मातृत्व, आधुनिक तंत्रज्ञान आणि पितृसत्ता

प्रियंका चोप्राने सरोगसी तंत्रज्ञानाचा उपयोग करून मूल जन्माला घातल्याची बातमी जेव्हा प्रसिद्ध झाली, त्यानंतर त्या घटनेवर बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. बहुतेक लोकांनी प्रियंकाचं अभिनंदन केलं होतं तर काहींनी तिच्यावर टीका केली होती. त्यापैकी तसलीमा नसरीन यांची प्रतिक्रिया मला धक्कादायक वाटली होती. त्यांनी ट्विटर मेसेजेस मध्ये सरोगसीद्वारे जन्माला आलेल्या बाळाला ‘रेडिमेड बेबी’ म्हटलं होतं आणि अशा बाळाविषयी आईला कितपत प्रेम वाटत असेल, अशी शंका उपस्थित केली होती. एखाद्या व्यक्तीने नऊ महिन्यांचा शारीरीक, मानसिक त्रास सहन केल्याखेरीज त्या व्यक्तीला स्वत:च्या गुणसुत्रांतून तयार झालेल्या बाळाविषयी माया वाटू शकत नाही – असं तसलीमा सुचवत होत्या! अशा प्रतिक्रियेबद्दल त्यांच्यावर टीका होऊ लागली, तेव्हा सारवासारव करताना त्यांनी सांगितले की – ती टिप्पणी प्रियंका ह्या व्यक्तीसाठी नसून सरोगसी तंत्रज्ञानामुळे जनरली होणाऱ्या गरीब महिलांच्या पिळवणुकीकडे त्यांना लक्ष वेधायचे होते ज्यांना मुलांची इतकी हौस असेल त्यांनी मुलं दत्तक घ्यावीत – असंही त्यांनी लगेच सुचवले होते. पण दत्तक बाळदेखील एकप्रकारे ‘रेडिमेड बेबी’च असते! मग दत्तक आयांनाही आपल्या बाळाबद्दल प्रेम नसतं - असं त्यांना वाटतं का? तर तसं नाहीये - दत्तक बाळांचे संगोपन करणाऱ्यांच्या विषयी मात्र तसलीमाने काहीच शंका घेतलेली दिसत नाही. वर्षानुवर्षांपासून अनेक लोक मुलं दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करत आलेली आहेत. त्यामानाने सरोगसीचे तंत्रज्ञान केवळ काही दशकांइतके नवे आहे –कदाचित त्यामुळे देखील ही शंका उपस्थित केली असावी!

सरोगसी तंत्रज्ञानाविषयी अनेक नैतिक आक्षेप घेतले जातात. यामध्ये तंत्रज्ञानावरच्या अविश्वासाचा जितका भाग आहे, तितकाच किंवा त्याहून जास्त पितृसत्तेने लादलेल्या भूमिकांच्या नैसर्गिकीकरणावरील गाढ विश्वासाचा देखील भाग आहे. मातृत्व म्हणजे बाळ जन्माला घालणे आणि पुढे जन्मभर त्यांचे पालनपोषण आणि मुख्य म्हणजे त्याच्यासाठी त्याग करत राहणे – हे सर्व जणूकाही “नैसर्गिक” आहे – असे आपल्या मानसिकतेत आता घट्ट बसलेले आहे. त्यामुळे मातृत्वाशी जोडलेल्या जैविक आणि