जागा - प्रिया जोशी

आज सकाळपासून नंदिनीची धावपळ सुरू होती. घाईघाईतच तिनी एकदा तिच्या त्या वीतभर घरावर शेवटची नजर फिरवली आणि दार बंद करून त्याला कुलूप लावलं. आता पुढचे काही महिने तरी या कुलुपाला किल्ली लागणार नव्हती. 

दिनाकाका वाटच बघत होते तिची. काही न बोलता दोघंही राणासिंगच्या हवेलीच्या दिशेनी निघाले. हवेलीत प्रवेश करताना एकीकडे नंदिनीची नजर सर्वदूर फिरत होती. जागोजागी ओसंडून वाहणारं ऐश्वर्य बघून तिचे डोळे चमकले. तिचं व्यवहारी मन तिच्याही नकळत हिशोब मांडायला लागलं. 'चला, आता पुढचे निदान नऊ दहा महिने तरी अगदी आरामात राहता येईल. मागच्या दोन वेळची कसर भरून काढायची आता...आयत्या चालून आलेल्या संधीचा फायदा करून घ्यायचा...' - मनात विचारांचे इमले बांधतच ती दिनाकाकांच्या मागोमाग हवेलीच्या मुख्य दालनात येऊन पोचली. तिथे माँसाहेब ,राणासिंग आणि त्यांची पत्नी - सरस्वतीदेवी तिघेही तिची वाटच बघत होते.

मासाहेबांनी सरळ मुद्द्यालाच हात घातला.-"दिनाकाकांनी सांगितलंच असेल तुला सगळं सविस्तर; त्यामुळे आता मी परत नाही सांगत. उद्याच आपण सगळे डॉक्टरांकडे जाणार आहोत. आता लवकरात लवकर आम्हाला आमच्या घराण्याचा वारस हवा आहे - आणि तो तू आम्हाला देणार आहेस. त्यामुळे या क्षणापासून आमचा वारस जन्माला येईपर्यंत तू इथेच आमच्या नजरेसमोर राहशील."

हवे असलेले शब्द कानी पडताच नंदिनी मनातून सुखावली. क्षणभर- तिला नावं ठेवणाऱ्या लोकांचे ते जळजळीत कटाक्ष आणि त्यांचे टोमणे ऐकू आले तिला... पण ती स्वतःच्या निर्णयावर ठाम होती... अगदी मागच्या दोन्ही वेळा आपली कूस भाड्याने दिली होती तेव्हा... आणि आज सुद्धा!

हो, नंदिनी एक surrogate mother होती... आणि तेही अगदी स्वखुशीने...तिच्या दृष्टीने पैसे मिळवण्यासाठीचा हा सगळ्यात सोपा आणि फायदेशीर मार्ग होता. याबाबतीत तिचे विचार अगदी स्पष्ट होते... 'लोक आपल्या बुद्धीचा, आपल्या शक्तीचा वापर करून पैसे मिळवतात - त्याचप्रमाणे मी माझ्या प्रजननशक्तीचा वापर करते. माझ्यामार्फत जर काही लोकांची स्वप्नं पूर्ण होत असतील तर त्यात वाईट काय आहे? आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मी माझा जीव धोक्यात घालते... बाळंतपण हा स्त्रीचा पुनर्जन्म म्हणतात ते काही उगीच नाही ! मग त्यासाठी जर मी पैसे घेतले तर माझं काय चुकलं?' - याच विचाराला अनुसरून तिनी याआधीही दोन वेळा आपली कूस भाड्याने दिली होती. आणि आता ही तिची तिसरी वेळ होती.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे डॉक्टरांकडे गेले. त्यांनी नंदिनीच्या आवश्यक त्या सगळ्या चाचण्या आणि परीक्षण केलं आणि लवकरच राणासिंग आणि सरस्वतीदेवींचा अंश नंदिनीच्या पोटात वाढू लागला.
आता माँसाहेब आणि सरस्वतीदेवी जातीने नंदिनीची काळजी घेत होत्या. तिच्यासाठी सकस आहार, फळं, दूध, तूप....सगळी रेलचेल होती. तिच्या सगळ्या इच्छा, सगळे डोहाळे अगदी हौसेनी पुरवले जात होते. जसजसा तिच्या पोटाचा घेर वाढू लागला तसतशा राणासिंग च्या तिच्या खोलीतल्या चकरा सुद्धा वाढू लागल्या.
नंदिनीच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातला सगळ्यात समृद्ध काळ होता तो ! पण - सगळं कोडकौतुक आपल्यासाठी नसून आपल्या पोटातल्या बाळासाठी आहे - हे ती जाणून होती. या लोकांना यांचं बाळ मिळाल्यावर हे आपल्याकडे ढुंकूनही बघणार नाहीत हेही तिला माहीत होतं.

