इनग्रिडची गोष्ट

ज्या दिवशी ती जन्मली, त्याच तारखेला तिचा मृत्यू झाला. खूप कमी लोकांबाबत असं घडतं. तिचा जन्म २९ ऑगस्ट १९१५चा आणि मृत्यू २९ ऑगस्ट १९८२चा. तिचं नाव इनग्रिड बर्गमन.

अपरं नाक, धनुष्याकृती भुवया, रुंद जिवणी, डाळिंबासारखी दंतपंक्ती आणि अर्थातच तिचं मिलियन डॉलर स्माईल. स्वच्छंद, बिनधास्त, मोहक, पण कमालीची बुद्धिमान अभिनेत्री. खरं तर माझी ती सर्वात आवडती अभिनेत्री. फॉर हूम द बेल टोल्स, स्पेलबाउंड, जोन ऑफ आर्क आणि ऑटम सोनाटा या चित्रपटांसाठी इनग्रिडचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचं नामांकन ऑस्करकरिता झालं. तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून दोन, तर सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री म्हणून एक ऑस्कर मिळालं. वॉल्टर ब्रेनन, जॅक निकल्सन, मेरिल स्ट्रिप, डियल डे लुईस आणि कॅथरीन हेपबर्न एवढ्यांनाच इतके ऑस्कर पुरस्कार लाभले. नायिकांचा विचार केला, तर इनग्रिड, मेरिल आणि कॅथरीन अशा तिघीच असा विक्रम करू शकल्या.

