रुपेरी पडद्यामागच्या स्त्रीया ( भाग १ )

चित्रपटसृष्टी आणि स्त्रीया असा विचार करताना कोण पटकन आठवतं ?... डोळ्याला सहज दिसणाऱ्या आणि लोभावणाऱ्या अभिनेत्री किंवा कानाला सहज ऐकू येणाऱ्या गायिका आठवतात. एकूणच दिग्दर्शक,संगीतकार,गीतकार यांचे काही अपवाद सोडले तर चित्रपटातील अभिनेते हे आपल्याकडच्या चित्रपटांचा चेहरा असतात. मग त्या खालोखाल गायक-गायिका येतात. सर्वसामान्य प्रेक्षकाला यांच्यामुळे चित्रपट लक्षात राहतो.पण पडद्यावर दिसणाऱ्या-ऐकू येणाऱ्या गोष्टींच्या मागे चित्रपट-निर्मितीचं एक खूप मोठं विश्व असतं. ते अजूनही पुरषप्रधानच आहे. अजूनही स्त्रीया त्यात फार कमी संख्येनं येतात आणि आल्या तरी टिकून राहण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. कौशल्य सिध्द करावं लागतं. मग सुरवातीच्या काळात ज्या महिलांनी या सृष्टीत आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केला तो एव्हरेस्ट चढण्या इतका धाडसाचा आणि महत्वाचा म्हणावा लागेल नाही का!! या स्त्रीयांचा प्रवास अवाक करणारा आहे तसा कधी करूणही आहे. पण प्रेरणादायी मात्र नक्कीच. म्हणूनच या सहज न भेटणाऱ्या,नव्या वाटा चोखाळणाऱ्या रुपेरी पडद्यामागच्या स्त्रीयांची ओळख करून घेऊया.

सरस्वतीबाई फाळके 
२०१३ या वर्षात भारतीय चित्रपटसृष्टीचं शतक आपण साजरं केलं. दादासाहेब फाळके यांचा "राजा हरिश्चंद्र" हा चित्रपट १९१३ साली आला आणि त्यांची चित्रपट निर्मितीची कारकीर्द बोलपट येईपर्यंत झळाळती राहिली. पण परेश मोकाशी यांचा "हरिश्चंद्राची फॅक्टरी" हा चित्रपट आला आणि त्यांच्या पत्नीची - सरस्वतीबाई फाळकेंची एक वेगळी ओळख झाली. पत्नी,आई,गृहिणी अशी सरस्वतीबाईंची ओळख त्यात आहेच. परंतु चित्रपट निर्मितीसाठी आपले दागिने देऊ करणारी स्त्री म्हणजे त्या फायनान्सरच म्हणायच्या. कशाबशा जमा केलेल्या पुरुषांच्या टीमला जेवायला घालणाऱ्या, म्हणजे आताच्या भाषेत केटररच. हे माध्यमच नवं असल्यानं तज्ञ माणसांची वानवाच होती त्यामुळे तयार झालेली चित्रफीत डेव्हलप करणं, त्या तुकड्यांची जोडणी करणं म्हणजे एडिटिंग करणं हे कामदेखील करताना आपल्याला त्या दिसतात. सतत नवे उद्योग-उपद्व्याप करू पाहणाऱ्या नवऱ्याच्या मागे फरपटत जाणारी बायको नव्हे तर वेगवेगळ्या भूमिका उत्सुकतेनं,लीलया पार पाडणारी स्त्री म्हणून त्या आपल्याला चित्रपटातून भेटतात म्हणून मला 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' महत्वाचा वाटतो.
देविकाराणी  
सरस्वतीबाईंचं काम महत्वाचं असलं तरी ते तसं घरगुती स्वरुपाचं राहिलं. त्या नंतर स्टुडिओ-काळात चित्रसृष्टीत आलेल्या इतर स्त्रीयांना घराबाहेर पडून पुरुषबहुल क्षेत्रात काम करावं लागलं. फर्स्ट लेडी ऑफ इंडियन फिल्म इंडस्ट्री म्हणजे देविकाराणी या आपल्याला उच्चशिक्षित,पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव असलेल्या अभिनेत्री म्हणून माहीत आहेत.परंतु त्यांनी पती हिमांशु राय यांच्या पहिल्या मूक चित्रपटाचं कला दिग्दर्शन आणि ड्रेस डिझाईन केलं होतं. त्यांनंतर त्या दोघांनी जर्मनीत चित्रपट निर्मितीचं रीतसर शिक्षण घेतलं. भारतात परत आल्यावर बॉम्बे टॉकीज हा निर्मिती-स्टुडिओ स्थापन केला. १९४० मधे राय यांच्या मृत्यू नंतर पाच वर्षं त्या निर्मात्या-दिग्दर्शक म्हणून कार्यरत होत्या.
मीनाक्षी नारायणन्  

