छळवाद .. !

स्त्रियांच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या वारंवार बघाव्या लागतात. पत्रकार, मंत्री, अभिनेते, दिग्दर्शक, शिक्षक, डॉक्टर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले पुरुष निर्लज्जपणे हा गुन्हा करत असतात. म्हणूनच, महिलांसाठी अजून कोणतेही कार्यक्षेत्र सुरक्षित नाही, असं परतपरत म्हणण्याची वेळ येते. कारण प्रत्येकच क्षेत्रात महिलांचे लैंगिक शोषण होताना दिसते. अगदी “प्रगल्भ, बुद्धिमान, सोज्वळ” समजल्या जाणाऱ्या साहित्यिक लोकांच्याकडूनही महिलांचा लैंगिक छळ करण्यात आल्याची उदाहरणे घडतात. खरंतर अशा घटना घडणं, हे काही समाजाला तसं नवीन नाही. फक्त पूर्वी सोशल मीडियाचे प्रमाण जास्त नसल्यामुळे एकमेकांशी संपर्क करण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या, एवढंच! सोशल मीडियामुळे भौगोलिक अंतर जास्त असलेल्या माणसांच्यातही संपर्क होणे सहज शक्य झालंय. पण त्याचबरोबर त्रास देण्याचेही अनेक रस्ते खुले झाले आहेत. कारण पुरुषांनी स्वत:च्या हातातल्या सत्तेचा गैरवापर करून महिलांचा लैंगिक छळ करण्याची वृत्ती काही अजून संपलेली नाही! जेव्हा आपल्या आसपासच्या माणसांच्या बाबतीत अशी एखादी घटना घडते, तेव्हा तर हे अधिकच जाणवते.
नव्यानेच लिहू लागलेल्या माझ्या एका मैत्रीणीने फेसबुकच्या दुनियेत पाऊल टाकले आणि काही दिवसातच ती तिथल्या भुलभुलैय्यामध्ये हरवून गेली. घराच्या चौकटीच्या आतमध्ये, छोट्याशा वहीत लिहिलेल्या शब्दांचे कौतुक कोणी करत नसे. पण फेसबुकच्या दुनियेत तिला भरभरून कौतुक अनुभवायला मिळत होते. साहजिकच ती भारावून गेली. नवनवीन लोकांच्या ओळखी होत होत्या. तसेच नवनव्या विषयांवर लिहिण्यासाठी तिला प्रेरणाही मिळत होती. एकूणच ती आभासी दुनियेत आनंदाच्या डोही तरंगत होती. काही मोठ्या लेखक मंडळीचे मार्गदर्शन मिळत होते, लेखनात सुधारणा होत होती आणि तसे तिला स्वत:च्या शब्दांना पुस्तकरूपात प्रकाशन करायचे वेध लागू लागले. याचे कारण म्हणजे फेसबुकातल्या आदरणीय, माननीय लेखकांनी तिला दिलेले प्रोत्साहन! त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला होता. तिलाही आता नावापुढे ‘लेखिका’ हा शब्द जोडण्याची ओढ वाटायला लागली. ओळखीच्या लोकांकडे ती याविषयी बोलू लागली. मेसेंजरवरून, नंबर शिवाय अगदी कॉलची ही सोय असल्याने कुणालाही संपर्क करणे तिला सोयीचे झाले होते. आपल्या नावाचे पुस्तक प्रकाशित व्हावे, हीच एक आस ! म्हणून तिने घरच्यांना न सांगताच अनेकांशी संपर्क करायला आणि व्यवहाराची बोलणी करायचं ठरवलं.
