आपल्यातली उणीव स्विकारून तिच्यावर मात करणं जितकं कठिण, त्यापेक्षाही दुसऱ्यातल्या कमतरतेला सकारात्मक दृष्टीकोनातून स्विकारणं अधिक कठिण असतं! माझ्या आजीने हेच नेमकेपणानं केलं. माझ्या लहानपणीच्या बऱ्याचश्या आठवणी आजीसोबतच्या आहेत. ही आजी म्हणजे माझ्या आईची आई. आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा माझ्या जडणघडणीचा काळ आजीने तिच्याही नकळत समृद्ध केला.
आजीचं नाव माहेरचं नाव मालिनी. लग्न करून आल्यावर आजोबांनी तिचं नाव कल्पना ठेवलं. पण, आम्हा नातवंड-पतवंडांत तिचं मालेआजी हेच नाव प्रचलित आहे. मला लहानपणापासूनच आजीचं मालिनी हे नाव वेगळं वाटायचं. अजूनही मी दुसऱ्या कोण्या स्त्रीचं हे नाव ऐकलं नाहीये.
मी ६ वर्षांची होता होता मला पूर्णतः अंधत्व आलं. तेव्हा एका डोळस मुलांच्या शाळेत इ. पहिलीला होते. पण मला फळ्यावरचंही दिसेनासं झालं आणि माझी शाळा सुटली. पुढची २ वर्ष मी डोळ्यांच्या उपचारांसाठी मम्मी-पप्पांसोबत मुंबईतले सर्व दवाखाने पिंजून काढत होते. याच काळात मम्मी-पप्पा आपली नोकरी, माझ्या पाठची दोन-अडिच वर्षांची माझी जुळी भावंडं आणि नुकतीच अंधत्व आलेली मी अशा तिन्ही आघाड्यांवर लढत होते. अशात, माझा अंधत्वाला स्विकारण्याचा प्रयत्नही त्रासदायक ठरत होता. तेव्हा आजी मला मासवणला घेऊन गेली. त्या काळातला एकेक अनुभव माझ्या जगण्याची पुंजी आहे. मी घरात कंटाळते हे आजीच्या लक्षात आलं आणि तिने मला गावच्या बालवाडीत पाठवायला सुरुवात केली. तिथे शिकवलेली बडबडगीतं, सांगितलेल्या गोष्टी मी घरी येऊन आजीला सांगायची. आजी त्याकाळातली सातवी पास. तिला शिक्षणाचं महत्त्व माहिती होतंच. ती मला गाण्या-गोष्टींवर आधारित प्रश्न विचारायची आणि मी त्याची उत्तरं द्यायची. मला पुन्हा शाळेत दाखल करण्याबाबत तिने मम्मीचा पिच्छा पुरवला होता.
मला आठवतं, आजी रोज ४ च्या सुमारास उठायची. पहिलं काम ती करायची ते म्हणजे अंगण झाडून काढणं. मला सकाळी उठल्यावर पुढच्या अंगणात बसून आजीशी बोलायला आवडायचं. मग, बसल्या बसल्या आजीची अनेकविध कामं चालायची. ती मला ते स्वतःसोबत करायला लावायची. अंगणात जागोजागी उगवलेलं गवत बेणणं, पायाला टोचणारे दगड गोळा करणं, अगदी शेणाने सारवणंही तिने मला हाताला धरून शिकवलंय. या कामांमध्ये मी देहभान विसरून रमायचे. दिवाळीत रांगोळी काढण्याचा मातीचा चौथरा मी शेणाने सारवलेला आणि मग दुसऱ्या दिवशी गेरूने रंगवलेला मला लख्ख आठवतो.
एकदा मला भाजी करून पाहण्याची खूपच इच्छा झाली. मी आजीकडे हट्ट केला. आजीने आधी समजावून पाहिलं, पण माझा हट्ट मोठा ठरला असावा. तिने हातात एक मुळा आणि सुरी दिली. एकदा तुकडे कसे करायचे ते दाखवलं. मी एका वाटीत हाताला न कापता बारिक तुकडे केले. मग आजीने मला त्या वाटीत थोडं तेल, मिठ आणि हळद घालून दिलं. तेवढ्यात कोणीतरी आलं असावं. आजी मला स्वयंपाकघरात सोडून पुढे गेली. ती वेळ साधून मी मागच्या ओट्यावर आले. चुलीवर पाणी उकळत होतं. मी चुलीशी स्वतः सावरून बसले. लाकूड वरखाली करून, जवळची फुंकणी घेऊन आजीच्या आवाजाची नक्कल करत चूल आणखी जळती करण्याचा प्रयत्न केला. मग, बाजूला ठेवलेली वाटी चिमटीत धरली आणि दिली त्या चुलीत ढकलून. थोडावेळ छान खमंग वास आला पण, मग आग जोरात पेटल्यासारखी वाटली आणि पाठोपाठ जळक्या मुळ्याचा वास दरवळला. फक्त मुळाच नव्हे तर वाटीसुद्धा काळीठिक्कर पडली होती!