सामाजिक कामांमध्ये फरक करणंच आपण विसरून गेलेलो आहोत. गर्भाशय असलेली व्यक्ती नऊ महीने आपल्या उदरात बाळाला वाढवते, पोषण देते, अनेक वेदना सहन करून बाळ जन्माला घालते आणि नंतरही काही दिवस आपले स्तन्य त्या बाळाला देते – ही झाली मातृत्वाची जैविक प्रक्रिया, जी निसर्गदत्त जडणघडणीशी जोडलेली आहे. त्याव्यतिरिक्त बाळाची शी-शू काढणे, आजारपण निभावणे, बाळावर ‘संस्कार’ करणे, अभ्यास घेणे, जेवणखाण, भावनिक गरजा पुरवणे - ह्या सगळ्या कामांना सामाजिक मातृत्व म्हणता येईल. मुलाच्या सामाजिकरणाशी जोडलेल्या ह्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी व्यक्तीच्या शरीरात गर्भाशय असण्याची काही गरज नसते. तरीही या सगळ्या कामांचा भारदेखील पारंपरिक रीतीने जैविक मातृत्व निभावणाऱ्या ‘आई’ ह्याच व्यक्तीवर ढकलला जातो. जैविक आणि सामाजिक जबाबदाऱ्या दोन्ही एकाच व्यक्तीने पार पाडणे – हे जणूकाही ‘नैसर्गिक’च आहे आणि तेही “नैसर्गिक स्त्रावांमुळे” आपोआप करता येते – असे पितृसत्ताक समाजात भासवले जाते. मातृत्वामधल्या ‘त्याग’ ह्या पैलूचा गौरव करण्याच्या संस्कृतीमुळे आई देखील मानव आहे आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीप्रमाणेच तिलाही मानवी गरजा आहेत हे सत्य पुसूनच टाकले जाते. ही गैरसमजूत आपल्या डोक्यात इतकी भिनलेली आहे की त्यामुळे मूल जन्माला घालणाऱ्या व्यक्तीला विकासाच्या अनेक संधीपासून वंचित राहावे लागतेय, कुटुंबावर / जोडीदारावर अवलंबित जीवन जगावे लागते – याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेकदा महिलांनी करिअर आणि मातृत्व यापैकी एकच पर्याय निवडणे अपेक्षित असते. इंद्रा नूयी, ज्वाला गुट्टा यांच्या सारख्या विविध क्षेत्रातल्या अनेक कर्तबगार महिलांच्या मुलाखती मधून देखील हेच दिसून येते. मूल ही आईच्या आयुष्यातली एकमेव सर्वोच्च महत्त्वाची बाब असली पाहिजे असे गृहीत धरले जाते आणि स्त्रीसाठी इतर सर्व काही कमी महत्त्वाचे होऊन बसते. स्त्रीला ‘आई’ ह्या ओळखी व्यतिरिक्त इतर काही आयडेंटिटी असण्याची गरजच नाही – असे मानले जाते. किंबहुना त्यामुळे तिचे जे वैयक्तिक नुकसान होते, त्याचे गौरवीकरणही केले जाते. जैविक मातृत्व आणि सामाजिक मातृत्व या दोन्ही संकल्पनांचे एकत्रीकरण करणे – पितृसत्तेला सोयीचे आहे. 

