हॅप्पी वटपोर्णिमा... !

सहज गंमत म्हणून एक पोस्ट फेसबुकवर टाकली - वड पुजणाऱ्या बाया मनात काय विचार करत असतील?
बाई १. जन्मोजन्मी असाच साधा भोळा हवा.
बाई २. पुढच्या जन्मी नवा दे आणि जरा बरा दे.
बाई ३. पुढचे सहा जन्म कोणताही दे, पण हा नको.
बाई ४. पुढच्या जन्मी हा माठ बिलकुल नको.
बाई ५. बाईचा जन्मच नको पुढल्यावेळी.
बाई ६. नवराच नको कोणत्याच जन्मी...
ही यादी अजून कितीही वाढवा म्हटलं ... तशी अनेकांनी यादी वाढवत नेली. अनेकांनी उत्फुर्त आणि मिश्किल प्रतिक्रिया दिल्या...
'जो आहे त्याला पुर्नजन्म नको, दुसरीचे भोग तरी वाचतील!', 'याची देही याच डोळा पितृसत्ताक रीती आणि रूढी नष्ट होऊ दे', 'सात जन्मांचं टेन्शन नको याच जन्मात सात दे', 'लग्न संस्थाच नष्ट होऊदे', 'वड पुजणेच बंद होऊ दे', 'जरा ह्या जन्मात सात जमतात का बघा ना', 'पुढच्या जन्मी या नवऱ्याची बायको न होता नवरा होवू दे जरा उट्ट काढायची संधी मिळू दे', 'पुरूष वड कधी पुजणार?' अशी बरीच गंभीर आणि गमतीदार मतं आली.
'अगं बाई अरेच्च्या' या चित्रपटात वडपूजेचा प्रसंग फार गमतीदार रंगवला आहे. नटूनथटून नऊवारी नेसून साग्रसंगीत पूजा करणाऱ्या आणि वडाला फेऱ्या मारणाऱ्या बायका मनातल्या मनात काय विचार करतायत हे या चित्रपटाच्या नायकाला ऐकू येतं. "याच जन्मात जगणं नकोसं केलंय तर "पुढच्या जन्मी कशाला मागू याला?", "जरा म्हटलं आज माझ्यासोबत उपवास करा तर नाही ते पण जमत नाही यांना", "चांगलं त्या डॉक्टरचं स्थळ चालून आलं होतं, त्यालाच हो म्हणायला हवं होतं." अशा अर्थाची किती अन् काय काय स्वगते बायकांच्या मनात चाललेली असतात. संपूर्ण चित्रपटातच बायकांच्या मनातले विचार त्याला ऐकू येत राहातात. तो त्रस्त होतो. बायकांच्या बडबडीचा त्याला राग येतो, त्रास होतो. पण हे ऐकू येणं मात्र तो थांबवू शकत नाही. एक स्त्री मानसोपचार तज्ज्ञ त्याचे समुपदेशन करतात आणि स्त्रियांच्या मनात चाललेली घुसमट, तगमग, त्रागा, मनस्ताप याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी त्याला प्रदान करतात आणि हा नायक आपल्या आई, बहिण, आजी, बायको आणि इतर बायकांच्या मनातला कोंडमारा ओळखून त्यांच्या मनासारखं वागू पाहतो. अतिशय गमतीशीर आणि मार्मिक पध्दतीने स्त्रियांच्या जगण्याचा, तगमगीचा वेध घेणारा हा सिनेमा आहे. पण त्यांना समजून घेणारे नायक प्रत्यक्ष जीवनात फारच कमी आहेत. उलट स्त्रियांवर सत्ता प्रस्थापित करू पाहणारे, तिला पारंपारिक चौकटीतून बाहेर पडू न देणारे पुरुष आजही घरोघरी आहेत.
‘परिकथेतील राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशील का?' 'कही तो मिल जायेगा, मेरा बलमा', ' किसी दिन बनूंगी, मै राजा की रानी' अशी स्वप्न पहात मोठ्या होणाऱ्या मुली - शिक्षण, करियर, नोकरी यांपेक्षा 'लग्न' या गोष्टीला महत्त्व देऊन वाजत-गाजत नवऱ्याच्या घरी नांदायला जातात. आणि मग वर्षानुवर्षे अशी पातिव्रत्य, पुनर्जन्म, पावित्र्य, मांगल्य यात सार्थकता मानणारी व्रतवैकल्यं करत राहतात. कधी नटण्या-मुरडण्याची हौस म्हणून, तर हल्ली एक इव्हेन्ट म्हणूनदेखील अशा सणवार-व्रतांकडे पाहिलं जातं.
पूर्वी म्हणजे साधारण ऐंशी ते नव्वदच्या दशकात 'दिल्या घरी तू सुखी रहा' टाईपच्या मुलींची संख्या खूप होती. 'डोली चढके मे आई, कांधे पे जाऊंगी', असे म्हणत गप्प राहून सहनशीलतेचा कळस गाठणाऱ्या पोरी दर वटपौर्णिमेला नटून-थटून वडाभोवती दोरा गुंडाळायला जायच्या. मग दारू पिऊन किंवा दारू न पिता मारणारा, घराबाहेर काढणारा नवरा असो की गप्प राहून खेळी करणारा आई-वडिलांचा 'श्रावणबाळ' असो - 'मेरा पति मेरा देवता है' म्हणत बायका पुढचे सात जन्म त्यालाच मागण्यासाठी वडाभोवती फेर्‍या मारायच्या. मग त्या पुरुषाने दोन-दोन लग्नं केली तरी 'मै तुलसी तेरे आंगन की' म्हणत दोघीही त्याच्या दीर्घायुष्याची आणि पुढच्या जन्मी पुन्हा हाच नवरा मिळावा, यासाठी दुवा मागत राहायच्या. म्हणजे पुढच्या जन्मी परत हीच कहाणी कन्टीन्यू...
