आजी, आजोबा बाथरूममध्ये पाय घसरून पडले आणि त्यांचं खुब्याचं हाड मोडून अंथरुणावर खिळले असं आपण अनेकदा ऐकतो. काही वयस्कर लोक आपल्याला पुढे झुकलेले दिसतात. माझ्या एका मैत्रिणीचा हात नुसता थोडासा झटका बसल्याने फ्रॅक्चर झाला. ती तेव्हा 53 वर्षांची होती. आजकाल कमी वयात सुद्धा हे थोड्याशा आघाताने फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे.
या सर्वांचं कारण आहे - ऑस्टिओपोरोसिस.
हाडं ठिसूळ होणं म्हणजेच ऑस्टिओपोरोसिस. हाडांतलं कॅल्शियम कमी होऊन ती ठिसूळ झालेली असतात. त्यामुळे जराशा धक्क्यानेही फ्रॅक्चर होतं. स्त्रियांमध्ये मेनोपॉजनंतर ही प्रक्रिया खूप वेगाने होते. कारण मेनोपॉजनंतर इस्ट्रोजेन कमी होतं.COVID-19 मुळे झालेल्या लॉकडाऊन दरम्यान ऑस्टिओपोरोसिसच्या घटना आणि तीव्रता वाढली, कारण लोक व्यायाम न करता घरातच राहिले त्यामुळे त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही आणि त्यांच्या खाण्याच्या पद्धतीही बदलल्या.
आपली हाडं ही इतर अवयवांप्रमाणेच जिवंत असतात. ती एखाद्या स्पंजप्रमाणे असतात, ज्याची भोकं कॅल्शियममुळे भरली जाऊन ती मजबूत होतात. वयाच्या 30 वर्षांपर्यंत हाडं तयार होण्याचा वेग जास्त असतो. त्यामुळे ती मजबूत असतात. मात्र त्यानंतर हाडं तयार होणं कमी होत जातं आणि अस्थिघनता कमी होत जाते. हाडं ठिसूळ होऊ लागतात. स्पंजमधली भोकं मोठी होतात. बरेचदा हाड मोडेपर्यंत आपल्याला ऑस्टिओपोरोसिस आहे, याचा पत्ताच लागत नाही. म्हणून या आजाराला Silent disease असंही म्हणतात.
कारणं
स्त्रिया आणि पुरुष दोघांमध्ये हाडं ठिसूळ होऊ शकतात. पण ‘National Institute of Health’च्या म्हणण्यानुसार रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांना हाडं ठिसूळ होण्याचा धोका पुरुषांपेक्षा चौपट जास्त असतो. वाढत्या वयाच्या मुलींना, गरोदर महिलांना आणि बाळाला अंगावरचं दूध पाजणाऱ्या आईला देखील कॅल्शियमची नेहमीपेक्षा जास्त गरज असते. पण भारतात महिलांच्या आहाराकडे अतिशय दुर्लक्ष केलं जातं. आपल्या संस्कृतीमध्ये बाईला ‘अन्नपूर्णा’ म्हणत असले तरी स्त्रियांमधील कुपोषणाचं प्रमाण वाढतच चाललं आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार 15 ते 49 वयोगटातल्या 57% महिला अॅनिमिक आहेत. या महिलांना व्हिटामिन D, कॅल्शियम आणि लोह या महत्त्वाच्या अन्नघटकांची कमतरता असते.
याशिवाय आणखी काही जणांना हाडं ठिसूळ होण्याची जास्त रिस्क असते.
- खूप अशक्त आणि कमी वजन असलेले लोक.
- थायरॉईड, पॅराथायरॉईड हॉर्मोनची पातळी जास्त असणं
- किडनी ट्रान्सप्लांटसारखी ऑपरेशन्स
- कॅन्सरसाठी हॉर्मोन थेरपी घेणारे
- मल्टिपल मायलोमा हा कॅन्सर
- व्हिटॅमिन D आणि कॅल्शियमची रक्तातील पातळी कमी असणं. मुबलक सूर्यप्रकाश असूनही सुमारे 85% भारतीय लोकांमध्ये व्हिटॅमिन Dची कमतरता आहे.
