मंगळसूत्र आणि थोडंसं इतर काही ..

कभी कभी मेरे दिल में खयाल आता है, की ये जो देश ही मेरा, वो कहीं एक tv सिरियल तो नहीं?

त्यादिवशी सहज फोन चाळत बसले होते आणि अचानक माझ्यासमोर एक मजेदार हेडलाइन आली - ‘पत्नीने मंगळसूत्र उतरवणे ही सर्वोच्च पातळीवरील मानसिक क्रूरता. त्यामुळे नवऱ्याच्या भावना दुखावतात आणि त्याच्या मनावर खोलवर परिणाम होतो : मद्रास उच्च न्यायालय.’ आधी तर मला हसूच आलं! तरी मी ती बातमी पूर्ण वाचली. त्यातून असं कळलं की ज्या जोडप्याच्या घटस्फोटाची सुनावणी होती ते २०११ पासूनच वेगळे रहात आहेत. त्यातल्या पत्नीने तेव्हाच मंगळसूत्र घालणं बंद केलं होतं. न्यायाधीश व्ही. एम. वेलूमणी आणि एस. सौंथर ह्यांनी असा निष्कर्ष काढला की - ‘बायको मंगळसूत्र घालत नाही म्हणजे ह्या जोडप्याने एकत्र राहण्याची काहीही शक्यता नाही’ - म्हणून त्या जोडप्याला घटस्फोट देऊन टाकला. अर्थात मद्रास हायकोर्टाच्या विधानावर भरपूर टीका झाली! त्यानंतर दोन दिवसांनी कोर्टाच्या विधानाचा 'चुकीचा अर्थ' लावण्यात आलेला आहे अशाही अनेक बातम्या आल्या. पण विधान खरंच हायकोर्टाने केलं असलं किंवा बातमीदारांच्या गैरसमजातून झालेलं असलं, तरी जे सामान्य लोकांपर्यंत पोहोचलंय ते कसं बदलणार? लग्नानंतर मंगळसूत्र घातलंच पाहिजे, असा समज आणखीन घट्ट व्हायला त्यातून मदत होणार नाही का?
खरं म्हणजे आता ‘लग्न’ ही गोष्टच किती आऊटडेटेड होत चालली आहे! मला तर मुळात लग्नासारखा आर्थिक करार (economic proposition) करण्याची गरजच वाटत नाही. पण समजा मी नाईलाजाने लग्न केलंच तर मंगळसूत्र तरी अजिबात घालणार नाही. माझे विचार असे असण्याचं कारण हे माझ्यावर झालेले स्त्रीवादी संस्कार आहेत. लहानपणापासून मी अनेक स्त्रीवादी बायकांना बघत बघत मोठी झाले आहे. अर्थातच, हा एक मोठा प्रीव्हीलेज आहे! छाया दातार, मीना देवल, विजू चौहान, माझी आई तशीच मंगलमावशी (मंगल पाध्ये) ह्यांना कुणालाही मी कधी मंगळसूत्र, कुंकू अशा अवतारात बघितलेलं नाही. 
मंगलमावशीचा एक किस्सा तर इतका भारी आहे! साधारण ३०-३५ वर्षांपूर्वी तिची मुलगी सोनाली लहान असताना, तिला शाळेत सोडायला जायची. तेव्हा सोनालीचे शिक्षक आणि इतर मुलांचे पालकसुद्धा मंगल मावशीकडे अगदी बिचाऱ्या नजरेने बघायचे. ‘इतक्या तरुण वयात ह्या बाईचा नवरा जावा, हे किती वाईट..’ असंही कुजबुजायचे. पण एकदा सोनालीला शाळेत सोडायला रमेशकाका (मंगलचा नवरा) सुद्धा गेला होता ! तेव्हा मात्र हिचा नवरा ठणठणीत असूनसुद्धा ही बाई ना कुंकू लावते ना मंगळसूत्र घालते, ह्याचा सोनालीचे शिक्षक आणि इतर पालकांना इतका धक्का बसला की त्यांनी मंगल मावशीशी बोलणंच टाकलं! माझ्या आईचं पण अगदी तसंच - मी लहानपणी ज्या पाळणाघरात जायचे तिथल्या बायका मंगळसूत्र न घालणाऱ्या आणि कुंकू न लावणाऱ्या माझ्या आईबद्दल किती वाईटसाईट बोलायच्या हे मी स्वतः ऐकलेलं अजून आठवतं. अशा ह्या सगळ्या बायका गेल्या ४० वर्षांपासून ठिकठिकाणी झगडत राहिल्या म्हणून आता माझ्या पिढीतल्या काहीजणी तरी मंगळसूत्राकडे निव्वळ चॉइस म्हणून बघू शकतात. पण मद्रास हायकोर्टाच्या विधानाने त्यांच्या संघर्षावर अगदी बोळाच फिरवलाय !
सगळ्यांनाच असे स्त्रीवादी संस्कार मिळत नाहीत ह्याचीही मला जाणीव आहे. म्हणूनच मी माझ्या आणखी काही मित्र मैत्रिणींशी बोलून त्यांचीही मतं विचारली. दिल्लीला शिकणारी ऋतिका गौर म्हणते, “मी कधी लग्न केलंच, तर मी काही मंगळसूत्र घालणार नाही. त्याची अनेक कारणं आहेत. पहिलं म्हणजे मला ते अनावश्यक वाटतं आणि दुसरं म्हणजे मंगळसूत्र घालण्याची रीत ही धर्माशी जोडलेली आहे आणि मी कोणताही धर्म पाळत नाही. बाईने मंगळसूत्र घालायचं की नाही हा तिचा प्रश्न आहे. पण तरी माझी खात्री आहे की जर बायकांना मंगळसूत्राचा पुरुषसत्तेशी असलेला जवळचा संबंध समजावून दिला, तर बहुतेक बायका ते घालणं नाकारतील.”
आभास केसकर म्हणतो, “मला मंगळसूत्र घालणं अजिबात महत्वाचं वाटत नाही. बायकोने मंगळसूत्र घालून मिरवावं, जगाला कळावं की ही ‘माझी’ बाई आहे हे मला मुळातच पटत नाही. अशाप्रकारे दुसऱ्या व्यक्तीवर आपला मालकी हक्क असूच शकत नाही. मी त्याकडे ज्याची त्याची आवड म्हणून बघतो. नवरा-बायको दोघं जर का कम्फर्टेबल असतील तर त्यांनी खुशाल घालावं मंगळसूत्र.”
“मंगळसूत्र काय, किंवा कुंकू, अंगठी काय, हे सगळे मॅरेज मार्कर्स असतात. आणि ते फक्त बाईला घालावे लागतात. एखाद्या पुरुषाकडे बघून त्याचं लग्न झालं आहे की नाही हे कळायची काहीच सोय नसते. मी जर कधी लग्न केलं तर मी काही मंगळसूत्र घालणार नाही. सुदैवाने माझे आई बाबा आणि अगदी माझ्या आजोबांचं सुद्धा माझ्यासारखंच मत आहे. पण ज्या बायका मंगळसूत्र घालणं पसंत करतात, त्यांनाही मी काही जज् करत नाही. तो जिचा तिचा प्रश्न आहे असंच मी समजते.” - असं काव्या मोहता म्हणाली.
थोडक्यात, माझ्या वयाचे मित्रमैत्रिणी तर खूप स्पष्टपणे यावर बोलले. पण माझ्यापेक्षा थोड्याशा मोठ्या पुरुषांना काय वाटतंय? तेही मी विचारून पाहिलं. तर एकाने नाव प्रसिद्ध न करायच्या अटीवर सांगितलं, की - “माझ्या बायकोने मंगळसूत्र घातलं नाही म्हणून माझ्या काही भावना बिवना दुखावल्या जाणार नाहीत. बाईला मंगळसूत्र घालण्याची सक्ती करण्याला माझा निश्चित विरोध आहे. माझे आईवडीलही तसे नाहीत. त्यांच्यावर वर्षानुवर्षांची काही सांस्कृतिक बंधनं आहेत. पण ती बंधनं त्यांनी माझ्यावर कधीही लादली नाहीत.”
