लेखाच्या पूर्वार्धात स्त्रियांच्या जगण्यावर असलेल्या बंधनांचा त्यांच्या भाषेवर झालेला परिणाम लेखिकेने मांडला आहे. आता उत्तरार्धात स्त्रियांच्या भाषेची आणखी काही वैशिष्ट्ये समजून घेऊया.
पूर्वार्ध वाचण्यासाठी - https://punhastriuvach.blogspot.com/2021/04/blog-post_16.html
स्त्रियांच्या वागण्यातला गूढपणा
स्त्रियांच्या बोलण्याचा वाच्च्यार्थ आणि लक्ष्यार्थ विविध प्रसंगात वेगळा असतो असेही दिसून येते. समोरची स्त्री जे बोललीच नाही त्यावरून त्या स्त्रीच्या मनाचा अंदाज घेणे, लेकी बोले सुने लागे प्रमाणे बोलणे, एकमेकींना हसत हसत टोमणे मारणे. स्त्रिया एखादी गोष्ट नको म्हणत असतील तर त्याचा अर्थ हो असा असणे. अगदी माहेराहून साडी किंवा नातेवाइकांकडून भेटवस्तू घेतांना बायका नाही नाही नको म्हणत असतात याचा अर्थ त्यांना ती वस्तू नको असते असा नसतो. पण एखादी गोष्ट वस्तू लगेच स्विकारायचं नाही, पट्कन घ्यायचं नाहि.हे त्यांना परंपरेनं शिकवलेलं असतं.म्हणून त्यांच्य होकारात नकार आणि होकारात नकार असु शकतो.मनातला संभ्रम,संकोच लज्जा यामुळे त्यांच्या मनातली नेमकी भावना कळू शकत नसल्याने त्यांचे वागणे गूढ आहे असे वाटते. उदा. जेव्हा
एखादी बाई आपल्या नवऱ्याला सांगते की वीस-पंचवीस रुपयाचे खेळणं घेऊन या म्हणजे जास्त महाग आणू नका असा त्याचा अर्थ.तिथे वीस पंचवीस म्हणजे अगदी तेवढेच नाही.
स्त्रियांची समृद्ध भाषा
अय्या ! इश्श ! अगंबाई ! असे उद्गार फक्त स्त्रियांच्या तोंडी असतात. पुरुषांच्या भाषेत सतत अधिकार गाजवण्याचा भाव डोकावतो. त्यामुळे आक्रमक भीडभाड न ठेवणारी शिव्या देणारी भाषा असं पुरुषांच्या भाषेचे वैशिष्ट्य जाणवतं याला कारण पुन्हा सामाजिक संस्कार किंवा सामाजिक संकेत असं आहे. याउलट भरपूर म्हणी,वाक्प्रचार,अनेक किस्से घटना,गोष्टी,अनुभव आठवणी आसतात त्यामुळे स्त्रियांची भाषा समृद्ध आहे असं लक्षात येतं.
स्त्रियांच्या बोलण्यात सहसा प्रादेशिक हेल अधिक असलेले दिसून येतात. जसे नांदेड जिल्ह्यातील किनवट व परिसरातील भागातल्या भाषेवर तेलुगु भाषेचा प्रभाव असलेला दिसून येतो ‘अय्यो!आब्बबा!अय्यो पापबिचारी!’ अशा उद्गारवाचक शब्दांचा वापर असतो. तसं नाही म्हणण्याऐवजी ‘अं अं’ एवढेच नकारात्मक उत्तर तिथल्या स्त्रियांच्या बोलण्यात दिसून येते. तर लातूरकडील भाषेवर कन्नड चा प्रभाव असलेला दिसून येतो 'अगं अगं अगं तुझा मुडदा बशिवला न्हीवून' असा कानडी हेल दिसतो. हरियाणा छत्तिसगड मध्यप्रदेश अशा वेगवेगळ्या प्रदेशातून अन्य ठिकाणी रहायला आलेल्या कुटुंबातील स्त्रियांची भाषा जाणिवपुर्वक तशीच टिकून असलेली दिसते. यामागे स्त्रियांचं कुटुंबातुन बाहेर न जाणं,एकमेकींशी चट्कन मैत्री होणं या गोष्टी पण कारणीभूत असतात. स्त्रियांची भाषा ही जात्याच मायाळू हळवी प्रेमळ काळजीची असते. असंही लक्षात येतं.याला कारण पुन्हा संस्कृती ममत्व मातृत्व अशा गोष्टी कारणीभूत ठरतात. नांदेडच्या आसपास असलेल्य भागात 'बरी तर हाइस की माय? कवा आलीस? जेवलीस माय?' -अशी मवाळ वाक्य बायकांच्या तोंडी असतात. या बायकांना भेटताक्षणी अगदी फारच जीवाभावाचं माणूस भेटल्याचा आनंद होतो. शेवटी प्रेम, माया, आत्मियता ही बोलणाऱ्याच्या भाषेतूनच व्यक्त होत असते.
