‘डार्लिंग्स’च्या निमित्ताने

आपल्या हिन्दी सिनेमाला हिंसाचार काही नवीन नाही. सिनेमातला पुरुष आक्रमक होतो, बदला घेण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत दंगे-मारामाऱ्या करतो, अगदी युद्धं देखील करतो. पुरुषाने केलेली हिंसा पहायची आपल्याला सवय आहे. हा सगळा हिंसाचार बहुतेक वेळा घराबाहेर घडणारा असतो. कधीकधी पुरुषांनी घरातल्या बाईवर केलेला हिंसाचार देखील सिनेमात दाखवला जातो. पण आपल्यावरच्या हिंसाचाराचा बदला घेण्यासाठी बायांनी केलेला हिंसाचार हिन्दी सिनेमातून क्वचितच दिसला आहे. ‘डार्लिंग्स’ हा अशाच दुर्मिळ प्रकारातला सिनेमा आहे!

इथं त्याची स्टोरी सांगण्याचा इरादा नाही, कदाचित आतापर्यन्त सिनेमाचं कथानक सर्वाना माहिती झालंही असेल! पण ह्या सिनेमात जे काही चित्रण केलेलं आहे, त्यावरून बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. मी जे काही रिव्ह्यूज् सोशल मिडीयावर वाचले, त्यातही एकच सूर होता की - हा काही कौटुंबिक हिंसाचारावरचा किंवा वाईट नवऱ्यापासून सुटका करून घेण्याचा उपाय नाही! 
मला असं वाटतं की ‘डार्लिंग्स’ मधला उपाय - चूक की बरोबर - हा प्रश्नच असू नये. कौटुंबिक हिंसाचार हे समाजातले वास्तव आहे. अगदी अंगावर काटा येईल अशा पद्धतीने नवरा, प्रियकर, बायको, प्रेयसी यांना छळल्याच्या अनेक बातम्या आपण वाचतच असतो. पण फक्त इथे ते रुपेरी पडद्यावर प्रभावीपणे मांडले आहे आणि आपल्या मध्यमवर्गीय जडणघडणीच्या तेच अंगावर येते! ‘डार्लिंग्स’च्या कथेचा वेग, दिग्दर्शन, अभिनय सारे काही उत्तम जमलेले आहे. सिनेमा कुठेही एकसुरी किंवा कंटाळवाणा होत नाही. चित्रपटाचा विषय गंभीर असला तरी त्याला अशी काही विनोदाची डूब दिलेली आहे की प्रेक्षकांना नको तिथेही हसू येते. त्यामुळे प्रेक्षक थरारक सिनेमाप्रमाणे श्वास रोखून न बसता थोडा हलक्याफुलक्या मूडमध्ये हा सिनेमा बघू शकतो आणि नंतर आरामात विचार करू शकतो.
जरी सिनेमाला लोअर मिडलक्लास मुस्लिम कुटुंबाची पार्श्वभूमी असली, तरी इथं धार्मिक संदर्भ अजिबात नाहीत. ही कोणत्याही जातीधर्मात आणि आर्थिक वर्गात घडणारी गोष्ट आहे. आपण समाजात नेहमी बघतो की बाई जीवापाड प्रेम करते, त्यासाठी माहेरच्या रक्ताच्या नात्यांना धुडकावून लावते. पण त्याबदल्यात नवऱ्याकडून मिळतं काय? तर त्याचं व्यसन, त्याची अरेरावी, मारहाण, लहरी स्वभाव, खोटारडेपणा, फसवणूक. तरी असे नवरे सुधारावे म्हणून बाया आयुष्य खर्ची घालतात, प्रेम करत राहतात. प्रेम संपलं तरी माणूस म्हणून करूणा, वात्सल्य दाखवून त्याला माफ करत राहतात. हे बहुतांश वास्तव आहे. बाईच्या अंगात असलेल्या अंगभूत प्रेमळपणाचा गैरफायदा घेतला जातो आणि पुरुषाची अरेरावी चालू राहते. पण तीही माणूस असते. तीही बिथरते. क्रूर होऊ शकते. बदला घेऊ शकते. ‘डार्लिंग्स’ सिनेमाची नायिका बद्रू, आईच्या मदतीने नवऱ्याला धडा शिकवते, त्याच्याशी क्रूर वागते, त्याला मारहाण करते. तो मरेपर्यंत मायलेकी अगदी थंड डोक्याने हा संताप त्याच्यावर काढत राहतात. नेमके त्याचमुळे हा सिनेमा पाहून पुरुषोत्तमांची बरीच चलबिचल होताना दिसते आहे.
