मुलींचं जगणं बदलावं म्हणून

मी माझ्या आई-बाबांची लाडकी मुलगी, माझ्या सासू-सासऱ्यांची छोटी सून, भावंडांची जबाबदार बहीण, नवऱ्याची प्रेमळ बायको आणि समाजासाठी एक कर्तव्यनिष्ठ अशी नागरिक. एका सर्वसाधारण घरात वाढलेली मुलगी; पण जिद्दी, धाडसी आणि कोणी म्हटलं, हे तुला जमणार नाही तर ते मी पहिलं करून पाहणारी. 
आई-बाबा शिक्षक असल्यामुळे घरी करडी शिस्त असायची. लहानपणापासूनच बाबांनी एकच सांगितलेलं की, तू हवं ते खेळ, पण तू खेळात चमकली पाहिजे. एक दिवस मी खेळाच्या शिक्षकांना सांगितलं, ‘सर माझे वडील मला म्हणाले आहेत की, ‘खेळात भाग घेतला नाहीस तर घरात पाऊल ठेवायचं नाही’. ह्यावर सरांचं उत्तर - ‘तुला जो खेळ खेळायचा आहे, त्याबद्दल काही तरी माहिती सांग.’ 
मला कबड्डीची माहिती होती, ती मी सरांना सांगितली आणि सरांना म्हटलं, ‘कबड्डी खेळून माझे हात पाय मोडले तर...’ मी घाबरले. 
सरांचा जोरात आवाज आला, ‘असा विचार करशील तर तू आयुष्यात काहीच करू शकणार नाहीस’. 
जी मुलगी एक पाल पाहून घाबरत होती, ती मुलांसोबत कबड्डी खेळत-खेळत मुलांच्या टीमची कर्णधार होण्याइतकी तरबेज झाली. पण मग नातेवाईक ओरडू लागले की, ‘मुलगी आहे, तिला मुलांसोबत खेळण्याची परवानगी का देताय?’ ह्यावर माझ्या आईबाबांचे एकच उत्तर की, लग्न झाल्यानंतर तिने कधीच कोणाचा मार नाही खाल्ला पाहिजे. तिथे तिला एकटीला सगळ जिंकता आलं पाहिजे. ह्यातून हळूहळू माझ्यात एक नेतृत्व गुण आला, 
पण नातेवाईकांनी आई-बाबांना टोचून टोमणे मारून-मारून एकटं पाडलं. ह्यावर वडिलांनी कधीच माघार घेतली नाही. बाबा म्हणायचे की, माघार घेणं आपल्या रक्तात नाही. त्यानंतर मी तायक्वांदो खेळात पण सहभाग घेतला. तिथेही मी सराव करताना मुलांसोबत खेळायचे, कारण मला वाटायचे प्रतिस्पर्धी कसाही असो, विजय माझाच झाला पाहिजे. खेळत-खेळत मी राज्यस्तरावर पोहोचले आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. त्यानंतर लोक मला हळूहळू ओळखू लागले. गावातील लोकांना त्याबद्दलचे महत्त्व पटवून दिले. मुलगी कधीच डगमगली नाही पाहिजे, अशी शिकवण घरातून होतीच. कराटेचे प्रशिक्षण मी गावातूनच घेतले. हळूहळू शिकवणी घेत-घेत माझ्याकडे ४३० मुली शिकू लागल्या. माझे एकच म्हणणे असायचे, नारी अबला नाही तर आत्मविश्वासू, धाडसी आणि कर्तृत्व यांनी परिपूर्ण असावी.
थोड्या वर्षांनी आई-बाबांनी लग्नासाठी मुलगा बिघतला. लग्न जमलं. सगळं कसं नळ-दमयंतीप्रमाणे वाटू लागलं. तंत्रज्ञानाच्या या जमान्यात त्याचा आणि माझा फोनचा आणि इतर सोशल मीडियाचाही अतिरेक वापर होऊ लागला. थोड्याच दिवसांत लग्न झालं आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल लागला. पूर्वपरीक्षेत अर्ध्या गुणांनी हुकले. थोड्या महिन्यांनी मला घरात बसायचा कंटाळा आला. हे माहेर नव्हतं, की बाहेर जाऊन ग्रंथालयात किंवा वाचनालयात अभ्यास करत बसावं. हळूहळू मनात एक निराशा दाटून यायला लागली, की आता माझे सुद्धा स्वप्न अपूर्णच राहील. वडिलांना वाटायचे, मी अधिकारी व्हावे. त्यांना चूल आणि मूल कधीच मान्य नव्हते. पुरुषांप्रमाणे स्त्रियांनीही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालायला हवे, असे त्यांचे मत होते.
मग एकदा मी घरी फोन केला आणि म्हणाले की, ‘बाबा मला वाचनालयात जाण्यासाठी परवानगी देत नाहीत’ प्रतिउत्तर करत बाबा म्हणाले की, ‘हे बघ बाळ, तू धाडसी आहेस. शक्यतो तू प्रेमाने सगळ्यांना समजव. तुझ्या सासरी नसेल तशी पद्धत तर हट्ट कर आणि त्यानंतरही नाहीच मान्य केले तर तू मला सांग’. ह्यावर माझ्या डोळ्यांत पाणी आले आणि वाटले की, अजूनही त्यांना मी लग्नाआधी होते तशीच वाटते आहे. नंतर माझ्या मनात एक युक्ती आली की, मी जवळील महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, जेणेकरून तेथील महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचा पुढील अभ्यासासाठी उपयोग करून घेता येईल. ह्यावर सुद्धा सासरच्या मंडळींचा नकार. ह्यावर प्रतिउत्तर म्हणून मी सासरी विचारले, ‘मला घराबाहेर न पडण्याचे फक्त कारण सांगा. माझ्यातील कमतरता सांगा, म्हणजे मी माझ्यात सुधारणा करेन’. मनात आलं, कशासाठी हा भेदभाव? घरातील फक्त पुरुषच बाहेर पडणार, स्त्रिया का नाही घराबाहेर पडू शकत?
मग पुढचे आठ दिवस सासरच्या लोकांना समजावत त्यांचे मन वळवत राहिले आणि पहिले पाऊल यशस्वीरीत्या घराबाहेर टाकले. अशा खूपशा सुधारणा मला करायच्या आहेत. आता मी सकाळी घरातली सगळी कामे करून महाविद्यालयात येते. तिथे आल्यावर मला माझे बाबा आठवतात, त्यांनी माझा हा आत्मविश्वास वाढविला नसता तर मी माझी स्वप्ने अपुरी ठेवूनच जगत राहिले असते. अशा अपुरी स्वप्नं घेऊन जगणाऱ्या भारतात कितीतरी मुली आहेत. त्या मुलींसाठी शिकून अधिकारी बनून मला त्यांचे जीवन बदलायचे आहे.

प्रतीक्षा पवार

[मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयमहाराष्ट्र यांनी प्रकाशित केलेल्या 'कशासाठीलिंगभाव समतेसाठी' पुस्तकातील लेख. हे पुस्तक शासकीय मुद्रणालयचर्नीरोडमुंबई येथे उपलब्ध आहे.] 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form