बहुआयामी लेखक

मागच्या आठवड्यात जयंत पवारांना अंतिम निरोप देण्यासाठी बोरीवलीत स्मशानभूमीत पोचलो तेव्हा "काय डेंजर वारा सुटलाय" नाटकाचे दिवस राहून राहून आठवत होते. माझा आणि जयंत पवार यांचा थेट संबंध २०१० पासूनचा. "काय डेंजर वारा सुटलाय" हे माझं व्यावसायिक रंगभूमीवरचं अभिनेता म्हणून पहिलं नाटक. माझ्या मनात त्या नाटकाचं खास स्थान आहे. मुंबईवर आपला राक्षसी कब्जा मिळवलेली बिल्डर लॉबीची व्यवस्था आणि स्थानिक भू-राजकारण, त्याहीपुढे जात माणसांचं होत जाणारं विस्थापन त्यांनी "काय डेंजर वारा सुटलाय" मध्ये मांडलंय. ही केवळ एका विशिष्ट शहराची, प्रदेशाची आणि पात्रांची गोष्ट सांगणारी नाटकं नाही तर ती 'व्यवस्थे'ची गोष्ट आहे.
जयंत पवारांनी गोष्टी सांगितल्या त्या व्यवस्थांच्याच. "अधांतर" मधली एकेकाळी मुंबई घडवणारी पण आता धोक्यात आलेली मिल-संस्कृती, तिला पोखरून काढणारी व्यवस्था, "टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन" मधली लोकल रेल्वेशी जगणं बांधलं गेलेल्यांची व्यवस्था - या सगळ्या व्यवस्थांच्या गोष्टी त्यांनी नीडरपणे मांडल्या. या व्यवस्थांनी सामान्य माणसांची केलेली प्यादी, त्यांची जगण्याच्या संघर्षांत होणारी शोकांतिका मांडली. ही तीनही नाटकं मला मराठी नाटकातल्या सर्वोत्तम शोकांतिका वाटतात. "जे लोकल ते ग्लोबल" हे सूत्र पुरेपूर आकळलेला हा लेखक होता. मुंबई महानगरातल्या माणसांची विविध रूपं त्यांनी आपल्या लेखनातून मांडली. "अधांतर", "काय डेंजर वारा सुटलाय", "टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन" ही विविध टप्प्यांवरची नाटकं केवळ नाटकंच नाहीत तर विविध टप्प्यांवरचा मुंबई महानगराचा दस्तऐवजही आहेत.
तेंडुलकर – आळेकर - एलकुंचवार यांच्यानंतरच्या टप्प्यात नाट्यलेखन करणाऱ्या नाटककारांत जयंत पवार हे नाव ठळक आहे. त्यांच्या नाटकातील पात्रंही विविध वर्गांची प्रतिनिधी म्हणून येतात. त्यांना आपापली स्वतंत्र भाषा आहे, ठाम आवाज आहे. उदाहरणार्थ "काय डेंजर वारा सुटलाय" नाटकातला "बबन येलमामे". तो या नाटकातला समांतर नायक आहे. दाभाडेच्या गोष्टीसोबत त्याचीही गोष्ट चालते. त्या एकाच शहरात घडत असल्या तरी परस्परांत मिसळत नाहीत. या दोघांच्या शोकांतिका वेगवेगळ्या व्यवस्थांनी घडवून आणल्या असल्या तरी त्याची परिणामकारकता सारखीच तीव्र आहे. "अधांतर" मधला मिल सुरू होणार नाही, याची खात्री पटल्यावर हाय खाल्लेला पण घरी येताना सगळ्यांसाठी भेटवस्तू घेऊन येणार्‍या राणेचा आकांतही असाच हृदयद्रावक! सचोटीनं, कष्टपूर्वक आयुष्य जगणाऱ्या या साध्या माणसांना कुणी उध्वस्त केलं, त्यांच्या शोकांतिकेला जबाबदार कोण- हे सवालही पवार या गोष्टींमागून उभे करतात.
डेंजर वारा मधला बबन येलमामे, दाभाडे, अधांतर मधला जावई, टेंगशेमधला प्राध्यापक आणि भाईच्या रूपातला यम - या पात्रांच्या भाषाही वैशिष्ट्यपूर्ण आणि घोटीव. जयंत पवार नाटकातल्या पात्रांच्या भाषा लिहायचे. प्रत्येक पात्राच्या तोंडी आपलीच भाषा लिहायचे नाहीत. नगरमधून मुंबईत आलेल्या पात्राची भाषा शोधण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं होतं.
बर्‍याच मराठी पुरूष लेखकांना बाई लिहिता येत नाही. तेंडुलकर- आळेकर- एलकुंचवारांनंतर ज्या मोजक्या पुरूष लेखकांना बाई लिहिता आली, त्यापैकी जयंत पवार एक होते. "अधांतर", "शेवटच्या बिभत्साचे गाणे" यांतल्या स्त्री पात्रं स्वतंत्रपणे अभ्यासली पाहिजेत.
