बाप का बाप होना जरुरी है क्या?

दुपारच्या वेळी मी काहीतरी लिहित बसलो होतो. आणि माझा मुलगा अबीर माझ्याकडे आला. “आज असं झालं... मग मी असं magic केलं. तर तो उडून गेला...” हे असलं काहीतरी भव्यदिव्य सांगत होता आणि मी एक महत्वाचा मेल वाचण्यात अडकलो होतो. मला त्याचं फार लक्ष देऊन ऐकता येत नव्हतं. तरी मी जमेल तेवढ्या शक्तीनं ‘हो का?’ वगैरे अभिनय करत होतो. अबीरच्या लक्षात आलं की बाबाचं आपल्याकडे काही लक्ष नाहीये. “असं काय हे? मी सांगतोय ना तुला... खरंच magic झालं...” हे सगळं त्याच्या मनात येत असणार. पण मला त्याच्याकडे बघता येत नव्हतं. माझी concept एका channel ला आवडली होती आणि त्याच्याबद्दल तो मेल होता. 
अबीर खट्टू झालाय हे माझ्या लक्षात आलं आणि मी त्याला सांगत होतो. “अबीर, मला कळतंय की मी तुझं नीट ऐकलं नाहीये. पण खूप महत्वाचं काम करतोय पाच मिनिट दे. मग तुझं सगळं ऐकतो. चालेल?” 
“मग क्रिकेटची एक match पण खेळायला लागेल.” - मला हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. मी हो... म्हटलं. 
तो धावत जाऊन बॉल घेऊन आला आणि तीन सेकंदात परत तिथेच उभा. अजून चार मिनिट ५७ सेकंद जायचे होते. मी काही आता मेल करू शकणार नाही असं मला वाटायला लागलं आणि मागून माझ्या बाबांचा म्हणजे अबीरच्या आजोबांचा आवाज आला. “मी खेळतो तुझ्याबरोबर... पण मला क्रिकेट खेळता येत नाही. काय खेळूया?” “उनो खेळूया? ओके चला मी तुम्हाला शिकवतो” अबीर लगेच टण टण उड्या मारत गेला. युद्ध टळलं होतं. मी हुश्श केलं.
मेल करून झाला आणि बाजूला पाहिलं, अबीर आजोबांना (म्हणजे माझ्या बाबांना) ‘उनो’ हा खेळ शिकवत होता. आणि ते पण शांतपणे शिकून घेत होते. आयुष्यात पत्ते ह्या गोष्टीचा तिटकारा असलेला हा माणूस स्वतःच्या नातवाकडून पत्त्यांचा एक खेळ शांतपणे शिकून घेतोय. माझ्याशी खेळले होते का कधी पत्ते? मी आठवू लागलो आणि “कधीच नाही...” हे उत्तर आलं. क्रिकेट, फुटबॉल, लगोरी, विटीदांडू, गोट्या, लपंडाव यांपैकी काहीच नाही. मी काही काळ gymnastics ला जायचो. त्यांनीच आग्रह धरला होता. Badminton, चेस, कॅरम हे सगळं आणलं, शिकवलं त्यांनीच. पण मोकळा वेळ काढून आम्ही खेळतो आहोत असं कधी फार घडलं नाही. आम्ही खूप खूप खेळलो तो खेळ म्हणजे नाटकाचा. तो त्यांनीच शिकवला. नाटक म्हणजे हे, नाटक म्हणजे ते! नाटकाच्या समुद्रात त्यांनी मला उभं-आडवं पोहायला शिकवलं. आणि आता ते बसून ‘उनो’ शिकत आहेत.
अबीरच्या ह्या डिमांडकडे त्यांनी तसे एरव्ही कदाचित दुर्लक्ष केले असते. पण आताची सिच्युएशन थोडी वेगळी आहे. अबीरची आई शुटींगच्या निमित्ताने गेले फिफ्टी डेज सिल्व्हासामध्ये आहे. त्याला चुकुनही आईची कमतरता भासू नये ह्यासाठी आमची सगळ्यांची धावपळ सुरु असते.
