बाया आणि भाकऱ्या

मातीतल्या बाया दिवसाला पदरात झाकून दिवेलागणीला
घरी परतताहेत डालून घेताहेत घराच्या खुराड्यात 
चुलीत जाळून घेताहेत स्वत:ला भाजून घेताहेत तव्यावर
मातीतल्या बाया भाकर होताहेत
- ऐश्वर्य पाटेकर

मध्यंतरी एका शेतकरी कवयित्रीने त्या कुटुंबात रोज किती भाकऱ्या थापतात याचा आकडेवारीसह हिशेब दिला होता. स्त्री ही कवयित्री असो की प्राध्यापक, इंजिनिअर असो की डॉक्टर, व्यावसायिक असो की नोकरदार तिची ‘होममेकर’ म्हणूनच्या जबाबदारीतून सुटका झालेली नाही. सामंती प्रभाव टिकून असलेल्या ग्रामीण भागात तर हे वास्तव बिलकूल बदललेले नाही. ‘जशी उत्पादनव्यवस्था तशी विचारप्रणाली’, या नियमानुसार ‘पायातली वहाण पायातच बरी’ या विचारसरणीचा प्रभाव अजूनही कमी झालेला नाही.

स्त्रियांकडे स्वयंपाकाचे काम हे पितृसत्तेचा बळकट आधार असलेल्या कुटुंबसंस्थेच्या उदयानंतर आले. या कुटुंबसंस्थेच्या संरक्षणासाठी धर्माची रचना उभी राहिली. या रचनेत स्त्रियांच्या ‘गृहिणी’ म्हणूनच्या भूमिकेला गौरविले गेले. मनूने स्त्रियांच्या कर्तव्याबाबत ‘गृहार्थोSग्निपरिक्रीया’ (घरासाठी आगीवर पदार्थ शिजविणे हा पाकयज्ञ हा स्त्रीचा यज्ञच आहे.) अशी भूमिका घेतली होती.

जोतीराव फुल्यांनी शेतकरी स्त्रियांना सकाळपासून उपसाव्या लागणाऱ्या भाकरी थापण्यापासूनच्या कष्टाचे मार्मिक शब्दांत वर्णन केले आहे

सूर्य प्रकाशता भाकरीस थापी ॥ अवलास सोपी ॥ कालवण ॥१॥

स्वयंपाक होता पाटीमध्ये भरी ॥ घेई डोयीवरी ॥ शेतीं जाई ॥२॥

सर्वासंगे शेती काम करू लागे ॥ खाई ना ती मागे ॥ घरी घास ॥३॥

भिकारी ब्राह्मण धान्य ती वाटती ॥ भूदेवा पोशिती ॥ जोती म्हणे ॥४॥

शेतकरी स्त्रियांना उपसावे लागणारे हे कष्ट दुहेरी स्वरूपाचे आहेत :

1. शेतकरी स्त्रियांना कुटुंबांतर्गत स्वयंपाक वगैरे कष्ट करावे लागतात

2. कुटुंबाच्या बाहेर ह्या स्त्रिया उत्पादक श्रम वेचत असतात.