त्यांच्या कथांमधूनही ते प्राधान्यानं शोषित माणसांचं जगणं मांडतात. मुंबईतली विविध स्थळं आणि अवकाश या कथांमध्ये ठळकपणे येतात. "फिनिक्सच्या राखेतून उठला मोर" या संग्रहाला २०१२ साली साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आलं. या संग्रहातल्या सगळ्या कथांना पार्श्वभूमी आहे ती मुंबईची, गिरणगावाची, कामगारांची आणि चाळसंस्कृतीची. या कथा घटनाप्रधान आहेत. गिरणगावातली सामान्य माणसं या कथांचा केंद्रबिंदू आहेत.
जयंत पवारांना पत्रकार असल्याचा फायदा झाला असावा. अतिशय विविध प्रकारच्या स्वभाव आणि स्तरातल्या व्यक्ती, त्यांचं जगणं, मुंबई महानगरातल्या कानाकोपऱ्याची खडानखडा माहिती, अविश्रांत वहात्या असणाऱ्या शहरातल्या जगण्यातले ताणेबाणे आणि हे सगळं वर्तमानपत्री शब्दमर्यादेत मांडण्याचं आव्हान- यामुळे त्यांच्या लेखनाची वीण घट्ट आहे. पत्रकाराला काहीशे शब्दांत ब्रह्मांड मांडावं लागतं, असं म्हणतात. पत्रकार म्हणून हा रियाज त्यांच्या इतर लेखनाठीही मदतकारक ठरला असणार. कुठलाही लेख लिहिताना जागोजाग विषयानुरूप संदर्भ आणि पुरावे देऊन लेख नुसताच माहितीपूर्ण नव्हे तर त्याला संग्राह्यमूल्य देणारे अभ्यासक होते. त्यांची नाट्यसमीक्षाही त्यांनी नाटक किती बारकाईनं पाहिलंय, याचा नमुना असायची.
केवळ नाटक आणि कथातूनच नव्हे तर वेळोवेळी शोषकांच्या विरोधात जाहिर मतप्रदर्शन करून ते जागल्याची भूमिका निभावत राहिले. त्यांच्या एकूण लेखनातला उष्ण रसरशीत जीवंतपणा टिकण्याचं कारण त्यांची अस्वस्थता, तळमळ हे होतंच पण ते सातत्याने विविध चळवळींत सक्रियपणे गुंतलेले राहिले, हे देखील होतं. आपल्या लेखनातून सातत्याने वाचक-प्रेक्षकांना थेट प्रश्न विचारत राहिले. "एकटे असण्यासाठी एकत्र येऊया" असं म्हणत इतरांनाही विचारपूर्वक भूमिका घ्यायला प्रोत्साहित करत राहिले.
विविध कारणांनी सर्वत्र भयाचं वातावरण निर्माण झालेलं असताना आणि माणसं अधिकाधिक एकटी एकटी होत गेली असताना त्यांना आधार वाटावा असा कार्यकर्ता लेखक निघून जावा, ही घटना हतबलतेची भावना निर्माण करणारी आहे. जुन्याजाणत्यांपासून ते तरुणांपर्यंत मोठं नेटवर्किंग असणारे मित्र आणि मार्गदर्शक होते. मराठी आणि इतर भाषांमध्ये नवं काय सुरू आहे, याची खबरबात ठेवणारे आणि अफाट वाचन असणारे माहितगार होते.
स्व-पूजेचा काळ सोकावलेला असताना स्वत:चीच टिमकी न वाजवता इतर लेखकांचं साहित्य आत्मियतेनं पुन्हा पुन्हा वाचकांपर्यंत पोचवत रहाणं, हा एक दुर्मिळ विशेष पवारांकडे होता. आपल्या लेखनातून मुंबईचे आणि मुंबईतल्या जगण्याचे विविध पैलू प्रकाशात आणणारे भाऊ पाध्ये आणि चंद्रकांत खोत हे लेखक पवारांना प्रिय होते. त्यांचं लेखन नव्या वाचक आणि लेखकांपर्यंत ते हिरीरीनं पोचवत राहिले. चंद्रकांत खोतांच्या कादंबऱ्या नव्यानं प्रकाशित करायचं ठरल्यावर त्यांना पवारांनी दीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. तत्कालीन साहित्यात खोतांचं स्थान महत्त्वाचं का आहे, हे पवारांनी नेमकेपणानं मांडलंय. पवारांनी चंद्रकांत खोतांना "सातरस्त्याचा हेमिंग्वे" म्हटलं होतं.जयंत पवार सरांचं अखेरचं दर्शन घेताघेता मनात विचार आला; जयंत पवार यांना काय म्हणता येईल..? पण पुढच्याच क्षणी तो विचार झटकला.
जयंत पवार हे जयंत पवार असणंच सर्वार्थानं सार्थ आहे, नाही का?
अलविदा जयंत पवार. सलाम.

अक्षय शिंपी.

रंगकर्मी आणि कवी

 

 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form