सकाळी तो उठला की बराच वेळ त्याच्यासोबत लोळत बसतो. “काय लोळतोय गर्दभासारखा...!” असं आजोबा म्हणाले तरी ते बाबाला पण लागू होतं. मग आम्ही खळखळून हसतो. गर्दभ असण्याची जबाबदारी शेअर होते. गिल्ट म्हणून नाही. मी त्याला गेल्या वर्षीपासून हात धुवायला शिकवले आहे. आता ह्या वर्षी हात – पाय स्वच्छ कसे करायचे हे शिकवलं आहे. सध्या आंघोळीचे क्लासेस सुरु आहेत. आंघोळ करताना साबण कसा लावायचा? किती लावायचा हे क्लासेस offline सुरु आहेत. त्यातही पाणी कसं कमी वापरायचं हा कोर्स आजोबा घेतात. तो अभ्यासक्रम पण तसा कठीणच आहे. मग मी पण त्याच्यासोबत आंघोळीला बसतो. साबण माझ्यापण हातून सटकतो. दोघे एकमेकांना साबण लावतो, एकमेकांना पाणी घालतो. आणि शेवटी बादलीत उरलेलं पाणी डोक्यावरून घेताना दोघे वर बादलीकडे पाहतो आणि धबधब्यात न्हाऊन निघतो. कंटाळा आला तरी “चल आपण दोघे मज्जा मज्जा करू...” म्हटलं की तो आंघोळीला एका पायावर तयार होतो. शरीर स्वच्छ कसं करायचं? हे त्याला मी शिकवलं आहे. ते क्रेडीट माझं. कॉलर टाईट करण्यात मला काहीच गैर वाटणार नाही.
मी त्याच्यासोबत क्रिकेट – टेनिस खेळतो तेव्हा पूर्णपणे मनापासून खेळतो. काही वेळा बरेच जण फक्त batting करतात, मुलांनाच बॉल आणायला पळवतात. एकाच जागेवर उभे राहून खेळतात. झोपल्या झोपल्या बॉलिंग करतात, मी मात्र तसं करत नाही. मी पण त्याच्या इतकाच धावतो, कदाचित थोडा जास्तच. खेळताना धावावंच लागतं. त्याचा कंटाळा करून चालत नाही हे कळावं असा माझा उद्देश असतो. मी एक्साईट पण होतो. Match हरलो तर नाराज पण होतो. पण चिडत नाही. तो चिडला तर मला सांगता येतं... मी चिडलो होतो का? नाही ना? मग तो पण हार सोडून पुढची match अजून त्वेषाने खेळतो. खरेतर मी स्पोर्ट्स वगैरे खेळणारा असा धावगडी असा कधी नव्हतो, पण आता मी स्वतःला तसं थोडं बनवलं आहे. केवळ त्याच्यासाठी. आपले बाबा आपल्यासोबत फार खेळले नाहीत, ह्याचे तरी खेळू देत.
मी एकदा माझ्या आजीला विचारलं होतं, “बाबा लहान असताना कधी खेळलेच नाहीत का गं?” तर ती म्हणाली होती. “कुठे वेळ होता त्याला? हा मधला पडायचा. मोठे भाऊ शिक्षण सोडून नोकऱ्या करत होते. बाकीचे लहान. हा मला मदत करायचा. स्वयंपाक – घरकाम. मी भात शिजायला ठेवायचे. हा रस्त्यावर सापडलेले कुठले कुठले कागद आणायचा आणि चुलीजवळ वाचत बसायचा. वाचनाचा आणि स्वयंपाकाचा नाद त्याला. खेळणार कधी?” बाबा कच्चा लिंबू असणार असं म्हणत मी बाबांसोबत नकोच खेळायला म्हणत हा विषय तेव्हा सोडूनच द्यायचो.
अबीरच्या आईने त्याला टीव्ही टाईमची सवय करून दिली आहे, दुपारी ४ ते ५.३०. इतर वेळी फार हट्ट करत नाही. पण ही वेळ मात्र तो काय वाट्टेल ते झालं तरी सोडत नाही. ही आपली हक्काची वेळ आहे, हे त्याला पक्के ठाऊक आहे. आणि त्यावेळेला घरात टीव्ही सोडून बाकी कशाचाच आवाज करायचा नाही, हे आम्ही कटाक्षाने पाळतो. रात्री झोपताना फार मजा येते. बराच वेळ इकडून तिकडे करायचे. आजीच्या कुशीत थोडावेळ, मग माझ्या छाताडावर थोडावेळ, मग डोक्यावर पांघरून घेऊन “चल बाबा... चिकटून चिकटून झोपूया...” अशी मस्ती होते. झोपायच्या आधी आज त्यानं काय काय मजा केली हे मलाच त्याला सांगावं लागतं. मग त्याला आठवतं. नाहीतर लक्षात सगळं असलं तरी आठवायला कुणाला वेळ आहे? आजचा दिवस एकुणात भरपूर खेळण्यात – आनंदात गेला आहे. हे फिलिंग आलं तर तो गप्प झोपतो. तसं फिलिंग आलं नाही तर मात्र झोप लांबते.