स्त्रियांची भाषा कुजबुजणारी मनातली गुपितं सांगणारी अशी असते.
साधारणतः जवळपास सर्वच घरांमध्ये कोणत्या न कोणत्या प्रकारे बायकांची घुसमट होत असते. प्रत्येकीचे प्रश्न वेगवेगळे असतील परंतु प्रत्येक स्त्रीने आपल्या आयुष्यात कधी न कधी मानसिक घुसमट सोसलेली असते. घरात कुटुंबात समाजात सार्वजनिक ठिकाणी कामाच्या ठिकाणी कुठे ना कुठे ती शोषणाची शिकार झालेली असते. तरीसुद्धा वरील सर्व ठिकाणी मात्र ती आपल्या मनात चाललेली घुसमट जाहीर करू शकत नाही अनेकदा त्याची वाच्यता करू शकत नाही. तिच्या शारीरिक समस्या आजार मासिक पाळीच्या तक्रारी अडचणीबद्दल सुद्धा ती मोठ्याने बोलू शकत नाही. पुरुष सहकारी, कुटुंबातले पुरुष यांच्यासमोर या गोष्टींची चर्चा करू शकत नाही. या सगळ्यांमध्ये मग स्त्रियांची आपापसात कुजबूज वाढते. काही नाजूक गोष्टींवर स्त्रिया अतिशय हळू आवाजात आजूबाजूला कोणी ऐकणार नाही याची दक्षता घेत कुजबुजत राहतात मी अशा अनेक बायकांना पाहिलेलं आहे की त्यांचं बोलणं फक्त आणि फक्त तिला आणि ज्या समोरच्या स्त्रीला सांगायचं आहे तिलाच ऐकू येतं; इतका तिचा आवाज हळूवार असतो. ऐकणारी स्त्रीसुद्धा जिवाचा कान करून ते ऐकत असते त्यांच्या बाजूला असणार्या तिसऱ्या व्यक्तीला जवळ असूनही त्यांच्या बोलण्याचा अंदाज येत नाही. अनेकदा स्त्रियांच्या काही लैंगिक समस्या असतात, गरजासुद्धा असतात, जोडीदारा विषयीच्या तक्रारी असतात. कुटुंबातल्या कुटुंबात होणारं लैंगिक शोषण असतं; तसंच परित्यक्ता, विधवा, अविवाहित बायकांच्या शारीरिक गरजा असतात. त्या पूर्ण होण्याची कुठलीही व्यवस्था, आपल्याकडे असणाऱ्या पितृसत्ताक समाजात अस्तित्वात नाही. याविषयी समाजात त्यांना कुठेही न्याय मिळत नाही. अशा अनेक गोष्टी स्त्रिया एकमेकांजवळ कुजबुजत असतात, व्यक्त करत असतात,आपल्या मनातली गुपितं खोलत असतात. एकमेकींच्या केसांना तेल लावून देणे, विंचरुन देणे, वेणी घालून देणे, गुंता काढून देणे एकमेकींच्या पाठी घासून देणे अशा नित्यकर्मातून ही स्त्रिया वर्षानुवर्षे एकमेकींच्या मनातले गुपित एकमेकींजवळ उकलत राहतात.
