तराजू

ट्रेन आणि बसने प्रवास करताना मी शक्यतो हाफ शर्ट घालणे टाळतो कारण बाजूला बसलेल्या अनोळखी किंवा जवळीक नसलेल्या लोकांचा स्पर्श माझ्या शरीरास झाल्यास मला अस्वस्थता जाणवते. कुमारवयीन झाल्यापासून माझा स्वभाव जास्तच लाजरा बुजरा झाला आहे. त्यात कोणी माझ्याकडे टक लावून पाहिलेलं, मला स्पर्श केलेलं, विनाकारण चर्चा केलेलं मला सहन होत नाही.

तोही एक प्रवासाचा दिवस होता. एक्सप्रेसमध्ये तीन लोकांचे सीट एकमेकांना लागून होते. एक जाड अंगकाठी असलेला पुरुष आणि माझी बहिण ह्या दोघांच्या मध्ये मी हाफ टी शर्ट घालून बसलेलो होतो. माझ्या बहिणीने फुल बाह्यांचा कुर्ता आणि वरून स्टोल घेतलेला होता. भरदार अंग असल्याने तो पुरुष अर्धा माझ्या सीटवर येऊन त्याचा दंड माझ्या दंडाला स्पर्शत होता. जे की फारच सामान्य आहे पण मला ते आवडत नव्हते. अर्थातच तो समलैंगिक नाही हे अवगत असलेल्या ज्ञानामुळे मला एव्हाना कळले होते परंतु मला ते स्पर्श नकोसे होत होते. माझी अस्वस्थता वाढू लागली. ताईकडून तो स्कार्फ घेऊन स्वतःच्या खांद्याभोवती गुंडाळून घ्यावा असं मला वाटू लागलं. पण तो लेडीज स्कार्फ.. लोकं काय म्हणतील? मी तिला काय सांगू? की ह्या पुरुषाचा स्पर्श मला सहन होत नाहीये आणि मग ती मोठमोठ्याने हसेल.. ती काय विचार करेल?? पण नाही.. मला काहीतरी करणे भाग होते.. मी तिच्या कानाजवळ झुकून कचरतच तिला म्हणालो... 

"मला हे ना.. म्हणजे असं हाफ शर्ट असेल तर बाजूच्या व्यक्तीचा स्पर्श सहन नाही होत अंगाला.. हे..."