इनग्रिड म्हटलं की तिचा ‘कॅसाब्लांका’ आठवतोच. त्यातला नाझीविरोधी भूमिगत चळवळीचा नायक व्हिक्टर लाझ्लोच्या नॉर्वेजियन पत्नीची, लिसाची व्यक्तिरेखा तिने जिवंत केली आहे. नाझींच्या छळछावणीतून पळून जात असताना व्हिक्टर मारला गेला, असं तिला कळतं. त्यानंतर ती रिकच्या प्रेमात पडते. त्याच्याकडे लिसाची प्रेमपत्रं असतात. ती परत देण्यास रिक नकार देतो, तेव्हा ती पिस्तुल उगारून, त्याला मारण्याची धमकी देते. पण त्याचवेळी, मी तुझ्यावर अजून प्रेम करते, अशी कबुलीही ती देते...लिसाची ही व्यक्तिरेखा इनग्रिडने अगदी जिवंत केली होती. अशा या इनग्रिडने ‘माय स्टोरी’ ही आत्मकथा लिहिली आहे.
‘फॅसिनेटिंग, शी हॅज फॅब्युलस स्टोरी टू टेल’ अशा शब्दात या आत्मकथेचं कौतुक ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने केलं होतं. तर ‘क्लासी, कँडिड, एनर्जिटिक अँड चार्मिंग’ अशा प्रकारे ‘द बॉस्टन ग्लोब’ने त्याची प्रशंसा केली होती. इनग्रिडलिखित आत्मकथन हे खरोखरच एक जबरदस्त पुस्तक आहे.
इनग्रिडचा जन्म स्वीडनची राजधानी स्टॉकहोममधला. तिचे वडील स्वीडिश आणि आई जर्मन. १९३०च्या दशकात तिने स्वीडिश व जर्मन चित्रपटांतून अभिनय करण्यास आरंभ केला. तिच्या ‘इंटरमेझ्झो’ (१९३९) या चित्रपटाचा इंग्रजीत रिमेक झाल्यावर ती अमेरिकन प्रेक्षकांसमोर प्रथम आली. तेव्हाचे जगद्विख्यात निर्माते डेव्हिड सेल्झनिक यांनी तिच्यासमोर चार सिनेमांचं काँट्रॅक्टच ठेवलं. तेव्हा इनग्रिडने ते सात वर्षांचं काँट्रॅक्ट करण्यास सांगितलं. सेल्झनिकचा स्वतःचा स्टुडिओ होता. पण तो आला आर्थिक अडचणीत. तेव्हा त्याने इनग्रिडला इतर स्टुडिओजकडे ‘लोन’वरपाठवलं. मग डॉ. जेकिल अँड मिस्टर हाइड, फॉर हूम द बेल टोल्स, गॅसलाईट, द बेल्स ऑफ सेंट मेरीज वगैरे चित्रपटांतून तिने कामं केली. हिचकॉकच्या स्पेलबाउंड, नटोरियस, अंडर कॅप्रिकॉन या चित्रपटांतूनही ती चमकली. जवळपास दशकभर अमेरिकन चित्रपटांमध्ये घालवल्यावर इनग्रिडने नववास्तववादी चित्रपट दिग्दर्शक रॉबेर्तो रोझेलिनीच्या ‘स्ट्रोंबोली’मध्ये भूमिका निभावली. तेव्हाच इनग्रिड त्याच्या प्रेमात पडली. त्यानंतर तिने त्याच्याशी लग्नही केलं. ‘कॅसाब्लांका’तली लिसा व्हर्नलेबल आहे आणि हिचकॉकच्या ‘गॅसलाईट’मध्ये सॅडिस्टिक नवऱ्यामुळे सैरभैर झालेल्या पत्नीची व्यक्तिरेखाही इनग्रिडने मनापासून रंगवली. त्यामुळे तिची एक इमेज झाली होती. म्हणूनच तिने बाईलवेड्या रोझेलिनीबरोबर विवाह केल्यामुळे अमेरिकेत विरोधी प्रतिक्रिया उमटल्या. एका सिनेटरने तर ‘पॉवरफुल इन्फ्लुअन्स फॉर इव्हिल’असा तिचा उद्धारही केला.
इनग्रिडचा अगोदर डॉ. पीटर लिंडस्टॉर्म या शल्यविशारदाशी विवाह झाला होता. त्याच्यापासून तिला दहा वर्षांची मुलगी होती. रोझेलिनी आपल्या मार्सेला डि मार्चीस या पत्नीपासून विभक्त झालेला होता. पण ॲना मग्नानी या नटीशी त्याचं सूत जुळलं होतं. पीटरने आपल्याला घटस्फोट द्यावा, यासाठी इनग्रिडने त्याला पत्रही लिहिलं. पण तो तिला सहकार्य़ करत नव्हता. लवकरच तिला रोझेलिनीपासून मूल होणार होतं. इनग्रिड व रोझेलिनीच्या अफेअरची चर्चा जेव्हा सर्वत्र होऊ लागली, तेव्हा, पीटरपासून मी ब्रेकअप घेत आहे, असं इनग्रिडला जाहीर करावं लागलं. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू कर, अशा सूचना मी माझ्या वकिलाला देत असल्याचं प्रसिद्धी पत्रकच इनग्रिडने जारी केलं.
रोझेलिनीशी ओळखदेख नसताना त्याच्या चित्रपटांचा आपल्यावर प्रभाव कसा निर्माण झाला, याचं रेखीव वर्णन इनग्रिडने आपल्या आत्मकथेत केलं आहे. ‘१९४८च्या वसंत ऋतूत मी माझा नवरा डॉ. पीटरसमवेत एका छोट्या थिएटरमध्ये गेले होते. तेव्हा ती (म्हणजे स्वतः इनग्रिड. आत्मचरित्रात तिने स्वतःचा उल्लेख बरेचदा तृतीयपुरुषी एकवचनात केला आहे) लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून मान्यता पावली होती. सीटवर बसल्यानंतर दहा मिनिटांतच थिएटरमधले दिवे मंदावले. तिच्या लालसर चेहऱ्यावर कोड्यात पडल्यागत भाव निर्माण झाले. तासाभरानंतर कपाळावर आठ्या पडल्या. सत्तराव्या मिनिटाला तिला अश्रू आवरेनात. पडद्यावर काळोख होऊ लागला, तसतशी तिला जाणीव होऊ लागली, की आपण आपल्या कारकिर्दीत अनुभवलाच नाही, इतका भावोत्कट अनुभव आता घेतला आहे.’