अनिरुद्ध जोशी तर म्हणतो, “मंगळसूत्र घालायचं की नाही हयाबद्दल माझं आणि माझ्या बायकोचं खास बोलणं झाल्याचं तर मला आठवत नाही. ती कधीतरी एखादं धार्मिक कार्य असेल तर तिच्या मर्जीने मंगळसूत्र घालते. पण जर एक दिवस अचानक तिने तेही घालणं बंद केलं, तरी तो तिचा चॉइस असेल. त्यावर माझी काही हरकत असण्या नसण्याचा प्रश्नच येत नाही.”
ही तर झाली वैयक्तिक पातळीवरची मतं; पण ह्या गोष्टी आता खासगी पुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत ना! 
मला आठवतंय, मागच्या वर्षी एका प्रोफेसरने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मंगळसूत्राची तुलना कुत्र्याच्या गळ्यातल्या पट्ट्याशी केली होती; म्हणून तिच्यावर FIR दाखल करण्यात आला होता. कारण काय? तर म्हणे तिच्या ह्या मतामुळे कुणाच्या तरी धार्मिक भावना दुखावल्या होत्या! 
एका मंगळसूत्राच्या जाहिरातीमुळे सुद्धा लोक भडकले होते. तसंच आणखी कुठल्यातरी जाहिरातीतल्या बायांनी बिंदी न लावल्यामुळे आणखी कुणाच्यातरी हिंदुत्ववादी भावना दुखावल्या होत्या. आता हायकोर्टाच्या ह्या नव्या निकालाने कदाचित अशा भावना दुखावून घेणाऱ्यांना जास्त प्रोत्साहन मिळेल. उठसूट स्वत:च्या भावना दुखवून घेणारे लोक तर दिवसेंदिवस वाढतच चाललेत. 
मद्रास हायकोर्टाने नेमकं काय विधान केलं आणि त्यातलं आपल्यातल्या कोणापर्यंत कायकाय पोहोचलं हे तर सांगणं कठीण आहे. मग माझ्यासारख्या, ऋतिकासारख्या मुलींनी मंगळसूत्र घातलं नाही, सिंदूर लावला नाही - म्हणूनही रस्त्यावरच्या कुणाच्या भावना दुखावतील की काय? पण मला मात्र माझ्यासारख्या मुलींच्या फ्यूचर पार्टनरला हे सांगायलाच पाहिजे की ‘मन घट्ट कर बाबा... भविष्यात तुझ्या भावना दुखवण्याची चांगलीच शक्यता आहे. मी ना मंगळसूत्र घालणार, ना कुंकू लावणार, ना तुझं नाव लावणार! नाही रे, तुझ्या आईबाबांना बरं वाटावं म्हणून पण मी असं काही करणार नाही! आणि तुला हे चालणार नसेल तर तुझं अवघड आहे...’

#Mangalsutra #MentalCruelty#Sabyasachi#MangalsutraAds

मुक्ता खरे

रंगकर्मी आणि ब्लॉगर

 


3 Comments

  1. लेख चांगला झालाय. मालिकांमध्ये मंगळसूत्रांचं प्रदर्शन असलं तरी बऱ्याच महिला ते गळ्यात घालतातच असंही नाही. हल्ली ही संख्या थोडी का होईना वाढतेय.

    ReplyDelete
  2. विचापूर्वक लिहले आहे. तुमची समज परिपक्व आहे का? हे प्रत्येकाने तपासून बघायला हवे .

    ReplyDelete
  3. मुक्ता लेख चांगला आहे, सर्व बाजूंनी विचार मांडले आहेत.

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form