देहासी विटाळ म्हणती सकळ ...

मी शहरी, सुशिक्षित कुटुंबात आणि खूपच प्रिविलेज्ड वातावरणात वाढले आहे. त्यामुळे पाळीसंदर्भातल्या अंधश्रद्धांच्या अनुषंगाने येणारे अनुभव माझ्यापाशी फारसे नाहीत. (अर्थात, सुशिक्षित समाजात अंधश्रद्धा नाहीत असे मला मुळीच म्हणायचे नाही!) अनेक अशा घटना वाचल्यानंतर आपण फारच सुखी आहोत, हे वाटल्याशिवाय राहात नाही. मी कुठलाच देवधर्म, कुळाचार पाळत नाही. माझ्या माहेरी आणि सासरी धार्मिक वातावरण नाही. त्यामुळे मुलगी अथवा सून म्हणून मला काहीच 'नियम' पाळावे लागलेले नाहीत. असे जगणे सगळ्याच मुलींना शक्य नसते हेही मी जाणते. त्यामुळे मला कृतज्ञ वाटते, आणि लगेचच 'असं कृतज्ञ कशाला वाटायला हवं ' असेही वाटून जाते.. कारण सगळ्यांनाच आपल्याला हवं तसं जगण्याचा अधिकार आहे. परंतु यावर नंतर कधीतरी लिहीन. आज मात्र पाळीच्या अनुषंगाने आलेले दोन छोटे अनुभव शेअर करते.
१ .
'पाळी असेल तर पूजा करू नये, देवळात जाऊ नये' - हा जणू काही common sense आहे अशा थाटात स्त्रिया वागतात हे मी अनुभवलेले आहे. त्याला लगेचच काहीतरी शास्त्रीय पुरावा देऊन छद्मविज्ञानाचे विज्ञान कधी होते हे कळतही नाही. किंवा मग " जाऊ दे, कशाला भांडायचे एवढ्याशा कारणासाठी' असा एक विचार असतो. माझ्या एका अत्यंत 'मॉडर्न ' पोशाख करणाऱ्या, इंग्रजी बोलणाऱ्या मैत्रिणीला मी गणपती उत्सवाच्या आसपास स्टेशनवर भेटले. 

बोलता बोलता ती सहज बोलून गेली, की "खरंतर फुलं आणि आरास करण्यासाठीचे सामान आणायला जायचे होते, पण काल पिरेड्स आले. त्यामुळे मग आई म्हणाली आता राहूदे, मी बघते." मला आश्चर्य वाटले, कारण या आशयाचे बोलणे आमच्यात याआधी कधीही झाले नव्हते. मी तिला विचारलं, की 'तुला हे मान्य आहे का?' तिने खांदे उडवले आणि म्हणाली, की कधी यावर फार विचार केलेला नाही. "हे असंच असतं आमच्या घरात " ती म्हणाली. पाळीच्या दिवसांतला देवांबाबत असलेला सोवळेपणा हा common sense झाला आहे तो असा. ज्यावर ना प्रश्न विचारावेसे वाटत, ना कारणे शोधाविशी वाटत, ना आव्हान द्यावेसे वाटत. तुम्ही किती शिकलेले आहात, किती विचार करता, एरवी कशाचा पुरस्कार करता याने काहीही फरक पडत नाही. 'हे असेच असते' असं म्हटलं की झालं.
२ .
दुसरा अनुभव गमतीदार आहे. माझ्या लहान भावासाठी पाळी हा हसण्याचा, लाजण्याचा किंवा त्याज्य विषय नाही. माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी तो नेहमीच पॅड्स वगैरे खरेदी करत आला आहे. बायकांसाठी महिन्यातले चार दिवस कठीण असतात हे त्याला तो बऱ्यापैकी लहान असल्यापासूनच माहित आहे. एकदा अशीच एक 'इमर्जन्सी' आल्यावर तो माझ्यासाठी पॅड आणायला मेडिकल स्टोरमध्ये गेला. त्याला पॅडचे पाकीट द्यायला तिथला मुलगा भयंकर लाजायला लागला. कदाचित एक टीनएजर मुलगा पॅड कशाला विकत घेतोय , याचे त्याला आश्चर्य वाटत होते. आधी लक्षच देत नव्हता.'रायटींग पॅड यहा नही मिलेगा ' अशी काहीतरी हास्यास्पद उत्तरे दिली. शेवटी माझ्या भावाने दुकानातल्या काचेच्या कपाटात ठेवलेल्या पॅकेट्सकडे बोट दाखवले. लाजत लाजतच त्याने पिशवीत भरून दिले. नंतर माझा भाऊ हसत हसत हा प्रसंग मला सांगत होता.
Lovehandlecomics

मला एकदम आठवली ती आमची शाळा, जिथे फक्त मुलींना पाळीची माहिती दिली गेली होती. मुलांपासून पॅड लपवत लपवत आम्ही वर्गात आलो होतो, आणि मुलगे त्यामुळे अर्थातच कुतूहलमिश्रित थट्टा करत होते. कुठल्याही शिक्षकाला यात काहीही गैर वाटले नव्हते. किंवा त्या मुलांनाही व्यवस्थित माहिती देण्याचा विचार कोणीही केला नाही. आता त्यातील बऱ्याच मुलांची लग्नेही झालेली आहेत. शहरी, सुशिक्षित आणि प्रिविलेज्ड वातावरणातल्या या सगळ्यांना पाळीसंदर्भात कुठल्याही अंधश्रद्धा, लाज अथवा गैरसमजुती नसतील अशी मी आशा करते. 
#आतामाझीपाळी #menstrualhygiene#MHDay2023  


गायत्री लेले

प्राध्यापक,
मुंबई विद्यापीठ  


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form