रोझेलिनीचा ‘ओपन सिटी’ हा चित्रपट इतका थोर होता की, सत्यजित राय हे देखील तो बघून भारावून गेले होते. १९३४ पासून सुरू झालेली इनग्रिडची कारकीर्द १९४८ मध्ये कळसाला पोहोचली होती. मूकपटातील सर्वोत्तम नटी म्हणून ग्रेटा गार्बो आणि बोलपटातील उत्कृष्ट अभिनेत्री म्हणऊन इनग्रिडचा गौरव ‘डेली व्हरायटी’ या मासिकाने केला होता. पण एखाद्या भारावलेल्या सामान्य प्रेक्षकाच्या अवस्थेत असेलल्या इग्रिडने रोझेलिनीला पत्र लिहिलं,

प्रिय रोझेलिनी,
मी तुमच्या ओपन सिटी व पेसान या फिल्मस बघितल्या आणि त्याची मजा चाखली. तुम्हाला जर छान इंग्रजी बोलणारी एखादी स्वीडिश नटी हवी असेल, जी स्वतःची जर्मन भाषा विसरलेली नाही, जिचे फ्रेंच पटकन समजत नाही आणि जिला इटालियन फक्त ‘ती अमो’ (ti amo)एवढ्यापुरतंच येतं, ’तर मी तुमच्याकडे येऊन, तुमच्यासमवेत चित्रपट करायला तयार आहे.
हे पत्र इनग्रिड हॉलिवूडला घेऊन गेली, कारण तिच्याकडे रोझेलिनीचा पत्ता नव्हता. तो माहीत असणारा कोणीही तिला ठाऊक नव्हता. हा भाग इनग्रिडने मस्त लिहिला आहे.


