आमच्या लग्नाचे किस्से

 मागच्या आठवड्यातला लक्ष्मी यादव हिचा लेख वाचल्यावर दोन वाचकांनी त्यांच्या लग्नाशी जोडलेल्या काही आठवणी शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला हे  किस्से वाचून स्वत:च्या लग्नाशी संबंधित काही आठवणी आल्या तर आमच्याशी नक्की शेअर करा. 



माझी नोंदणी पद्धतीने लग्न करण्याची इच्छा होती. कारण आईला लग्नविधी करता येणार नाहीत हे एक व दुसरे म्हणजे - पारंपरिक लग्नात खर्च फार होतो ! त्यानुसार अपेक्षित तारखेच्या महिनाभर आधी आम्ही दोघांनी नोंदणी केली. दरम्यान अगोदरच आजारी असलेल्या आजेसासऱ्यांची प्रकृती अतिशय गंभीर झाली. आता लग्न ठरलेच आहे तर त्यांच्यासमोरच लग्न व्हावे - असा सगळ्यांचा आग्रह झाला. मग सर्वात जलद पद्धत शोधली तर ती ‘आर्यसमाज पद्धत’ असे कळले.

आम्ही एका जीपमध्ये मावतील इतकेच जण दुसऱ्या दिवशी तिथे गेलो व नवऱ्याकडचे जवळचे काही नातेवाईक असे सगळे मिळून 25 लोक जमलो . एका तासात प्रमाणपत्रासह लग्न आटोपले. जेवायला एका हॉटेलला जायचे होते; त्या मधल्या वेळात काय करायचे - म्हणून मी नव्या घरातली सगळी वर्तमानपत्र वाचून काढली ! पुढे यथावकाश सासरच्या मंडळींनी त्यांना हवे तसे रिसेप्शन वगैरे केले.

माझ्या माहेरचे शेजारी अगदी घरच्यासारखेच होते. त्यांना या अचानक झालेल्या झटपट लग्नाला नेता आले नाही, म्हणून ते फार रागावले. मग मी माहेरी गेले की ते मला दर वेळी खिडकीतून 'काय म्हणतात गं तुझे आजेसासरे' असे ओरडून विचारत! कारण माझे आजेसासरे तेव्हा काही अनाकलनीय कारणाने बरे होऊन पुढे साडेतीन वर्ष जगले !

