गंदी बात

“ABCD पढ ली बहोत, अच्छी बाते कर ली बहोत, अब करूंगा तेरे साथ – गंदी बात, गंदी बात!” असं हक्काने सांगणारा शाहिद कपूर आठवतोय का? आणि ‘डिकेबोस’ला धावायला सांगणारा इम्रान खान पण आठवत असेल ना? आणि ‘विल यू बी माय छ्म्मकछल्लो?’ अशी प्रेमळ विचारपूस करणाऱ्या शाहरुखला नाही विसरलात ना? ही गाणी त्यातल्या अपशब्दांच्या म्हणजेच शिव्यांच्या वापरामुळे गाजली होती. सेन्सॉर बोर्डाने सिनेमातल्या संवादातल्या शिव्यांच्या जागी जरी ‘बीप’ करायला लावलं तरी गाण्यांमध्ये मात्र त्यांच्या नाकावर टिच्चून अनेक शिव्यांचा वापर केला गेलाय आणि ती गाणी गाजली देखील आहेत. म्हणजे प्रेक्षकांना देखील त्या शिव्या COOL वाटल्या असणार! आता इंटरनेटवर दिसणाऱ्या वेबसिरीजला तर कसल्या सेन्सॉरशिपचं सुद्धा बंधन नसतं. त्यामुळे त्यात तर शिव्यांचा मुबलक वापर केला जातो आणि त्यावर प्रेक्षकही फारसा आक्षेप घेत नाहीत. निवडणुकीच्या काळात राजकीय नेते भाषणातून प्रतिपक्षावर अगदी हसतहसत अपशब्दांचे वार करतात. तरुण वयात अनेकजण सहज, गंमत म्हणून किंवा थ्रिलसाठी किंवा कधीकधी फक्त दोस्ती दाखवण्यासाठी शिव्या देत असले तरी अजूनही पालक आपल्या मुलांना ‘शिव्या देऊ नये’ असंच शिकवतात. म्हणजे अजूनतरी शिव्या देण्याला – गंदीबात – मानलं जातं आहे.

पण गेल्या काही वर्षांपासून अपशब्दांच्या वापराबद्दल जे सामाजिक संशोधन झालं आहे त्यातून असे निष्कर्ष निघाले आहेत की माणसाच्या निरोगी जगण्यासाठी शिव्या आवश्यक आहेत. अपशब्द वापरताना एंडॉरफीन संप्रेरकांचा स्त्राव होतो. त्यांना Feel Good रसायने असंही म्हणतात. तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी शिव्या किंवा अपशब्द वापरल्याने माणसाचा तणाव कमी होतो, वेदनेपासून सुटका मिळाल्यासारखं वाटतं, हताश होण्याऐवजी परिस्थितीवर ताबा मिळवण्याचा हुरूप येतो आणि काही अंशी रक्तदाब स्थिरावण्यासाठी मदत होते – असं काही मानसोपचार तज्ञांचं निरीक्षण आहे. शिव्या घालून भावनांचा निचरा करून टाकला तर शारीरिक हिंसा टाळता येऊ शकते अशीही शक्यता काहीजण सांगतात. 
म्हणून अपशब्द वापरणे हा एक मनोवैज्ञानिक उपचारसुद्धा आहे – असं काही विचारवंताना वाटतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जवळजवळ हेच सगळे फायदे रडण्यामुळेसुद्धा होऊ शकतात. रडण्याच्या क्रियेविषयी देखील जगात बरंच संशोधन झालेलं आहे. रडणं हेसुद्धा उत्कट अभिव्यक्तिचं माध्यम असतं. तीव्र वेदनेच्या किंवा भावनिक उद्रेकाच्या प्रसंगी जेव्हा रडू फुटतं तेव्हादेखील एंडॉरफीन संप्रेरकांचा स्त्राव होतो, रडल्यामुळे माणसाचा तणाव कमी होतो, वेदनेपासून सुटका मिळाल्यासारखं वाटतं आणि मनस्थिती सुधारते. रडणाऱ्या व्यक्तीची असहायता लोकांना दिसून येते आणि अशा व्यक्तीला लोक मदत करायला पुढे येतात.
अशा प्रकारे शरीरशास्त्रीयदृष्ट्या जरी रडणं आणि शिव्या देणं यात खूपच साम्य असलं तरी दोन्हीच्या बाबतीतला सामाजिक दृष्टिकोनात मात्र प्रचंड तफावत आहे. रडणं हे सामान्यत: बायकांचं काम समजलं जातं आणि शिव्या देणं हा मर्दानगीचा आविष्कार मानला जातो. मागच्याच वर्षी रडण्याविषयी जगातल्या पाच देशात झालेल्या ताज्या संशोधनातही असं दिसलं की स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक सहजपणे, जास्त वेळा आणि जास्त तीव्रतेने रडतात. याचा अर्थ स्त्रिया फक्त रडतात आणि पुरुष नुसत्या शिव्या देतात; असा होतो का? अर्थातच नाही! भांडताना कचकचून शिव्या देणाऱ्या बायका सगळ्यांनीच पाहिल्या असतील आणि अनेकदा पुरुषही भावनिक होऊन डोळे पुसताना दिसतात. तरीही आयुष्यात कठीण प्रसंग ओढवल्यास पुरुषाने न डगमगता खंबीरपणे उभं राहावं आणि जिवाचा कितीही संताप झाला तरी बाईने आवाज चढवून बोलूदेखील नाही अशीच अपेक्षा साधारणपणे केली जाते. पुरुषांनी राग व्यक्त करायला आणि स्त्रियांनी असहायता व्यक्त करायला समाजाची आडकाठी नसते.

