विवाहसंस्था आणि लैंगिकतेचे राजकारण

विवाह ही खरेतर समाजाच्या आर्थिक गरजेतून अस्तित्वात आलेली व सामाजिक मान्यतेद्वारा प्रस्थापित झालेली सोयीची संस्था आहे. आपल्याला ती कितीही नैसर्गिक आणि पूर्वापार चालत आलेली म्हणून उदात्त अशी वाटली तरीही मानवी इतिहासाच्या नजरेतून तिच्याकडे पाहिले तर ती मुळातून तशी नाहीये असे लक्षात येते. हे समजून घ्यायला करूणा गोखले यांनी त्यांच्या ‘बाईमाणूस’ या पुस्तकात दिलेला संदर्भ महत्वाचा ठरतो, ‘आपली मालमत्ता आपल्या मुलाला जावी या इच्छेतून विवाहसंस्था आणि पर्यायाने कुटुंबव्यवस्था उदयास आल्या, त्यासोबत स्त्रीच्या सामाजिक वावरावर बंधने आली आणि तिच्या लैंगिक स्वातंत्र्याचा संकोच झाला.’ 
 याउलट स्त्रीची लैंगिकता ही मात्र पूर्णपणे नैसर्गिकरीत्या अस्तित्वात येणारी व उस्फुर्तपणे कार्यान्वित होणारी अशी मूलभूत प्रेरणा आहे. परंतु समाजात दिसून येते की विवाहसंस्थेचे उदात्तीकरण करून, तिच्याद्वारे स्त्रीच्या लैंगिकतेवर अंकुश ठेवणे, सुप्तपणे तिची भीती बाळगून तिचे दमन करणे, तिची निंदा करणे आणि जमेल तेवढे स्त्रीला तिच्या लैंगिकतेपासून अलग करण्याचा प्रयत्न केला जातो. एकीकडे स्त्रीच्या लैंगिकतेला पूर्णपणे नाकारायचे आणि दुसरीकडे मात्र तिचे चारित्र्य, नीतीमत्ता, तिचे समाजातील स्थान या सर्वाना इथूनतिथून तिच्या लैंगिकतेशी कावेबाजपणे जोडायचे असा दुटप्पीपणा समाजात पहायला मिळतो.
या सर्व लैंगिकतेच्या राजकारणाची सुरुवात लहान मुलगी जन्माला आल्यापासूनच होते. बाळाचे लिंग मुलीचे आहे हे पाहताच तिच्यावर ‘मुलगी घडवण्याचे’ संस्कार केले जातात. मुलीला पाळी येताच तिच्या वागण्या-बोलण्यावरचे निर्बंध आपसूकच जाचक होतात. कारण पाळी आली म्हणजे तिचे शरीर लैंगिकतेच्या खुणा दाखवू लागले आहे, आता तिच्या चारित्र्याचे आणि पर्यायाने कौमार्याचे जतन लग्नापर्यंत करायचे, ही विचारसरणी बंधने घालण्यामागे असते. जसे पाळी येण्याने मुलीवर बंधने वाढतात, तसेच पाळी योग्य वयात आली नाही तरी पालक चिंतेत पडतात,’ हिचे शरीर प्रजननासाठी सक्षम आहे की नाही, आणि भविष्यात हिचे लग्न होईल की नाही?’ एकदा मी एका मुलींच्या आश्रमात निबंधस्पर्धा ठेवली होती, विषय होता ‘पहिली पाळी येण्याचा अनुभव.’ 
