नुकतीच आषाढी एकादशी झालीये... हा वर्षातला सगळ्यात मोठ्ठा उपास मानला जातो. बऱ्याच घरांमध्ये लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळेच जण हा उपास करतात. एकदा हा उपास झाला की मग त्याच्या पाठोपाठ अनेक व्रतवैकल्य घेऊन श्रावण येतो. पुढे कार्तिकी एकादशी पर्यन्त कसले ना कसले नेमनियम सुरूच राहतात. चातुर्मासात दसरादिवाळी सारख्या सणांची सुद्धा रेलचेल असते. पण व्रतं आणि उपासांची संख्या त्यापेक्षा काहीशी जास्तच असेल. यातली बहुसंख्य व्रतं बायकाच करतात! आणि ह्या नेमनियमांच्या आणि उपासांच्या मागे मुलांचे, नवऱ्याचे किंवा घरातल्या इतरांचे भले व्हावे – अशी इच्छा असते. पण उपास करताना स्वत:च्या शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यावर काय परिणाम होईल, याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केलं जातं!
बऱ्याच व्रतांच्या निमित्ताने या दिवसांत अन्नग्रहणावर वेगवेगळ्या पद्धतीची बंधनं घालून घेतली जातात. ते आरोग्याला अपायकारक आहे की उपायकारक आहे – याबद्दल नेहमीच उलटसुलट मतं मांडली जातात. चातुर्मासातले उपासतापास अंधश्रद्धा नसून ते आवश्यक असतात असंही अनेकांना वाटतं! उपास करणं आरोग्याला हितकारक असतं, असं अनेक जणांचं म्हणणं असतं. आयुर्वेदात लंघन करणे हा उपचार म्हणून देखील सांगितलेला आहे. त्यामुळे शरीर डीटॉक्स होते. ‘चातुर्मासात पावसाळा असल्यामुळे निसर्गाचे रूप पालटलेले असते. भूक फारशी लागतच नाही, कारण या काळात जठराग्नी मंद झालेला असतो. पचनशक्तीही जरा कमकुवत झाल्यामुळे उपास करणं हे आरोग्यासाठीही चांगलं असतं !’ असेही म्हटलं जातं. शिवाय वजन घटवण्यासाठी देखील उपासांचा उपयोग होतो – अशी श्रद्धा तरुण मंडळींमध्ये वाढायला लागली आहे. पण आपल्याच संस्कृती मधल्या काही ग्रंथात उपास न करता विविध धान्य, कडधान्य, भाज्या, दूधदुभते असा व्यवस्थित आहार घ्यावा आणि योगाभ्यास करावा असे सांगितले आहे – त्याचा उल्लेख मात्र फारसा केला जात नाही.
चातुर्मासात वेगवेगळ्या ठिकाणी आहारविहाराचे वेगवेगळे नेमनियम पाळले जातात. अनेक लोक या दिवसांत कांदालसूण आणि मांसाहार वर्ज्य करतात. काही लोक पर्णभोजनाचे म्हणजे पानावर जेवायचे व्रत करतात तर काहीजण दिवसातून एकदाच जेवायचे (एकभुक्त) असा नेम धरतात. अनेक स्त्रिया चातुर्मासात ‘धरणे-पारणे’ नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास, असे सतत चार महीने करायचे असते. हे व्रत ‘इंटरमिटंट फास्टिंग’चा प्रकार आहे – असे सांगितले जाते. श्रावणात तर एकेकदा इतके उपास एकत्र येतात की अनेकजणींना आठवडाभर उपास घडतो. नवरात्र, नागपंचमी, हरतालिका यासारखे अनेक उपास तर सणांना जोडूनच येतात. म्हणजे एकीकडे सणवार म्हणून घरातल्या मंडळींसाठी गोडधोडाचा स्वयंपाक करायचा आणि त्याचवेळी स्वत: मात्र उपासाचे पदार्थ खाऊन राहायचं अशी अनेक बायांची अवस्था असते. काही उपास ‘निर्जळी’ म्हणजे अगदी पाणीसुद्धा न पिता करावे लागतात. पण उपासाचे बरेचसे पदार्थ छानपैकी चविष्ट असतात आणि त्यात भरपूर वैविध्य आणलं जातं. बटाटे, साबूदाणा, रताळी अशा पिष्टमय पदार्थांच्या बरोबरीने तेलातुपाचा सढळ हाताने वापर केलेला असतो. यूट्यूबवर तर उपासाचा डोसा, उपासाचा दहीवडा, उपासाची इडली अशा मजेदार रेसिपीज् पहायला मिळतात. पण उपासांच्या निमित्ताने खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये पोषणमूल्यं कितीशी असतात, हा मात्र सध्या वादाचा विषय आहे.
