चोराच्या उलट्या बोंबा

साधारण दहा दिवसांपूर्वी कोझीकोळ जिल्हा सत्र न्यायालयाने विनयभंगाच्या (आयपीसी कलम ३५४) एका खटल्यात आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर करताना अशी टिप्पणी केली की 'फिर्यादी महिलेने जर लैंगिक भावना उत्तेजित करणारे कपडे परिधान केले असतील तर तिला एखाद्यावर लैंगिक छळाचा आरोप करता येणार नाही'. 
इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हा खटला फौजदारी कायद्या अंतर्गत सुरू होता.  कार्यस्थळी होणाऱ्या लैंगिक छळाच्या कायद्या अंतर्गत पीडित महिलेवर झालेला परिणाम जास्त महत्वचा मानला जातो, आणि हेतू बघितला जात नाही. कारण हा एक दिवाणी कायदा आहे.पण  फौजदारी कायद्यामध्ये गुन्हा करण्याचा 'उद्देश' आहे असे सिद्ध व्हावे लागते. या प्रकरणातील आरोपी सिविक चंद्रन हे ७४ वर्षांचे आहेत आणि व्हीलचेयर वर असतात. याबाबतीत गुन्हा दाखल करायला उशीर झाला होता आणि त्याविषयी पुरेसे स्पष्टीकरण दिलेले नव्हते, एवढ्याच दोनतीन कदाचित या बाबींवर हा जामीन मंजूर झाला असता. जामीन अर्जासोबत आरोपीने काही फोटो दाखल केले होते. ते पाहून कोर्टाने नमूद केले कि या फोटोंमध्ये, तक्रारदार महिलेने लैंगिक दृष्ट्या उत्तेजक पद्धतीचे कपडे परिधान केलेले आहेत – असे भाष्य करायची कोर्टाला गरज नव्हती.
२०२२ साली भारतामधील एखाद्या कोर्टाने असे विधान करावे हे खेदजनक आहे. कोर्टाने लक्षात ठेवले पाहिजे, कि त्यांची वाक्ये पायंडा पाडतात आणि पुढे इतर प्रकरणांत या टिप्पणीचा चुकीचा उपयोग होऊ शकतो, ज्यामुळे पीडित व्यक्तीला न्याय मिळण्यात अडथळे येऊ शकतात.

एकतर ‘लैंगिकता’ ही कल्पनाच मुळी खूप व्यापक आहे. समजा अगदी स्त्री पुरुष आकर्षण हा एकच कंगोरा लक्षात घेतला तरीही, ‘उत्तेजक कपडे’ म्हणजे काय? या शब्दांचा अर्थ फार संदिग्ध आहे. एखाद्या पुरुषाला साडी परिधान केलेली स्त्री आकर्षक वाटेल, एखाद्याला जीन्स, कुणाला शॉर्ट्स, किंवा स्कर्ट्स. लैंगिकता उत्तेजित करणारे कपडे प्रत्येकासाठी वेगळे असतात. बरं लैंगिक भावना उत्तेजित होणे हा स्वाभाविक गुण मानला तरी त्याचे रूपांतर लैंगिक छळातच होते का? प्रत्येक पुरुष, त्याची लैंगिक भावना उत्तेजित झाली कि समोरच्या महिलेचा लैंगिक छळ करतो का? नाही.... मुळीच नाही. आणि याच खुळचट तर्कानुसार, सध्या बरेच लोक वर्क फ्रॉम होम करत असल्याने , बहुतांश पुरुष शॉर्ट्स मध्येच असतात, मग महिला त्यांचा लैंगिक छळ करतात असं म्हणायचं का? 
 हे समीकरण खूप हास्यास्पद वाटले ना? मग जेव्हा कोणतीही महिला लैंगिक छळाचा आरोप करते, तेव्हा आपण सर्वप्रथम तिच्या कपड्यांवर किंवा तिच्या वागण्यावर का बोलतो ?
मी गेली अनेक वर्षे कार्यस्थळी होणारा लैंगिक छळ या विषयावर काम करीत आहे. याबाबतीत जाणीव जागृती व्हावी म्हणून आम्ही ट्रैनिंग घेतो. बरेचदा पुरुष लगेच महिलांच्या कपड्यांचा विषय काढतात. काही महिला स्वतःसुद्धा हा विषय काढतात!
"अहो मॅडम, मुली वाटेल तसे कपडे घालुन येतात हो " – ही एक नेहमीची कॉमेंट असते.
काही कम्पन्यांमध्ये तर महिलांना युनिफॉर्म का देत नाहीत असे वाद होतात. एखादी स्त्री ऑफिसमध्ये छान कपडे घालून येते, कधी तो स्लिव्हलेस घालत असेल, कधी जीन्स घालेल, कधी साडी नेसेल. जोपर्यंत तिच्या कामामध्ये काही व्यत्यय किंवा धोका येत नाही, तोवर ती कोणताही वेष करायला मुक्त असली पाहिजे. याला अपवाद म्हणजे युनिफॉर्म असलेले क्षेत्र उदा. पोलीस, सेना, पायलट सिक्युरिटी इ. तसेच मशीन वर काम करताना, दुपट्टा साडी, असे कपडे चालत नाहीत, ते मशीन मध्ये अडकायचा धोका असतो. मुळात माझे म्हणणे असे आहे, की शाळा सोडून आपल्याला बरीच वर्षे झाली आहेत, आता पुन्हा युनिफॉर्म कशाला ? गणवेशाने प्रश्न खरच सुटत असता तर शाळांमध्ये तरी लैंगिक छळ झाला नसता. पण शाळेत छळ होतो, म्हणून शाळा सोडलेल्या कित्येक मुली आपल्याला सापडतील.
गणवेशाने प्रश्न सुटत असता तर शाळांमध्ये तरी लैंगिक छळ झाला नसता!

