ह्या चित्रपटाला 'वाय' असं नाव का दिलं असावं?- याचं एकच एक उत्तर नाही देता येत!
पोस्टरमध्ये 'वाय' या इंग्रजी अक्षराच्या आत दडलेला एक हात दिसतो, गर्भपात करणारा.
स्त्रीच्या गर्भपिशवीचा आकारही साधारण 'वाय' या इंग्रजी अक्षरासारखा... 'एक्स' आणि 'वाय' या मानवी गुणसूत्रांमधलं 'वाय' हे अक्षर पुरुषाची लिंगनिश्चिती करणारं असतं. " 'एक्स' म्हणजे निसर्गानेच मारलेली फुली आणि 'वाय' म्हणजे 'येस', होकार.." हाही संदर्भ चित्रपटात एका ठिकाणी येतो. याशिवाय चित्रपटात एका निर्णायक वळणावर आपल्याला फ्रेममध्ये हा 'वाय' दिसतो. एका ठिकाणी मुख्य रस्त्याला 'वाय'च्या आकारात दोन फाटे फुटलेले दिसतात. त्यातल्या एका फाट्याने पुढे जाणाऱ्या रस्त्याच्या टोकाला या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असणारा निर्घृण प्रकार घडत असतो. या सर्वातून काहीही अर्थ काढला, तरी चित्रपटाचं महत्त्व कमी होत नाही. काही वर्षांपूर्वी PIFF मध्ये या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले. असं आहे तरी काय या चित्रपटात?

चित्रपटाचा विषय ट्रेलरमधून अजिबात कळत नाही!कसलातरी मोठा गुन्हा घडतो आहे आणि तो लपवण्यासाठी काही माणसं प्रयत्नांची शर्थ करतायत, एवढंच कळतं. गर्भलिंगनिदान आणि स्त्री गर्भाचा नाश हा तो गुन्हा आहे, हे चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही मिनिटांतच प्रेक्षकांना कळतं. मग चित्रपटात उरतं काय? तर हा गुन्हा ज्या शिताफीने घडतो, ते पाहणं. या गुन्ह्याच्या निमित्ताने आणखी एक गुन्हा घडणं - या सगळ्या प्रकरणावर पडदा पडलेला असणं आणि काही वर्षांनी पीसीपीएनडी कायद्याच्या निमित्ताने कुणीतरी ही जुनी मढी उकरून पाहतं, तेव्हा त्या व्यक्तीच्या हाती लागलेलं काहीतरी भीषण आणि धक्कादायक प्रकरण!
चित्रपटाची नायिका आपल्याला पडद्यावर दिसते, ती चित्रपट सुरु होऊन बराच वेळ उलटून गेल्यानंतर. अर्थात, हे कथा सांगण्याच्या क्रमानुसार होत असलं, तरी महत्त्वाचं आहे. पडद्यावर दिसणारं कृष्णकृत्य हा कथेचा गाभा असल्यामुळे मुख्य पात्रांचा प्रवेश दुय्यम होऊन जातो. कथेच्या अनुषंगाने अनेक पात्रांचा भरणा चित्रपटात असला, तरी गुन्ह्याची उकल करणाऱ्या मोजक्या स्त्रिया सोडल्या, तर इतर स्त्रियांना स्वतःचा आवाजच नाही. पहिल्या फ्रेमपासून आपल्याला गुन्ह्यात सहभागी असलेले पुरुषच दिसत राहतात.
चित्रपटाच्या कथेचा मागोवा घेतला, तर वास्तवातल्या अनेक घटनांशी साधर्म्य आढळते.
बीड जिल्ह्यात अवैधरीत्या गर्भलिंगनिदान आणि स्त्रीभ्रूणहत्येचं रॅकेट चालवणाऱ्या सुदाम मुंढे आणि त्यांची पत्नी सरस्वती या डॉक्टर दांपत्याला गुन्हा घडून गेल्यानंतर आठ वर्षांनी बीड सेशन्स कोर्टाने १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती. २०१२मध्ये एका स्त्रीच्या पाचव्या गर्भधारणेच्या वेळी गर्भपात करताना तिचा मृत्यू झाल्यानंतर हा गुन्हा उजेडात आला होता. या गुन्ह्यात सतरा जणांना संशयित म्हणून अटक करण्यात आली होती.