"मग मी बसू का तिथे?? तू ह्या बाजूला बस.. मी फुल हातांचा कुर्ता घातलाय आणि माझ्याकडे स्कार्फ पण आहे.." 
ती मधेच माझं बोलणं तोडत म्हणाली आणि उठून उभीही राहिली.. मी लगेच तिच्या जागेवर सरकलो आणि ती मधल्या सीटवर बसली. ती तिथे बसताच तो पसरलेला पुरुष त्याच्या सीटवर व्यवस्थित अंग चोरून बसला. 
माझे विचारचक्र चालू झाले.. 'हिला काहीच वाटलं नसेल?? ही मला असंही म्हणाली नाही की ‘तू मुलासारखा मुलगा आणि बहिणीला त्या पुरुषाच्या बाजूला बसवतोस’?? हिने थोडाही लिंगभेद केला नाही?? आणि तेव्हा मला जाणवलं की इथे लिंगभेद करणं गरजेचंच नाही... इथेच नाही पण कुठेच लिंगभेद करणं गरजेचं नाही. हा लिंगभेद म्हणजे ज्याला ज्यात स्त्रियांना दुय्यम आणि कमजोर मानले जाते तो नाही... तर जिथे पुरुषांनी फारच मजबूत आणि कणखर असणं आवश्यक मानलं जातं तो लिंगभेद ! 
ह्याचा पाया पालकांपासून रोवला जातो. आपण नेहमी पाहतो की मुलांना जितकी मोकळीक दिली जाते तेवढी मुलींना मिळत नाही. काही संधी असतील तर मुलांना त्यात प्राधान्य दिले जाते...पण कधीकधी काही गोष्टी मुलांवर लादल्या जातात. मुलगा आहेस, तू बाहेर गेलंच पाहिजेस, तू मेहंदी, रांगोळी ह्यासारख्या कलांपासून दूर राहा, मुलगा आहेस तर रडायचं नाही, तुला तर गाडी चालवता आलीच पाहिजे, दहा मिनिटांच्या आत अंघोळ झाली पाहिजे, क्रिकेट खेळता आलं पाहिजे, बाहेर रात्री एकटं घाबरायचं नाही.. कारण मुलांचा बलात्कार होत नाही!!!
मी एक असा मुलगा आहे की जो स्वतःची लैंगिकता स्वीकारताना खुप एकटा होता. मला विभिन्न मानसिक आजार जडले आहेत. पण मुलगा असल्याने मानसिकरित्या दुर्बल असण्यालाही मनाई आहे. जेव्हा मी मानवी वस्तीपासून दूर असलेल्या एमआयडीसीमध्ये अपरात्री कामासाठी जायचो तेव्हा दुचाकींवरून येजा करणारे लोकं मला ऑफिसपर्यंत सोडून देत. परंतु काहींनी धमकावून मोबाईल पळवण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी मलाच अंधाऱ्या वळणावर पळवून नेण्याचा प्रयत्न केला. अर्थातच ह्या घटनांचा परिणाम म्हणून मला सुनसान रस्त्यांवरून चालताना अचानक जवळ एखादी दुचाकी आल्यास धडकी भरू लागत असे. प्रयोग म्हणून ऑफिसमध्ये माझी ही भीती सांगितली असता - 'काय घाबरतो?? तू मुलगी आहेस का? तुझा काय रेप होणार आहे??' 'तुझ्याच मागे असे लिंगपिसाट माणसं का लागतात?? तुझं चालणं बोलणं जरा मुलांसारखं सुधार...' असं ऐकावं लागलं.
मी मुलींसारखा वागतो.. पण मी मुलगा आहे.. मला मुलं आवडतात.. पण मी मुलगा आहे.. माझ्यात कोणी स्त्री दडलेली नाही तर एक शृंगार आवडणारी, पुरुषांचे आकर्षण असणारी व्यक्ती आहे जी सुद्धा पुरुषच आहे. मी हिजडा नाही.. मी स्त्री नाही.. मी पुरुष आहे.. पुरुष आहे मी!! मी पुरुष असून स्त्रीसारखा वागतो, त्याने काही फरक पडत नाही ! खरंतर मी पुरुष नसेल तरीही काहीच फरक पडत नाही!!!
हा कसला अहंकार?? स्त्री किंवा हिजडा असण्यात वाईट काय?? ती ही मनुष्याचीच लिंग आहेत. कोणी माझ्या पुरुषत्वावर बोट ठेवतं तेव्हा मला इतका का संताप येतो?? मला कोणी त्याबद्दल चिडवलं की राग का येतो????
समाजाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे मुलगा नाही वागला की तो मुलगाच नाही... तो हिजडा!! अरे असू दे ना हिजडा.. त्यात गैर काय?? एखाद्याच्या लिंगावरून त्याला हिणवले कसे जाऊ शकते?? केवळ स्त्री आणि पुरुष तुमच्या सडलेल्या विचारांचा वंश पुढे चालवू शकतात म्हणून ते लाडाचे? त्यापैकीही स्त्री स्वतःचा नाही तर दुसऱ्याचा वंश वाढवणार म्हणून ती दुय्यम.. पुरुष प्रथम.. हिजडा ते करू शकत नाही म्हणून त्याला थेट उपेक्षित घटक म्हणून घोषित केले आणि निर्दयीपणे दूर फेकून देण्यात आले. अरे किती हा स्वार्थीपणा ह्या मनुष्याचा??
आपण आज जागोजागी पाहतो की स्त्रियांवर युगानुयुगे होणाऱ्या अत्याचारांना वाचा फुटू लागल्या आहेत. स्त्रियांच्या समान हक्कांसाठी अनेक ठिकाणी चळवळी पाहायला मिळतात. काही ठिकाणी फेमिनिजमच्या नावाखाली नको त्या गोष्टी केल्या जातात आणि पुरुषांना त्रास दिला जातो ह्याला फेक फेमिनिजम असे म्हणतात. स्त्रियांकडून पुरुषांवर केले जाणारे आरोप नेहमीच खरे असतील हे गरजेचं नाही हे सिद्ध करण्याच्या मागे लागले. परंतु ह्याच समुदयापैकी एखाद्या पुरुषाने स्वतःवर बलात्कार झाल्याचे सांगितले तर त्याला मदत करण्याऐवजी त्याच्याकडे कुतूहलाने बघितले जाते. आणि मग माजतो एकच हस्यकल्लोळ!! का?? कारण समलैंगिक आणि गर्लिश वागणाऱ्या मुलांना पुरुष म्हणून ओळखलेच जात नाही... तर अश्या लोकांसाठी लढणं लांबच राहील. फेमिनिजम आणि मेनिनिजमचे युद्ध नेहमीच पाहायला मिळते. सत्यमेव जयते ह्या मालिकेत कमला भसिन ह्यांनी सांगितलं की "फेमिनिजमच्या विरुद्ध मेनिजम कधीच नसते. तर ह्या दोघांच्याही विरुद्ध असते ती म्हणजे समानता."
जोपर्यंत पुरुषांना जे हक्क आहेत ते महिलांनाही मिळतील तेव्हा किंवा पुरुष जी कामं करतात ती स्त्रियांनी केल्यावर तिच्याकडे जेव्हा घृणेने पाहिले जाणार नाही तेव्हा समानता येईल असे बऱ्याच लोकांना वाटते. जे की काही अंशी खरे आहे! परंतु, खरी समानता ही केवळ स्त्रियांना सशक्त केल्याने नाही येणार. जेव्हा स्त्रियांच्या माथी मारून ठेवलेली कामं, कृती, छंद, पेहराव हे सर्व पुरुषांनीही केली तरी ते खुल्या मनाने स्वीकारले जाईल, तेव्हा येईल!!
एखादी व्यक्ती चांगली की वाईट हे तिच्या लिंगावरून न ठरवता ती काय करत आहे ह्यावरून ठरायला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, अरेरावी करणे, शिव्या देणे अशा सर्व गोष्टी कोणीही केल्या तरी त्या वाईटच समजल्या गेल्या पाहिजेत! एक पुरुष करत आहे म्हणून त्याने काही फरक पडत नाही; मात्र एक स्त्री करत असल्यास तुमच्या भुवया वर जात असतील तर तुम्हाला इलाजाची गरज आहे. अगदी तसेच घरकाम, कलाकुसर ह्या चांगल्या गोष्टी वाटत असतील तर त्या कोणत्याही मनुष्याने केल्यास त्या चांगल्याच म्हणायला कचरू नये! मनुष्यात कोणते लिंग कशावरून श्रेष्ठ हे कोणी ठरवलं ? कोणी बांधला हा अवाढव्य तराजू??!! तोडा त्याला..!! कठीण आहे? अशक्य तर नाही!! माणसाने स्वतःला ह्या दोन लिंगांपुरते सीमित करून घेतले आहे. पण प्रत्यक्षात मात्र इतरही अनेक प्रकारची लिंग अस्तित्वात आहेत !! कोणी व्यक्ती एका विशिष्ट लिंगाचा आहे म्हणून तो हे किंवा ते करेलच ह्या विचारांना कुलूप ठोकूयात... तराजूच्या पारड्यातून उतरून जमिनीवर येऊयात!! आणि समानतेने जगुयात!!


 लेखकाला स्वत:चे नाव जाहीर करायची इच्छा नाही.  

 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form