यातील सर्वच मुलींचा सूर नकारात्मक होता. एका मुलीने तर लिहिले होते, ‘या पाळीमुळे मला असे वाटतेय की मी मुलगा असते तर किती बरे झाले असते, उगीचच मी मुलगी झाले.’ तिच्या या वाक्याने मला खूप दुःख झाले की वयात येण्याचा, शरीर बहरण्याचा जो पौगंडावस्थेचा काळ आहे, तो या मुलींमध्ये स्वतःबद्दल जर असा न्यूनगंड निर्माण करत असेल तर कुटुंब व समाज म्हणून आपण कुठेतरी नक्कीच चुकत आहोत. खरेतर कुमारावस्थेतील मुलींना योग्य वेळी योग्यप्रकारे लैंगिक शिक्षण मिळाले कितीतरी समस्या आपोआप टळतील. 
अशी कुमारवयीन मुलगी जेव्हा गर्भवती होते तेव्हा जर ती विवाहित असेल तर तिला उत्तमरीत्या वागणूक मिळते, सोबत कुटुंबीय काळजी घ्यायला असतात. परंतु ती जर अविवाहित असेल, तर मात्र आरोग्य यंत्रणेतील लोकही तिला टोमणे मारायची संधी सोडत नाहीत. सोबत येणारे कुटुंबीय सतत तिची अवहेलना करत राहतात, आणि त्यातून पोलिसांचा मागे लागणारा ससेमिरा तो वेगळाच. या सर्वात त्या मुलीच्या मानसिक आरोग्याचे काय होत असेल याचा विचार कोणालाच नसतो.
या सर्वाचे मूळ मला वाटते की स्त्रीचे चारित्र्य विवाहसंस्थेच्या आजूबाजूला गुंफले जाते - यात आहे. जेव्हा एखादी विधवा किंवा घटस्फोटीत स्त्री माझ्याकडे गर्भपातासाठी येते तेव्हा तिची मान शरमेने झुकलेली असते. मला तिला समजावून सांगावे लागते की ‘बाई ग. शरीरीच्या गरजा कोणालाच चुकलेल्या नाहीत. कोणाला त्रास न देता त्या गरजा भागवणे यात काहीही वाईट नाही.’ अशाही काही बोटावर मोजणाऱ्या स्त्रिया पहायला मिळतात की ज्या सिंगल मदर बनतात आणि एकटीने मुलाची जबाबदारी घेतात. अशा स्त्रियांकडे बोट दाखवायला समाज विसरत नाही. शरीर संबंधातून गर्भ राहणे ही एक नैसर्गिक घडणारी गोष्ट, परंतु याला जेव्हा विवाहाच्या लेन्समधून पाहिले जाते तेव्हा नीतिमत्तेच्या रंगीबेरंगी कल्पना समाज त्याला चिटकवून टाकतो. वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीलाच एक अलिखित नियम भारतीय समाजाने पूर्वीपासून पाळला आहे तो म्हणजे मुलीचे कौमार्य ! आडून आडून विविध पद्धतीने मुलीची माहिती काढली जाते. शेजारी पाजारीही मुलीचे ‘वळण’ चांगले आहे की नाही हे खोलात जाऊन सांगतात, त्यानुसार तिच्या निवडीचा निर्णय घेतला जातो. आजच्या काळातही अनेक ठिकाणी उघडपणे कौमार्य चाचणी केली जाते!