त्याग आणि मातृत्व हे दोन्ही जणू समानार्थी शब्द आहेत, 

असं आपली संस्कृती आपल्याला सांगते. 

पण हा त्याग करणं ही तिची स्वत:ची निवड नसते 

तर पितृसत्ताक संस्कृतीने तो आईच्या माथी मारलेला असतो!

‘मुलांवर आईच संस्कार करू शकते’, ‘स्त्रियांनी मुलांचे संगोपन करायचे असते म्हणून त्यांनी नोकरी-व्यवसाय करू नये’ – अशा मतांचा प्रसारप्रचार करून स्त्रीच्या दुय्यमत्वाला मजबूती दिली जाते. अगदी डॉ ह.वी.सरदेसाई यांच्यासारखे सुप्रसिद्ध तज्ञ देखील ‘घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती’या पुस्तकामध्ये म्हणतात, “निसर्गसिद्ध शरीरशास्त्रानुसार आईच आपल्या अपत्याचं संगोपन व बुद्धिसंवर्धन अधिक चांगल्या प्रकारे करू शकते. आपलं मूल चांगलं व्हावं, हुशार व्हावं, शहाणं व्हावं अशी इच्छा असेल तर बाळासाठी आईनं किमान तीन वर्षं तरी द्यायला हवीत आणि हेही लक्षात ठेवायला हवं की मुलाला पहिल्या सहा ते आठ वर्षांपर्यंत आईच्या सहवासाची नितांत गरज असते.” अशा मतांमुळे ह्या पितृसत्तेला विज्ञानाचा आधार आहे – अशी कल्पना दृढ होते. त्याखेरीज नाटक – सिनेमा – टीव्ही सिरिज – कथा - कादंबऱ्या – कविता - गाणी – अशा प्रसारमाध्यमातून देखील मातृत्वाचे आणि पर्यायाने आईच्या त्यागाचे गोडवे गायले जातात. कारण त्याग आणि मातृत्व हे दोन्ही जणू समानार्थी शब्द आहेत, असं आपली संस्कृती आपल्याला सांगते. पण हा त्याग करणं ही तिची स्वत:ची निवड नसते तर पितृसत्ताक संस्कृतीने तो आईच्या माथी मारलेला असतो! जर तुम्हाला माझं हे विधान अतिरेकी वाटत असेल तर तुम्ही प्रामाणिक निरीक्षण करून सांगा - आपल्या समाजात बहुसंख्य महिलांना ‘आई’ व्हायचं की नाही – याचा जाणीवपूर्वक निर्णय घ्यायला काही वाव तरी असतो का? ‘लग्नानंतर एका वर्षात पाळणा हलला पाहिजे’ – अशी ग्रामीण भागात तरी उघड सक्तीच असते! तसं झालं नाही तर बाईवर दडपण आणायला सुरुवात होते. शहरी भागात देखील लग्नानंतर दोन-तीन वर्ष मूल झालं नाही तर – ‘आता पुरे झालं तुमचं प्लॅनिंग’ असं जोडप्याला दटावलं जातं. पण एखाद्या लग्न न झालेल्या बाईने स्वत:च्या रक्तमासाचं मूल जन्माला घालायचं ठरवलं तर? तर अशावेळी समाज तिच्या निर्णयाचं आनंदाने स्वागत करतो का? तिला समाजात मानसन्मान मिळतो का? डोहाळेजेवणा सारखे लाडकोड तिच्या वाट्याला येतात का? उलट तिच्या वाट्याला प्रचंड हेटाळणी येते. तिचं मातृत्व लांछनास्पद ठरवलं जातं. कारण मातृत्व हे जोपर्यंत समाजमान्य विवाहच्या चौकटीच्या आत असेल - तोपर्यंतच त्याचं कौतुक, पावित्र्य, उदात्तपणा इ. मानलं जातं. एकीकडे लग्न झालेल्या बाईवर ‘आई’ होण्याची सक्ती असते आणि तशीच लग्न न झालेल्या बाईवर मूल होऊ न देण्याची सक्ती असते. पण वैवाहिक चौकटीच्या बाहेर मूल जन्माला येऊ नये – यासाठी जर काळजी घ्यायची असेल तर तिला गर्भनिरोधनाची साधनं किंवा त्याविषयीची माहिती देखील उघडपणाने सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. म्हणजे केवळ मातृत्वच नव्हे तर बाईची लैंगिकता देखील समाजमान्य विवाहाच्या खुंटीला टांगलेली असते! किमान आपल्या देशात तरी मूल केव्हा होऊ द्यायचं, होऊ द्यायचं की नाही, स्वत:ला किती मुलं व्हावीत हे ठरवायचा अधिकार लग्न झालेल्या बहुसंख्य बायकांना मिळू दिला जात नाही. बाईने शक्यतो मुलगाच जन्माला घालावा किंवा किमान एकतरी मुलगा झालाच पाहिजे अशी तिच्याकडून अपेक्षा केली जाते.