आपल्या समाजात आणि एकूणच पितृसत्ताक विचारसरणीत, ‘आयडियल व्हिक्टिम’ चा एक तयार साचा आहे. ' साधी सोजवळ स्त्री’ आणि बिंधास्त स्वतःच्या हिमतीवर जगणारी स्त्री अशी आपण एक विभागणी केली आहे. जी स्त्री पारंपरिक वेशभूषा करते, साधी आहे( हक्कांची भाषा करत नाही) आणि पितृसत्तेची चौकट मोडत नाही, तिच्या बाबतीत काही लैंगिक छळ झाला, तर समाज तिला सहानुभूती देतो. परंतु या चौकटीत न बसणारी कोणतीही स्त्री - उदा. उच्चशिक्षित आणि चांगले कमावणारी स्त्री, महत्त्वाकांक्षी महिला, एकल महिला, आपल्या मनाप्रमाणे कपडे घालणारी आणि आपल्या मर्जीप्रमाणे जगणारी स्त्री, वेश्या व्यवसायातील स्त्री - यांच्या बाबतीत जर छळ झाला तर त्यांना मात्र आपण सहानुभूती न देता त्यांनाच दोषी ठरवतो.
 POSH कायद्याअंतर्गत प्रत्येक कार्यस्थळी इंटर्नल कमिटी असते. मी अशा समितीची एक्सटर्नल मेम्बर म्हणूनही  काम करते.  लैंगिक छळाच्या तक्रारींचे निरसन करताना, कमिटी मेम्बर्स कडून पुढील प्रमाणे ताशेरे ऐकायला मिळतात 
"तिचे कपडे जरा तोकडेच असतात", 
"तिचा मेकअप जरा अति नाही होत?", 
"बोलायला जहाल आहे नुसती ती", 
"खूप भांडकुदळ आहे, कोणाशी पटत नाही"  
म्हणजे कुठेतरी छळाला ही स्त्री स्वतःच जवाबदार असल्याचा सूर असतो. खरं तर, लैंगिक छळ कोणत्याही स्त्रीचा होऊ शकतो - तिने काय कपडे घातले, तिचे वागणे कसे होते या गोष्टीचा संबंध असता कामा नये. अनेक सर्वे मधून ते सिद्ध झाले आहे की कुठल्याही प्रकारचे कपडे परिधान केलेले असले तरी बाईवर लैंगिक हल्ला होतो. लैंगिक छळाचे समर्थन कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ शकत नाही! अमुक कपड्यांमुळे तिच्यावर लैंगिक हल्ला झाला असे म्हणणे - हे म्हणजे 'दरवाजा उघडा होता, म्हणून मी चोरी केली' असे चोराने उलट्या बोंबा मारण्यासारखे आहे! अशावेळी, वर्षानुवर्षे जाणीवजागृती करून समाजाच्या मानसिकतेमध्ये काहीच फरक पडला नाहीये असे वाटते आणि खूप निराशा येते.
#sexualharassment #PoshAwareness 

रेणुका मुकादम

POSH विषयाची कन्सल्टंट

आणि ट्रेनर

1 Comments

  1. खूप विचारप्रवर्तक लेख आहे. निराश न होता काही तरी बदल कसा करता येईल असा विचार करताना, लैंगिकता आणि त्याची जीवनातल्या सर्व स्तरावर असलेली व्याप्ती लक्षात घ्यायला हवी. आणि स्त्री व पुरूष यांच्यासाठी प्रचलित असलेल्या भिन्न मापदंडाचा प्रश्न मोठा आहे. यामध्ये रेणुका यांनी कपड्याचा आणि युनिफॉर्मचा उत्तम प्रश्न समोर आणला आहे. स्त्रियांनी कसे कपडे घालावे किंवा घालू नये हा प्रश्न महत्वाचा बनतो पण तिने कोणचेही कपडे घातले म्हणजे कोणत्याही पुरूषाला तिच्या संमती शिवाय कोणच्याही प्रकारे तिच्यावर तोंडाने हावभावाने किंवा प्रत्यक्ष अंगचटीला जायचा हक्क आजची संस्कृती, समाजिकता देते. या मध्ये प्रश्न तिच्या व्यकती म्हणून स्वातंत्रयाचा आहे हा मुद्दाच पुढे येत नाही. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाचा मुख्य गाभा हा तिच्या व्यक्ती म्हणून अस्तित्वाशी जोडलेला आहे. कोणत्याही प्रकारे तिला कामाच्या ठिकाणी तिच्या व्यक्तित्वाला खीळ घालणारा कोणचाही व्यवहार हा ती स्त्री आहे म्हणून केला जातो आणि तिचे कामातले लक्ष विचलीत करून तिच्या अस्तित्वाचे प्रश्न निर्माण केले जातात आणि त्याला आळा घालण्यासाठी कायदा केला गेला.
    आणखी खोलात गेले की तिचे अस्तित्वच दुय्यम स्थानी आहे हे लक्षात येते. म्हणजे अखेर स्त्रियांच्या दुय्यम स्थानाचा, स्त्री पुरूष श्रमविभागणीचा हा प्रश्न आहे. कायदा हा पुरोगामी असला तरी त्याची बैठक ही पुरूष प्रधानच आहे.

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form