आमचं सिंबायोसिस

कामानिमित्त बाहेर गेलेला नवरा कधी बाहेरून फोन करतो, चहा टाक ना, येईन मी दहा मिनिटांत. कंटाळा आला असला तरी मी चहा टाकते. मुलगा म्हणतो, ‘आज काहीतरी टेस्टी कर ना,’ त्या वेळी त्याच्या आवडीचे काही तरी करते मी. मुलीच्या आणि माझ्या आवडीनिवडी ब-याच सारख्या. ‘उद्या जेवायला भगर आमटी करीन, अभ्यास कर’. म्हटलं की हातातलं काम पटापट संपवते. हे सगळं सांगायचा मुद्दा असा की आमच्या घरातले रांधावाढाउष्टीकाढा डिपार्टमेंट माझ्याकडे आहे, आणि ते मी स्वतःहून स्वतःकडे ओढून घेतले आहे. हा निर्णय मी मुद्दामून घेतला नाही. पण मला नेहमीच लग्न करायचे होते, आणि मला नेहमीच दोन मुलं हवी होती. या दोन्ही गोष्टी किती ओव्हरहाईप्ड आहेत याची जाणीव पुढे कधी तरी झाली; पण तरीही मला हे सगळे हवेच आहे! लग्न केलं म्हणजे रांवाउका डिपार्टमेंट हातात आलेच पाहिजे असे नाही. मी जेंव्हा घरी राहायचे ठरवले, तेंव्हा रांवाउका हातात आले आणि तीन मिनिटांत मला जाणीव झाली की आपण फारच बेकार हाऊस मॅनेजर आहोत. रोज स्वयंपाक केला पाहिजे या तत्वावर आपला विश्वास नाही आणि घराच्या आरोग्यासाठी हे योग्य नाही. मग माझ्या मदतीला या विषयातले तज्ज्ञ आले. माझ्या घरी भांडी घासायला, स्वयंपाक करायला इतकेच काय मुलं सांभाळायला मदतनीस आल्या. मी उघडपणे मदत स्वीकारते आणि माझे आयुष्य सुरळीत सुरू आहे. माझ्या मदतनीस ह्या मदतनीस कमी आणि माझी लाईफलाईन जास्त आहेत हे वास्तव आहे. वर सांगितलेली कामं मी घरात राहणा-या व्यक्तीमध्ये झालेल्या कामाच्या विभागणीचा भाग म्हणून करते. 
मुलगा गॅसपुढे उभा राहण्याच्या वयाचा झाल्यापासून ब-याचवेळा स्वतःसाठी काहीबाही खाणे बनवतो. मुलगी अजून काही वर्षे गॅस सुरू करु शकणार नाही. पण फ्रीजमधले पातेले काढून कपात दूध ओतून पिते, ब-याचदा सांडते, मी लक्ष देत नाही कारण तिला कपात दूध ओतून देणे माझे काम नाही, तिचे स्वतःचे आहे असे माझे मत आहे. शाळेने घरी असलेल्या आयांनी मुलीचे सहशिक्षक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केल्यावर मी तिला शालेय अभ्यासक्रम शिकवण्यासाठी दिवस खर्च करणे माझे काम नाही, याच ठसक्यात मी सांगितले आहे. तिची शाळा ते करेल लागली मदत तर मी आहेच. गृह व्यवस्थापक म्हणून काम करत असले तरी मी हॅंड्सऑन आई किंवा बायको नाही. मी आधी मी आहे; त्याच्यानंतर मी बाई, बायको, आई आहे.
माझा स्वभाव खूप माझ्या आईसारखा आहे. आईने इतक्या लोकांना जेऊ घातले आहे की, तिच्याशी निगडीत लोकांच्या आठवणी बहुदा तिने त्यांना काय करुन खाऊ घातले अशा असतात. आजही तिचा तोच स्वभाव आहे. पण हा स्वभाव तिने जपला आणि त्यातून स्वयंपाकाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार मिळेल याची व्यवस्था केली. नोकरीदार आणि घरी राहणा-या महिलांना घरातल्या स्वयंपाकाच्या राड्यात अडकून राहू लागू नये म्हणून पोळीभाजी केंद्र सुरू केले. तिने घर सांभाळले पाहिजे आणि काम करु नये अशा अर्थाच्या चर्चाही घरी कधी झाल्या नाहीत इतके आमचे व्यक्तीस्वातंत्र्य घरी प्रिय होते आणि आहे. 
तिच्यामाझ्या जोडीदारांतही ब-याच बाबतीत समानता आहे, दोघेही अतिशय किचकट शिस्तप्रिय आहेत. कामांची अंमलबजावणी झाली पाहिजे या उद्देशातून दिवसाची आखणी करतात. पण त्या दोघांमध्ये आणि आम्हा दोघींमध्ये काही फरक आहेत. बाबांनी आईची साथ गृहित धरली. मी माझ्या जोडीदाराची साथ गृहित धरते. म्हणजे आणिबाणीच्या काळात सभेसाठी आलेले सत्तर लोक ऐनवेळेस घरी जेवायला आले तरी आई पिठलंभात करुन जेवायला घालेल ही खात्री बाबांना होती. माझा जोडीदार मला न सांगता चार लोकांनाही घरी जेवायला बोलावणार नाही याची खात्री आहे मला. 