'नंतर तुझ्या नशीबात पुन्हा एकटं राहाणं आणि पैशांची चणचण …' अधूनमधून नंदिनी स्वतःला बजावत राहायची. पण आता तिला या सगळ्या सुखसोयींची, ऐश्वर्याची चटक लागली होती. एका अनाथ, गरीब स्त्रीला जगण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हे तिनी अनुभवलं होतं. पुन्हा त्या दारिद्र्याच्या दलदलीत जाण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती.
'वेळीच काहीतरी केलं पाहिजे... या घरात टिकून राहण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करायला हवे'- नंदिनीचं व्यवहारी मन तिला सतत हेच सांगत होतं. खूप विचार करून शेवटी तिने आपला डाव मांडला... हळूहळू फासे टाकायला सुरुवात केली. आणि लवकरच तिच्या खेळातलं सगळ्यात महत्त्वाचं प्यादं तिच्या हिशोबानी चालायला लागलं.
आधी सरस्वतीदेवी बरोबर तिच्या खोलीत येणारा राणासिंग आता अधूनमधून एकटाच यायला लागला. बाळाची चौकशी करताकरता आता तिचीही विचारपूस करायला लागला. आधी त्याच्याशी फक्त कामापुरतं बोलणारी नंदिनी आता त्याच्याशी लगट वाढवायला लागली. येणाऱ्या बाळाबद्दल, त्याच्या भविष्याबद्दल राणासिंग जी स्वप्नं बघत होता त्यांत आता हळूहळू नंदिनीने आपली जागा निर्माण करायला सुरुवात केली. तिनी फेकलेल्या जाळ्यात राणासिंग अधिकच गुंतला जात होता.
पण अजूनही एक प्यादं होतं - जे नंदिनीला आपल्या बाजूनी हवं होतं...माँसाहेब !! लवकरच ते प्यादंही तिच्या काबूत आलं.... आधी आपल्या सुनेचा, तिच्या चांगुलपणाचा उदोउदो करणाऱ्या माँसाहेब आता नंदिनीचं गुणगान करायला लागल्या. आपल्या हातातून निसटणारी नाती आणि हळूहळू ढळणारं आपलं स्थान - हे सगळं सरस्वतीला दिसत होतं. पण सगळं काही उघड्या डोळ्यांनी बघत राहण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
रोज मागच्या अंगणातल्या देवळात नेत्रोबाच्या मूर्तीसमोर आपलं गाऱ्हाणं मांडायची ती! त्याच्यावर विश्वास ठेवून आला दिवस ढकलत राहिली. पण जसंजसं नंदिनीचं जाळं घट्ट होत होतं तसातसा सरस्वतीचा देवळातला मुक्काम वाढत गेला.
आणि शेवटी एकदाचा तो दिवस येऊन ठेपला. नंदिनीच्या पोटात पहिली कळ आली. तिला गाडीत बसवून माँसाहेब आणि राणासिंगनी तडक हॉस्पिटल गाठलं.... पण त्या घाईगर्दीत कोणालाच सरस्वतीची आठवण देखील झाली नाही . त्या क्षणी तिला जाणवलं, 'आज त्यांच्या गाडीत आपल्याला जागा मिळाली नाही.. लवकरच त्यांच्या आयुष्यातलं आपलं स्थानही आपण गमावून बसणार. . माझा नवराच काय .... आता तर माझं मूलही माझं राहिलं नाहीये......एका नव्या जीवाच्या आगमनामुळे आता नात्यांचे सगळेच संदर्भ बदलले आहेत.'
तिनी धावत जाऊन नेत्रोबाचे पाय धरले...'यापुढे हीच माझी जागा....'
सरस्वतीला आता हे कटू सत्य कळून चुकलं होतं... या वस्तुस्थितीचा स्वीकार करण्याखेरीज तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता !!!!

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form