हिंदी सिनेमातलं 'करवा चौथ' असो वा मराठी सिनेमातलं 'वटपौर्णिमा' व्रत. एकीकडे आधुनिकीकरणामुळे मध्यमवर्गीय समाजात बोकाळलेला चंगळवाद आणि त्यांचे होणारे ग्राहकीकरण; तर दुसरीकडे व्रते व ते साजरे करण्याची पध्दत अशी विरोधाभासी परिस्थिती दिसत आहे. बॉलीवूडमधल्या दिग्दर्शकांनी 'डीडीएलजे', 'कभी खुशी कभी गम', 'हम दिल दे चुके सनम' अशा अनेक चित्रपटांमधून करवा चौथ प्रचंड लोकप्रिय केला. चित्रीकरणातील भव्यता, गाणी, पोषाख दागदागिने यांची सामान्य दर्शकांवर भुरळ पडत गेली. मग ड्रेसेस, साड्या, ज्वेलरी मार्केटिंगने बाजी मारली. मुंबईसारख्या महानगरापासून ते छोट्या शहरापर्यत मेहेंदि सर्विसेस, पूजा थाळी, मिठाई आणि फुले, ज्वेलर्सकडून तसेच टेलर आणि ब्युटी पार्लरकडून वेगवेगळी सूट मिळू लागली. बॉलिवूड तारका, सेलिब्रेटींनीही या कंपन्यांच्या वस्तू परिधान करुन इन्स्टाग्राम ट्विटरसारख्या सोशल मिडियावर विधीवत पूजेचे सेल्फी शेअर करत 'हॅप्पी करवा चौथ' केले. अशा कंपन्यांनी स्पॉनसर केलेल्या पार्ट्या, विविध स्पर्धा यांना उत्सवी रुप आले. हल्ली तर अमरावतीसारख्या छोट्या शहरातही अशा इव्हेंटला मिसेस अमरावती, बेस्ट मॉम, बेस्ट वाईफसारख्या सौंदर्य स्पर्धा होऊ लागल्यात आणि वारेमाप पैसा खर्च करत, घराघरातून संघर्ष करत साध्या भोळ्या 'सुहागनस्' त्यात नशीब आजमावू लागल्यायत. जागतिकीकरणाच्या काळात स्त्रीत्वाचा हा नवा अवतारच जणू. 
अशा झगमगटात अडकून मग सामान्य बायकाही 'सदा सुहागन' बनून मूर्खपणाचे ढोल वाजवत राहिल्या. आणि आपल्या येणार्‍या पिढीतही ही परंपरा रुजवत राहिल्या. बरं या बाया-आया सगळ्याच अशिक्षित होत्या असं नाही, शाळेत गणित, विज्ञान शिकविणाऱ्या शिक्षिका, डॉक्टर, इंजिनिअर असलेल्या बायासुद्धा आपल्या विवेकाचं गाठोडं दूर बांधून ठेवून, 'मै तुम्हरी दासी, जनम की प्यासी, तुम्ही हो मेरा सिंगार साजन!' असे म्हणत नटूनथटून वडपूजेला जाऊ लागल्या.
वीस पंचवीस वर्षापूर्वी वडाचे चित्र काढून किंवा मुलांकडून काढून घेऊन व्रत पूर्ण करणाऱ्या भोळसट बाया होत्या. तर, शहरी भागात वडाच्या झाडाची फांदी तोडून आणून किंवा विकत आणून पर्यावरण वगैरे कल्पना धादांत खोट्या ठरवत पूजा करणाऱ्या माता-भगिनी होत्या आणि अजूनही आहेत. वर्षानुवर्षे पुरुषसत्ताक विचारांनी स्त्रीचे स्वातंत्र्य बांधून टाकून तिला वेगवेगळ्या धार्मिक, उदात्त, पवित्र संकल्पनांमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. तिची सृजनशक्ती फसव्या प्रतिमेत अडकवून तिला कायम अबला बनवण्याचा प्रयत्न केला गेला. स्त्रीने परंपरेला सोडू नये आणि आधुनिकतेला अंगिकारू नये, यासाठी ही पुरूषसत्तेची आत्यंतिक धडपड होती आणि त्यात ते यशस्वीही झाले. सावित्रीबाई फुले, जोतिबा फुले यांनी खुल्या केलेल्या स्त्री शिक्षणाच्या वाटेवरून चालताना मात्र प्रत्यक्ष स्त्रीने आपल्या विवेकाचा वापर न करता स्वतःची बुद्धी गहाण टाकून अशा गुलामीतच राहणे पसंत केले.
व्रतवैकल्ये केल्याने कोणी दीर्घायुषी होईल का? पुढच्या जन्मात हवी ती व्यक्ती अशी मागून मिळते का? मुळात पुनर्जन्म वगैरे कल्पनांवर आजची सुशिक्षित मुलगी विश्वास ठेवते हेच हास्यास्पद आहे. वड ऑक्सिजन देतो म्हणून किंवा रोजच्या कामातून बाहेर पडण्याची संधी म्हणून शिकल्यासवरल्या, नोकरी करणाऱ्या मुलीसुद्धा वाहिन्यांवरच्या नेभळट नायिके सारख्या नटूनथटून, भरपूर मेकअप करुन सोशल मीडियावर “हॅप्पी वटपोर्णिमा” म्हणत लाईक आणि कमेंटची वाट बघत दिसतील तेव्हा फार आश्चर्य वाटून घ्यायला नको !

सारिका उबाळे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form