ज्या विवाहसंस्थेचा एवढा उदो उदो केला जातो, 

त्या संस्थेत स्त्रीच्या लैंगिकतेला व लैंगिक सुखाला किती  महत्व दिले जाते ?  

ज्या विवाहसंस्थेचा एवढा उदो उदो केला जातो, त्या संस्थेत स्त्रीच्या लैंगिकतेला व लैंगिक सुखाला किती महत्व दिले जाते ? ही लैंगिकता म्हणजे नेमके काय ? स्त्रीची स्वतःच्या शरीराची समज, तिचे संपूर्ण व्यक्तिमत्व, तिची लैंगिक सुखाबद्दलची जाण, तिला कशाप्रकारचे लैंगिक संबंध आवडतात, कोणत्या व्यक्तीसोबत आवडतात, भिन्नलिंगी की समलिंगी की दोन्ही, या तिच्या आवडीची अभिव्यक्ती कशी होते? यात तिचे बोलणे, चालणे, कपडे घालणे, विचार करणे, छंद जोपासणे, लिखाण, वाचन, कला हे सर्व आले. इतकी सारी व्यापक व्याख्या लैंगिकतेमध्ये येते. आता तुम्ही विचार करा, यामधील किती घटकांवर, जवळजवळ सर्वांवरच समाज बंधने घालत राहतो, तिला नकारात्मकरित्या टोचणी देत राहतो, किंवा तिने ही अभिव्यक्ती करूच नये यासाठी तिचे दमन करत राहतो. लग्नानंतर तर बंधने आणखी करकचून आवळली जातात. कित्येक घरांमध्ये स्त्रीने कपडे कशाप्रकारे घालायचे हे सासरचे लोक सांगतात. कपडेच काय, तिने केस कसे ठेवावे, मेक अप करावा की नको, कसे बोलायचे, बाहेरच्या लोकांसमोर यायचे की नाही इत्यादी अनेक गोष्टी सासरकडील लोक ठरवतात. यामध्ये स्त्रीच्या अभिव्यक्तीला किंवा आवडीला काही स्थान नसते. इतक्या वेगवेगळ्या पातळ्यांवर तिचे मन मारून टाकल्यावर किती स्त्रियांचा आत्मविश्वास बळकट राहत असेल ?
यानंतर येते ती प्रत्यक्ष लैंगिक सुखाची गोष्ट. ज्याबद्दल मुलीनी अनेक कल्पना रंगवलेल्या असतात, त्यांचीही स्वप्ने असतात, की पुरुषाचा पहिला स्पर्श कसा असावा, पहिले चुंबन कसे असावे. कित्येक मुलीना याबद्दल भीतीही असते कारण नेमकी माहिती कधी मिळालेली नसते आणि आजूबाजूची काही नकारात्मक उदाहरणे पाहून मनात पूर्वग्रह निर्माण झालेले असतात. अशा स्त्रीला जर तिचे मन आणि शरीर समजून घेणारा, आधी मन उलगडून मग तिच्या शरीराला चेतवणारा, तिला उल्हासित करून लैंगिक इच्छा निर्माण करणारा आणि मग तिला सोबत घेऊन लैंगिक सुखापर्यन्तचा प्रवास संगीताच्या मैफिलीसारखा रंगवणारा जोडीदार मिळाला तर खरेच सुंदर. अशावेळी ती स्त्री सुखाने आतून बाहेरून फुलून येईल. परंतु प्रत्यक्षात असा पुरुष नवरा म्हणून मिळणे किती अवघड काम आहे. कारण लग्न जुळवताना बाकी सर्व गोष्टी पाहिल्या जातात, पण त्यांची मने जुळतात का, हे खूपच कमी ठिकाणी पाहिले जाते. मने जुळली तर शरीरांच्या तारा जुळणे सहज सोपे होते. कधीकधी मात्र मने जुळली तरीही दोघांचे लैंगिक संबंध सुखाचे होतीलच असे नसते, त्यातही वेगळ्या प्रकारच्या समस्या येऊ शकतात.
विवाहसंस्थेचे काही ठळक दोष उघडपणे जाणवतात. पहिला म्हणजे स्त्रीच्या शरीराकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहणे. यात मग तिच्या शरीरावर, सवयींवर आक्षेप घेतला जातो, तिचा अपमान केला जातो. माझ्या क्लिनिकमध्ये एक जोडपे आले होते. स्त्रीची आरोग्यतक्रार ऐकून तिला औषधे लिहून दिल्यावर, अचानक तिचा नवरा तिच्या स्तनांकडे हात दाखवून हिणकस आवाजात मला म्हणाला की “हिचे स्तन खूप छोटे आहेत. हे मोठे व्हायला काही उपाय सांगा.” हे ऐकून मी सर्द झाले. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर मात्र कसलेच भाव उमटले नाहीत जसे काही हे नेहमीचे असावे. कधी स्त्री जाड असेल तर पुरुष उठता बसता तिच्या वजनावर विनोद करत राहतात, तर काही तिच्या रंगरूपावरून तिला टोमणे मारत राहतात. जसे काही स्त्रीचे शरीर ही नवऱ्याची हक्काची मालमत्ता असल्याने त्याबद्दल कसेही बोलायला त्याला पूर्ण स्वातंत्र्य असते. यात मग तिच्या गर्भाशयावरही नवऱ्याचा आणि सासरच्या लोकांचा हक्क येतो, हे तर सर्वांनाच माहित आहे. त्यात मग कुटुंब नियोजनाची साधने वापरायची की नाही हेही पुरुष ठरवतो आणि ती न वापरल्याने नको असताना गर्भधारणा झाली की गर्भपातासाठी स्त्रीच्या शरीरावर औषधे, ऑपरेशनचा मारा होत राहतो. पुरुषांनी शिश्नावर चढवायचा निरोध ही इतकी साधी सोपी आणि स्वस्त, सगळीकडे उपलब्ध होणारी गोष्ट, पण केवळ आवडत नाही किंवा त्याने लैंगिक सुख कमी होते या कारणापोटी कित्येक पुरुष ते वापरायला नकार देतात. त्यामुळे स्त्रीला होर्मोन्सच्या गोळ्या खाण्याशिवाय पर्याय राहत नाही. निरोध न वापरल्याने अनेकदा पुरुषाकडून बायकोला लैंगिक आजार पसरतात, एच.आय.व्ही. त्यातलाच एक!
दुसरा महत्वाचा दोष म्हणजे लैंगिक संबंधांमध्ये स्त्रीच्या मर्जीचा आणि सुखाचा विचार न करणे. या वेळी स्त्रीला संभोगाची इच्छा आहे का, असेल तर तिला काय करायला आवडते, स्पर्श कसा आवडतो, तिला त्रास तर होत नाहीये ना, शेवटी तिला पण ऑरगाझ्म आला की नाही - या सर्व घटकांबद्दल अनेक पुरुष थोडाही विचार करत नाही. तू माझी बायको आहेस तर माझी जेव्हा जेव्हा इच्छा असेल तेव्हा तेव्हा तू माझ्याशी लैंगिक संबंध ठेवलेच पाहिजेत अशी स्त्रीवर सक्ती केली जाते, यातून मग प्रेमविवाहही सुटत नाही. अनेकदा ठरवलेल्या लग्नानंतर एकमेकांची अजून ओळख होण्याच्या आतच स्त्रीचे शरीर ओरबाडले जाते. स्त्रीचे शरीर उत्तेजित होऊन संभोगासाठी ती पूर्ण तयार होण्यामध्ये फोरप्ले म्हणजेच संभोगाच्या आधीची प्रणयक्रीडा याचे खूप महत्वाचे स्थान आहे. याने स्त्री फुलते आणि सुख घ्यायला व द्यायला उत्साहित होते. अनेक पुरुषांना याची माहिती नसते, स्त्रीच्या शरीराबद्दल ज्ञान नसते किंवा माहिती असली तरी तेवढे कष्ट करायची इच्छा नसते!
संभोग म्हणजे केवळ पुरुषाचे लिंग स्त्रीच्या योनीमध्ये घालायचे एवढीच मर्यादित कल्पना यामागे असते. परंतु लैंगिक संबंध इतके मर्यादित नसतात. प्रणय हा नजरेपासून सुरु होतो, एकमेकांकडे दोघे कसे पाहतात, स्पर्श कसा करतात, भावना शब्दांत कशा व्यक्त करतात, एकमेकांना कसे फुलवतात येथपासून लैंगिक सुखाची सुरुवात होते, ज्याची परिणीती कधी प्रत्यक्ष संभोगात होते किंवा नाहीही. लैंगिक सुखाचा परमोच्च बिंदू म्हणजेच ओर्गाझम, हा स्त्री व पुरुष दोघांचा वेगवेगळा असतो. पुरुषाचा ओर्गाझम हा त्याचे लिंग स्खलन होण्यातून कळून येतो. स्त्रीचा असा बाहेरून दिसत नाही, तसेच त्याला वेळही लागतो. त्यासाठी वेळ द्यायची, तिला आवडेल त्या गोष्टी करण्याची अनेक पुरुष तसदी घेत नाहीत. पुरुषाचे लिंग स्खलन झाले की संभोग संपला असे ठरवून पुरुष बाजूला होतो. तिला आनंद वाटला की नाही, हे अनेक पुरुष पत्नीला विचारतही नाहीत. यालाच इंग्लिशमध्ये Orgasm Gap अशी संज्ञा आहे आणि त्यावर शास्त्रीय व सामाजिक अभ्यासही करण्यात आलेले आहेत. अनेक चाळीशीला आलेल्या स्त्रियाही सांगतात की त्यांना वैवाहिक आयुष्यात कधीच ओर्गाझम मिळाला नाही. मी जेव्हा त्यांना फोरप्लेबद्दल समजावते तेव्हा त्या तक्रार करतात की त्यांचा नवरा बिलकुल या गोष्टी करत नाही. रात्री जेवण उरकून बेडरूममध्ये गेल्यावर ५-१० मिनिटात संभोग उरकतो आणि झोपून जातो, मागे अतृप्त राहिलेली बायको मात्र रात्रभर तळमळत राहते. 