‘चांगली आई’ आणि ‘वाईट आई’ असण्याचे निकष

 बाईच्या पुरुषाशी असलेल्या नात्यावर अवलंबून असतात. 

एकीकडे जन्मदात्रीच्या त्यागाचे, कष्टाचे म्हणजेच पर्यायाने मातृत्वाचे प्रचंड गोडवे गायले जातात;आणि त्याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे मूलबाळ नसलेल्या महिलेला धार्मिक, सामाजिक समारंभातून वगळले जाते, दूषणे दिली जातात, अपवित्र समजले जाते – कधीकधी तर वंशाला दिवा दिला नाही म्हणून घरातून हाकलून लावलं जातं किंवा जीवदेखील गमवावा लागतो. नवर्‍यातल्या शारीरिक कमतरतेमुळे मूल होत नसेल तरी दोष बाईलाच दिला जातो! मूल नसलेल्या बाईवर ‘चेटकीण’ असल्याचे आरोप करून बहिष्कृत केले जाते. एवढंच नाही तर विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत अशा कुठल्याही प्रकारच्या एकल आईलासुद्धा समाजातून कसलीही मदत किंवा सहानुभूती मिळत नाही. एकल मातांना तर समाजाच्या पाठिंब्याची जास्त गरज असते पण त्याऐवजी तिची आणि तिच्या मुलांची सुद्धा कुचेष्टा केली जाते, अडवणूक केली जाते आणि शक्य तितका त्रासच दिला जातो. कारण ‘चांगली आई’ आणि ‘वाईट आई’ असण्याचे निकष बाईच्या पुरुषाशी असलेल्या नात्यावर अवलंबून असतात. आपल्या देशात किमान ४५०लाख एकल आया आहेत. ४५० लाख हा आकडा मी कुठून आणला? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. तर त्याचं उत्तर असं आहे की UNwomen च्या २०१९-२० च्या सर्वे नुसार भारतामध्ये १३० लाख कुटुंबं एकल महिला चालवतात. त्याखेरीज ३२० लाख एकल आया इतर नातेवाईकांच्या आश्रयाने राहतात. (ज्या बायकांना आपल्या मुलांची कस्टडी मिळालेली नसते – अशांचा तर या आकडेवारीत समावेशच नाही.) पण अशा किमान ४५० लाख महिलांना वर्षानुवर्ष सातत्याने वाळीत टाकून,बदनामी करून, संशय घेऊन त्रासच देत असतो. जेव्हा Mother’s Day ला मातृत्वाची कौतुकं समाजमाध्यमावर केली जातात, तेव्हा ह्या साऱ्या वास्तवाला सोयीस्कर बगल दिली जाते. मुळात मातृत्वाचे कौतुक एखाद्या दिवसांपुरतंच करणं पुरेसं नाहीये. मातृत्वा विषयीच्या पारंपरिक धारणा मुळापासून बदलायची गरज आहे! सरोगसी तंत्रज्ञानामुळे काही प्रमाणात तरी हा बदल करायची शक्यता निर्माण झाली आहे. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे – जैविक आणि सामाजिक मातृत्व एकाच व्यक्तीने निभावले पाहिजे – अशी तथाकथित नैसर्गिक गरज ह्या तंत्रज्ञानामुळे नाहीशी होऊ शकते! ज्या व्यक्तीला मूल वाढवण्याचं ‘सामाजिक मातृत्व’ पार पाडायची इच्छा असेल तिच्याकडे सक्षम गर्भाशय असायला पाहिजे – याची गरज देखील ह्या तंत्रज्ञानाने मोडीत काढली आहे. नऊ महीने गर्भाचे पोषण करायची, त्यासाठी होणाऱ्या शारीरिक, मानसिक उलथापालथी आणि गैरसोयी सहन करण्याची आणि प्रसूतीवेदना सहन करायची जबाबदारी एखाद्या सक्षम महिलेकडे सोपवता येऊ शकते. एकप्रकारे जैविक मातृत्व outsource करता येऊ शकते. मग जन्माला आलेल्या बाळाचे संगोपन निराळीच व्यक्ती करू शकते. मी इथे ‘व्यक्ती’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे – कारण सामाजिक मातृत्व पार पाडण्यासाठी जैविक दृष्ट्या “स्त्री’ असायची देखील गरज नसते. पुरुष किंवा ट्रान्सजेंडर व्यक्ति देखील ते करू शकते. थोडक्यात, जैविक आणि सामाजिक मातृत्वाची सांगड घालण्याला ‘नैसर्गिक’ म्हणायची आवश्यकता उरत नाही. ज्यांना जैविक मातृत्व पार पाडणे शारीरिकदृष्ट्या शक्य आहे – अशा व्यक्ती ज्यांना ते शक्य नसेल त्यांच्यासाठी मदत म्हणून किंवा व्यावसायिक सेवेच्या रूपात देखील हे काम करू शकतात. गेल्या काही वर्षांपासून त्याचा फायदा शारीरिक कमतरता असलेल्या व्यक्तींना, जैविक मातृत्व करायची इच्छा नसलेल्या व्यक्तींना किंवा गे-लेस्बियन जोडप्यांनाही होतो आहे. ज्यांना जैविक प्रक्रिया पार पाडल्या नंतरचे सामाजिक मातृत्व सुरू ठेवण्यात रस नाही, त्यांची त्या जबाबदारीतून सुटका होऊ शकते. अशाप्रकारे जैविक मातृत्वाची प्रेम, त्याग, विवाहबंधन यांच्या चौकटीतून मुक्तता होऊ शकते आणि विशिष्ट शारीरिक क्षमतेवर आधारित एक काम म्हणून ‘जैविक मातृत्व’ प्रस्थापित होऊ शकते. म्हणूनच हे तंत्रज्ञान एकप्रकारे पितृसत्तेच्या डोलाऱ्याला धक्का देखील देऊ शकते. विज्ञान-तंत्रज्ञान हे काही एखाद्या निर्वात पोकळीत अस्तित्वात येत नसते. तंत्रज्ञान देखील मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. विज्ञानातील नवनव्या शोधांमुळे मानवी व्यवहार बदलत जातील, तशा अनेक पारंपरिक धारणा मोडित निघणे अनिवार्य असते. सरोगसी तंत्रज्ञानामुळे मातृत्वासंबंधीच्या पारंपरिक धारणा मोडीत निघण्याची किती शक्यता आहे ते बघूया.