- बैठी जीवनशैली - ऑस्टिओपोरोसिस होण्याचं मुख्य कारण म्हणजे शारीरिक हालचालींचा अभाव होय. आपण बघतो बऱ्याच वेळा लोक तासनतास टी,व्हीसमोर बसून असतात तर काही लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी खूप वेळ बसून असतात. अशा वेळी त्यांच्या शरीराची पुरेशा प्रमाणात हालचाल होत नाही. व्यायाम किंवा हालचाल केल्याने रक्तातील कॅल्शियम हाडांत जातं. पण आहारात जर पुरेसं कॅल्शियम नसेलच तर रक्तातली कॅल्शियम ची पातळी योग्य प्रमाणात रहावी म्हणून ते हाडांतून रक्तात जातं. त्यामुळे हाडं ठिसूळ होतात. म्हणून अशा लोकांमध्ये ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका जास्त असतो.
- धूम्रपान वा तंबाखू खाणं
- दारू - रोज दिवसाला 2 पेगपेक्षा जास्त पिणं
ऑस्टिओपोरोसिसचं निदान DEXA स्कॅन या मशीनने होतं. यामध्ये आपल्या हाडांची घनता किती आहे त्याचं मापन करतात. मेनोपॉजनंतर स्त्रियांनी आणि 60 वयानंतर पुरुषांनी ही टेस्ट करून घेतल्यास हाडं किती ठिसूळ आहेत हे समजू शकतं. ज्यांना काही रिस्क फॅक्टर आहेत ते त्याआधीही ही टेस्ट करून घेऊ शकतात.
उपचार
1. व्यायाम
2. व्हिटॅमिन D आणि कॅल्शियम
हे साधारण पुरेसं असतं. ज्यांच्यामध्ये खूप जास्त ठिसूळ हाडं असतात, अशांसाठी हाडांना मजबुती देणारी काही औषधंही देतात. पण अगदी दुसरा कुठलाही उपाय नसेल तरच ही देतात.
ऑस्टिओपोरोसिस टाळण्याचे उपाय
आपली जीवनशैली आणि आहार सुधारणं हे दोन मुख्य उपाय आहेत. मेनोपॉजनंतर इस्ट्रोजेन रिप्लेसमेंट थेरपीमुळेही फायदा होतो.
आहार - कॅल्शियम भरपूर मिळेल असा आहार घेतला पाहिजे - उदा. रोज एक कप दूध, पनीर, दही इ. दुग्धजन्य पदार्थ आणि याशिवाय मासे, ब्रोकोली, सुके अंजीर वगैरे घेता येईल.
मला इथे डॉ. मालती कारवारकरांची आठवण होते. त्यांनी आहारातील कॅल्शियमबद्दल विशेष अभ्यास केलेला होता. मांसाहारी लोकांनी हाडे, खुर वगैरे उकळून ते पाणी स्वयंपाकात वापरणं आणि शाकाहारी लोकांनी पनीर,दूध, दही यांचा वापर करावा, यावर त्या खूप भर देत.
आपली हाडं मजबूत असणं खूप महत्वाचं आहे. हाडं ठिसूळ होऊन फ्रॅक्चर झाल्यास उरलेलं पूर्ण आयुष्य अंथरुणावर घालवावं लागतं. काहींना मृत्यूही येतो. असं परावलंबी आयुष्य जगण्यापेक्षा स्वतःला अॅक्टिव ठेवून स्वावलंबी राहावं. त्यासाठी व्यायाम, हालचाल जास्त करणं आणि कॅल्शियम, व्हिटॅमिन D ची पातळी योग्य ठेवणं आवश्यक आहे. अगदी हाड मोडायची वाट न पहाता वरपांगी ठिकठाक दिसणाऱ्या शरीरातल्या हाडांचा सांगाडा आतून पोकळ झालेला आहे का, याची वेळेवारी तपासणीदेखील करायला पाहिजे.