रांवाउका मधला ‘रांधा’ हा प्रकार थोड्याफार प्रमाणात सोडला तर बाकी काहीच मला करावे लागत नाही याचे एकमेव कारण म्हणजे मी अशा आर्थिक वर्गात मोडते, जो वर्ग संपन्न आणि सुजग आहे. (संपन्नता असली तरी समानता असेल असे नाही.) मध्यमवर्गीय संपन्नता नसती आणि मी नोकरी सोडली असती त्या क्षणी मला घरकामात पूर्णपणे गुंतवून घ्यावे लागले असते. आज मध्यमवर्गासाठी काम करणारे मदतनीस त्यांच्या आयुष्यातले घरकामही सांभाळत आहेत. या सगळ्या मदतनिसांची मुलं शिकून मोठी होत आहेत. उद्याचे चित्र वेगळे असेल. परदेशी राहणा-या भारतियांप्रमाणे घरकाम सगळ्यांना करावे लागेल. सध्या माझे स्वातंत्र्य माझ्या गृहमदतनीसांच्या सहाय्याने अबाधित आहे. म्हणजे त्या नसत्या तर मला विचार करण्याची शक्ती, किंवा स्वतंत्र अस्तित्व नसेल अशातली गोष्ट नाही. मध्यंतरी त्या नव्हत्या तेंव्हा आम्ही घरातल्यांनी सगळी कामे वाटून घेऊन केलीच. पण आज त्या आहेत म्हणून माझ्यावरच्या जबाबदा-या वाटल्या जात आहेत. विशेषतः जी मदतनीस माझ्या मुलीला सांभाळायला मदत करते तिचा मला खूप आधार आहे.
माझे आजी आजोबा, आई बाबा आणि नंतर माझा जोडीदार एकाच प्रकारच्या विचारप्रवाहाचा भाग आहेत म्हणून मला संघर्ष करावा लागला नाही. हे माझे नशीब नाही तर माझे प्रिव्हिलेज्ड मध्यमवर्गीय आयुष्य आहे. मला स्त्री म्हणून जन्माला आल्यापासून आजपर्यंत काही संघर्ष करावे लागले, कधी कधी नोकरीत दुजाभाव सहन करावा लागला. पण स्वयंपाकघराची जबाबदारी घेण्याची सक्ती माझ्यावर कधी झाली नाही. कधी परंपरेच्या चौकटीत राहून स्त्री म्हणून कमीपणा भोगावा लागला नाही, पाळी सुरू आहे म्हणून हिडीसफिडिस वागणूक सहन करावी लागली नाही, आपल्याकडे अशी पध्दत आहे म्हणून अमुकतमूक गोष्ट पाळ अशी सक्ती झाली नाही. हे स्वातंत्र्य, हे प्रिविलेज माझ्या मदतनीसांना लाभले नाही. त्यांना माझ्याकडे रांधावे लागते. आणि शिवाय त्यांच्या स्वतःच्या घरी जाऊन रांधा, वाढा, उष्टी काढा हे सगळे करावे लागते. इतकेच नाही तर त्या ज्या परिस्थितीत राहतात त्यात त्यांना अनेक प्रकारचा अन्याय आणि हिंसाचार सहन करावा लागतो. त्यांच्या समस्या माझ्या आहेत असे मी म्हणणार नाही, पण त्यांच्या समस्यांना सोडवण्यासाठी मदत करणे माझे कर्तव्य आहे असे मी मानते. या समस्या कमी झाल्या आणि त्यांच्याही  आयुष्यात माझ्या आयुष्यातल्या काही चांगल्या गोष्टी आल्या तर त्यांचा विकास होईल याची मला जाणीव आहे. आणि माझ्या आजूबाजूलाच असलेल्या स्त्रियांच्या विकासासाठी काही ना काही प्रमाणात सहभागी व्हायची माझी सतत तयारी असते. हा सहभाग नेहमी फक्त आर्थिक नसतो. त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजावून सांगणे, त्यांच्या अंधश्रध्दा दूर करणे, शिक्षणाचे महत्व सांगणे, त्यांच्या अडचणी एक मैत्रीण म्हणून ऐकून घेणे अशा मार्गाने सुध्दा हा सहभाग साधता येतो. माझ्या आयुष्यातल्या या महिलांच्या मागचे रांधावाढाउष्टीकाढा संपले तर माझ्या विकासाचे चक्र पूर्ण होईल!

भक्ती चपळगावकर

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form