सेक्सवर्क कडे काम म्हणून का पाहिले जात नाही? (भाग १ )

सर्वोच्च न्यायालयाने सेक्सवर्क करणाऱ्या महिलांसंदर्भात नुकताच एक महत्वाचा निर्णय दिला आहे. देहविक्रय व्यवसाय करणाऱ्या महिलांची अडवणूक करण्याचा किंवा त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा त्याचप्रमाणे त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने त्यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली असेल तर पोलिसांनी त्यांच्यासोबत भेदभाव करू नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे. वेश्या व्यवसायातील महिलांना पोलिसांकडून क्रूर आणि हिंसक वागणूक मिळते. कारण वेश्याव्यवसायाला काम मानण्या ऐवजी गुन्हा मानले जाते! वेश्याव्यवसाय ही काम का मानले जात नाही? समाजातील आणि कायद्यातील कोणकोणती गृहितके कारणीभूत ठरतात – याविषयी ह्या लेखात मांडणी केली आहे. लेखिका  "संग्राम" संस्थे द्वारे  वेश्यांच्या  हक्कांसाठी अनेक वर्षांपासून काम करत आहेत. 

सेक्सवर्क म्हणजे पैशासाठी लैंगिक सेवांची प्रौढांच्या संमतीने केलेली तरतूद. या व्याख्येचा कोणता भाग कामाच्या कल्पनेला आव्हान देतो? ‘पैशासाठी’ प्रदान केलेली सेवा? पैशासाठी ‘प्रौढांद्वारे’ प्रदान केलेली सेवा? पैशासाठी प्रौढांद्वारे ‘सहमतीने’ प्रदान केलेली सेवा? वरीलपैकी काहीही नाही. ज्या क्षणी सेवेचे वर्णन ‘लैंगिक’ म्हणून केले जाते, त्या क्षणी ते काम आहे ही समजूत बदलते. ह्या लेखात आम्ही “धंदा” म्हणजे लैंगिक व्यवसायातील कामाचे स्वरूप – याचा शोध घेऊ इच्छितो.
सेक्सवर्क मध्ये व्यावसायिक संदर्भात एकाच व्यक्तीशी किंवा एकापेक्षा अधिक व्यक्तींशी लैंगिक भागीदारी केली जाते. पैशाच्या देवाणघेवाणीसाठी लैंगिक सेवांची तरतूद आणि लैंगिक भागीदारी ह्या दोन्ही बाबी दोन्ही विवादास्पद राहतात. कारण त्यामध्ये पुरुषांच्या वासना पूर्ण करण्यासाठी स्त्रिया ‘सहज उपलब्ध" असतात अशी समजूत असते! 

सेक्सवर्क म्हणजे पैशासाठी लैंगिक सेवांची प्रौढांच्या संमतीने केलेली तरतूद. 

या व्याख्येचा कोणता भाग कामाच्या कल्पनेला आव्हान देतो?

अनेक भागीदारांसोबत प्रासंगिक स्वरूपात ठेवण्यात येणारे लैंगिक संबंध ही भावना नसलेली शारीरिक कृती असू शकते, असे मानले जाते. असे संबंध स्त्रियांद्वारे सुरू केले जाण्याची शक्यता असणे, तसेच हे संबंध व्यावसायिक संदर्भात वापरले जाणे आणि ते आनंददायक देखील असण्याची शक्यता या सर्वांबद्दल नैतिकतावाद्यांची नाराजी असते. वेश्या व्यवसाय करणारी बाई म्हणजे अनैतिक - अशी प्रतिमा तयार झालेली आहे. समाजाने वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना बहिष्कृत केल्यामुळे सेक्सवर्कच्या गुन्हेगारीकरणाला पाठबळ मिळते.

भारतामध्ये दलित चळवळीने असे मानले आहे की जातीच्या वर्चस्वाची अभिव्यक्ती म्हणून मुख्यतः उच्च जातीतील पुरुष त्यांच्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी खालच्या जातीतील स्त्रियांचा "वापर" करतात. भारतातील अनेक भागांमध्ये जात-आधारित देवदासी व्यवस्था आणि ‘बेडिया’ सारख्या जमाती ही याची उदाहरणे आहेत. कर्नाटकातील देवदासींचे सक्तीचे पुनर्वसन आणि देवदासी विरोधी कायद्यामुळे अनेक देवदासींना कर्नाटकातील त्यांची घरे सोडून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात कामासाठी स्थलांतर करावे लागले आहे.

चेरिल ओव्हर्सने स्पष्ट केल्याप्रमाणे, जुन्या स्त्रीवादी मंडळीद्वारे आणखी एक विचार व्यक्त केला जातो. त्यानुसार सेक्सवर्कला अपरिहार्यपणे अनैच्छिक आणि गुलामगिरीपासून अविभाज्य मानले जाते. सेक्सवर्कमध्ये लैंगिक आणि आर्थिक शोषणासाठी तस्करी केली जाते; कोणतीही स्त्री स्वत: होऊन सेक्सवर्क मध्ये येऊ शकत नाही आणि सर्व स्त्रियांना लैंगिक व आर्थिक शोषणासाठी जबरदस्तीने किंवा फसवून अथवा आमिष दाखवून, कर्जाशी बांधून ठेवलं जातं हा विचारही गृहीत धरला जातो.