अर्थात, शेतकरी कुटुंबातून सामंत बनलेल्या कुटुंबातील स्त्रियांच्या सार्वजनिक जीवनातील सहभागावर मर्यादा येते. अशा कुटुंबातील स्त्रियांना शेतावरील कामे करावी लागत नाहीत. अशा स्त्रियांसाठी ‘घर’ हे ताराबाई शिंदे यांच्या भाषेत ‘गृहबंदीशाळा’ बनते.
याबाबतीत माझा एक खासगी अनुभव सांगतो. ढासळते सामंतीपण जपणाऱ्या माझ्या घरातील कोणत्याही स्त्रीने स्वत:च्या शेतात काम केले नाही; परंतु गावाकडील माझ्या चुलत बहिणी स्वत:च्या शेतात काम करीत. आर्थिक विपन्नाअवस्थेतदेखील त्यांनी दुसऱ्याच्या शेतावर काम केले नाही. थोडक्यात, सामंती दर्जा प्राप्त झालेल्या; परंतु आर्थिक स्थिती ढासळलेल्या कुटुंबांची स्थिती ही “सुंभ जळाला तरी पीळ जात नाही”, अशी असते. अशा कुटुंबातील स्त्रियांना स्वत:च्या शेतावर काम करण्याची मुभा दिली जाते; परंतु दुसऱ्याच्या शेतावर काम करण्याची मुभा दिली जात नाही. १९७२-च्या दुष्काळावेळी अशा तथाकथित ‘घरंदाज’ घरांमधील स्त्रियादेखील रोजगारासाठी रस्त्यावर आल्या होत्या. परंतु, दुष्काळ संपल्यानंतर त्या पुन्हा घरात बंद केल्या गेल्या.
कनिष्ठ जातीतील स्त्रियांच्या बाबतीत मात्र असे घडत नाही. या स्त्रियांना घरातील कष्टासोबतच घराबाहेरील कष्टदेखील उपसावे लागतात. त्यांचे श्रम हे उत्पादनव्यवस्थेला उपलब्ध व्हावे यासाठी त्यांच्यावरील बंधने सैल करण्यात आलेली असतात. अशा स्त्रिया उत्पादनव्यवस्थेतील श्रम वेचण्यासाठी कुटुंबाबाहेर पडणे उत्पादनव्यवस्थेला आवश्यक बनते.
कुटुंबांतर्गत स्वयंपाक करणे, हे काम स्त्रियांचे मानले जाते; परंतु सार्वजनिक ठिकाणी जेव्हा स्वयंपाक केला जाई तेव्हा कुटुंबांतर्गत स्वयंपाक करण्याच्या या जबाबदारीचा विस्तार होई. पूर्वी जेव्हा लग्नं होत असत तेव्हा प्रत्येक कुटुंबातील एक स्त्री – शेजारणी – लग्नाच्या स्वयंपाकातील भागीदारीसाठी जात असे.
आमच्या गल्लीत लग्नप्रसंगी घरटी एक स्त्री स्वत:च्या घरातील पोळपाट-‘बेलनं’ घेऊन लग्नमंडपी सकाळीच हजर होई! लग्नात स्त्रिया मुख्यत: पोळ्या लाटण्याचे काम करीत. आमच्या गल्लीत मुख्यत: देशमुख, तेली, कुणबी, लेवा पाटील, ब्राह्मण अशा जातींची घरं होती. त्यांपैकी लग्नप्रसंगी केवळ मध्यमजातीय स्त्रियाच पोळ्या लाटण्यात भागिदारी करण्यासाठी जात असत! या स्त्रियांनी लग्नप्रसंगी स्वयंपाकासाठी एकत्र येण्याला त्यांच्या कामाच्या जागी एकत्र येऊन सोबत भाकरी खाण्याच्या अनुभवाची पार्श्वभूमी होती. वामन दादा कर्डकांनी त्यांच्या “माळणी” या गाण्यात हा ‘भाकरीधिष्ठित’ भगिणीभाव चित्तारला आहे :

“भिलाणी, कोळणी, तेलणी, साळणी मराठणी, माळणी गं 
 पोटासाठी एक ठिकाणीखपतो साऱ्या जणी गं
एकाच्या शेतावरी गाव सारा पाणी भरी
रक्ताच पाणी करी तवा मिळे मीठ भाकरी
अशीच निंदणी आणि खुरपणी भांगली कापणी गं...।।१।।”