पण अगदी लहान मुलगा देखील रडत असेल तर त्याला – “रडतोस काय मुलीसारखा?” असं ऐकवलं जातं. मुलाचा पुरुष होताना त्याने आक्रमक असले पाहिजे असंच त्याच्या मनावर बिंबवलं जातं. पितृसत्ताक समाजात पुरुषाला कुटुंबाचा संरक्षक म्हणून भूमिका निभवावी लागते. त्यासाठी घराबाहेर पडून जेव्हा संघर्ष करावा लागतो तेव्हा चारदोन रट्टे देण्याघेण्याची, अरेलाकारे करायची तयारी ठेवावी लागते. जो पुरुष आक्रमक नसेल त्याला बुळया, बायल्या, नेभळट - असं चिडवलं जातं! कधीकधी ‘छक्का’, ‘हिजडा’ असे काही शब्द पुरुषांचा अपमान करण्यासाठी वापरले जातात. कधी कधी पुरुषाच्या निष्क्रियतेचा धिक्कार करण्यासाठी त्याला - बांगड्या भर - असं सांगितलं जातं किंवा ‘षंढ’ म्हटलं जातं. म्हणजे त्यांची बायकांशी आणि तृतीयपंथीयांशी तुलना केली जाते.

आक्रमक भाषा किंवा अपशब्द वापरल्याने हिंसा टाळता येते – असं म्हटलं जातं. पण खरंतर शिव्या देणे हीसुद्धा शाब्दिक हिंसाच आहे. ज्याप्रमाणे जनावरं हल्ला करायच्या आधी गुरगुरतात तसंच हाणामारीच्या आधी शिवीगाळ केली जाते. शिव्या देताना जोरजोराने हातवारे केले जातात, आवाजाची पट्टी वाढलेली असते. शिव्यांमध्ये लैंगिक अवयवांचे, संभोगक्रियेचे किंवा उत्सर्जनाच्या क्रियांचे उल्लेख करणारे शब्द वापरले जातात. डॉक्टरांशी बोलताना जर योनि, लिंग, गुदद्वार अशा शब्दांचा उपयोग केला जात असेल तरी भांडणात त्याच अर्थाचे जे शब्द अपमान करण्यासाठी वापरले जातात ते अगदीच वेगळे असतात. बरेच अपशब्द भ, झ नाहीतर फ अक्षरापासून सुरू होतात. ही अक्षरं उच्चारताना फुफ्फुसातून जोराने हवा बाहेर फेकावी लागते. अपशब्दांविषयी संशोधन करणारे म्हणतात की शिवी देत असताना त्या शब्दांचे शब्दकोषातले अर्थ माणसाच्या मनात नसतात, तर राग व्यक्त करण्यासाठी त्यानं ती शब्दयोजना केलेली असते. अनेक माणसांना बऱ्याचशा शिव्यांचे खरे अर्थ माहितसुद्धा नसतात. जरी अपशब्दांचे अर्थ माहीत असले तरीही रागाच्या भरात माणसं बेधडकपणे बोलून जातात. भांडणाऱ्या माणसाच्या भावना महत्वाच्या असतात, शब्द नव्हे – असंही शास्त्रज्ञ म्हणतात. दोन पुरुषांच्या भांडणात अनेकदा एकमेकांच्या आई, बहिणीला वेश्या ठरवणारे उल्लेख येतात किंवा ह्या स्त्रियांवर बलात्कार करण्याचे उल्लेख केले जातात किंवा तशा अर्थाच्या धमक्या दिल्या जातात, तेव्हा पुरुषांना कमालीचा राग येतो. याचं कारण काय असेल बरं?