1980 च्या दशकात एचआयव्ही/एड्सच्या आगमना नंतर विविध देशातल्या सरकारांनी सेक्सवर्कर्सना एचआयव्हीच्या प्रसाराचे वाहक मानले होते. बहुसंख्य देशांनी पुरुषांचे “bridge population” वाचवण्याचा निर्धार केला होता. केवळ "आदरणीय" महिलांचे एचआयव्हीपासून संरक्षण करणे हे उद्देश्य त्यांनी ठरवलेले असायचे. पण जगभरातील छोट्या छोट्या भागातल्या सेक्स वर्कर्सनी या संधीचा उपयोग करून घेतला आणि सेक्सवर्कर्सचे आरोग्य, त्यांची सुरक्षितता आणि त्यांचे अधिकार याकडे लक्ष वेधले.

कोणतीही स्त्री स्वतःहून लैंगिक कार्यात येऊ शकत नाही 

आणि सर्व महिलांना सक्ती केली जाते – असेच गृहीत धरले जाते


तथापि, जोआन सेटेने म्हटल्याप्रमाणे, ही सगळी परिस्थिती राजकीयदृष्ट्या शक्तिशाली असलेले धार्मिक लोक,  सेक्सवर्कर्सचे हक्क आणि अधिकार नाकारणारी तस्करीविरोधी चळवळ आणि भरपूर फंडिंग देणाऱ्यांमुळे गुंतागुंतीची बनते. युनायटेड नेशन्सने सुरुवातीच्या काळात लैंगिक कामगारांच्या अधिकारांच्या बाजूने काही सकारात्मक भूमिका घेतली परंतु नंतर निषेधवादी विचारांनाच मान्यता दिल्याचे दिसून आले.

सेक्सवर्क म्हणजेच हिंसा आहे? 


ज्या तस्करीविरोधी कार्यकर्त्यांना कट्टरपंथी स्त्रीवाद्यांचा पाठिंबा मिळाला आहे; त्यांचा असा युक्तिवाद असतो की सेक्सवर्क म्हणजेच हिंसा आहे! कारण सेक्सवर्कमध्ये जबरदस्ती आणि फसवणुकीद्वारे महिलांना आमिष दाखवून आणले जाते. आणि तस्करांकडून लैंगिक शोषण केले जाते. विशेषत: अल्पवयीन मुलींबद्दल त्यांचा युक्तिवाद वैध आहे. परंतु तस्करांना शोधून त्यांना शिक्षा करण्या ऐवजी प्रत्यक्षात मात्र लैंगिक कामगारांची त्यांच्या संमतीशिवाय सुटका करणे आणि त्यांचे पुनर्वसन करने (Rescue & rehabilitation) वरच लक्ष केंद्रित केले जाते. या विचार पद्धतीतली गडबड अशी आहे की - सर्वच महिलांची तस्करी केली जाते – अशी समजूत करून घेतल्याने अशा अविवेकी बचाव आणि पुनर्वसन योजनेत सेक्सवर्कर्सची संमती आवश्यक मानलीच जात नाही. मानवी तस्करीविरोधी संघटनांकडून सेक्सवर्कर्सच्या सक्षमीकरणासाठी काही केले जात नाही.

सेक्सवर्क बद्दलचे बहुतेक कायदे आणि धोरणे असे दर्शवतात की सेक्सवर्क भारतात बेकायदेशीर नसले तरी, अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा सेक्सवर्क मधल्या महिलांना गुन्हेगार ठरवतो. अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा, 1956 मध्ये लागू करण्यात आला. हा सुरुवातीला Suppression of Immoral Traffic Act  (SITA) होता आणि 1986 मध्ये, अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा किंवा ITPA असे नाव बदलले गेले. हा ITPA कायदा वेश्यागृह चालवणे, सार्वजनिक ठिकाणी soliciting करणे, वेश्याव्यवसायाच्या कमाईतून जगणे आणि वेश्येच्या सहवासात राहणे यासारख्या कृत्यांना दंडनीय ठरवतो.

ITPA मध्ये विरोधाभासी पद्धतीचे असे अनेक मुद्दे आहेत, ज्यामुळे लैंगिक कामगारांना लांछनास्पद मानले जाते. उदाहरणार्थ, सेक्सवर्क केले जाते त्या भागातून एखाद्या व्यक्तीला “त्याच्या संमतीने किंवा त्याशिवाय” ताब्यात घेणे. तसंच, छापा मारताना "प्रौढ" आणि "अल्पवयीन" यांच्यात कोणताही फरक केला जात नाही. सामान्यतः, प्रौढांच्या बाबतीत, अपहरण किंवा बेकायदेशीर बंदिवास यांसारख्या गुन्ह्यांमध्ये संमती किंवा त्याची कमतरता हा एक महत्त्वाचा घटक असतो – त्यामुळेच एखादं कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचं आहे की नाही हे ठरतं. हा कायदा न्यायदंडाधिकार्‍याला त्याच्या अधिकारक्षेत्राच्या स्थानिक मर्यादेत राहणाऱ्या वेश्येला क्षेत्रातून काढून टाकण्याचा आदेश देण्याचा अधिकार देतो. वेश्याव्यवसाय निर्मूलनवादी असा युक्तिवाद करतात की सेक्सवर्क ही सर्व स्त्रियांवरील हिंसा आहे आणि ती पूर्णपणे नष्ट केली पाहिजे. हा युक्तिवाद गरिबी, जात, शुद्ध स्त्रीत्व, पवित्रता, परिस्थितीची बळजबरी आणि अनैतिक तस्कर या सगळ्यांना एकत्र गुंडाळतो.

(क्रमश:)

#SexWork #Sexworker #Prostitution #SupremeCourt

मीना सेशू 

आरती पै

(हा लेख फेमिनिझम इन इंडिया ह्या वेबसाइटवर जून 2017 मध्ये प्रकाशित झाला आहे.

मूळ लेख वाचण्यासाठी - https://feminisminindia.com/2017/06/07/sex-work-seen-work/)




Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form