सोनलचे वय झाले होते, ती आजारी होती,हे सगळे खरे असले तरी मैत्रिणींचे जाणे मनाला दुखावून जातेच. त्यातून निवृत्त झाल्यावर मी वाशीत रहायला आले व ती पार्ल्यात! त्यानंतरही काही वर्षे ‘वाचा’मध्ये जाऊन मी तिला भेटत होते; पण मग प्रवास करण्याचा कंटाळा व वाढते वय यामुळे प्रत्यक्ष भेट होईनाशी झाली. फोन व्हायचे, पण कधी तिला बोलताना त्रास व्हायचा, म्हणून बोलणेही सीमित होते.
कालपासून असंख्य आठवणी, तिचे मनापासून हसणे, खणखणीत गाणे, आठवत बसले आहे. मी १९७७ला दिल्लीहून आले व ७८ मध्ये केव्हातरी विभूती पटेल मला सोनलकडे घेऊन आली. ती सोनलला ‘सोनलबेन’ म्हणायची व आमच्याकडे गुजरातेत सगळ्यांना बेन व भाई म्हणण्याची रीत असल्याने, मीही तिला बेन म्हणायची. एकदोनदा ऐकल्यावर तिने मला दम भरला व म्हणाली की तू मला बेन म्हणालीस तर मीही तुला बेन म्हणेन; “तू गुजरातेत वाढलेली मराठी असशील तर मी महाराष्ट्रात वाढलेली गुजराती आहे.”
आमची औपचारिक ओळख संपून मैत्री लगेचच सुरु झाली. त्याकाळात मी मुंबई व महाराष्ट्रात नवीनच होते. विभूती व सोनलमुळे माझे नवखेपण व सांस्कृतिक एकलेपण कमी झाले. विभूती लगेचच कृतीशील झाली व शारदाश्रमातील तीन दिवसीय बैठकीनंतर एक स्त्रियांचा गट तयार झाला. महाराष्ट्रात स्त्री-चळवळ सुरु झाली होती; पण अमराठी मुलींच्यात चळवळ यानंतर सुरु झाली. सोनलच्या घरी “फेमिनीस्ट नेटवर्क” या नावाने आम्ही एक बुलेटीन काढत असू. तिथेच “फोरम अगेन्स्ट रेप” स्थापन झाले व त्याचेच रुपांतर “फोरम अगेन्स्ट ओप्रेशन ऑफ विमेन” यात झाले. १९८० साली अखिल भारतीय स्त्री संमेलन झाल्यावर एकदा आम्हाला एका चाळीस वर्षीय स्त्रीचे पत्र मिळाले. तिला आसरा हवा होता व ती पती व मुलांना सोडून यायला तयार होती. तेंव्हा आम्ही तिला होकारार्थी उत्तर देऊ शकलो नाही; पण मुंबईतील अनेक संघटनांना उदा. बापनू घर, एआयडब्लूसी सामील करून घेऊन, चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले. सोनलचे घरही काही मुलींना आसरा देणारे झाले. पुढे स्त्रियांना इतर काही मदत करण्याच्या, म्हणजे कायद्याची मदत किंवा घरातून बाहेर पडण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टीने, “विमेन्स सेंटर”ही तिच्याच घरात स्थापन झाले. ‘विमेन्स सेंटर’ वाकोल्याला स्वत:ची जागा मिळवून स्थिर-स्थावर होताच, सोनलने स्वत:च्या वैयक्तिक पुस्तकांसह “वाचा” ही लायब्ररी व नंतर सांताक्रूझच्या नगरपालिका शाळेत जागा मिळताच, रिसर्च व डॉक्युमेंटेशन सेंटर उभे केले.