मातृत्वासंबंधी जगात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पारंपरिक धारणा असतात, त्या सर्वांचा इथे विचार करणं शक्य नाही. पण ‘मीडियावॉच’च्या संपादकांनी दिलेल्या टिपणामध्ये काही धारणांचा उल्लेख होता, तेवढ्या तरी तपासून पाहायचा आपण प्रयत्न करूया.
मातृत्त्वाबाबतची एक महत्त्वाची कल्पना म्हणजे – ‘नऊ महिने पोटात बाळ वाढविणाऱ्या आणि प्रसूतीदरम्यान प्राणांतिक वेदना सहन करणाऱ्या बाईला नवजात बाळाबद्दल वात्सल्य आणि प्रेम उफाळून येतं.’ - ही एक फारच लोकप्रिय धारणा आहे. पण वास्तवात निरनिराळ्या परिस्थिती मधल्या महिलांच्या वाट्याला जे मातृत्व येत असतं, ते नेहमीच सुखकारक आणि अभिमानास्पद नसतं. जेव्हा महिलांवर अनेक अप्रिय सांस्कृतिक, सामाजिक कारणांमुळे मातृत्व लादलं जातं, त्याना मूल नकोसंही वाटू शकतं! उदा. बलात्कारातून जन्माला आलेल्या बाळाविषयी आईला प्रेम वाटणं जरा अवघडच आहे, तसंच एखादी महिला जर कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करत असेल आणि घर सोडायचा विचार करत असेल तर अशा काळात देखील तिला गर्भधारणा होणं म्हणजे एक प्रकारे जास्तीच्या जबाबदारीचं ओझं वाटू शकतं. अनेकदा अशा अवघड परिस्थितीच्या कात्रीत सापडलेल्या स्त्रियांना गर्भपात करून घ्यायचा असतो. पण “गर्भपात हे पाप आहे” – असं जिथे समजलं जातं अशा समाजात स्त्रियांचा गर्भपाताचा हक्क नाकारला जातो. कधी त्यात कायद्याचे अडथळे येतात, तर कधी वैद्यकीय व्यवसायात असलेल्या लोकांचा किंवा पोलिसांचा आडमुठेपणा कारणीभूत ठरतो. त्यामुळे अशा स्त्रीच्या वाट्याला येणारं मातृत्व हे तिला नकोसं वाटू शकतं. जर एखाद्या स्त्रीला अशी कारणं नसताना देखील मुलांच्या संगोपनात रस नसेल तर? तर तिला ‘चांगली’ बाई मानले जात नाही!

त्याशिवाय मूल नकोसं वाटण्याचं एक महत्त्वाचं कारण असतं – प्रसूती नंतर शरीरातल्या नैसर्गिक स्त्रावांमध्ये होणारे बदल! बाळाला जन्म दिल्यानंतर, आईच्या शरीरातल्या संप्रेरकांची पातळी बदलते, त्यामुळे तिच्या मूडवर परिणाम होतो. कधीकधी ती खूप उत्साहात असते तर कधी तिला विनाकारण रडू कोसळतं. शिवाय नवजात बाळ देखील रात्री सतत जागं होत रहातं, त्याला पाजावं लागतं, इतर काळजी घ्यावी लागते. म्हणूनही आईला पुरेशी झोप मिळत नाही आणि चिडचिड होऊ शकते. आई नव्या जबाबदारी विषयी काळजीत असते आणि त्याचाही तणाव असतो. नव्याने आई झालेल्या ८०% महिलांना प्रसूती नंतर दोनतीन दिवसांत खूप दडपण येतं, नैराश्य येतं. तिचे मूड्स बदलत राहतात, त्यामुळे त्या अगदी जेरीस येतात. ह्या अवस्थेला ‘बेबी-ब्ल्यूज्’ असं म्हणतात. अनेकदा ही केवळ तात्पुरती अडचण असते. बहुतेकवेळा दोनतीन आठवड्यात ही लक्षणं आपोआप कमी होत जातात. मात्र १०% महिलांच्या बाबतीत ही मानसिक अवस्था जरा जास्त गुंतागुंतीची असते. अशा परिस्थितीत स्वतःला किंवा बाळाला इजा पोहोचवली जाण्याची शक्यता असते. जर नैराश्य जास्त असेल तर आत्महत्येचे विचारही मनात येऊ शकतात. साधारणत: १००० महिलांपैकी एकीला असा त्रास होण्याची शक्यता असते – असं वैद्यकीय आकडेवारी सांगते. इतक्या मोठ्या संख्येने जगभरातल्या महिलांना हा त्रास होत असूनही त्याची पुरेशी दखल घेऊन त्याबाबत जाणीवजागृती केली जात नाही. जे डॉक्टर्स नव्याने आईबाबा होणाऱ्यांसाठी प्रसुतीपूर्व कौशल्य आणि माहिती देण्याचे वर्ग चालवतात – तेदेखील ह्या विषयी काही माहिती देत नाहीत. स्वतःच्या रक्तामासापासून जन्माला आलेल्या पोटच्या गोळ्याबाबत आपोआप फक्त माया आणि प्रेमच उद्भवते – ही धारणा डॉक्टर मंडळींमध्ये देखील खोलवर रुजलेली आहे. ही धारणा लवकरात लवकर बदलली पाहिजे. ‘आई’ देखील मनुष्यप्राणी आहे – तिला वात्सल्याशिवाय इतरही भावभावना असतात, तिला मानसिक आधाराची जास्तच गरज असते – ही जाणीव रुजवायला डॉक्टर मंडळीनी जास्त मदत करायला पाहिजे. पालकत्वाची जबाबदारी निभावण्यात आई आणि बाबा दोघांचाही सारखाच सहभाग असायला पाहिजे – हे डॉक्टरांनी सांगितलं तर कदाचित सहज पटायला मदत होईल.