कधी काही पुरुषांना लैंगिक समस्या असते, परंतु पुरुषीपणाच्या खोट्या अहंकारापायी पुरुष याबद्दल मेडिकल सल्ला घेत नाही आणि त्यातून विवाहितांचे लैंगिक आरोग्य बिघडते. बिघडलेल्या लैंगिक संबंधांचे परिणाम वैवाहिक नात्यावर, मानसिक स्वास्थ्यावर झाल्याशिवाय राहत नाहीत. काही स्त्रिया सांगतात की त्यांचा नवरा अनेक महिने त्यांना हातही लावत नाही, तर काहीजणी सांगतात की नवरा जबरदस्तीने संभोग करत राहतो, अगदी त्या आजारी असल्या तरी किंवा एखाद्या वयोवृद्ध स्त्रीला वयोमानाने सांधेदुखी होत असली तरी एक दिवसही नवरा सोडत नाही. अनेक स्त्रियांना तर डॉक्टरशीही मोकळेपणाने बोलता येत नाही की त्यांना नेमके कसे लैंगिक सुख हवे वाटते, नवऱ्याशी बोलणे तर दूरच. अनेकदा जर पुरुष विकृत असेल तर स्त्री त्याच्या लैंगिक शोषणाला बळी पडत राहते ज्यात तिचे कुटुंबीयही तिला मदत करत नाहीत. याबद्दल खरेतर समाजात मोकळेपणाने चर्चा व्हायला हवी. तरुणवर्गाचे, विवाहितांचे याविषयाबाबत समुपदेशन व्हायला हवे. पाश्चात्त जगतात एक इंट्रेस्टिंग बाब समोर आलीये की पुरुषासोबत केलेल्या संभोगापेक्षा लेस्बिअन म्हणजेच दोन स्त्रियांमधील संभोगामध्ये स्त्रीला मिळणाऱ्या ओर्गझमची टक्केवारी जास्त आहे.
विवाहसंस्थेचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे याद्वारे एक पुरुष आणि एक स्त्री यांमध्ये होणारा लैंगिक संबंध तेवढा नैसर्गिक आणि हे सोडून वेगळे जे काही असेल ते सर्व अनैसर्गिक असे लोकांच्या मनावर ठसवले जाते. त्यामुळे स्त्री, पुरुष अथवा इतर लिंगी लोक (transgender, queer) यांच्या लैंगिकतेच्या इतर सर्व अभिव्यक्ती चुकीच्या मानल्या जावून त्याला टोकाचा विरोध केला जातो. सध्या यासाठी चळवळ चालू आहे आणि काही देशांनी समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यताही दिलेले आहे. परंतु भारतीय समाज मात्र अजूनही विवाहाची आणि लैंगिकतेची जुनी ठोकळेबाज प्रतिमा जपत आहे. विवाहाची चौकट हि सामाजिक मान्यतेद्वारा इतकी भक्कम केली आहे की जाणीवपूर्वक ह्या चौकटीच्या बाहेर राहणाऱ्या स्त्रिया किंवा यातून बाहेर फेकल्या जाणाऱ्या स्त्रिया यांच्यावरती समाज अनेकप्रकारे अन्याय करतो, त्यांच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करतो. कारण स्त्रीची लैंगिकता ही विवाहाच्या चौकटीतच आणि तीही पुरुषाला हव्या त्याप्रकारेच व्यक्त व्हायला हवी, हा समाजाचा नियम आहे. पुरुषाला मोठ्याप्रमाणात लैंगिक स्वातंत्र्य बहाल करणारा समाज स्त्रीच्या बाबतीत मात्र अजूनही कर्मठ व अन्यायकारक आहे. यातूनच मग स्त्रीसाठी नटवी, बाहेरख्याली, कोणाच्याही खाली झोपणारी, वाईट चालीची, वेश्या, रांड अशी विशेषणे बेधडकपणे सर्वांदेखत वापरली जातात. त्यात कोणालाही चुकीचे वाटत नाही. यातून मुद्दामहून लैंगिकतेचा वापर करून स्त्रीला समाजात कमजोर करण्याचे कारस्थानही रचले जाते. अशा विचित्र मानसिकतेतून आपला समाज कधी बाहेर येणार ?
आज एवढ्या वर्षांनी किंचितसा बदल घडून येईल अशी चिन्हे दिसत आहेत. जुनाट व चुकीच्या विचारसरणीने ग्रस्त अशा विवाहसंस्थेला जर नव्या प्रवाहात टिकून रहायचे असेल तर तिच्यातील अनाय्य व असमानता दूर करून, स्त्री पुरुषांमधील संवाद वाढवला पाहिजे आणि या प्रवासात भिन्न लिंगी व भिन्न लैंगिकतेच्या लोकांनाही सोबत घेवून पुढे जायला हवे. स्त्रीची लैंगिकता ही तिची कमजोरी म्हणून न पाहता तिचे सामर्थ्य म्हणून स्वीकारले जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने ती परंपरेच्या जोखडातून मुक्त होईल.

 #typicalIndianmarriage #Indianmarriagesystem #विवाहसंस्था #Femalepleasure# Orgasmgap #Maritalrape #Menstrualhealth  


डॉ. ऐश्वर्या रेवडकर, 

स्त्रीरोगतज्ज्ञ 


 

4 Comments

  1. आमच्या रीलेशानी या गटा मध्ये शेअर करतो आहे. खूप चांगला लेख आहे, डॉ ऐश्वर्या.

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर आणि समर्पक लेखन

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form