बेल हुक्स आणि समतेचं शिक्षण

नमस्कार! सर्वांना क्रांतिकारी जय भीम!

नुकतंच बेल हुक्स ह्या प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका आणि कार्यकर्तीचं निधन झालं. बेल हुक्सला कुठलंही एक लेबल लावलं तर तिच्या व्यक्तिमत्वावर अन्याय होईल असं मला वाटतं. तिने अनेक चळवळींमध्ये काम केले आहे, उदाहरणार्थ डाव्यांची चळवळ, स्त्रीवादी चळवळ, black स्त्रीवादी चळवळ इत्यादी. बेल हुक्स ही या काळातली अत्यंत महत्त्वाची कार्यकर्ती होती, तिने मांडलेले विचार आणि तिने दाखवलेला मार्ग खऱ्या अर्थाने क्रांतिकारी आहे.
बेल हुक्सला श्रद्धांजली म्हणून आज मी तिने लिहिलेल्या माझ्या आवडत्या पुस्तकाबद्दल सांगणार आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे – Teaching to Transgress. Education as the practice of freedom. १९९४ साली हे पुस्तक प्रकाशित झालं आहे.
खरं तर आपण जेव्हा एखाद्या आवडत्या पुस्तकाबद्दल बोलतो तेव्हा आपण नकळतपणे आपलंही व्यक्तिमत्व मांडत असतो. कारण कुठलंही पुस्तक आवडण्यामागे नेहमी दोन मुख्य कारणं असतात. एक तर ते पुस्तक आपलंच आयुष्य, आपलेच विचार आणि आपलेच अनुभव मांडत आहे असं वाटत असतं किंवा अगदी दुसऱ्या टोकाचं कारण, ते म्हणजे ते पुस्तक आपल्याला अजूनपर्यंत माहीत नसलेला नवा विचार, नवा अनुभव आणि एक नावं विश्व दाखवत असतं. बेल हुक्सच्या या पुस्तकाबद्दल बोलायचं झालं तर मला तिचं हे पुस्तक आवडण्यामागे वर नमूद केलेली ही दोन्ही कारणं आहेत.
म्हणून आधी मी माझ्या विचार- आणि अनुभवविश्वाबद्दल थोडक्यात सांगतो. माझं नाव जमीर कांबळे. मी पुण्यात राहतो. माझं जर्मन हा विषय घेऊन बी.ए., एम.ए. आणि एम.फिल असं शिक्षण झालं आहे. गेली २० वर्षं मी जर्मन भाषा आणि साहित्य शिकवत आलो आहे. परंतु विद्यार्थी म्हणून विद्यापीठाच्या कारभारामध्ये धर्म-जात-वर्ग-लिंग यांच्या आधारावर भेद केला जातो, राजकारण केलं जातं. शिक्षक म्हणूनही शिक्षणक्षेत्रात परिवर्तनाच्या शक्यता कशा नाकारल्या जातात हे अनुभवलं आहे. जर्मन भाषा अनेकदा जर्मन किंवा इंग्रजी माध्यमातून शिकवली जाते, यामुळे जे विद्यार्थी इंग्रजी भाषेच्या वर्चस्वामुळे मागे पडतात ते जर्मनकडे फिरकले तरी फार काळ टिकत नाहीत. शेवटी प्रवेशप्रक्रियेत आरक्षण असलं तरी शिक्षणप्रक्रियेत वंचित मुलं आपोआप स्वतःहून गळून पडतात.
जमीर कांबळे 