स्त्रियांचे समाजीकरण (socialisation) पुरुषांपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने घडते आणि कुटुंबातल्या लोकांची सेवासुश्रूषा करणे, काळजी घेणे असे तथाकथित ‘स्त्रीविशेष गुण’ मुलींनी आत्मसात करावेत यावर लक्ष केंद्रित केले जाते. खरंतर हे गुण स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये रुजवले जाऊ शकतात. पण स्त्रियांचे समाजीकरण करताना, त्यांची भविष्यातील ‘मातांची’ भूमिका लक्षात घेऊन त्यांच्यावर संस्कार केले जातात. याचं अगदी सर्वत्र दिसणारं उदाहरण म्हणजे लहान मुलींना खेळण्यासाठी बाहुली आणली जाते आणि लहान मुलग्यांना मात्र बाहुली अजिबात दिली जात नाही. 
मातृत्वाबाबत महिलांवर खूप सामाजिक दडपण असते. मुलांच्या अपयशासाठी आईलाच दोष दिला जातो. खरं म्हणजे मुलांचं संगोपन ही एकट्यादुकट्याचं कामच नव्हे! इंग्रजीत अशी म्हण आहे की - “It takes a village to raise a child” एखादी आई संगोपनाच्या सगळ्या जबाबदाऱ्या ‘आदर्श’ प्रकारे पाडू शकली नाही – म्हणून तिला दोष दिला जाणं अगदी चुकीचं आहे. संस्कार केवळ आईच्याच द्वारे होत नसतात, तर ते प्रसारमाध्यमे, शेजारपाजारचे लोक, परिसरातल्या घडामोडी यातून देखील होत असतात. समाजातल्या प्रत्येक घटकानेच आपल्या वागणुकीचा मुलांवर काय परिणाम होईल, त्याचा विचार करून वागायला पाहिजे. पण अनेकदा आई आणि बाबा एवढ्या दोन माणसांत देखील संगोपना बद्दल पुरेसा संवाद नसतो आणि एकवाक्यता देखील नसते. बाबांचा संगोपनात सहभाग असलाच तर तो बऱ्याच अंशी गमतीजमती पुरताच मर्यादित रहातो. आणि खस्ता काढण्याची, कष्टाची कामं आईच्या वाट्याला येतात. पालनपोषणाची मुख्य जबाबदारी आईवरच पडते. दुर्दैवाने भारतीय संदर्भात सह-पालकत्वाची संस्कृती जवळजवळ अदृश्यच आहे. एका अमेरिकन कंपनीने नुकत्याच केलेल्या जागतिक सर्वेमध्ये भारतातल्या 80% पुरुषांनी असे सांगितले आहे की मुलांची दुपटी बदलणे, मुलांना आंघोळ घालणे आणि जेवण भरवणे ही सगळी बायकांची कामं आहेत! अजूनही पुरुषाने पैसे कमवायचे आणि बायकांनी चूल-मूल सांभाळायचे – हीच आपली पारंपरिक कामांची विभागणी आहे. अशा मानसिकतेमुळे बहुसंख्य महिलांची प्रचंड शारीरिक आणि मानसिक ओढाताण होते. विशेषत: नोकरी करणाऱ्या महिलाना तर याचा खूपच त्रास होतो. राष्ट्रीय सर्वेक्षणात ३५% महिलांनी सांगितलेलं आहे की त्यांना घराबाहेर पडून पैसे मिळवण्याची इच्छा आहे. तरीही गेल्या काही वर्षापासून महिलांनी नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेकदा मातृत्वरजा द्यावी लागेल ह्या भीतीपोटी स्त्रियांना नोकरीच दिली जात नाही. सहा महिन्यांची मातृत्वरजा संपल्यावर अनेक महिला नोकरी आणि आईपणाच्या दुहेरी जबाबदाऱ्यांनी त्रासून जातात. अनेकजणीना घरकामाच्या ओझ्यामुळे किंवा मुलांची काळजी घ्यायला पळणाघरा सारख्या पुरेशा सोयी नाहीत म्हणून नोकरी सोडावी लागल्याचे अनेक सर्वेक्षणातून दिसून आले आहे. थोडक्यात पितृसत्ताक समाजाने महिलांवर टाकलेल्या दडपणामुळे देशाच्या श्रमशक्ती मधला स्त्रियांचा सहभाग आक्रसला आहे. जर स्त्रियांचा सहभाग पुरुषांइतका वाढला तर देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न तब्बल ६० टक्क्यांनी वाढेल, असं मॅकिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूट ह्या आंतरराष्ट्रीय पाहणी संस्थेचे मत आहे. पण यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. स्वीडन आणि फीनलंड या दोन्ही देशांनी स्त्री-पुरुष समता बऱ्याच प्रमाणात प्रत्यक्षात आणलेली आहे. जेंडर गॅप इंडेक्स मध्ये ह्या दोन्ही देशांचा क्रमांक पहिल्या पाचात आहे. ह्या देशांमध्ये जोडप्याला एकत्रितपणे पालकत्व रजा देण्यात येते. त्यादोघांनी एकमेकांच्या सोयीने ही रजा आपसात वाटून घ्यावी अशी त्यामागची कल्पना असते. जेंडर गॅप इंडेक्स नुसार १४६ देशांमध्ये आपल्या देशाचा १३५ वा क्रमांक आहे.