अबीर तान्हा असल्यापासूनच कमी झोपतो. तान्हं बाळ बावीस तास झोपतं वगैरे त्यानं झूट ठरवलं आहे. एक दिवसाचा असताना पण तो १०-१२ तासच झोपायचा. कसलीतरी anxiety आहे म्हणून त्याला स्वतःचे ओठ दातात घट्ट धरून आणि बाजूला झोपणाऱ्याचा कान घट्ट पकडून झोपायची सवय आहे. कधी कधी आपल्या कानाचा चिवडा होतो. पण तो कान सोडत नाही. पण तोवर तो अर्धवट झोपेत असतो. मी त्याला कळवळून सांगतो. “अबीर, माझा कान खूप दुखतोय रे... कान सोडतोस माझा?” तेव्हा त्या अर्धोन्मीलित डोळ्यांनी तो आपल्याकडे पाहतो. आपल्या गळ्यात हात टाकून आपल्याला घट्ट जवळ ओढतो आणि माझ्या दंडावर डोकं ठेवून झोपून जातो. झोपला की आठ दहा तास चिंता नाही. तो झोपलाय ह्याची खात्री झाली की मी माझा दंड सोडवून घेतो आणि जाऊन कामाला बसतो.
हे सगळं झाल्यावर ‘आईची ऊब’ वगैरे कविकल्पना आहेत की काय? असं मला वाटतं. मला झोपायला आईच असेल आणि बाबा हा ऑप्शनच नसेल तर मी ‘आईची ऊब’ बद्दलच कविता करणार. ‘बापाचा बलदंड दंड’ ह्यावर ओळी खरडायला कोण रिकामं बसलंय? मला आठवतं, मी लहान असताना बाबांजवळ झोपायचो कधीतरी. बाबा दर शनिवारी रात्री घरी यायचे. तेव्हा ते औरंगाबाद – जालना प्रवास करून आलेले असायचे. आम्ही झोपेला आलेलो असायचो ते पटकन आमच्या जवळ आडवे व्हायचे. त्याच्या घामाचा मंद सुवास मला अजूनही सहज आठवून जातो कधीतरी. पण तो फक्त शनिवारी. रविवारी रात्री ते पुन्हा औरंगाबादला जायचे. मी पुन्हा आईची ऊब घेतच झोपायचो.
परवा एक किस्सा घडला. मी एका खूप महत्वाच्या कॉलमध्ये होतो. काहीतरी लिहून अर्जंट पाठवायचे होते. मी ते लिहित होतो. एक वाक्य सुचेना, शिवाय त्या पात्राला एक बिझिनेस द्यायचा होता. तो सापडेना. आणि अबीर मला काहीतरी सांगायला आला. त्याला सांगायचं होतं आणि मला काही लक्ष देता येईना. मी पाच मिनिटांनी ऐकतो असं सांगितलं तरी तो ऐकेना. आपल्या आयुष्यात काहीतरी फार महत्वाचं घडलेलं असताना आपल्याला इग्नोर केलं जातंय ह्याचा त्याला त्रास होऊ लागला. त्याने चिडचिड करायला सुरुवात केली. आजोबा आले, ते काहीतरी समजावू लागले, आजी आली तिनं सांगितलं पण तो ऐकत नव्हता. माझी पण चिडचिड होऊ लागली. मला परत परत फोन येत होते. एका मिनिटात कॉन्फरन्स कॉल करूया असा मेसेज आला. आता जर आपण हा कॉल अटेंड नाहीच केला तर? नाही नको... हे काम हातचं जाणार. असा माज दाखवणं बरं नाही. काय म्हणतील ते सगळे? माझ्याबद्दल काय मत होईल? मी असा नाहीये. पण वाटलं त्यांना की आहे असाच तर काय फरक पडणार आहे? पण मला नाही जमणार असं बोलायला. की मी असाच माजखोर आहे? तुसडा आहे? नाही नसेल. म्हणजे माहित नाही. हे सगळं चालू आहे आणि अबीरचं कुठे ऐकू आता? माझ्या कानात गुइं... वाजायला लागलं. पाठीत दुखायला लागलं. आता गोष्टी माझ्याही कंट्रोलच्या बाहेर होत्या तसा मी पण संतापलो. माझा स्वर तिखट होऊ लागला. (असं बऱ्याचवेळा घडतं आणि तेव्हा बाबापणाची मोठी परीक्षा येते, मी mostly नापास झालोय, हे कबूल करतो. त्यावेळी त्याची आईच कामी येते. तिला हे सगळं manage करता येतं.) शेवटी मी “नंतर ऐकतो ना रे...! बरं सांग काय झालं ते?” असं म्हणालो. त्याने पण एका वाक्यात काहीतरी सांगून टाकले. त्याचा पण मूड गेला होता. मला वाईट वाटायला लागायच्या आत फोन वाजला. कॉन्फरन्स कॉल आला होता. मी बोलू लागलो. अबीर त्याच्या कारशी खेळताना मला दिसत होता.
