"इकडं आड आनं, तिकडं हीर! अशी हालत झाल्या जिंदगीची. काय करावं, काय बी कळंना....."
संध्याकाळच्या वेळी दिनाकाका बोलला. त्याच्याऐवजी, भिंतीवर टांगलेल्या कॕलेंडरवरील श्रीदेवीच्या फोटोवर तिची नजर खिळली होती. हात श्रीदेवीच्या फोटोतील गजऱ्यावरून फिरत होता.
"काय म्हणतूया मी नंदू? ध्यान कुटं आसतंय तुझं?"
त्याची लेक नंदिनी गडबडून म्हणाली,"हंss…….... काय?"
"काय करतीस त्या नटीसंगं…..?" दिनाकाका भडकला.
"आरं, त्येss, गजरा. मला आसा गजरा लईss आवडतो. आणणार का मला एकदा आसा गजरा….?"
नंदिनीला प्रत्युत्तर न देताच, काहीतरी आठवल्यासारखा काका झटकन उठला. आपल्या मोडलेल्या पायाला काठीचा आधार देत, घराबाहेर जाऊ लागला.
"आता ह्या टायमाला कुटं निगालास, तात्या?" इति नंदिनी.
"आलोच. जरा, जाऊन येतो."
"लवकर ये. भाकरीचं जुगाड करते तवर......"
अंथरूणावर मुटकुळा होऊन पडलेल्या आपल्या आईला दोन घोट पाणी पाजून, नंदिनी चुलीकडे वळली. चुलीच्या धुराच्या वासानं लहान भावंडं तिच्याभोवती गोळा झाली. चुलीचा विस्तव फुलला, पटापट भाजलेल्या भाकरी भुकेल्यांच्या तोंडी पडल्यावर नंदिनीचा जीवही समाधानाने फुलून गेला.
"नंदूss, मी आलो बरं का! काय आसलं दुरडीत तर आण वाडून. दोन घास भागत्यालं पाणी प्यासाठनं....."
बाहेरून जाऊन आलेल्या दिनाकाकाने लेकीला हाक दिली.
लगबगीने तिने उरलेली भाकरी, भाजी, चटणीची चिमट ताटात घालून तात्यापुढे ठेवले.
"व्हयं, काय जमलं का कुटं कामाचं......?"
"अंss, नाई. एक गोष्ट हाय हातात. परss......"
"काय ते स्पष्ट बोल बा."
"त्योsss, खालच्या आंगचा किसना हाय नव्हं? त्येनं...."
"हां, त्येचं काय......?"
"आगं, त्येनं एक स्थळ आणलंय तुझ्यासाठनं. बक्कळ पैशेवाला शेट हाय म्हणतूया त्यो. वरच्या जातीचा बी हाय. आपून काय बी द्याचं नाय. समदं शेट बघणार लग्नाचं. चार दिसानं लगीन करायचं म्हणलाय शेट........."
दिनाकाका भरभरून बोलत राहिला. नंदिनीही त्याच्या बोलण्यावर विचार करत राहिली. त्या रात्री तिला झोप लागेना.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच किसन दिनाकाकाच्या घराबाहेर हजर झाला.
"एss दिनाकाका, हाईस नव्हं घरात?"
"हांss. यं, आत यं."
दिनाकाकाने किसनला बसायला घोंगडी पसरत नंदिनीला हाक मारली,
"आगं, नंदूss. च्या टाक. किसना आलाय."
रात्री पासून विचारांच्या गाडीत बसलेल्या नंदिनीने होकार दिला. काही मिनिटांत ती चहाचा कप घेऊन बाहेर आली.
"हं. घ्या काका, ह्यो च्या पिऊन घ्या."
"हां. आण, आनं यं बघू, हिथं आशी बस जरा." किसन बोलला.
"त्ये नव्हं काका, दळभद्री खोपटात राहणारी माणसं आम्ही. वरच्या जातीचा शेट, राणासिंग! काय म्हणून माझ्यासंगट लगीन करत आसंल."