आपल्या देशात पुरुषांना पालकत्वाची रजा किती ठिकाणी मिळते? सध्या भारतात फक्त केंद्रीय कर्मचार्यांनाच 15 दिवसांची पितृत्वरजा मिळू शकते. खासगी कंपन्यांवर अशी रजा देण्याचे कुठलेच बंधन नाही. तरीही मायक्रोसॉफ्ट, zomato, Ikea अशा काही कंपन्या भारतातही पितृत्वरजा देऊ करत आहेत. पण अनेक पुरुष त्या रजेचा लाभ घेत नाहीत असे दिसते. कदाचित, कामाच्या ठिकाणच्या स्पर्धेत मागे पडण्याची त्यांना भीती वाटत असेल किंवा समाजातून होणाऱ्या टीकेची काळजी वाटत असेल. एखाद्या पुरुषाने आवर्जून बाळाच्या संगोपनासाठी वेळ काढायचे ठरवले – तर भारतात त्याला समाजाकडून पाठिंबा मिळतो का? 
विराट कोहलीचे उदाहरण लक्षात आहे ना? खरंतर विराट कोहलीने आपल्या पहिल्या बाळाच्या आगमनाच्या वेळी आपल्या बायकोसोबत राहायचं ठरवलं, तेव्हा त्याने तरुण पालकांच्या समोर एक आदर्श उभा केला म्हणून त्याचं कौतुक व्हायला हवं होतं. पण ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातली पहिली मॅच आटपल्यावर आधीच मंजूर झालेली पितृत्वरजा घेऊन मायदेशी परतणाऱ्या कोहलीवर मात्र टीकेचा भडिमार झाला. त्याउलट, महेंद्र धोनीने अशाच परिस्थितीत कुटुंबापेक्षा खेळाला (देशाला?) महत्त्व दिले होते – म्हणून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला गेला होता. अशा परिस्थितीत कोहलीला कोण आदर्श मानणार? आणि तरुण पुरुष पालकत्वा साठी आवर्जून वेळ काढतील का?
महिलांवरील मातृत्वाच्या जबाबदाऱ्यांचा दबाव कमी करण्यासाठी जोडप्यामध्ये प्रभावी संवाद असण्याची आणि सहपालकत्वाची जाणीव असण्याची गरज आहे. काही नवीन जोडप्यांमध्ये त्याबद्दल थोड्याफार प्रमाणात जाणीव दिसते पण तरीही अजून हे चित्र फारच दुर्मिळ आहे. मुंबईतल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलने पालकांचा सर्वे केला होता. त्यात 4800 वडिलांनी सहभाग घेतला होता. त्यातील निष्कर्षातून असं दिसून आलं की 65% वडील मुलांच्या बरोबर रोज किमान दोन तास तरी वेळ घालवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. आपले मूल कुठल्या इयत्तेत आहे, त्याचे छंद इ. विषयी आजकालच्या बाबांना माहिती असते. म्हणजे एक प्रकारे मागच्या पिढीपेक्षा आजच्या पिढीतल्या पुरुष पालकांनी प्रगतीच केली आहे. तरीही संगोपनातील रोजच्या कामात मुलांच्या बाबांचा फारच कमी सहभाग असतो, अशीच बहुसंख्य महिला पालकांची तक्रार आहे. कारण फक्त 33% वडील घरगुती कामात किंवा मुलांना गोष्टी वाचून दाखवणे इ. कामात मदत करतात. 88% बाबा मंडळींना आईशिवाय मुलांना बाहेर घेऊन जाण्याचा आत्मविश्वास नसतो. याचा अर्थ आजही बालसंगोपनाचा बराचसा भार आईवरच पडतो. जागतिक पातळीवर झालेल्या अनेक अभ्यासातून असे लक्षात आलेले आहे की वडिलांनी पहिल्या तीन वर्षात मुलांच्या संगोपनात जास्त सहभाग घेतल्यामुळे मुलांच्या भावनिक आणि बौद्धिक क्षमतेवर सकारात्मक परिणाम होतात. त्याचसोबत वडिलांच्या मानसिक स्वास्थ्यावर देखील चांगले परिणाम होतात!