सरस्वतीबाईसारख्याच एक तामिळी महिला, मीनाक्षी नारायणन. यांना भारतातल्या पहिल्या महिला साऊंड इंजिनिअर म्हटलं जातं. त्यांचे पती ए नारायणन तीसच्या दशकात तामीळ चित्रपट क्षेत्रातले मोठे निर्माते-दिग्दर्शक होते. त्यांनी जर्मन तंत्रज्ञ आणून पत्नीला शिकवलं. मग नऊवारी लुगड्यातल्या या बाई सेटवर जाऊन ध्वनीमुद्रण करू लागल्या. शिकणं आणि त्याचा उपयोग करणं दोन्ही धाडसाचं!

आपण अशा भारतीय स्त्रीयांच्या कर्तबगारीची दखल घेणार असलो तरी आधी जगातल्या पहिल्या दिग्दर्शक स्त्रीची ओळख करून घेणं मला महत्वाचं वाटतं.फ्रान्स मधल्या अलिस गी (Alice Guy- Blache') या पहिल्या महिला सिने-दिग्दर्शक आणि नॅरेटिव्ह फिल्ममेकिंग करणाऱ्या पहिल्या दिग्दर्शकांपैकी एक समजल्या जातात. त्या अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि तंत्रज्ञ सुध्दा होत्या. हे त्या काळातच काय अजूनही विशेष आहे. 
१९०६ मधे त्यांनी "The Birth, the Life and the Death of Christ" हा चित्रपट बनविला.त्या काळात हा तांत्रिक दृष्ट्या मोठ्या आवाक्याचा चित्रपट होता(हा अर्ध्या तासाचा चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध आहे) आता खूप बायका इंजिनिअर झालेल्या दिसतात पण प्रत्यक्ष यंत्राबरोबर काम करणाऱ्या, विशेषतः चित्रपट क्षेत्रात,अजूनही अल्पसंख्यच आहेत.१८९८ ते १९२० या काळात त्यांनी ४०० चित्रपट केले त्यातले २२ पूर्ण लांबीचे कथापट होते.वडील आणि भावाचा मृत्यू झाल्यानं एकविसाव्या वर्षी त्यांनी अर्थार्जनासाठी एका कंपनीत सेक्रेटरीची नोकरी धरली.चल-चित्रपट येऊ लागल्यावर त्या कंपनीचं रूपांतर चित्रपटनिर्मिती करणाऱ्या कंपनीत झालं आणि ञॅलिसचं क्षेत्र बदललं.
Alice Guy- Blache'
१८९६ ते १९०६ त्या कंपनीत चित्रपट-निर्मिती प्रमुख होत्या. १९०७ मधे याच क्षेत्रातल्या हर्बर्ट ब्लाशे यांच्याशी लग्न झालं.लग्न झाल्यामुळे त्यांना नियमानुसार कंपनी सोडावी लागली.त्यानंतर ब्लाशे पतिपत्नींनी १९१०मधे अमेरिकेत स्वतःची फिल्म कंपना काढली.हॉलीवुडपूर्व काळातली ती सर्वात मोठी कंपनी होती.या कार्यमग्न काळातच त्यांच्या दोन्ही मुलींचा जन्म झाला. परंतु हा विवाह टिकला नाही. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर नव्यानं विकसित होणाऱ्या हॉलिवुडमधे नशीब आजमावण्यासाठी एका सहकारी अभिनेत्री बरोबर नवरा निघून गेला. तो सोडून गेल्यावरही खचून न जाता १९२० पर्यंत त्या चित्रपट तयार करत राहिल्या. त्यानंतर त्यांनी फ्रान्सला परत येऊन या माध्यमाविषयी व्याख्यानं दिली.
अॅलिसची चित्रनिर्मिती भरात होती तेव्हा भारतात स्त्रीयांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटांत प्रवेश करायला सुरवात केली होती. बहुतेक स्त्रीयांचा चित्रपटसृष्टीतला प्रवेश हा अर्थार्जनासाठी झाला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.परंतु एकदा कार्यक्षेत्र निवडल्यावर बहुतेक जणींनी सक्षमपणे यात प्रगती केली. पुढच्या भागात अशाच काहीजणींच्या बद्दल समजून घेऊ.

सुषमा दातार 

मास कम्युनिकेशन आणि चित्रपट 
यांच्या निवृत्त व्याख्यात्या, 
अभ्यासक आणि लेखिका

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form