कडी - लक्ष्मी यादव

 सखे,

तुला एकदा बघावंच लागेल

तुझ्या अस्वस्थ आयुष्याच्या बंद दरवाज्याला

कडी आतून आहे की बाहेरून?



कडी आतून असेल
तर धाडस कर
एकच पाऊल पुढं टाक
विश्वास ठेव
कडी काढण्याची ताकद आहे तुझ्या मनगटात


कडी बाहेरून असेल तर
लाथा मारत रहा
धडकत रहा
हाका देत रहा

थकायला होईल, रडायला येईल
धमकावलं जाईल, मारलं जाईल
पोरांच्या आणाभाका दिल्या जातील


बाहेरची भीती घातली जाईल
प्रेमाची लालूच दाखवली जाईल
बदलण्याचे वचन दिले जाईल
सुखी संसाराच्या स्वप्नात गुंतवलं जाईल


क्षणभर ढासळशील,
कोलमडशील, डगमगशीलसुद्धा!
भावनिक होऊन विश्वास ठेऊ नकोस
त्या शपथांवर आणि अश्रूंवर


थांबलीस तर विरून जाशील
मागच्या कैक वावटळींसारखी
आणि हरवून जाशील
पुन्हा पुन्हा भरकटण्यासाठी


किती दिवस दरवाज्याआड हंबरडा फोडत राहशील?
जखमा लपवत हसत राहशील ?
आणि मिरवत राहशील नातं
मुखवटयावर कौतुकानं?

तसं तर
पिंजर्‍याशीही जुळतंच की आत्मीयतेचे नातं
होते गुलामगिरीचीही सवय
पण पिंजरा शेवटी बंदिस्तच की
विचार कर,
स्वातंत्र्याच्या बदल्यात
मिळणार्‍या जगण्याचं मोल काय?


ज्या पिलांपायी थबकतात तुझे पाय
थोडा विचार कर
अंधाराच्या छायाछत्राखाली ती
घडतील? उडतील? जगतील? की गुदमरतील?


जी मरणकळेने प्रसवते
तिच्यात जग जिंकायचं सामर्थ्यही असतंच
रुजवलंय तर फुलवशीलसुद्धा
लेकरांना जगवण्याच्या भयाखाली
पावलं उंबर्‍याच्या आत ओढून घेऊ नकोस

तुझीच सावली घेतील तुझी लेकरं
सहन करत जगणार्‍या मलूल आईपेक्षा
हिंमतीने लढणारी तेजस्वी आई
लेकरांसाठी अधिक गर्वाची गोष्ट!


मान्य आहे निर्णय सोपा नाही
तुझ्या पावलांसाठी मळलेली वाट
नक्कीच असणार नाही
तुझी वाट तुलाच शोधावी लागेल
पण तुझ्या पावलांचे ठसे दिवे बनून
रस्ता दाखवतील अनेकींना

उठ आणि उजेडाचा शोध घे
पुन्हा एकदा बळ एकवटुन बघ,
कडी आतून आहे की बाहेरून
तुझ्या लाथेने

एक ना एक दिवस कडी तरी तुटेल
नाही तर तुझा तरी आवाज पोहोचेल आसमंतात
मग तुझाच तुला अभिमान वाटेल

उठ,
बाहेर पडायला घाबरू नकोस,
स्वागताला जिजाऊ आणि क्रांतीज्योतीच नाहीत तर
आंबेडकर आणि ज्योतिबाही आहेत.

आणि यातलं तुला कुणीसुद्धा नाही भेटलं
तर तू स्वत:च बन तुझी सावित्री
जोतिबाशिवाय ...
मग तुझं तुलाच कळेल
गुलामीपेक्षा स्वातंत्र्य नक्कीच भीतीदायक नाही!

 

लक्ष्मी यादव 

-      

 

2 Comments

  1. कविताप्रतिम। कडीची कल्पना आवडली।

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form