एकल महिलांच्या ओळखीचा प्रवास...!!

साधारणपणे 8 ते 9 वर्षापूर्वी या गोष्टीला सुरुवात झाली. कोरो इंडिया च्या कामात असलेल्या ३२ महिलांनी एकत्र येऊन स्वत:चे  अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याला भक्कमपणे कोरोने साद दिली. त्याचा आज इतका मोठा वृक्ष पहावयास मिळतो ! त्या प्रवासात सोबत असतांना खूप सारा संघर्ष – शिक्षण आणि स्वानुभव मांडण्याचा हा प्रयत्न.


एकल महिलांच्या प्रश्नाच्या बाबतीत अभ्यास करण्याचा विचार समोर आला आणि त्याला प्रत्यक्ष करतांना अभ्यासाचे टूल विकसित करत असतांना एकल महिलांचे प्रकार कोण कोणते असावेत याचा विचार सुरु झाला त्यावेळी विधवा, परीत्यक्ता, घटस्फोटीत, प्रौढकुमारी,असे प्रकार वर चर्चा सुरु असतांना “ परीत्यक्ता” म्हणजे नवऱ्याने टाकून दिलेली महिला अशी चर्चा सुरु होती. त्यावेळी मुद्दा समोर आला की, ‘नवऱ्याला तर आम्ही सोडून दिल आहे, त्याने आम्हाला नाही सोडलेलं! या प्रकाराला काय म्हणता येईल?’ यावर खूप शोधाशोध झाली, काही साहित्याचा शोध घेतला, शिक्षण देण्याच्या संस्था, विद्यापीठ यांना विचारले परंतु असा काही शब्द नव्हता. त्यावेळी विचार झाला की, शब्द सापडे पर्यंत आपण MNT ( मी नवऱ्याला टाकले ) असे लिहू या ! खर तर यावर खूप सारी चर्चा करत असतांना पुरुष - 'मी टाकले' म्हणतो तसे आपण देखील म्हणायला हवे का ? जरा सौम्य शब्द असावा का ? असा देखील विचार समोर आला. 

परंतु महिलांचे म्हणणे होते, 'तात्पुरता हा शब्द घेऊ; पुढे जाऊन यामध्ये विचार करता येईल.' या साऱ्यामध्ये टाकणे हि भावना खूप खोलात रुजलेली होती. जेव्हा अभ्यासाला सुरुवात झाली त्यावेळी माहिती जमा करणाऱ्या महिलांनी ‘एकल’ प्रकारावर प्रत्येक महिलेच्या सोबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सुरुवातीला “ परीत्यक्ता” म्हटलं; पण जशी चर्चा MNT वर झाली त्यावेळी खूप साऱ्या महिलांनी स्वत: ला MNT च्या प्रकारात ठेवले. एकूण डेटा पहिला तर 2% महिलांनी स्वत: ला MNT म्हटले आहे. यावरून असे लक्षात आले की, स्वत: च्या ओळखीचा हा मुद्दा आहे ज्यामध्ये ओळखीत सन्मान असावा आणि ती ओळख समाजाने लादलेली नसावी तर स्वत: निवडलेली असावी !

आजूबाजूला पाहिल्यावर आपल्याला लक्षात येतं की, समाजाने एकल महिलांना खूप साऱ्या ओळखी दिलेल्या आहेत. तिला कोणती ओळख असावी हे निवडण्याचे स्वातंत्र्य दिले नाही. त्याला ‘उद्धवस्त ओळखी असलेल्या महिला’ म्हणता येईल तिथपासून सुरुवात झाली ते “आम्ही एकल महिला” हा प्रवास सुरु आहे. अजून देखील हा प्रवास पूर्ण झाला झालेला नाही. तो प्रवास पुढे स्वतंत्र व्यक्ती पर्यंतचा आहे. यासाठी एकल महिला संघटना आणि संघटनेतील महिला सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्याच्या संदर्भात विचार – कृती- मांडणी करत आहेत. त्यामध्ये काही उदाहरण समोर ठेवत आहेत.

