स्त्रीउवाच गटातली मैत्रीण वासंती दामले हिचं 9 जानेवारीला निधन झालं.
वासंतीने अनेक वर्षे मुंबई विद्यापीठात अध्यापन केले. निवृत्त झाल्यावर देखील तिचे लिखाण आणि वाचन सुरू होते. 'लोकसत्ता' आणि 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये अनेकदा तिने लिहिलेले पुस्तक परिचय छापून येत असत. वासंतीने ‘पुन्हास्त्रीउवाच’ साठी देखील लिहिले. ‘पुन्हास्त्रीउवाच’ च्या पोस्टस् वाचून ती आवर्जून त्यावर अभिप्राय देत असे. इतिहासाशी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाशी संबंधित कुठलीही शंका असेल तेव्हा हक्काने आणि मोकळेपणाने तिच्याशी चर्चा करता येत असे.
वासंती दामले स्वयंपाकघराशी रोमान्स
बडोद्यातलं लहानपण, जे एन् यू मधलं शिक्षण आणि काही काळ रशियातलं वास्तव्य अशा वैविध्यपूर्ण पार्श्वभूमीमुळे तिच्याकडे किस्से आणि अनुभव यांचा खजिना असायचा. वासंतीला संगीत, उर्दू काव्य, स्वयंपाक आणि चवीने खाणे अशा अनेक गोष्टींची आवड होती. वासंतीने 1994 मध्ये वार्षिक स्त्रीउवाच च्या अंकाचे संपादन केले होते. त्याविषयी आणि 1980 – 90 च्या दशकातल्या मुंबईतल्या स्त्रीवादी चळवळी बद्दल मी तिची मुलाखत घेतली आहे. लवकरच ती मुलाखत पुन्हास्त्रीउवाच च्या यूट्यूब चॅनलवर सर्वांना बघता येईल. ह्या मुलाखतीच्या रूपाने तिच्या आठवणी सदैव आपल्या सोबत राहतील!