अनेक प्रेक्षक म्हणताहेत, ‘ती घटस्फोट घेऊ शकली असती, सोडून जाऊ शकली असती’ - हे बोलणं सोपं आहे. पण आजही घटस्फोट घेतलेल्या बाईचं जिणं किती कठीण आहे! त्यात ही तर लोअर मिडलक्लासमधली बाई - आर्थिक समस्या असतात, धड शिक्षण नसतं, आमदनी नसते, बदनामी तर मोठीच असते. त्यावरही मात करून नवऱ्याला सोडायचं म्हटलं तरी असे व्यसनी पुरुष त्या स्त्रीला सुखाने जगू देतातच असं नाही. बद्रूचा नवरा देखील वारंवार माफी मागून पुन्हा तेच करत असतो. ती देखील टिपिकल स्त्रीस्वभावापोटी विरघळत राहते आणि पुन्हापुन्हा मार खात राहते. नवऱ्याने कितीही मारहाण केली तरी बाया शेवटी विरघळतात आणि नवऱ्याला तुरुंगात टाकायला ऐनवेळी माघार घेतात - या अनुभवाने पोलिस इन्स्पेक्टरही हताश होऊन, ‘ऐसाही होता है’ – असं म्हणतो तेव्हा समाजातील स्त्रियांची परिस्थिती त्या एका प्रसंगातच स्पष्ट होते.
बद्रू आणि तिची आई एकाच मोठ्या चाळवजा ईमारतीत राहत असतात. पण बद्रूच्या नवऱ्याला तिने तिच्या आईशी फार संबंध ठेवलेले आवडत नसल्याने दोघी समोरासमोरच्या खिडकीत असूनही मोबाईलवर बोलतात. जुल्फी नावाचा सेल्समन, बाजूला राहणारा खाटीक, पोलिस, बद्रूच्या रुमखालीच असलेली पार्लरवाली - सगळी पात्रे एकमेकांची सुखदुःखे जाणून असतात, हमजाचा बॉस त्याला शोधत त्यांच्या घरी येतो, तेव्हा उडालेली मायलेकींची तारांबळ, पोलिस स्टेशनवरचे प्रसंग - हे सर्व कथानकात वास्तवाचे रंग गडद करत राहतात. सिनेमा पुढे सरकत राहतो आणि एका क्षणी बद्रूच्या सहनशक्तीचा कडेलोट होतो. ती प्रेग्नंट असताना नवरा तिला जिन्यावरून ढकलून देतो. पडल्यामुळे तिचे मिसकॅरेज होते आणि तिच्यातील सहनशक्ती आणि करूणाही संपते. ती पेटून उठते. ज्या नवऱ्याची अरेरावी त्याला तिने मरणातून तीनदा सोडवल्यावरही संपत नाही. ती त्याला घटस्फोट देऊन संपणार होती? घटस्फोटीत स्त्रीपेक्षा विधवा स्त्रीचे जिणे मानाचे आणि सहानुभूतीचे असते आपल्या समाजात! खून जिरला तर विधवा म्हणून ती स्त्री मानाने जगू शकणार असते. मात्र घटस्फोटीतेकडे मग ती अगदी उच्चशिक्षित, कमावती असली तरी हेटाळणीनेच पाहिले जाते. लोक म्हणतात, ती पोलिस तक्रार मागे का घेते? पण पोलिस वर्ष/दोनवर्ष जेलमध्ये ठेवतील. त्यानंतर काय? तो सुटून आल्यावर हिला जिवंत सोडेल?
असं करायला नको होतं, तसं करायला नको होतं – बोलणं सोपं आहे! पण असं का केलं जातं यामागची पार्श्वभूमी फार गुंतागुंतीची आणि व्यापक असते. त्याचं एका वाक्यात उत्तर नसतं. घरगुती हिंसाचाराला कंटाळून अनेक स्त्रिया आत्महत्या करतात, तेव्हा लोक फक्त चुकचुकतात. पण डार्लिंग्समधील बद्रूप्रमाणे त्या हिंसाचार करणाऱ्यालाच संपवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मात्र लोकांना तो उपाय खटकतो. समाजाने बाईपणाची कोंडी केलेली असते, कोंडून घातलेली मांजर गळा पकडतेच. सामाजिक कोंडीत एखाद्या स्त्रीचीही अनेकदा अशी मांजर होते. ती स्वतःला ज्या सहजतेने संपवू शकते, तशी समोरच्यालाही संपवू शकते. तरीदेखील एकाच गोष्टीसाठी स्त्रियांकडे आणि पुरुषांकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो हे मला अधोरेखित करायचं आहे. डार्लिंग्स सिनेमाच्या बाबतीतही हेच होतंय. मला वाटतंय की कदाचित हा सिनेमा पाहिल्यावर पुरुषोत्तमांची फक्त चलबिचलच होत नाही, तर ते आतल्या आत हादरत असावेत.
युनोच्या निष्कर्षानुसार, जगात असा एकही देश नाही जिथे स्त्रियांवर कौटुंबिक हिंसाचार घडत नाही! युनोच्या २०२०च्या आकडेवारीनुसार केवळ या एका वर्षांत जगातल्या ४५००० स्त्रिया कौटुंबिक हिंसाचारात मरण पावल्या आहेत. ही आहे केवळ मरण पावलेल्या महिलांची संख्या! हिंसाचार झेलत जिवंत असलेली आकडेवारी याहून कितीतरी पटीने असणार हे उघड आहे. शिवाय पोलिसतक्रार नसलेली, नोंद न झालेली आकडेवारी अजून वेगळी!