नंदिनीने आपल्या विचारांची कोंडी फोडली.
"आगं पोरी, पैशेवाला शेट हाय राणासिंग. बायलीचं पॉटपाणी पिकलं नाय. तवा दुसरी बायकु हुडकतोय. जात-पातीचा ईचार नाय, पोरगी चांगल्या वळणाची पायजे म्हणला. तशी तुझी सय झाली मला."
"आवं काका, लई वयाचा असणार त्यो?"
"त्यो.....? आता "ते" म्हणायचं. दोन दिसात तुझा नवरा होत्याल राणासिंग. हाईस कुटं?" नंदिनीच्या आईनं बजावलं.
"तुला काय बी कमी पडणार नाई तिथं. कशाला कमी नाई त्या घरात. नुसती दिवाळी आसत्या रोज. शेटानी हुशील लगीन करून."
दिनाकाकाने समजूत घातली.
"आनं, गजरा बी मिळणार का घालायला….?" नंदिनी.
"ह्या भली थोरली बाग हाय राणासिंगजींची."
किसनने हात पसरत, मोठ्याने हसून सांगताच नंदिनीची कळी खुलली.
घरच्यांनी जवळजवळ सगळंच ठरवलं होतं. जेमतेम दहावीचं तिचं शिक्षण. सौंदर्य म्हणाल तर चार चौघींसारखीच सामान्य रूपरंग. आईचं आजारपण, अपघातात आलेले दिनाकाकाचे अपंगत्व. पाठची चार लहान भावंडं. मोठ्ठं शिक्षण तर सोडाच पण रोजच्या भाकरीची चणचण. नवा कपडा कधीतरीच मिळायचा. आई-वडीलांनी कुणाकडे हात पसरून आणलेले खाणे-पिणे व कपडे यातच समाधान मानत ती जगत होती.
बालपणाच्या आठवणींचे धागे जुळवून बघेपर्यंत नव्या आयुष्याची, लग्नाची वेळ दारात येऊन थांबली.
"बरं का नंदू? शहाण्यासारखी वाग. आमचं नाक खाली हुईल आसं काय करू नगं. मोठ्या खानदानी घरात निगालीस बाय माज्ये. धीरानं घे. सासरच्या चौकटीतनं भाईर पाय काडताना लई ईचार कर. शेटच आता तुझा देव हाईत. तुझ्या म्हायेराचा उध्दार करायचे हाईत ते. संभाळून घे समद्यासंगं……."
कपाळावर मुंडावळ्या बांधलेल्या नंदिनीला तिची आई शहाणपणाच्या चार गुजगोष्टी सांगत होती.
"व्हयं गं आये, समदं ध्यानात ठेवीन. काळजी करू नको."
लग्न आटोपून सुमन राणासिंगच्या गाडीतून रवाना झाली. गाडी एका मोठ्या वाड्याकडे जाऊ लागली तशी नंदिनी कौतुकाने गाडीच्या खिडकीला बिलगली.
"बाबोsss, एवढया मोठ्या वाड्याची शेटानी हाय व्हयं मी? नंदेss, नशीब काडलंस गं बाय!"
नंदिनी अशा विचारातच होती अन् राणासिंगनी गाडी वाड्याच्या शेजारी असणाऱ्या लहानशा घराकडे नेण्याचा हुकूम ड्रायव्हरला दिला. नंदिनी हिरमुसली. अनेक प्रश्नांच्या कल्लोळातच गाडीतून उतरून देवाजींच्या मागोमाग चालत त्या घरात गेली.
"हं, हे तुझं घर. रोज सकाळी वाडयात यायचं. दिवसभराची कामं उरकून पुन्हा तुझ्या घरात येऊन आराम करायचा. आमच्या सौ. म्हणजे सरस्वतीदेवी, सांगतील ते ऐकायचं. तुला काय हवं, नको ते सर्व त्यांनाच सांगायचं." राणासिंगनी सुनावले.