श्रमाची प्रक्रिया स्त्रियांना आपापसातली जात विसरण्यास भाग पाडते : “जात आमची घरची घरी, मांगणी, बुद्धणी जरी”. पण तरीही बहुजन स्त्रियांमधील सीमित भगिनीभाव दिसून येतो. स्त्रिया जेव्हा कुटुंबात परततात तेव्हा त्या विभागल्या जातात आणि या भगिनीभावावर मर्यादा येतात. जात आणि वर्गाधिष्ठित घर आणि कुटुंबव्यवस्था स्त्रियांना अशी विभागते. असो.
थोडक्यात, लग्नप्रसंगी स्त्रियांनी पोळ्या लाटण्याची कृती ही स्त्रियांच्या विशिष्ट अशा भगिनीभावाची अभिव्यक्ती असली तरी अशा प्रथा पुरुषसत्तेच्या पोलादी चौकटीतच आकाराला येत होत्या, हेदेखील विसरता येत नाही. आता, लग्नात वगैरे स्वयंपाकाची कंत्राटी पद्धती आलेली असली तरी कंत्राटदार पुरुष हा प्राय: स्वयंपाकावर देखरेखीचेच किंवा भाजी तयार करण्याचे तुलनेत कमी श्रमाचे काम करतो. मान-पाठ एक करीत पोळ्या लाटण्याचे काम हे केवळ स्त्री कामगारच करतात.
पोळ्या लाटण्याच्या कामात अतीव श्रम गुंतलेले असतात. सार्वजनिक ठिकाणी जेव्हा हे काम स्त्रिया करतात, तेव्हा मान-पाठ एक करूनच हे काम करावे लागते.
महाराष्ट्रात जेव्हा ग्रामीण भागात वसतिगृहे आली तेव्हा अशा वसतिगृहांमध्ये स्त्रियांना स्वयंपाकाचे काम करावे लागले. मराठीतील एक सुप्रसिद्ध लेखक दया पवार यांनी त्यांच्या आईविषयी लिहिले आहे. अकोले तालुक्यातील अशाच एका वसतिगृहात जेव्हा त्या स्वयंपाकाचे काम करीत असत तेव्हा त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर भाकऱ्या थापाव्या लागत असत. दया पवार यांनी असे लिहिले आहे की, त्यांच्या आईने थापलेल्या भाकऱ्या एकत्र केल्या असत्या, तर भाकऱ्यांचा प्रचंड मोठा डोंगर तयार होऊ शकला असता. बहुजन समाजातील ह्या स्त्रियांचे हे कष्ट कवडीमोल किमतीने विकत घेतले जात असत, हे सांगण्याची आवश्यकता नाही.
वामन दादा कर्डकांनी “शेणाची भाकर” ही कविता लिहिली. “शेणाच्या कामाला जातंय / शेणाची भाकर खाते रं..” अशा शब्दांत त्यांनी भाकरीभोवती असलेली जातिधिष्ठित अर्ध-वेठबिगारी हतबलता आणि पितृसत्ता यांचे गुंफलेपण शब्दबद्ध केले. “साऱ्या समाजाला जशी साखर हवी, आम्हा गरीबाला आज भाकर हवी...” अशीही रचना करून त्यांनी भाकरीभोवतीचे विश्व आणि समाजातील अंतर्विरोध हेरले. भाकरीची भ्रांत दलित स्त्रियांनाही विवश करीत होती.
“भाकरी आणि लावणीमध्ये फारकत करता न येण्याजोगी विवशता” अशा शब्दांत प्रज्ञा पवार यांनी विठाबाई नारायणगावकर यांचे वर्णन केले आहे. भुकेलेल्या समूहाचा संघर्ष भाकरीच्या शोधार्थ राहिला. ही बोच “भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली” या शब्दांत नारायण सुर्वे यांनी व्यक्त केली. या संघर्षांची जाणीव सर्वच स्त्रियांनी ठेवली पाहिजे अशी अपेक्षा योगिनी सातारकर-पांडे व्यक्त करतात : “विस्थापितांच्या सगळ्या जखमा / भाकरीशी झगडण्यात सुकल्या / असं इतिहास आहे आपला / याचा विसर पडू देऊ नकोस” भाकरीसाठीच्या संघर्षासाठीची जाणीव व्यापक भगिनीभाव निर्माण करू शकते!
कालौघात महाराष्ट्र हळूहळू भाकरीकडून पोळीकडे संक्रमित झाला. अर्थात, राजस्थान-पंजाबमधील ‘हरित-क्रांती’ महाराष्ट्रात पोहचल्यानंतर ह्या स्त्रिया पोळ्या लाटायल्या लागल्या! स्त्रियांच्या जगण्यातील भाकरी ‘थापणे’ गेले आणि पोळ्या ‘लाटणे’ आले. आता पोळ्या लाटणे ही भाकरी थापण्यापेक्षा अधिक जिकरीचे काम स्त्रियांना करावे लागणार होते. नव्या समाजात लाटण्याविषयी नव्या म्हणी आणि वाक्प्रचार तयार झाले. शहरी समाजवादी स्त्रियांनी महागाईविरोधी मोर्चे काढताना स्त्रियांच्या हातात लाटणेच दिले!
आज मध्यमवर्गीय स्त्रिया पोळ्या लाटण्याच्या कामापासून काहीशा मुक्त होऊ पाहाताहेत. पण हे काम शेवटी एका स्त्रीकडून दुसऱ्या स्त्रीकडे वर्ग होते. आपण स्त्रीवर्गाचे असूनही आपले काम आपण दुसऱ्या कुठल्यातरी स्त्रीकडे वर्ग करतोय याविषयी अपराधीपणाची भावना एका फ्रेंच स्त्रीवादी अभ्यासिकेने व्यक्त केली होती. आपल्याकडे मात्र पोळ्या लाटणाऱ्या स्त्रियांविषयी सर्व प्रकारच्या जुन्यानव्या अपधारणा काम करताना दिसतात. एक पुरुषी कोडगेपणा मुरून राहिलेला आहे. मराठवाड्यातील एका पुरोगामी प्राध्यापकाच्या बायकोने ‘मराठा’ जातीची ‘पोळ्यावाली’ मिळेल का, अशी विचारणा केली होती. मराठवाड्यातील एका प्राध्यापकाने चारपदरी पोळ्या लाटण्याचा आग्रह पोळ्या लाटणाऱ्या बाईंकडे केला होता. इतर प्रदेशही यात मागे नाहीत. पुण्यातील कुप्रसिद्ध खोले प्रकरण सर्वश्रुत आहेच. पश्चिम महाराष्ट्रात “सौ. कुळकर्णी यांचे पोळी-भाजी केंद्र” अशा पाट्या दिसतात. “कांबळे पोळी भाजी केंद्र” असे कुणी सुरू केले तर ते केंद्र चालेल का?