नुकतेच मी पुणे विद्यापीठातल्या स्त्री अभ्यास केंद्रामध्ये पुन्हा शिकत होतो. मी एलजीबीटी म्हणजे समलिंगी, उभयलिंगी, ट्रान्सजेंडर, द्विलिंगी वगैरे लोकांच्या प्रश्नांविषयी आणि हक्कांसाठी लिहितो, बोलतो. लैंगिकतेचे प्रश्न लिंगभावाच्या प्रश्नांशी जुडलेले आहेत असं लक्षात आल्यामुळे मी स्त्रीवादाचा अभ्यास सुरू केला. स्त्रीवादी विचारसरणीचा अभ्यास करताना पितृसत्तेची वर्णव्यवस्था, जातव्यवस्था आणि भांडवलदारी व्यवस्था यांच्याशी असलेली युती समजायला लागली. आणि मग अर्थातच स्त्रिया, गरीब, आदिवासी, कनिष्ट जाती, एलजीबीटी अशा असंख्य वंचित व्यक्तींच्या शोषणाला कारणीभूत असलेल्या व्यवस्थांना आणि त्यांच्या युतीला नष्ट करू पाहणारे क्रांतिकारी विचारवंत, त्यांनी मांडलेले चिकित्सक चिंतन मला प्रेरणा देऊ लागलं. एक मुक्तिदायी, समतेचं विश्व निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांनी दाखवलेला मार्ग जसा महत्त्वाचा आहे तसेच बेल हुक्ससारख्या स्त्रीचे विचार आणि तिचं कार्य तितकंच प्रेरणादायक आहे.
मुक्तिदायी विश्वाचा विचार मांडत असताना एका सच्च्या कार्यकर्त्याला एक प्रश्न नेहमी भेडसावत असतो, तो म्हणजे – माणसाला मुक्तिदायी कसं करायचं? कारण मुक्तीचा, समतेचा विचार तर करून झाला आहे आणि होतो आहे, परंतु आता हा विचार माणसामाणसांमध्ये कसा रुजवायचा हा मुलभूत प्रश्न आहे. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “The ultimate aim of education is to cultivate the mind.”, तसंच बेल हुक्सलाही चळवळीच्या तिच्या प्रवासात शिक्षणाचं महत्त्व प्रकर्षानं जाणवू लागलं. मुक्तिदायी समाज उभा करण्यासाठी, माणसामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्याला मुख्यतः आपल्या शिक्षणपद्धतीमध्येच आमुलाग्र बदल घडवून आणावा लागेल – हे तिच्या लक्षात आलं. त्याचंच फलित म्हणजे हे पुस्तक.
या पुस्तकामध्ये मुक्तिदायी शिक्षणपद्धतीसाठी अनेक प्रेरणादायक मुद्दे बेल हुक्सने मांडले आहेत. ती म्हणते,
“शिक्षणक्षेत्र हे काही स्वर्ग नाही. परंतु शिकणं ही एक अशी जागा आहे जिथे स्वर्ग निर्माण करता येऊ शकतो. शाळेतील वर्गखोली तिच्या असंख्य मर्यादांसोबत एक जागा आहे शक्यतांची. शक्यतांच्या या क्षेत्रात आपल्याला एक संधी मिळालीय – मुक्तीसाठी कष्ट घेण्याची, स्वतःचं व आपल्या कॉम्रेड मित्र-मैत्रिणींचं मन व हृदय उदार आणि मोकळं करण्याची, जेणेकरून सामाजिक वास्तवाला आपण आव्हान देऊ शकू, आपल्याला एकजूट होऊन सीमारेषांच्या पलीकडे जाण्याची कल्पना करता येऊ शकेल, त्या सीमारेषा ओलांडता येतील. अशा तऱ्हेने शिक्षण ही नेहमी मुक्तीची साधना होऊ शकते.” शिक्षणाचा लावलेला हा अर्थ फार सुंदर आहे. शिक्षण माणसाचं मन आणि हृदय मोकळं व उदार करू शकतं.” (पान २०७, स्वैर भाषांतर)
ह्यालाच तर बुद्ध ‘करुणा’, “मैत्री” आणि “प्रेम” म्हणतात. फ्रेंच तत्त्वचिंतक आला बाड्यू म्हणतो प्रेमामध्ये क्रांतिकारी ताकत असते. आणि खरंच आहे. आपल्या मनात प्रेम नसेल, मैत्रीभाव नसेल, करुणा नसेल, केवळ स्वतःचं आयुष्य, स्वतःची सोय, स्वतःचा आनंद जिवंत ठेवण्याचा स्वार्थ असेल तर, मनीषा गुप्ते म्हणतात तसं आपल्याला कुणाचंच काहीही ऐकू येईनासं होतं, मग ते आदिवास्यांचे दुःख असो, शेतकऱ्यांचा लढा असो, ‘कनिष्ट’ जातींचं शोषण असो, स्त्रियांच्या व्यथा असो, किंवा भीक मागणाऱ्या हिजड्यांची ताली असो, आपल्याला काहीच ऐकू येत नाही. परंतु आपल्या मनाची आणि हृदयाची कवाडं खुलली, मोकळी झाली, उदार झाली तर? तर आपल्याला काय काय ऐकू येऊ लागतं! मग आपली सुखाची, सोयीची, थोडक्यात आनंदाची व्याख्याच बदलू लागते. जोवर इतर माणसं सुखी होत नाहीत, मी आनंदी होऊ शकत नाही, हे लक्षात येऊ लागतं. आणि आपलं सगळं आयुष्य मग आपण सगळ्यांच्या समतेसाठी झोकून द्यायला तयार होतो. बेल हुक्स म्हणते माणसांमध्ये असे परिवर्तन घडवून आणण्याची ताकत केवळ शिक्षणामध्ये आहे.
परंतु आजचं शिक्षणक्षेत्र, त्यातील शिकवण्याच्या पद्धती या सर्व ज्या तत्वाच्या आधारावर चालतात त्याला बेल हुक्स “banking system” म्हणते. आता शिक्षणाकडे आपण ‘माणुसकीची शाळा’ म्हणून पाहत नाही, शिक्षण म्हणजे नोकरी-व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यांचं दुकान. म्हणून जितकी महागडी शाळा तितकी या जगातील भांडवली स्पर्धेमध्ये जिंकण्याची शक्यता वाढत जाते. अशी शाळा केवळ स्पर्धा शिकवते. शाळेत शिकवली जाणारी ‘माहिती’ हे करुणा, मैत्री, प्रेम आणि समतेचं ज्ञान नसतं. ही माहिती केवळ स्पर्धेत जिंकण्यासाठी लागणारी कौशल्ये असतात. अशी शाळा आपल्याला विजयाचं मूल्य शिकवते, ज्यात विजय म्हणजे स्वतःच्या स्वार्थावर मिळवलेला विजय नसतो, तर स्पर्धेमध्ये जिंकणे, अर्थात जास्तीत जास्त पैसा आणि सत्ता मिळवणे म्हणजे विजय.
याचा अर्थ, आधुनिक शिक्षण आपल्याला भांडवलदारी व्यवस्थेशी जुळवून घ्यायलाच नाही तर या व्यवस्थेच्या स्पर्धेत पारंगत व्हायला शिकवते, यालाच आपण हल्ली “करियर” असा शब्द वापरतो. प्रेम, मैत्रीभाव, करुणा नाही तर आर्थिक सुबत्ता, सामाजिक सत्ता, वैयक्तिक प्रगती (“personality development”) ही आजच्या शिक्षणाची मूल्ये आहेत. आधुनिक शाळांच्या या स्पर्धात्मक मूल्यांच्या शिक्षणाची टीका करत असताना बेल हुक्स याच्या विरोधात ज्या क्रांतिकारी शाळेची कल्पना सुचवते, त्यात शाळेचा वर्ग ही वैचारिक उर्जांच्या देवाणघेवाणीची जागा असते. ‘प्रत्येकाला त्याचे आत्मभान व्हावं, त्याला दिलेल्या असंख्य ओळखींचं राजकारण त्याला लक्षात यावं, माणसामाणसांमधील विषमता, त्यांच्यातील विसंवाद, त्यांच्यातील दरी त्याला लक्षात यावी, त्याला पर्याय म्हणून करुणेचं, मैत्रीचं आणि समतेचं मुक्तिदायी राजकारण त्याला त्याला सुचत जावं’ - हाच बेल हुक्सच्या नव्या शाळेचा हेतू आहे.