मोहिनी मोडक



आम्हा मैत्रिणींची शिक्षणे पूर्ण झाली आणि पालकांनी लग्नाचे विषय काढले. ही ऐंशीच्या दशकातली गोष्ट. माझ्या एका मैत्रिणीचा भाऊ लग्नाचा होता. तो मोठ्या शहरात प्राध्यापक असून घरी अगदी कर्मठ वातावरण होतं. भावाशी ओळख जरी मैत्रिणीनं करून दिली होती, तरी मला ती पुढे वाढवावीशी वाटली नाही. तो जो विषय शिकवायचा त्याच विषयाची माझी दुसरी एक मैत्रीण लग्नासाठी उत्सुक होती. तिला त्याचं स्थळ मी सुचवलं. तिच्या घरच्यांनाही पटलं. त्यांनी त्यासाठी प्रयत्नही सुरू केले. एके दिवशी दोन्ही कुटुंबांच्या भेटीचा कार्यक्रम पार पडला. पण उपवधू तिथे हजर नव्हता. नंतर कधीतरी सुटीत तो विद्यापीठाच्या त्या विषयाच्या विभागात मित्रांना भेटायला गेला होता, तेव्हा या मैत्रिणीची त्याच्याशी ओळख झाली. त्यापुढे त्यांचं लग्न ठरेल असे आम्ही सगळेच समजत होतो. पण अनपेक्षितपणे तिला नकार आला. तिच्यासह आम्हालाही खूप वाईट वाटले.
काही काळानंतर माझे आईवडील स्थळांची चौकशी करताना मला त्या मैत्रिणीच्या भावाविषयी विचारू लागले. मी त्याकडे दुर्लक्षच करत राहिले. कुठून कसा कोण जाणे, त्यांनी त्याच्या घरचा पत्ता मिळवला. तिथे पत्र पाठवले आणि पाठपुरावा करत राहिले. एके दिवशी उत्तर आले की मुलगी ( म्हणजे मी ) आमच्या पाहण्यातली आहे, तुम्ही लग्न ठरवायला या. झाले, माझ्या घरात आनंद पसरला. वडील चार दिवसांनी गेले ते लग्नाची तारीखच पक्की करून आले. माझ्या पोटात चांगलेच धस्स झाले. बापरे...तो वाडा, सणवार, सोवळेओवळे हे काहीच मला नको होते. पण वडिलांसमोर बोलण्याची प्राज्ञा नव्हती. मला मान्य करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. महिन्याभराच्या आतच लग्नही पार पडले. बऱ्याच मैत्रिणी लग्नाला आल्या होत्या. नकार मिळालेली मैत्रीण रडत होती, इतरजणी तिलाच पाठबळ देत होत्या. माझ्यावर त्या नाराज होत्या. पण यात माझी काय बरं चूक होती ? हळूहळू काही वर्षांत आम्ही मैत्रिणी हे सगळं विसरलो आणि आपापल्या संसारात रममाण झालो, एवढं मात्र खरं !
लग्नानंतर सासरी राहताना मी स्वतःच्या मनाविरुद्ध आणि मताविरुद्ध वागण्याचा प्रयत्न तर खूप केला, तरीही सासरच्यांना खूष ठेवणे मला जमले नाही. मग ते सोडून देऊन स्वतःशी प्रामाणिक राहतच आनंदी राहण्याचा प्रयत्न मी सुरू केला, तो आजपर्यंत. त्यात नवऱ्याची साथ पूर्णपणे नव्हतीच, मीही तशी अपेक्षा ठेवली नाही. नवऱ्याला मनातून माझं पटलं असलं तरी उघडपणे त्याची साथ घरच्यांनाच असे. सुनेच्या शैक्षणिक प्रगतीचं कौतुक सासरच्यांना असणं ही भाग्याची गोष्ट असते, ते मला मिळालं नाही. नवऱ्याला कौतुक होतं, माझ्या कामात त्याचं सहकार्यही होतं...पण नातवाइकांसमोर तो शांत राहून माझ्याकडे दुर्लक्षच करत असे. तोही कात्रीत सापडल्यासारखा झाला होता. घरात असणाऱ्या सर्वांना एकाचवेळी खूष ठेवणे कोणालाही शक्य नसते, तसेच त्यालाही ते नव्हते. पण इतरांना नाराज करणे त्याला परवडत नसावे, त्यापेक्षा माझा एकटीचा रोष पत्करणे त्याला चालत होते. तो रोषही हळूहळू विरघळून जात असे. शेवटी घट्ट नाते हे विश्वास व प्रेमावरच टिकते. इतरांशी गोड गोड वागून ( क्वचित खोटेही ) अखेरीस त्याच्या अंतःकरणातले खरे भाव माझ्याशी एकांतात बोलताना प्रकट होत, ते मी समजून घेत आले. कोणाला दुखवणे त्याच्या स्वभावात नव्हते. अशा अनेक बाबतीत कधी कधी चक्क तो दुग्ध्यात ( dilemma ) पडायचा, कसे वागावे/बोलावे यातही तो confused असायचा. याला मी काही करू शकत नव्हते, पण माझ्या मताशी ठाम राहायची. त्याच्यासारखं उगीच वरवरचं गोड बोलणं मला जमत नव्हतं. दोन्ही बाजूंच्या विरोधी वर्तणुकींना तोंड देताना त्याला दुर्धर व्याधी जडली. त्यानंतर अडीच वर्षांतच तो हे जग सोडून गेला.

नंदिनी देशमुख

 #HappyMarriage #typicalIndianmarriage #Indianmarriagesystem #विवाहसंस्था

 


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form