हा लेख सुद्धा वाचा - उपास एक अन्यायकारक प्रथा
जरी हिंदूंच्या उपवासपद्धतीत खूप विविधता असली तरी बहुसंख्य उपासाच्या पदार्थात प्रथिनांचा वापर मात्र अगदी कमी असतो. आपल्या देशातल्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त महिला आणि मुलींना अनिमिया असतो. तसंच महिलांना प्रथिनांची, कॅल्शियमची आणि त्याचबरोबर D आणि B12 जीवनसत्वांची कमतरता असते. प्रथिनांच्या कमतरतेमुळे देखील हिमोग्लोबीन बनण्यात अडथळा येतो. आहारतज्ञ सांगतात की गरोदर महिला आणि कुपोषित, अशक्त लोकांनी लंघन किंवा इंटरमिटंट फास्टिंग देखील करू नये. पण हिंदू धर्मात तरी बहुसंख्य महिला स्वत:च्या आरोग्याची अजिबात पर्वा न करता अगदी डायबेटीस असला तरीही उपासतापास करतात. मागच्या वर्षी उत्तर भारतातल्या काही हॉस्पिटल्समध्ये डायबेटीस असलेल्या लोकांसोबत एक अभ्यास करण्यात आला. त्यात विविध धर्माचे लोक सहभागी झाले होते. हे पेशंटस् उपासांच्या निमित्ताने काय खातात, कधी खातात, उपासाच्या काळात डॉक्टरांच्या संपर्कात असतात की नाही – अशा अनेक बाबींचा त्यात विचार केलेला होता. या अभ्यासात दिसून आले की डायबेटीस असूनही महिला मोठ्या प्रमाणात उपास करतात. बहुसंख्य पेशंटस् उपास सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतच नाहीत. मुंबईतल्या डॉ. कामाक्षी भाटे सांगतात की महिला मोठ्या प्रमाणात स्वत:च्या आरोग्याची हेळसांड करतात आणि अगदी पाइल्स सारखा आजारदेखील आपोआप बर होईल म्हणून दुर्लक्ष करतात. दोन वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये एक अभ्यास करण्यात आला होता, त्यात असे आढळले की – निरोगी दिसणाऱ्या शहरी स्त्री-पुरुषांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जीवनसत्वांची कमतरता असते. बी कॉम्प्लेक्स गटातल्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे डिमेनशिया, कॅन्सर असे अनेक आजार होऊ शकतात. भारतीय स्त्रियांच्या आरोग्याचे हे वास्तव लक्षात घेतलं तर बायकांनी कुठल्याही प्रकारचे उपास करणं त्यांच्या आरोग्याला घातक आहे, हे सहज लक्षात येईल. खेड्यातल्या गरीब महिला तर अनेक कारणांनी कुपोषित असतातच. तसंच शहरातल्या नोकरी बाईला तर घरकाम, बाहेरची धावपळ या बरोबरीने स्वत:चा चौरस आहार आणि व्यायाम हे सर्व सांभाळण्याची कसरत अजिबात झेपत नाही.जरी घरातल्या सर्वांचे भले व्हावे – अशा उदात्त हेतूने महिला उपास करत असल्या आणि त्यातून त्यांना अध्यात्मिक आनंद मिळत असला तरी त्यांच्या शारीरिक आरोग्याची हेळसांड होत आहे, याकडे त्यांच्या घरातल्या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे.
... किंवा महिलांनी तरी कुठलेच उपासतापास न करण्याचे नवे व्रत अंगिकारले पाहिजे!