या नवीन शाळेत शिक्षकाच्या भुमिकेबद्दलही बेल हुक्स सविस्तर सांगते. ती म्हणते समतेच्या शिक्षकांनी एक लक्षात ठेवले पाहिजे, ते म्हणजे की विद्यार्थ्यांसोबत स्वतः शिक्षकसुद्धा परिवर्तनाच्या प्रक्रियेतच आहेत. शिक्षक म्हणजे तो कोणीतरी पोचलेला विद्वान किंवा परिवर्तीत झालेला महापुरुष वगैरे नसतो. शिक्षक माणूस असतो, म्हणून प्रक्रियेत असतो. अशा प्रकारे बेल हुक्सच्या शाळेत सगळेच “are not, but are becoming.” म्हणून शिक्षकांनी वर्ग नावाच्या जागेलाही मुक्त, उदार आणि मोकळे केले पाहिजे, जिथे सगळ्यांना आपले विचार व अनुभव मांडायला, प्रश्न, समस्या आणि उपाय सुचवायला मुभा असेल. वर्गामध्ये शिक्षक या प्रवाहाचा केवळ संचालक असेल. त्याच्याकडे समस्यांचे निवारण आधीपासून नसेल, तशी अपेक्षा नसावी आणि तसा अविर्भाव त्याचाही नसावा. समस्या तर त्याला स्वतःलाही असतात, त्यानेही त्या समस्या बिनदिक्कत वर्गात मांडाव्यात, विद्यार्थ्यांसमोर त्यानेही मोकळं व्हावं, असलेल्या दोषांसकट स्वतःला मांडावं. समाजात समता हवी असेल तर आधी वर्गामध्ये समता रुजवली पाहिजे.
आज शिक्षणाची परिस्थिती अजून बिकट झाली आहे. शिक्षणक्षेत्रात भ्रष्टाचार, जात-वर्ग-लिंगभेद, हिंसेसारख्या भयंकर गोष्टी घडत आहेत. अशा बिकट परिस्थितीत बेल हुक्सने मांडलेले हे विचार खूप दिलासादायक आणि प्रेरणादायक आहेत. सगळ्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं, यावर चर्चा घडवून आणाव्यात आणि या विचारांना पुढे न्यावं, बेल हुक्सला ही एक खरी श्रद्धांजली असेल.

जमीर कांबळे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form