कुजबूज


पाळीची तजवीज म्हणून

नेहमीच जाते मेडिकल स्टोअरमध्ये

तोंडावरचा स्टोल बाजूला न करता अस्पष्टशा दबक्या आवाजात

तिथे काम करणा-या बाईला कुजबुजत म्हणते,

'एक व्हिस्पर द्या'

त्या बाईच्या कानी शब्दही पोहचलेले नसतात,

पण बाई उठतात, 

शेल्फमधल्या खालच्या कप्प्यातला पॅकेट काढतात

कारण बाईच्या अंगवळणी पडलेलं असतं

माझ्यासारख्या अनेक बाया, पोरींचं हे कुजबुजणं

बाई शेजारच्या पुरुषांची अन्

इतर गि-हाईकांची नजर चुकवून

पेपरमध्ये व्यवस्थित पॅक करून

ते पॅकेट सराईतपणे

काळ्या कॅरीबॅगमध्ये टाकतात

अन् गुपचूप सरकवतात माझ्यापुढे

तरीही समजतंच आजूबाजूच्या पुरुषांना

कारण त्यांचे कान ऐकत असतात दबके आवाज

नाक घेत असतं हवाहवासा वास

डोळे नेहमीप्रमाणेच शोधत असतात शिकार

त्यांचं ते माझ्याकडे बघून मिष्कील हसणं,कुजबुजणं

लचके तोडत राहतं माझे

मी स्वतःलाच विचारत राहते

माझा गुन्हा काय?

तसं हेदेखीलअंगवळणीच पडलंय आता;

मला आठवतीये लेडीज कर्मचारी असणारं

मेडिकल शोधण्यासाठी केलेली पायपीट

अन् मैत्रिणीचं बोलणंही

"अग, एकदाच मॅालमधून वर्षभरासाठी घेऊन यायचे

पुन्हा कटकटच नाही"

आठवतीये तिने अशा प्रसंगातून करून घेतलेली सुटका

आणि त्याचं कारणही

अन् आज मेडिकलमधली

ओळखीची बाई नसताना

नाईलाजाने पुरुषाकडे मागितलेलं व्हिस्पर

'एक व्हिस्पर द्या'

त्याला ऐकायला गेलेलं असतानाही

त्याची न ऐकल्याची प्रश्नार्थक खूण,

अन् पुन्हा मुद्दाम विचारणं,

'काय पाहिजे?'

अन् माझ्या मनदेहावर साचत चाललेली कानकोंडेपणाची काजळी

तरीही मी जरा जोरातच म्हटलं, "व्हिस्पर पाहिजे"

तेव्हा त्यानं सोबत्याला हळूच मारलेला डोळा चुकत नाही माझ्या नजरेतून

मग तो माझा खालून वरपर्यंत एक्स-रे काढत

ते पॅकेट कागदात गुंडाळून देऊ लागतो.. .                    


तेव्हा त्याला मी म्हणते खणखणीत आवाजात,

"गरज नाही त्याला आवरणाची    

असाच द्या...

मला नाही वाटत लाज याची

तुम्हाला वाटतेय का?"    

तरी अंगवळणी पडलेलं कोडगेपण मिरवत बेरकीपणे हसतो तो फक्त. 

सॅनिटरी नॅप्किन

पाळीसाठी वापरायची वस्तू

पाळी म्हणजे योनीशी निगडित नैसर्गिक प्रक्रिया

अन् योनी म्हणजे लिंगाच्या उपयोगाचा बाईच्या शरीराचा भाग

याच साखळीला धरून युगांतरापासून लोंबकळतोय वासनेनं बरबटलेला पुरुष

म्हणूनच त्याला त्या नॅप्किनमध्येही दिसत असावी योनी

संभोगशिल्पालाही आकार आला असावा त्याच्या मनात

त्यामुळेच तो पाहत असावा माझ्याकडे भोगण्याच्या लालसेने

शिल्पाला सत्यात उतरवणा-या

या शिल्पकाराच्या स्वप्नात

शिलाखंड होऊन डोकवायचीही

मला भीती वाटते          

#आतामाझीपाळी #menstrualhygiene#MHDay2023                                           


कवयित्री - प्रज्ञा सुधाकर भोसले





Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form