भारतात ६५ टक्के पुरुषांचे मत आहे की स्त्रियांना मारहाण करणे हे सयुक्तिक आहे! भारतातला प्रसिद्ध संत तुलसीदास म्हणतो, ‘ढोल गंवार पशू शुद्र नारी, ये सब ताडन के अधिकारी.’ जिथे आपल्या पुराणांमधून आणि धर्मग्रंथांमधूनच आणि कथित साधूसंत म्हणवणाऱ्यांकडूनही अशा प्रकारची वक्तव्ये आहेत, तिथे जनमानसात अशा वृत्ती रुजलेल्या असणं आश्चर्याचं नाहीच! भारतात स्त्रियांचा उल्लेख करताना, ‘पायातली वहाण...’ असा उल्लेख सर्रास केला जातो. ‘पावसाने झोडपलं नि नवऱ्याने मारलं तर कुठे तक्रार करणार’ अशी म्हण इथल्या ग्राम्य जीवनात सहजपणे म्हटली जाते. म्हणजे नवरा आहे तर हात उचलणारच – हे गृहीत धरलेलं आहे. मुलांसाठी आणि कुटुंब अबाधित राखण्यासाठी स्त्रियांनी हे सहन करायला हवं. ती काही फार मोठी गोष्ट नाही. अशीही समाजाची सहज मानसिकता आहे.
या हिंसाचाराला लहानमोठी कारणं पुरेशी असतात. खानदानाची इज्जत, मुलींचे जातीबाहेर प्रेमप्रकरण, हुंडा, विवाहबाह्य संबंध, एकनादोन! लिंगनिवड हादेखील कौटुंबिक हिंसाचाराचाच एक भाग आहे. पण अनेकदा विनाकारण मारहाण, शिव्या या स्त्रियांच्या पाचवीला पुजलेल्या असतात. बाहेरच्या जगातले अपमान, दुर्लक्ष, हिंसा, अन्याय, अत्याचार इत्यादींची परतफेड पुरुष घरातल्या स्त्रियांवर राग व्यक्त करून करत असतात. या सिनेमात देखील हेच घडत असते, मात्र इथं बद्रू आपल्यावरच्या हिंसाचाराचा बदला घेते.
‘हिंसाचाराला हिंसाचार हे प्रत्युत्तर होऊ शकत नाही. खूनाला खून हे उत्तर असू शकत नाही’ – हे सगळे सुविचार योग्यच आहेत. पण जेव्हा स्त्रिया हे करू लागतात तेव्हाच हा शहाणपणा समाजाला का सुचतो? हा प्रश्न आहे. हे अनेक बाबतीत घडत असतं. अगदी दारू, सिगरेट किंवा तत्सम कोणत्याही वाईट सवयींचा अंगिकार जेव्हा स्त्रिया करताना दिसतात, तेव्हाच दारू, सिगरेट हे आरोग्याला अपायकारक असल्याचा साक्षात्कार तमाम समाजाला होऊन तिला उपदेश केले जातात. बहुतांश पुरुष घरदाराकडे, मुलांकडे दुर्लक्ष करून करीअर करतात, छंद जोपासतात तेव्हा कुणाला फारसं काही वाटत नाही. मात्र स्त्री जेव्हा आपल्या करिअरला, आपल्या छंदांना, आवडींना अग्रक्रम देते तेव्हा ते कुटुंबाला, कुटुंबसंस्थेला कसं वाईट आहे, याचे हिरीरीने डोस पाजले जातात. इथं कशाचंच किंवा कुणाचंच समर्थन करण्याचा हेतु नाही. पण समाजाचा दुटप्पीपणा मांडायचा आहे! या पुरुषप्रधान समाजाला स्त्रीचा संताप फार फार खटकतो आणि हादरवतो..! आपली जन्मजात अरेरावी, वर्चस्व आणि सत्ता संपण्याची पुरुषांना धास्ती वाटते. डार्लिंग्सच्या निमित्ताने जर असा हादरा बसत असेल तर ते चांगलंच आहे!

#Domesticviolence   

अलका गांधी – असेरकर.

कवी आणि ब्लॉगर

 



2 Comments

  1. संपूर्ण जगात, सगळ्या धर्मातील पुरुष असेच वागतात. त्यातल्या त्यात आपण तर अधिकच दुतोंडी. घरात कुणी पाहुणे आले की बायको, सुनेसोबत खूप गोड व्यवहार, एरविला मारझोड.
    माझी आजी 80 वर्षाच्या वयाला, मरताना तिच्या मुलाला म्हणाली, "बाळ, एक सांगून ठेवते, या माणसाला (आजोबांना) माझ्या प्रेताला हात सुद्धा लावू देऊ नको". आयुष्यभर काय आणि किती सोसलं असेल तिने!

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form