याचं कारण पितृसत्तेने स्त्रीपुरुषांसाठी ज्या चौकटी आखून दिलेल्या आहेत – त्यामध्ये दडलेलं आहे! पुरुषप्रधान संस्कृतीने पुरुषांकडे कमवण्याचं, पोसण्याचं आणि बाईच्या संरक्षणाचं काम दिलेलं आहे. जो हे काम व्यवस्थित पार पडतो – तो चांगला पुरुष मानला जातो. पुरुषाने कुटुंबातल्या बायकांचं ‘संरक्षण’ करायचं म्हणजे काय - तर आपल्या जाती, धर्माबाहेरच्या पुरुषाशी त्यांचा संबंध येऊ द्यायचा नाही. त्यासाठी त्यांच्यावर निर्बंध घालायचे, त्यांना विशिष्ट नियमांच्या सहाय्याने ताब्यात ठेवायचे. जेव्हा दोन जाती, धर्म किंवा देश यांच्यात संघर्ष होतात तेव्हा शत्रूपक्षातल्या पुरुषांवर वर्चस्व दाखवण्यासाठी त्यातल्या महिलांवर बलात्कार केले जातात. एखाद्या महिलेवर बलात्कार केला जातो तेव्हा ती ज्याच्या अधिपत्याखाली होती त्या पुरुषाचाही तो अपमान ठरतो. म्हणून जेव्हा ‘आई झवली’ सारखी शिवी दिली जाते – तेव्हा पुरुषांना जास्त राग येतो. कधीकधी इतके थेट शब्द वापरण्या ऐवजी ‘तेरी मां की आंख’ किंवा ‘आईच्या गावात’ असं म्हटलं जातं – तरीही याचा काय अर्थ होतो ते बोलणारा आणि ऐकणारा दोघांनाही चांगलंच माहीत असतं. असे बलात्काराच्या धमकीसारखे वाटणारे अपशब्द जरी प्रत्यक्ष कृतीत उतरवले जाणार नसले तरीसुद्धा अशा वाक्प्रचारांमुळे लैंगिक हिंसेला एकप्रकारे क्षुल्लक ठरवलं जातं – हा आणखी एक मोठा धोका असतो.
याचीच दुसरी बाजू अशीही आहे की बाईला स्वतंत्र अस्तित्व असणं पितृसत्तेला मान्य नसतं. पुरुषाच्या आश्रयाला राहाणारी बाई म्हणजेच - चांगली बाई – असं मानलं जातं. बाप, भाऊ, मुलगा किंवा नवरा अशा एखाद्या पुरुषाच्या अधिपत्याखाली जी बाई नसेल, तिच्यावर कोणताही पुरुष लैंगिक हल्ला करू शकतो अशी समजूत असते. विधवेसाठी ‘रांड’ हा शब्द आहे आणि याच शब्दाचा अर्थ ‘वेश्या’ असा देखील आहे. जेव्हा पुरुषांना अक्करमाशा, बास्टर्ड अशा शिव्या दिल्या जातात तेव्हा त्या पुरुषाच्या आईचे अनेक पुरुषांशी शरीरसंबंध असल्याचं सुचवलं जातं. जी बाई स्वतंत्रपणे जगायचा प्रयत्न करते, स्वत:ची लैंगिकता स्वत:च्या मर्जीनुसार व्यक्त करते तिला अनैतिक ठरवलं जातं. अशा ‘वाईट’ बायकांसाठी कुलटा, उठवळ, छम्मकछल्लो असे भरपूर अपशब्द असतात. पण स्वत:च्या मर्जिने निर्णय घेणाऱ्या पुरुषांसाठी असे काहीच अपशब्द भाषेत सापडत नाहीत, कारण पुरुषाने निर्णय घेणं हे स्वाभाविक आणि ‘चांगलं’ समजलं जातं. जर क्वचित कधीतरी धडाडीने वागणाऱ्या बाईचं कौतुक करायचं असेल तर तिला ‘मर्दानी’ म्हणजे पुरुषयसारखी म्हटलं जातं. उदा. ‘खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी’ किंवा सिनेमात हाणामारी करणारी राणी मुखर्जी पण ‘मर्दानी’ असते.