वैयक्तिकदृष्ट्या मला तिच्याशी बोलून, तिचे अनुभव ऐकून बऱ्याच बाबींचा उलगडा व्हायचा. जेएनयुत मी राजकीय चळवळीबद्दल शिकले होते, जातीपातीविषयी पूर्वग्रह हा माझ्या जन्मजात संस्कारांचा भाग नव्हता. पण सामाजिक सत्य परिस्थितीची जाण मुंबईतच येऊनच झाली व त्यातील मोठा हिस्सा सोनलशी मारलेल्या गप्पांचा व तिच्या अनुभवांचा आहे. समाजात अनेक वर्षे वावरल्यामुळे तयार झालेली पारखी नजर, सामाजिक चळवळीसोबतच रसरसून जगणेही महत्वाचे आहे ही जाणीव, चवीढवीने खाणे, मुक्तपणे गाणे, दुसऱ्याचे ऐकून घेणे या सर्व गोष्टी तिच्यात होत्या. मला पटतील असे व्यावहारिक सल्लेही ती द्यायची. त्याच बरोबर पश्चिम पार्ल्याचे नागर गुजराती ब्राह्मण समाज व त्यांचे जगणे, अनेक पिढ्या तिथे राहिल्याने तयार झालेली संस्कृती, त्यांनी सुरु केलेले विलेपार्ले केळवणी( शिक्षण) मंडळ, या सगळ्यात तिचा सहभाग होता. मी गुजराती समाजातच वाढल्याने माझ्या व तिच्या या विषयावर गप्पा व्हायच्या. या मंडळाचेच मिठीबाई कॉलेज व अनेक शैक्षणिक संस्था आहेत व त्या सगळ्यांचा शैक्षणिक दर्जा उत्तम समजला जातो. यातील काहींवर सोनल ट्रस्टी होती.
बराच काळ मी फोरमचा भाग होते, पण काही काळाने मी ‘स्त्रीउवाच’ गटाबरोबर जास्त रहायला लागले. हा पूर्ण मराठी गट होता व लिखाण-वाचनाशी संबंधित होता. फोरमशी माझा काही वाद नव्हता व तत्पूर्वीचे आयुष्य गुजरात व दिल्लीत गेल्याने, व नोकरी मुंबई विद्यापीठात असल्याने, मी मराठी किंवा गैरमराठी कुठल्याही गटात सामावून जायची. पण असे झाले खरे! अर्थात हे सर्व नकळत घडत होते; पण त्यावर बहुदा चर्चा झाली असावी. तेव्हा सोनल म्हणाली की, “जाऊ दे! ती तिच्या मुळाकडे जात आहे, तिला ते एन्जॉय करू दे.”
मी त्यानंतर यासंबंधी विचार केला पण मला माझ्या मुळांकडे जाणे आवडले, हे मी आत्ता सांगू शकते. सोनलची व माझी मैत्री चालू राहिली. विद्यापीठाचे कॅम्पस सांताक्रूझ पूर्वेला व वाचाचे कार्यालय सांताक्रूझ पश्चिमेला. वेळ मिळाला की मी तिथे जायचे, जेवणाची वेळ असली की मिळून डबा खायचो, गप्पा व्हायच्या, नवीन पदार्थांच्या पाककृतीची चर्चा व्हायची, काही कार्यक्रम असला तर तो ऐकायचा, असा छान वेळ जायचा. गुजराती इतकेच इंग्रजीवर तिचे प्रभुत्व होते; एकदा चर्चेदरम्यान सरकारला विरोध करणाऱ्या लोकांना “this counter-intelligensia” असे तिने संबोधले. मला विचारांती तो अतिशय चपखल शब्द वाटला. असे अनेक चपखल शब्द मी चर्चेदरम्यान मी तिच्या तोंडून ऐकले. आयुष्य इंटरेस्टिंग करण्यात ज्यांचा सहभाग असतो अशा मित्रांचे जाणे आयुष्यात पोकळी निर्माण करते. पण वयामुळे, आजारपणामुळे व आता करोनामुळे प्रत्यक्ष भेटी अशक्यच झाल्या आहेत, अशी मनाची समजूत काढायची आणि त्यांच्या आठवणीत आपल्याला इतके छान आयुष्य काढता आले – याचेच समाधान मानायचे.
वासंती दामले
Tags
आदरांजली