एखाद्या जोडप्याला मुलं झाली की त्यांच्या वैवाहिक जीवनातल्या अनेक समस्या सुटतील – असं मानलं जातं. तसं होत नाही -ही बाब अलाहिदा. परंतु, ‘मातृत्व’ म्हणजे स्त्रीजिवनाची ‘परिपूर्ती’ आहे – असे जितक्या प्रमाणात खोलवर रुजवलेले असते, तशी ‘पितृत्व’ ह्या संकल्पनेची जबरदस्ती पुरुषांवर केली जात नाही. बरेचदा स्त्रीची ओळख फक्त ‘आई’ असण्यापुरतीच मर्यादित राहते. तरीही, आईचे काम हे बिनमहत्त्वाचे आणि सोपे मानले जाते. वर्षातून एखाद-दोन दिवसांपुरते आईचे कौतुक मर्यादित असते. आईला त्यागमूर्ती मानले जाते. त्याग करण्याची क्षमता ही मातृत्वाची मोठी ताकद समजली जाते. पण त्यामुळे एक व्यक्ती म्हणून त्या स्त्रीचं नुकसान होत असतं. म्हणून असे उदात्तीकरण केले जाणे देखील बदलायला पाहिजे.
थोडक्यात 'मातृत्व' ही एक Patriarchal construct आहे, जसजशा महिला शिकायला लागल्या, समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ लागल्या, तसतसं पुरुषप्रधानतेचं गौडबंगाल त्यांना उमगायला लागलं. निवडीचे स्वातंत्र्य हवंसं वाटू लागलं आणि ते स्वातंत्र्य मिळवण्याची क्षमता त्यांच्यापैकी काहींच्या तरी हाती गवसली. कदाचित म्हणूनच उद्योग, Software, Glamour Industry आणि इतर महत्वाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला सरोगसीच्या माध्यमातून मुलं जन्माला घालण्याला प्राधान्य देऊ लागल्या असाव्यात. दिवसेंदिवस ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून मुलं जन्माला घालण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. सरोगसी तंत्रज्ञानामुळे मातृत्वाच्या पारंपरिक संकल्पनेमध्ये बदल होणे शक्य झाले आहे. ह्या तंत्रज्ञानाला आपण कशा पद्धतीने राबवणार आहोत, त्यावर यातून गरीब महिलांचे शोषण होईल की नाही – ते अवलंबून असेल. उदाहरणार्थ, गर्भजल चिकित्सा तंत्रज्ञान - गर्भाला काही जन्मजात रोग आहेत का – हे तपासण्यासाठी वापरायला सुरुवात झाली होती. परंतु, नंतर त्याचा दुरुपयोग करून लिंगनिवड केली जाऊ लागली. तसा ह्या तंत्रज्ञानाचाही गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय तंत्रज्ञानात देखील नवनवीन बदल होत आहेत. त्याचा व्यापारी उपयोग होऊ लागला आहे. म्हणजेच मूल जन्माला घालण्यासाठी बीजाण्ड पुरवणे, गर्भाशय भाड्याने देणे-घेणे ह्या व्यवहारात पैशांची देवाणघेवाण असणार आणि त्यात विकणारे, विकत घेणारे आणि दलाली करणारेही असतीलच. अशा व्यवहारात वंचित समूहांचे शोषण केले जाते – तसेच ह्या व्यवहारात देखील होण्याची शक्यता अजिबात नाकारता येणार नाही. म्हणूनच हे धोके लक्षात घेऊन त्या अनुषंगाने समाजाला काळजीपूर्वक धोरणे आखावी लागतील. त्याचसोबत सरोगसी द्वारे जन्माला येणाऱ्या मुलांच्याही शोषणा विषयी जागरूक रहावे लागेल. UNICEF ह्या मुलांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या जागतिक पातळीवरच्या संघटनेच्या म्हणण्यानुसार सरोगसीद्वारे जन्माला आलेल्या मुलांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येण्याचीही शक्यता असते. ही मुलं देखील पिळवणुकीला बळी पडू नयेत म्हणून आंतरराष्ट्रीय कायदे करतानाही जास्त जागरूकता बाळगावी लागेल. सरोगसीचे तंत्रज्ञान विषमता दूर करण्यासाठी वापरायचे की पिळवणुकीसाठी ते आपल्यालाच ठरवायचे आहे.
(हा लेख "मीडिया वॉच" 2022 - ह्या दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित झाला होता.)  

#surrogacy #surrogatemother #mothersdayspecial #mothersday 

वंदना खरे

संपादक, ‘पुन्हास्त्रीउवाच’

 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form