एकदा हॉलिवूडमध्ये मी रस्स्याने चालत जात असताना एका माणसाने मला थांबवलं नि स्वाक्षरी मागितली. 
मी स्वाक्षरी करत असतानाच तो उद्गारला, ‘आय ॲम ॲन इटालियन, यू नो?’
‘काय सांगताय? मग तुम्हाला रॉबर्तो रोझेलिनी नक्कीच माहीत असेल?’
‘हो, ठाउकाय. तोच तो, महान दिग्दर्शक!’
‘पण मी त्याला कशी ओळखू शकेन?’
‘अर्थातच सांगतो. मिनर्व्हा फिल्म्स, रोम, इटली हा त्याचा पत्ता आहे.’
मग ती घरी गेली आणि त्या पत्त्यावर ते पत्र धाडलं. मिनर्व्हा फिल्म्समध्ये रोझेलिनीने काम केलं होतं, पण तेव्हा त्याची या स्टुडिओबरोबर कायदेशीर लढाई सुरू होती. रोझेलिनी त्यांच्याशी बोलतही नव्हता. जेव्हा इनग्रिडचं पत्र मिनर्व्हात पोहोचलं, त्याचवेळी दुर्दैवाने स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. पण त्याचे भग्नावशेष गोळा केले जात असताना मिनर्व्हावाल्यांना ते पत्र सापडलं. त्यांना मोठी गंमत वाटली. हॉलिवूडची इनग्रिडसारखी नामांकित नटी रोझेलिनीला पत्र लिहितेय की, आय वाँट टू कम अँड मेक अ मूव्ही फॉर यू,
त्यांनी रोझेलिनीला फोन केला. ‘मिनर्व्हा फिल्म्स हियर, मिस्टर रोझेलिनी देअर?’ त्यावर ‘मला तुमच्याशी बोलण्यात स्वारस्य नाही’ असं सांगून रोझेलिनीने फोन आपटला. पुन्हा फोन केला गेला, पुन्हा आपटला. शेवटी त्यांनी ते पत्र रोझेलिनीला कोणामार्फत तरी धाडलं. रोझेलिनीला इग्रजी बिलकुल येत नव्हतं. तो लिअना फेरी नामक एका अनुवादिकेस आपल्या अनुवादाची कामं द्यायचा. तिने त्याला पत्राचा आशय सांगितला. तेव्हा रोझेलिनीने प्रश्न केला, ‘ही इनग्रिड कोण?’...तेव्हा तिने ‘इंटरमेझ्झो’ या लेस्ली हॉवर्डबरोबरच्या सिनेमाचा उल्लेख केला, तेव्हा कुठे रोझेलिनीच्या डोक्यात प्रकाश पडला...इनग्रिडने या साऱ्याचं पुस्तकात याचं धमाल वर्णन केलं आहे.
इनग्रिडला लहानपणापासून जोन ऑफ आर्कचं आकर्षण होतं. लँकेस्ट्रियन पर्वातील शतकभराच्या युद्धातील कर्तृत्वामुळे जोनला फ्रान्सची नायिका मानलं जातं. तिला रोमन कॅथलिक संतपदही दिलं गेलं. तिच्या जीवनावरील चित्रपटात काम करण्याची ऑफर इनग्रिडला नाटककार मॅक्सवेल अँडरसनने दिली. ब्रॉडवेला येऊन माझ्या ‘जोन ऑफ आर्क’ नाटकामध्ये काम करशील का, अशी विचारणा त्याने केली. नाटक वाचल्यावर तिच्या लक्षात आलं की, त्यात ‘जोन’ कमी आणि आधुनिक राजकारण जास्त आहे. मग ती सेल्झनिककडे गेली आणि म्हणाली, ‘मी नुकताच नटोरियस हा चित्रपट पूर्ण केला आहे. तुझ्याकडे दुसरा चित्रपट नाही. मग आपण ‘जोन ऑफ आर्क’ नाटक करायचं का?’ याला त्याची तशी काही हरकत दिसत नव्हती. सेल्झनिकबरोबरचे इनग्रिडचे काही चित्रपट लवकरच संपणार होते. पण इनग्रिड आपल्याबरोबरचे व्यावसायिक सबंध संपवील, असं त्याला मुळीच वाटत नव्हतं. नाटक करायचं, तर त्याच्या तयारी व रिहर्सलसाठी नऊ महिने तरी लागणार होते. त्याबाबतच्या काँट्रॅक्टची बोलणी सुरू होत असतानाच, मॅक्सवेल पुन्हा इनग्रिडकडे आला. ‘सिनेमातल्या लोकांना नाटकात काम करण्यासाठी विचारणं ही माझी चूक झाली. तेव्हा ठीक आहे. उद्या मी न्यूयॉर्कला परततो आहे,’ असं त्याने सांगून टाकलं. मात्र जाण्यापूर्वी प्रशांत महासागराचं दर्शन घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. ते सान्ता मोनिका बीचवर गेले. तिथे वाळून बसल्यावर इनग्रिडने त्याला जोन ऑफ आर्कचं काँट्रॅक्ट तुझ्याकडे आहे का, असं विचारलं. ते त्याने दिल्यावर तिने त्यावर सही केली. तू आता या करारात अडकून पडलीस, असं तो म्हणाला. त्यावर, ‘हे नाटक मला करायचंच आहे. मी कोणाची फिकीर करत नाही’, असं उत्तर इनग्रिडने त्याला दिलं.
सेल्झनिकसारख्या लोकांना वाटायचं की इनग्रिडला कोण ओळखत होतं? आपणच तिला नाव मिळवून दिलंय. इनग्रिड त्याला वडिलांच्या जागी मानायची. पण जेव्हा काँट्रॅक्ट संपलं, तेव्हा आता मी मोकळी झाले. आता माझी मी पैसे मिळवीन, असं तिने सांगितल्यावर, त्याला राग आला. तो तिच्याशी बोलायचंही बंद झाला. तिच्यामागे तिच्याबद्दल वाईट साईट बोलू लागला...
इनग्रिड बर्गमन युद्धकाळात पुढे आली. युरोप-अमेरिका, व्यावसायिक-प्रायोगिक अशा दोन्ही जगांचा तिने अनुभव घेतला. दोन्ही ठिकाणी ती सहज वावरली. कौटुंबिक जीवनातले चढउतार अनुभवले. आयुष्याच्या उत्तरार्धात, म्हणजे १९८० साली तिची आत्मकथा प्रकाशित झाली. तिच्या मुलांनीच तिला सांगितलं की, तिने जर स्वतःची कहाणी स्वतःच सांगितली नाही, तर अफवा, प्रवाद आणि मुलाखती या रूपातच ती ओळखली जाईल. तेच मागे उरेल व सत्य मानलं जाईल. मग आपल्या आठवणी, अनुभव व निरीक्षणं हे सर्व तिने लिहून काढायचं ठरवलं. आपल्या कारकिर्दीबरोबरच स्वीडनमधलं बालपण आणि केलेली लग्नं, कॅन्सरशी दिलेला तिने लढा हे सारं तिने अगदी अनलंकृत शब्दांत मांडलं आहे. तिच्या रूपेरी कारकिर्दीइतकीच तिची स्वतःची कहाणीही अविस्मरणीय आहे.

(हा लेख यापूर्वी 'दैनिक पुण्यनगरी' मध्ये प्रकाशित झाला होता.) 

नंदिनी आत्मसिद्ध

 

1 Comments

Previous Post Next Post

Contact Form