"व्हयं जी. आवो, पण तुम्ही….."
तिला मधेच थांबवून राणासिंग बोलले, "आमच्या सौं ची तब्बेत बरी नसते म्हणून तुला मोलकरीण म्हणून नेमलंय, हेच सौं ना वाटू देत. फार बोलत बसायचं नाही. फक्त काम करायचं नी इथं येऊन बसायचं. आणि हो, मला, अहो नाही तर शेटजीच म्हणायचं, समजलं?"
"हूं ………!!" इति नंदिनी.
त्यानंतर राणासिंगनी सांगितल्याप्रमाणे नंदिनीची दिनचर्या पक्की झाली. महिना सरल्यावर एका रात्री तिच्या दारावर "टकटक" झाली.
"अंss….? कोण…..?" नंदिनीने विचारले.
"आम्ही, शेटजी." बाहेरून उत्तर आले.
लगबगीने नंदिनीने दरवाजा उघडला.
झोकांडी खात राणासिंग आत शिरले.दारूच्या वासाने घर भरून गेले. नंदिनीने दरवाजा आतून बंद केला.
राणासिंगनी आपल्या सदऱ्याच्या खिशातून कागदाची पुडी काढून तिच्या हातात दिली.
"हं. घे. गजरा आवडतो ना तुला…..?" राणासिंगचा प्रश्न.
"व्हयं. लईss…….." नंदिनीचे भाबडे उत्तर.
"घे मग."
राणासिंगची वासनेने भरलेली नजर त्या गजऱ्यासोबतच तिच्या सर्वांगावर भिरभिरू लागली. तिने गजरा घेण्यासाठी पुढे केलेला हात खसकन ओढून त्यांनी तिला आपल्या बाहुपाशात आवळले.नंदिनी गुदमरली.
पण आईच्या गुजगोष्टींची आठवण होताच, शांतपणे शेटजींच्या पुढ्यात स्वतःला तन-मनाने अर्पण करून मोकळी झाली. त्यानंतर हे सतत घडू लागले. रात्र झाली की, दारूच्या वासात गजऱ्याचा दरवळ घुसमटून जाऊ लागला. हळूहळू तिला गजरा आवडेनासा झाला.
चार-पाच महिन्यातच नंदिनीला नवी चाहूल लागली. नेहमीप्रमाणे ती वाड्यात काम करू लागली. सरस्वतीदेवी झोपाळ्यावर बसून काहीतरी वाचत होत्या. थोड्या वेळातच नंदिनीला मळमळायला लागून उलटी झाली.
"काय गं? काय होतंय?" सरस्वतीदेवीनी विचारले.
"बाईसाहेब, म….मला दिवस गेलेत वाटतंय."नंदिनी अडखळली.
"हं, मग…..ठीक. त्यात विशेष काय? शेटजी तुझ्याकडे येतात म्हणजे हे होणारच." सरस्वतीदेवी शांतपणे म्हणाल्या.
"अं…..? म्हणजे तुम्हाला हे समदं……" नंदिनी.
"हो. मला माहिती आहे सगळं. मोलकरीण आहेस हे फक्त मला दाखवायला. तुझ्याआधी एकीला असंच आणलं. तिनं मुलगीला जन्म दिल्यावर हाकलून दिली. मग तुला आणली."
नंदिनी सुन्न झाली. आता गजरा दरवळायचा थांबला. तिने मनाशी निर्णय पक्का केला.
काही महिन्यांनी एका अंधाऱ्या रात्री नंदिनीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तोंड दाबून तिने साऱ्या वेदना सहन करत, बाळाची नाळ कापून स्वतःची व्यवस्थित 'सुटका' करून घेतली. ठरविल्याप्रमाणे तिने आपल्या लेकराला कापडात गुंडाळले आणि पहाट होण्याआधीच ती तिथून पसार झाली. तिला आता तो गजरा पुन्हा दरवळत ठेवायचा नव्हता.