भाकरी असो की पोळ्या; स्त्रियांची यापासून सुटका होणे आवश्यक आहे. अलीकडे महानगरांमधून पोळ्यांचे सार्वजनिक उत्पादन सुरू झालंय! पुणे व पिंपरी-चिंचवड येथे तब्बल एका वेळेसाठी पाच लाख पोळ्यांचा पुरवठा होतो व त्यासाठी येथे ३५ कारखाने कार्यरत आहेत. यातून तब्बल प्रत्येकी १० ते १५ हजार पोळ्या वितरित केल्या जातात, असं मध्यंतरी शुभा प्रभू साटम यांनी लिहिले होते. प्रत्यक्षात हे प्रमाण याहून खूप अधिक आहे. घरोघरी जाऊन पोळ्या लाटणाऱ्या ‘अनौपचारिक’ उद्योगातही दरशहरी हजारो स्त्रिया आहेत. अर्थात, अशाप्रकारे पोळ्या लाटून घेण्याचा व्यवहार हा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीयांची मिजास बनतो, हेही नाकारता येत नाही.
स्त्रियांची स्वयंपाकाच्या कामातून मुक्ती साधण्यासाठी समाजवादी स्त्रीवाद्यांनी “कम्युनिटी किचन” हा पर्याय सुचविला आहे. रशियन क्रांतीनंतर माशा कार्प यांनी नवी शक्यता कशी निर्माण झाली यांचे वर्णन केले:

“People forget what an incredible upheaval the 1917 revolution was," she says. "There was a huge movement to free the country from the czarism, bring happiness to poorer classes. People thought maybe it was a good idea to relieve a housewife from her daily chores so that she could develop as a personality. She would go and play the piano, write poetry, and she would not cook and wash up. The idea to have canteens and cafeterias was a continuation of this wonderful intention.”