रात्र झाली. गाद्या घातल्या, झोपायची तयारी सुरु होती. आणि पाऊस आला. मी खिडक्या लावायला धावलो. एक खिडकी बंद होऊनही त्यातून पाणी येऊ लागलं. बाबा धावत आले. त्यांनी काहीतरी आयडीया काढून ते पाणी बंद केलं. “आपण तेव्हाच ही खिडकी बदलून टाकायला हवी होती...” मी कुरकुरलो. बाबा हसत पण थोड्या निराशेच्या सुरात म्हणाले... “हो... तेव्हा सगळ्याच खिडक्या बदलायला हव्या होत्या खरं तर. पण बजेट वाढलं असतं. तुझं – ताईचं लग्न पण होणार होतं, म्हटलं आता कुठं खर्च वाढवणार? पुढे कधी तरी बदल करू घरात तेव्हा बघू... पण ती वेळ काही आलीच नाही. आता काही नाही, ही अशी... बंद केली की नाही येत पाणी...” ते गेले.
मी जाऊन आडवा झालो. सकाळचं अबीरचं आणि आताचं बाबांचं माझ्या डोक्यात फिरत होतं. माझ्या लग्नाचं असं काय टेन्शन असणार होतं? का त्यांनी टेन्शन घेतलं असेल? लग्नाची हौस मौज करणारे तर आपण नव्हतोच. पण तरी ह्याला बोलाव त्याला बोलाव असं त्यांनीच ठरवलं. त्यांच्यासाठी ते करणं गरजेचं असेल. महत्वाचं असेल. आणि केलं नसतं तर लोकांना काय वाटेल? ह्याचं ओझं जास्त असणार. श्या! ते असायला नको होतं. आणि नसतंच तर?? काय झालं असतं? बाबांनी मला गोष्टी सांगितल्या असत्या, गाणी म्हटली असती, नाचले असते आणि मुख्य म्हणजे खेळले असते. मला एकदम गुदगुल्याच झाल्या. मी हसलो. आणि अबीरचा आवाज आला. “बाबा, फ्री फायर खेळायचं का?” ‘फ्री फायर’ म्हणजे ‘भारर्री व्हिडीओ गेम’ आहे. बंदूक घेऊन दोन सैनिक शत्रूच्या छावणीत घुसतात आणि लोकांना मारत सुटतात. मग आम्ही लपत छपत, गुडघ्यांवर चालत, सरपटत, रांगत घरभर फिरतो. तेल – पावडरीचे डबे उडवतो. आजीचे डोळ्यांचे drops उडवले की आम्हाला ‘वन मिलियन डॉलर’ मिळतात. मग आम्ही एकमेकांचा कान धरून झोपून जातो.
आता मला काही काम नव्हतं, जबाबदारी नव्हती. मग मी कितीही खेळू शकतो. 
अबीर झोपेला आला होता. थोपटलं. झोपला. 
मी उठून पलीकडे झोपलेल्या बाबांकडे पाहिलं. ते झोपले होते. झोपले तरी त्यांच्या कपाळावरच्या आठ्या मिटत नाहीत. त्यांना आताही काहीतरी काम आहे, जबाबदारी आहे.
“बाप का बाप होना जरुरी है क्या?” असा प्रश्न विचारत मी कपाळावर आठ्या घेऊन झोपून गेलो.


शार्दुल सराफ
नाट्य दिग्दर्शक, लेखक,अभिनेता

 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form