आजी तेव्हा शेती करायची. अंगणात एका बाजूला गोठा होता. एक म्हैस आणि एक टोणगा होता. मला आठवतंय, आजी मला रोज त्यांच्या जवळ नेऊन त्यांना हात लावून बघू द्यायची. आजीमुळे मी ह्या प्राण्यांना स्पर्श करून पाहू शकले. घरात माझ्या मावशीने पाळलेली झिमी कुत्री होती. आजीने तिलाही माझा लळा लावला होता. तिला पिल्लं झाल्यावर मी अगदी १-२ दिवसांची पिल्लंही हाताळली आहेत.
' पक्षी कसा असतो' हे मला कळावं म्हणून आजीने साळुंकी हातात धरून दाखवली होती. ती शेती करते म्हणजे काय करते, असं विचारलं असता तिने मागच्या वाड्यात एका घमेल्याइतकं खळं माझ्याबरोबर बसून केलं. मला मूठभर भात दिला. तुसासकट असलेल्या तांदळाला आमच्याकडे भात म्हणतात. तर, त्या खळ्यात चिरा पाडून माझ्याकडून त्यात तो भात पेरून घेतला. मग, काही दिवसांनी मी माझ्या हातांनी जादू पाहिली. माझ्या उंचीचा गवतासारखा प्रकार उगवला होता. त्याला छोट्या छोट्या लोंब्या आलेल्या. मी आजीला विचारलं, “आजी, आता आपण याचा भात करायचा?” “नाही, आता हा भात आपल्या कोंबड्या खातील.” तेव्हा मला खूपच आनंद झालेला.
आजही आमचं नातं तितकंच घट्ट आहे. वर्षातून एकदा तरी आजी माझ्याकडे रहायला येतेच. पण, पूर्वी माझ्यासाठी म्हणून येणारी माझी आजी आता माझ्या मुलांसाठी येते. याचा मला रागही येतो आणि आनंदही होतो. नातवंड दुधावरची साय असतात पण पतवंड त्यापेक्शाही खास असतात. तिने जे माझ्याबाबतीत केलं तेच ओजससाठीही केलं. आम्ही त्याला मराठी माध्यमात घालायचं ठरवल्यावर एक महिन्याच्या तिच्या वास्तव्यात तिने त्याला मराठी वाचायला शिकवलं. तो उत्तम वाचायला लागलाय हे तिचंच श्रेय आहे .
आजी स्वतः शिकलेली होती, तरी आजोबांनी तिला नोकरी करू दिली नाही याची तिला आजही खंत वाटते. आजोबांचं अकाली निधन झालं. तेव्हा माझा मोठा मामा ६ वर्षांचा, माझी मम्मी ४ वर्षांची तर धाकटा मामा २ वर्षांचा होता. आजी पंचविशीत होती. मालेआजी आणि तिची सख्खी लहान बहिण शालेआजी दोघी सख्ख्या जावा! त्यामुळे आजोबा गेल्यावर शालेआजी दोघींच्या ११ मुलांना सांभाळायची आणि आजी पुरुषा सारखी सर्व शेती करायची. आजीने केलेला संघर्ष शब्दातीत आहे. म्हणूनच मला असं वाटतं की, कोणतीही परिस्थिती आली तरी आपण आपल्या वाटचे प्रयत्न करणं साडायचं नाही हे बाळकडू मला आजीने दिलं! माझ्यात जिज्ञासू वृत्ती, बेडरपणा, कोणतीही गोष्ट एकदा तरी करून पाहण्याची जिद्द आजीने निर्माण केली. मग, मम्मी-पप्पांनी या गुणांना खत-पाणी घातलं आणि विशेष शाळेने हे गुण अधिक उजळले. माझ्यातल्या झुंजारपणाचं मूळ आजीत लपलंय यात शंकाच नाही!
अनुजा संखे
या सदरात अपंग व्यक्तींचे संघर्ष,
त्यांच्या यशोगाथा, त्यांचे समाजातले योगदान
आणि समाजाकडून त्यांना मिळालेली मदत
अशा विविध मुद्यांविषयी अनुजा लिहीत आहे.
ती स्वत: पूर्णपणे दृष्टिहीन आहे.
सुंदर लेख!
ReplyDeleteखूप छान लेख
ReplyDelete