हा लेख देखील वाचा - मी नवऱ्याला टाकलं

जेव्हा महिलांनी समाजात राहण्याच्या च्या संदर्भात चर्चा सुरु झाली त्यावेळी त्यांच्या मानसन्मानाच्या संदर्भात प्रकर्षाने एक मुद्दा समोर आला. विधवा झाल्यावर तिला कुटुंबात – समाजात सामोरे जाव्या लागणाऱ्या चालीरीती- पारंपारिक रूढी आणि परंपरा ज्यामध्ये त्यांचे शोषण होते त्यांचा आत्मसन्मानाला ठेच पोहचते. यावर काम करायला सुरुवात झाली. महिलांनी स्वत: च्या पोशाख, अलंकार, स्व:ता विषयी घ्यावयाचे निर्णय मुलांचे संगोपन याचा विचार करायला आणि त्याविषयी कृती करायला सुरुवात केली. रेणापूर मधील गोढाळा, खलंग्री, बीड मधील बेलखंडी पाटोदा अश्या अनेक गावात एकल महिला संघटनेच्या महिलांनी आपल्या गावात जेव्हा एखादी महिला विधवा होते म्हणजे गावात कोणी पुरुषाचे निधन होते अश्या वेळी तिच्या कुटुंबातील व्यक्तीच्या सोबत बोलून तिच्या अंगावरील अलंकार न काढण्याच्या विषयी चर्चा केल्या. या गोष्टी होऊ नयेत याचा विचार त्यांच्या समोर मांडला. खूप साऱ्या कुटुंबाने मान्य देखील केले. परंतु कुठेही त्यांनी - हे चुकीचे आहे की बरोबर आहे - यावर भाष्य केले नाही. ‘तर तिला तिचा निर्णय घेऊ द्या. तिला वाटत असेल अलंकार, पेहराव बदलायचा तर बदलू द्या अन्यथा आहे तसे राहू द्या. हा निर्णय त्या व्यक्तीवर अवलंबून राहू द्या’ - अशी भूमिका घेतली. यामधून आता पर्यंत 8 /9 गावात महिलांना या गोष्टीत यश आले आहे. पण हि प्रकिया खूप खोलात जाऊन करावी अशी आहे. कारण हा सांस्कृतिकदृष्ट्या मुळापासून बदल करण्याची समाजाची आणि समाज मनाची तयारी अगोदर करायला हवी. आता आपण महाराष्ट्रात पाहात आहोत की, शासकीय पातळीवरून सांस्कृतिक बदल घडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुळात हा बदल घडवण्यासाठी धोरणाच्या बाबतीत जसा विचार केला जात आहे, तसा समाजाच्या मनावर बिंबवलेल्या बाबी चा देखील विचार करावा लागणार आहे. याला फक्त एक - “इव्हेंट” - करून चालणार नाही. ज्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच लागली आहे, अशा पुरुषसत्ताक व्यवस्थेने खोल रुजवलेल्या गोष्टी त्या बदलण्याचा लांब पल्ल्याचा कार्यक्रम समजून घेऊन संथ गतीने पुढे जायला हवे.

शासकीय धोरण बदलण्याचा विचार करायचा तर आपल्या देशात एकल महिलांची आजची संख्या किती हे माहित असायला हवे. देशात विधवा, घटस्फोटीत स्त्रियांची आकडेवारी मिळते पण परीत्यक्ता म्हणजे ज्यांना नवऱ्याने टाकले आहे आणि ज्यांनी नवऱ्याला टाकले (MNT) आहे – त्यांची आकडेवारी कुठेच शासकीय दप्तरी पहायला मिळत नाही. हा आकडा समोर आला तर एकल महिलांच्या एकूण सर्वांगीण विकासाचा विचार करता येऊ शकेल. कोरो इंडिया आणि त्यांच्या सोबत असलेल्या महाराष्ट्रातील संस्था / संघटना यांनी एकत्र येऊन “ महाराष्ट एकल महिला अधिकार परिषद” च्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ( ग्रामपंचायत, नगर पालिका- महानगरपालिका ) पातळींवर एकल महिलांची स्वतंत्र नोंदणी करण्याच्या संदर्भात जानेवारी 2020 मधील ग्रामसभेत महिलांनी जाऊन मुद्दा ग्रामसभेत मांडला. त्यावर सविस्तर चर्चा झाली आणि ग्रामसभेने अशी नोंद होण्याच्या संदर्भात सकारात्मकता दर्शवली. संपूर्ण राज्यातून 350 पेक्षा जास्त ग्रामसभेत असे ठराव मंजूर होऊन त्याच्या प्रती परिषदेकडे जमा झाल्या आहेत. ग्रामसभेत ठराव तर पारित झाले परंतु नोंद कशी ठेवायला हवी याच्या संदर्भातील सर्व ठिकाणी सारखे नियम – मार्गदर्शक बाबी शासकीय पातळीवर ठरवायला हव्यात हा मुद्दा समोर आला. त्याला घेऊन राज्य पातळीवर संवाद सुरु असतांना देशात आणि राज्यात कोविड च्या प्रादुर्भाव वाढला त्यामुळे लॉकडाऊन लागले. आणि लोकांच्या समोर असलेल्या प्रश्नाचे स्वरूप बदलले. आता परत परिस्थिती नॉर्मल होतांना हा मुद्दा पुढे घेऊन जायच्या संदर्भात विचार सुरु झाला आहे.

एकल महिलांच्या सोबत काम करत असतांना त्यांना फक्त शासकीय योजना मिळवून देणे, त्यांच्या सक्षमीकरणाची चर्चा करून चालणार नाही तर त्यांच्या मधील उभरते नेतृत्व शोधून ते विकसित करणे, त्या नेतृत्वाच्या क्षमता विकसित करणे आणि संविधानिक मूल्याचा दृष्टीकोन विकसित केला पाहिजे. त्यामुळे त्यांचे प्रश्न हे कायमचे सुटतील. ज्याचे महाराष्टात एक उदाहरण मराठवाड्यात कोरो च्या माध्यमातून एकल महिला संघटना उभी करून केला जात आहे. ज्यामधून लीडरशिप, महिलांच्या सामाजिक-राजकीयदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या जो काही बदल होतांना दिसत आहे त्याला अधिक सक्षम आणि पुढे घेऊन जातांना इतर ठिकाणी देखील प्रयत्न व्हायला हवेत.


राम शेळके,

सदस्य,कोरो इंडिया

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form