खरंतर पुरुषांच्या दुनियेत सर्व स्त्रियांना घरात-समाजात सगळीकडेच दुय्यम दर्जा राहिलेला आहे त्यामुळे स्त्रियांना होणारे कष्ट, मेहनत, सासरी होणारा छळ, मारहाण, मानसिक कुचंबणा जवळपास सगळ्याच जणी सोसत असतात. तरी त्यातल्या त्यात जरा बर्या स्थितीत असलेली एक स्त्री आपल्यापेक्षा जास्त त्रासात असलेल्या स्त्रीची मदत करते, तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करते. म्हणूनच माहेरी येणाऱ्या स्त्रीला न्हाऊ माखू घालून तिचे दुःख समजून घेणे तिला साडी-चोळी घेणे ही कामे उत्साहाने करत असते. म्हणूनच स्त्रियांची भाषा ही समजूतीची, मदतीची मवाळ अशी असते. एकमेकींच्या कामात मदत करणे, एकमेकींना शेवया-पापड-कुरडया करू लागणे अशी कामे पूर्वी स्त्रिया स्वतःच्या घरचं काम समजून करायच्या आणि त्यानिमित्ताने आपापली दुःख एकमेकींजवळ मोकळी करायच्या. अगदी नडलेल्या गर्भारणीला सुईण आणण्यापासून ते बाळंतपण होऊन बाळबाळंतिणीला आंघोळ घालून निश्चिंत होईपर्यंत सोडून जायच्या नाहीत.
स्त्रियांच्या भाषेत एक प्रकारचा उदारपणा असतो. आपल्याजवळ जे आहे ते इतरांसोबत वाटून घेण्याची भावना असते. इतरांच्या गरजेला कामी येण्याची भावना असते. पूर्वी स्त्रिया नवीन साडी आणली की स्वतः नेसायच्या नाहीत तर आपल्या जवळच्या दुसऱ्या स्त्रीला किंवा अगदी शेजारणीला सुद्धा घडी मोडायला नवीन साडी द्यायच्या. 'मला तर काय आता नेसायचीच आहे आधी तू नेसून घडी मोड', असे औदार्य असायचे त्यात. पुरुषांमध्ये असली देवाण-घेवाण चालल्याचं पाहण्यात नाही. एखादा सोन्याचा दागिना केला तरी तो घरातल्या दुसर्या स्त्रीच्या गळ्यात घालून पाहतात बायका. लग्नसमारंभासाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी सोन्याचे दागिने बाहेरगावी सुद्धा घेऊन जाण्यासाठी देतात बायका. अजूनही मुली बायकांमध्ये मैत्रिणीची साडी किंवा ड्रेस हक्काने मागणे देणे घेणे या गोष्टी सर्रास चालतात. केवळ निखळ आनंद, हौस यापलीकडे या देवाणघेवाणीत फार काही चालत असावं असं वाटत नाही. एखादीने साडी मागितली तरी 'घे ना मग त्यात काय एवढं? तु नेसलीस तर फाटणार थोडीच आहे?’ अशी मनमोकळी भाषा असते त्यांच्यात. फक्त कपडे दागिनेच नाही तर इतर जीवनावश्यक गोष्टींची ही देवाण-घेवाण स्त्रिया खूपच सहजपणे करतात. अगदी तिखट-मीठ विरजनाच्या दह्यापासून ते गहूतांदूळ, तुपसाखरेपर्यंत जिनसा देखील स्त्रिया एकमेकींना उसन्या देऊघेऊ शकतात. छोट्या-मोठ्या कसल्याही अडचणी फार खळखळ न करता भागवत राहतात. वेळ पडली तर आपल्या जवळची साठवलेली रक्कम अडीनडीला दुसऱ्यांना द्यायलाही तयार असतात. त्या स्त्रियांच्या या आर्थिक देवाण-घेवाणीने कित्येक वेळा तब्येतीच्या तक्रारी ते मोठी कामे पार पडलेली आपल्या पाहण्यात असतात. एखाद्याला आयुष्यभर लक्षात राहावी अशा मदती सुद्धा खुल्या मनाने स्त्रिया करत असतात.
स्त्रियांची भाषा भयाची, श्रद्धेची असते.
जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सतत पुरुषी सत्तेच्या दडपणाखाली राहिलेल्या स्त्रियांची भाषा ही कधीकधी भयाची, दहशतीची बनते असेही दिसून येते. लहानपणी वडील, भाऊ, तरुणपणी नवरा, म्हातारपणी मुलगा असं आयुष्यभर कुणाच्यातरी आधाराने जगत असणाऱ्या स्त्रियांच्या मनात पुरुषी सत्तेचा एक प्रकारचा धाक निर्माण झालेला दिसतो. त्यातून बाहेर पडणं त्यांना शक्य होत नाही आणि कित्येक वेळा त्या तसा प्रयत्नही करताना दिसत नाहीत. अशा वेळी बहुतांशी स्त्रिया ह्या घरातच किंवा एका सुरक्षित चक्रात राहणे पसंत करतात. बऱ्याच वेळा स्वतःच्या आयुष्याचे मुलांच्या बाबतीतले महत्त्वाचे निर्णयही त्या घेऊ शकत नाहीत. दरवेळी कुठल्यातरी पुरुषावर अवलंबून राहण्याची त्यांना सवय लागते. त्यामुळे त्यांचे अंतर्मन मात्र भयभीत झालेलं असतं. काहीतरी वाईट घडेल का, अशी मनात भीती सतत डोकावत राहते. त्यातूनच मग जवळपास ९० टक्के स्त्रिया देवभोळ्या, अंधश्रद्धाळू बनत जातात. देव-धर्म, कर्म-कांड, उपास-तापास, सण-वार या पारंपारिक चक्रात अडकत जातात. पितृसत्ताक व्यवस्थेला हे हवंच असतं! मग एखादी गोष्ट अमूक पारंपारिक पद्धतीने झालीच पाहिजे, आमच्या आईचा असा आग्रहच आहे, बायकोला हे चालणारच नाही -अशा सबबी आडून रितिरिवाज बिनबोभाट चालत राहतात. भुताखेतांचे वेताळाचे कुलदेवतांचे प्रकोप होऊ नयेत अशा भयाने स्त्रिया चिंतेत असतात व तशीच भाषा बोलत राहतात. पुढच्या पिढीतही हीच श्रद्धा भय दहशत झिरपवत राहतात.
काळानुसार आता स्त्रियांची भाषा बदलते आहे. लेखिका आशा बगे, सानिया, मेघना पेठे, गौरी देशपांडे, उर्मिला पवार, प्रिया तेंडूलकर, कविता महाजन, प्रज्ञा दया पवार, शिल्पा कांबळे, कल्पना दुधाळ, सुनिता झाडे, सुनिता डागा, योगिनी राऊळ, अशी बरीच नावं घेता येतील. स्त्रिया गद्द्यपद्य ललित लेखनातून निर्भिडपणे व्यक्त होऊ पाहताहेत. खरंतर व्यवस्थेला स्त्रियांच्या व्यक्त होण्याची, बोलण्याची भीती वाटते आहे, सत्ता संपुष्टात येण्याची भीती वाटते आहे. कदाचित म्हणूनच स्त्रियांची भाषा अधिकाधिक बंडखोर होते आहे. परंतु स्त्रिया जेवढ्या मोकळेपणाने बोलतात, तेवढ्या अजूनही लेखनातून मोकळ्या होत नाहीत - असंही एकीकडे जाणवत राहतं. अगदीच विद्रोही, रोखठोक किंवा अगदीच मिळमिळीत, तोचतोपणा असलेले लिखाणही आज दिसून येतं. कदाचित रूढीपरंपरा, व्यक्त होण्याच्या मर्यादा - याचा परिणाम त्यांच्या लेखनावर अजूनही होत असावा, असं वाटतं. स्त्रियांच्या लेखनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण, लेखनातून खाजगी जीवनाची चाचपणी केली जाणे यामुळे स्त्रियांच्या लेखनात म्हणावा तसा मोकळेपणा येत नसावा. तरीही स्त्रियांची भाषा सुंदर आहे असं वाटतं. फक्त व्यवस्थेने लादलेली बंधन सैल व्हायला हवीत. एकूणच स्त्रियांच्या काय किंवा पुरुषांच्या काय जगण्यावरील ताण हलके व्हावेत, जातवर्गवर्णसत्ता यातून भाषेनेही मोकळा श्वास घ्यावा. ती अधिकाधिक सुंदर व समृद्ध व्हावी. नव्या पिढीने ज्ञानाची, अभ्यासाची, विद्वेष विरहित, मुक्तीची एक नवी भाषा शोधावी अशी अपेक्षा इथे व्यक्त करावीशी वाटते.
संदर्भ –
भाषा,समाज आणि संस्कृती (सोनाली देशपांडे गुजर - शब्दालय प्रकाशन)
बहिणाबाईची गाणी (सुचित्रा प्रकाशन)