काहीजण यावर असा उपाय सुचवतात की स्त्रीवादी लोकांनी नवीन शिव्या तयार कराव्यात. म्हणजे ‘आईघाल्या’ च्या ऐवजी ‘बापघाल्या’ म्हणावे. स्त्रियांच्या चारित्र्याशी संबंधित शिव्या देण्यास बंदी करावी अथवा कायद्याने शिक्षा असावी. खरंतर भारतीय दंड विधानाच्या कलम 509 अंतर्गत स्त्रीचा अनादर करणारा ‘छम्मकछल्लो’ हा शब्द वापरल्याबद्दल शिक्षा झाल्याचे उदाहरण घडलेले आहे. काही सामाजिक संस्था कॉलेजातील युवकांसाठी ‘गालीबन्द अभियान’ चालवतात. महाराष्ट्रात युनिसेफने शाळेतल्या मुलांसाठीही ‘शिवीबंद अभियान’ केले होते. गावोगावी मुलांनी शिव्या न देण्याची शपथ घेतली होती. पण ती शपथ किती प्रमाणात पाळली गेली त्याची काही माहिती सध्या तरी उपलब्ध नाही. पण त्यापेक्षा थोडेसे निराळे उपाय स्त्रीवादी लोकांनी शोधून काढले आहेत. Slut walk – हे त्याचे एक उदाहरण म्हणता येईल. काही वर्षांपूर्वी एका पोलिस अधिकाऱ्याने म्हटले होते की बलात्कारांना आळा घालायचा असेल तर स्त्रियांनी वेश्यासारखे (Slut ) कपडे घालणे बंद केले पाहिजे. बलात्कारासाठी बायकांना दोष देण्याच्या वृत्तीचा महिलांनी निषेध केला जगातल्या ‘बलात्कार संस्कृती’ विरोधात देशोदेशी Slut Walk नावाचे मोर्चे काढले गेले. एकप्रकारे Slut ह्या अवमानकारक शब्दाचे एका सामर्थ्यशाली शब्दात रूपांतर केले. असाच एक छोटासा प्रयोग माझ्या ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी ’ ह्या नाटकातही केला जातो. हे नाटक म्हणजे The Vagina Monologues ह्या इंग्लिश नाटकाच मराठी रूपांतर आहे. नाटकातल्या एका प्रवेशात एक मैत्रीण म्हणते की - ‘चूत' हा शब्द सार्वजनिक ठिकाणी जागोजागी लिहिल्याचे पाहून तिला लाज वाटते. पण अशी लाज वाटून घेण्याऐवजी हाच शब्द आपण वेगळ्या प्रकारे उच्चारून त्याच्यावर पुन्हा एकदा स्त्रियांचा हक्क प्रस्थापित करायचा असं त्या ठरवतात. मग पारंपरिक गाण्याच्या चालीवर तो शब्द खेळवत खेळवत आपलासा करून घेतला जातो. थोडक्यात, त्या शब्दातला ‘शिवी’पणा त्या काढून टाकतात! असं सगळ्याच अपशब्दांच्या बाबतीत करता येईल का?

लिंगभेदी भाषा हिंसक आहेच पण जो लिंगभेद समाजात आहे तोच शिवीत दिसतो आहे. समाजातल्या विषमतेचं आणि सत्ताकारणाचं प्रतिबिंब भाषेत दिसून येतं. पुरुष स्त्रीसारखा असणे हा अपमान मानला जातो मात्र स्त्री पुरुषासारखी असणे ही अनेकदा अभिमानाची बाब मानली जाते. सध्या जगात पुरुषांचं वर्चस्व असल्याने स्त्रीया आणि ट्रान्सजेंडर लोकांना दुय्यम लेखणारे, त्यांच्यावर लैंगिक हल्ला करण्याचं समर्थन करणारे आणि स्त्रीच्या स्वतंत्र अस्तित्वाबद्दल आणि लैंगिकतेबद्दलही तुच्छता दाखवणारे शब्द हे जगातल्या प्रत्येक भाषेत आपल्याला दिसतात. असे शब्द पितृसत्ता कायम ठेवायला एक प्रकारे मदतच करत असतात. जोपर्यंत आपण पितृसत्तेच्या अनुषंगाने येणारी स्त्रीपुरुषातली विषमता नष्ट करत नाही – तोपर्यंत ‘शिवीबन्द अभियान’ सारख्या मोहिमा राबवणे हा वरवरचा उपाय ठरेल. फक्त काही शब्दांना ‘गन्दी बात’ म्हटल्यामुळे ही लिंगभेदाची व्यवस्था बदलणार नाही. मुळात समाजात अशा प्रकारची लिंगाधारीत भेदभावाची व्यवस्था असणं हीच एक ‘गन्दी बात’ आहे!
(हा लेख 'शब्दोत्सव दिवाळी 2020' मध्ये प्रकाशित झाला होता.) 
 

वंदना खरे 

संपादक, 'पुन्हास्त्रीउवाच' 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form