म्हैसाळ मध्ये देखील अशीच काहीशी घटना घडली होती. तसंच सोलापूर जिल्ह्यात २०१३ साली उपासे हॉस्पिटलचे मालक डॉ. अजित उपासे आणि त्यांची पत्नी डॉ. प्रियदर्शिनी यांना अटक झाली होती. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी १८ आठवड्यांच्या मुलीच्या गर्भाचं दफन करताना पकडण्यात आलं होतं. चौकशीतून अशी माहिती पुढे आली, की हे डॉक्टर दांपत्य अशा बऱ्याच केसेसमध्ये सामील होतं. बीड आणि लातूर जिल्ह्यात त्यादरम्यानच्या काळात अनेक स्त्रीभ्रूणहत्या झाल्याचं तपासात आढळून आलं होतं. या झाल्या गर्भपाताच्या घटना. पण चित्रपट केवळ यावर भाष्य करत नाही. मुलींना जन्माला का घालायचं नाहीये, यावर मत व्यक्त करतानाचे अनेक व्यक्तींचे मुलाखतींचे तुकडे चित्रपटात दिसतात. मुलगा झाला की जावयाचे होणारे लाड, मुलगी झाली की तिच्या सुरक्षिततेचे प्रश्न, या अनुषंगाने ही चर्चा पुढे सरकते. स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायकारक गुन्ह्यांचं स्वरूप आणि त्यांचे आकडे पाहिले की घेरीच यावी - अशी परिस्थिती अजूनही आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात घडलेली एका भावाने आपल्या बहिणीचा अतिशय नृशंस पद्धतीने खून केल्याची घटना ताजीच आहे. गेल्या दहा वर्षांत परिस्थिती सुधारणं तर सोडाच, त्यात तसूभरही फरक पडलेला नाही, असंच या घटनांकडे पाहून वाटावं. पीसीपीएनडीटी कायद्यामुळे या घटनांना आळा निश्चितच बसला असेल, मात्र हे प्रकार पूर्णपणे थांबले नसावेत, अशीही शक्यता आहे.
हा चित्रपट कुठल्याही एका पात्राभोवती फिरत नाही, सुरुवातीच्याच काही दृश्यांत हॉस्पिटलमधला कर्मचारी पॉर्न पाहण्याच्या तयारीत असलेला दिसतो. ज्या फोटोग्राफरला कथेच्या अनुषंगाने सॉफ्ट कॉर्नर मिळू शकला असता, तोही काही धुतल्या तांदळाचा नाही. तो जोडप्यांचे अश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करणारा आहे. स्त्रियांच्या सशक्तीकरणावर भाषण करणारी आणि त्यात बक्षीस मिळवणारी गृहिणी नवऱ्याच्या कारस्थानांपुढे हतबल आहे.जी स्त्री गर्भलिंगनिदान आणि स्त्रीभ्रूणहत्यांच्या प्रकरणाचा छडा लावायचं ठरवते, तिच्यावर तिचे वरिष्ठ अधिकारी दबाव आणून तिची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्याचं फर्मान काढतात. या सगळ्या दृश्यांमध्ये चोरीछुपे सगळीकडे स्त्रियांचंच कसं शोषण होतं, हे अधोरेखित होतं. तरीही, स्त्रीची बिचारी आणि पुरुषांची केवळ शोषक अशी इमेज तयार करण्याचा प्रयत्न हा चित्रपट करत नाही,हे विशेष!
तरीही आपल्या समाजात आजही पुरुषप्रधान संस्कृतीच कशी तग धरून आहे, हे हा चित्रपट अगदी नेमकेपणाने प्रेक्षकांसमोर मांडतो. अशी अनेक मूक आक्रंदनं समजून घेण्यासाठी तरी हा चित्रपट पाहायलाच हवा.
(घटनांचे संदर्भ आणि इमेजेस् इंटरनेटवरून)
संदेश कुडतरकर
विविध वेबपोर्टल आणि प्रिंट मीडिया मध्ये चित्रपट
आणि लिंगभावाशी संबंधित विषयांवर लिखाण करतो.