काही दिवसांनी तिला एका प्रकाशकाने पुस्तकासाठी लिहिलेले साहित्य घेऊन बोलावले. तिला फार आनंद झाला पण घरी लेखनाचे कारण सांगितलं तर वाद निर्माण होतील असं तिला वाटलं. म्हणून तिने आपल्या मैत्रीणीकडे जात असल्याचे सांगितलं. एसटीत बसल्यावर तिला कोण आनंद झाला होता! आता थेट पुस्तक प्रकाशित करूनच घरच्यांना सांगू अशा विचारात तिने आनंदात शहर गाठले. आभासी दुनियेत सज्जन भासणाऱ्या प्रकाशकाचा खरा विखारी पुरुषी चेहरा प्रत्यक्ष भेटीत तिच्यासमोर आला.
संबंधित प्रकाशकाकडे गेल्यावर त्यांनी तिला पुस्तक प्रकाशनाची हमी तर दिली. पण त्याचबरोबर "आपण दोघं काही वेगळे आहोत का? आपल्यामध्ये पैसा आणू नकोस, तू फक्त लिहित रहा." - असं सांगत शारीरिक जवळीक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र ती घाबरली व कशीबशी घरी निघून आली. आता घरच्यांच्या अपरोक्ष काहीही करायचे नाही, असंच तिने ठरवलं ! पण तिने अनवधानाने व्हाट्सअप नंबर दिला होता. त्या भेटीनंतर तो प्रकाशक तिला सतत फोन करू लागला. आणि शरीरसुखाची मागणी करू लागला.
आता त्याला ब्लॉक करण्याचा सोपा पर्याय तर तिच्याकडे होता, परंतु तिचे साहित्य त्याच्या ताब्यात गेले होते. त्या लिखाणावर तिने दोनतीन वर्षे वेळ खर्च केला होता. एकीकडे पुस्तक प्रकाशित होण्याची आस व दुसरीकडे अवास्तव मागणी यामुळे धास्तावून ती अस्वस्थ झाली. शिवाय तिला साहित्य क्षेत्रातील, प्रकाशनाच्या संदर्भातली काहीच माहिती नव्हती. काय करावे तिला सुचेना! शेवटी तिने धीर एकवटून नवऱ्यालाच सर्व प्रकार सांगितला. तो देखील सुरूवातीला तिच्यावर भडकलाच, पण नंतर शांतपणे परिस्थिती समजून घेतली. लवकरच त्या प्रकाशकाला गाठून नवऱ्याने खास ‘पुरुषी’ शैलीत त्याची कानउघडणी केली. तिचे अडकून पडलेले लिखाणही त्याच्याकडून परत मिळविले. तोपर्यंत, तिला प्रचंड मानसिक ताण येत होता. स्वतःच्या बेसावधपणाबद्दल तिने स्वत:ला भरपूर दोष दिला. ती घरी न सांगता एका पुरुषाला भेटली म्हणून तिला अद्दल घडली, असं तिला बराच काळ वाटत राहिलं !
पण खरंतर अशीही अनेक उदाहरणं मला माहिती आहेत, की जिथे जवळच्या ओळखीतले किंवा अगदी नात्यातले पुरुष देखील महिलांचे लैंगिक शोषण करतात. आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का लागायच्या भीतीने त्या मुकाट्याने सहन करीत राहतात. थोडक्यात काय, तर कामाची जागा असो किंवा घरगुती असो - लैंगिक शोषणाचे दडपण बाईला नेहमीच असते! साहित्य क्षेत्रात महिला सुरक्षित आहेत – असं समजून गाफील राहता येणार नाही. प्रकाशन क्षेत्रात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या महिला प्रकाशक आहेत. त्यातही काहींचे फक्त कागदोपत्री नाव असते, पण कारभार तर घरचे पुरूषच हाताळतात. मोठमोठया साहित्य संमेलनातही पुरूषवर्गाची मक्तेदारी चालते आणि महिलांना दुय्यमपणाची जाणीव करून दिली जाते. मुख्य म्हणजे कुठलंही क्षेत्र असलं तरी सत्तेचा दुरुपयोग करून महिलांचा लैंगिक छळ करणारे सगळीकडे असतातच!


शुभांगी दळवी

सातारा

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form