अशा कम्युनिटी किचनच्या संकल्पनेतून काही सांस्कृतिक प्रश्न तयार होऊ शकतात. रशिया आणि चीन मध्ये ते तयार झाले.(पहा : https://www.npr.org/sections/thesalt/2014/05/20/314054405/how-russias-shared-kitchens-helped-shape-soviet-politics आणि https://www.atlasobscura.com/articles/peoples-commune-canteens-china)

पण ह्या समस्या सोडविता येऊ शकतात. चळवळीच्या प्रक्रियेत समूहांची लिंगभावसंवेदनशीलता घडवावी लागते. “खाना बनाना सिर्फ औरतों का काम नही”, हा विचार पुरुषही अरिष्टकाळात कसं स्वीकारतात हे पा. रंजिता यांनी ‘काला’ या चित्रपटात दाखविले. पण अशी तयारी केवळ अरिष्टकाळापुरती राहू नये, यासाठी जागे राहावे लागेल. भारतात स्वयंपाक या कृतीभोवती कमालीचे ‘खासगीपण’ आणि ‘पावित्र्य’ जुळलेले आहे. माझ्या घरी लहानपणी एक रामदासी पंथी महाराज यायचे. आमची हवेली मोठी आणि आरामदायी असल्यामुळे ते आमच्याकडे उतरायचे; पण त्यांचा स्वयंपाक करण्यासाठी मात्र आईला ब्राह्मण स्त्रियांची मनधरणी करावी लागे. त्यांना आमच्याकडचा कोरडा ‘शिधा’ चाले; पण ओला स्वयंपाक नाही. हे असले लाड! मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांनी स्वयंपाक न करण्याची प्रथा तर अगदी अलीकडच्या काळापर्यंत अस्तित्वात होती. अजूनही आहे!
कोवीड -१९ महामारीच्या काळात अनेक प्रकारचे वास्तव पुढे आले. केरळमध्ये डाव्या संघटनांच्या पुढाकाराने ‘कम्युनिटी किचन’ चालविली गेली. कम्युनिटी किचनसंदर्भातील निर्णय पुरुषी मानसिकतेच्या आणि पवित्र-अपवित्र अशा धारणांनी ग्रस्त पुरुषांनी घेण्यापेक्षा सर्वसामान्य स्त्रियांना घेऊ दिला पाहिजे. तसेही, पुण्यासारख्या शहरात उचचजातीय व अर्थात उच्चवर्गीय कुटुंबांनी आता स्वयंपाकापासून अंशत: सुटका करणारी ‘सर्व्हिस्ड् अपार्टमेंट’ ही संकल्पना आनंदाने स्वीकारलेली आहेच. 
याबाबतीत पर्यायी विचार केला नाही तर, सारिका उबाळे यांनी या कवितेत मांडल्याप्रमाणे स्त्रियांचे असे जीवन जरठीकृत रूपात अस्तित्वात राहीलच राहील :

स्वतः भोवती गोल गोल फिरत राहातात बाया...
कधी दोन पदरी
कधी तीन पदरी
कधी चौपदरी कधी गोल,
कधी त्रिकोणी, कधी चौकोनी
तेलाच्या, तुपाच्या,
बीनतेलाच्या, कोरड्या,
मऊसूत पोळ्या, फुलके, पराठे
लाटत राहातात बाया
कळायला लागल्यापासून
कळेनासं होईपर्यत
हातापायातलं त्राण जाऊन
शुद्ध हरपेपर्यंत
सासरी माहेरी पाहुणचारी
हॉस्टेल, रेस्टॉरंट, हॉटेल, खानवळी..
लग्न, बारसे, तेरवी, दशक्रिया
रिसेप्शन, प्रकाशन, पूजा, कंदुरी...
शेतात, रानात, पालात, घराघरात
गोलगोलगोलगोलगोलगोल
पोळ्या लाटत राहातात बाया
थापत राहातात भाकरी
रपारपरपारपरपारपरपारप
कणिक-पाणी, पीठा-मीठासोबत
स्वतःला मळून घेत
गोलाकार गोलाकार गोलाकार गोलाकार
फिरत राहातात बाया
पृथ्वीच्या उगमापासून अंतापर्यत..
ताटात पोळी होऊन मुकाट
पडत राहातात बाया
फक्त भूक होऊन मागे
उरत राहातात बाया...



दिलीप चव्हाण

स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड 

 

  

 

 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form