दिनाकाकाच्या मागोमाग नंदिनी मुकाटपणे चालत होती. हवेलीच्या बाहेर काका थांबला, हात जोडत म्हणाला, “जा आत... घर वाचवलंस पोरी...” काका गेला.
राणासिंगच्या हवेलीत तिला काम तर मिळालं होतं. मांसाहेब खुश असायच्या तिच्यावर. झाडलोट, सडा रांगोळी, गुरांना चारा, दूध काढणं, स्वयंपाक करणं - पण ह्या सगळ्यात तिला देवांसाठी फुलं काढून हार करणं हे काम खूप आवडायचं. थोडी फुलं ती बाजूला ठेवायची. सगळं काम संपलं की ती फुलं घ्यायची, त्याचे हार करायची, नेत्रोबाला घालायची. तिला हलकं वाटायचं.
राणासिंगचं लग्न झालं होतं. त्याची बायको सरस्वतीदेवी दिवसभर खोलीत लोळत असायची. संध्याकाळी नटूनथटून मोटारीत बसून जायची. रात्री दोघे झिंगून परत यायचे. नंदिनीनं केलेलं खाल्लं तर खाल्लं नाहीतर खोलीत जाऊन झोपणं. एका रात्री राणासिंग मोठमोठ्याने शिव्या घालत होता. नंदिनी घाबरली. पण गप जाऊन पडली.
सरस्वतीदेवी आली, नंदिनीला उठवलं आणि राणासिंगच्या खोलीत जा म्हणाली. नंदिनी थरथरत खोलीत गेली आणि दार लागलं. पुढे काय वाढून ठेवले असेल याच्या भीतीने ती अर्धमेली झाली होती. राणासिंगने तिला पलंगावर बसायला सांगितले. शेजारी बसून तो म्हणाला-
“हे बघ पोरी. तुझी मालकीण माझ्या धनदौलतिला वारस देऊ शकत नाही. म्हणून मांसाहेबांनी तुझ्या काकाला भरपूर पैसा देऊन तुला इथे आणले. तू विरोध केला तरी काही उपयोग होणार नाही. तू गुण्यागोविंदाने मला जे हवे ते दिले तर तुला त्रास होणार नाही. तेव्हा मुकाट्याने तूझे काम तू कर.”
नंदिनी न बोलता दैवात लिहिलेले भोगायला तयार झाली.
पुढे हे नेहमीचेच झाले. नंदिनी दिवसभर घरात कामे करायची. रात्र झाली की आपणहून राणासिंगच्या दालनात हजर व्हायची. असे काही महीने गेले. मांसाहेबांचे नंदिनीवर बारीक लक्ष होते. पण त्यांना हवी ती लक्षणे दिसेनात. आपली निवड चुकली तर नाही ना अशी शंका त्यांना येऊ लागली. एक दिवस मांसाहेबांनी नंदिनीच्या काकाला बोलावणे धाडले आणि जाब विचारला.
“काय रे ए तुला काय वाटते, तू मला इतके सहज फसवशील? वांझोटी गाय माझ्या मुलाच्या गळ्यात बांधली ना?”
“नाही बाईसाहेब. अहो मी सांगितले ना तुम्हाला, तिचे पोर जन्मल्याबरोबर मीच तर सगळे संपवले होते. पदरात पोर असलेली बिनलग्नाची मुलगी! मी जर वेळीच उपाय केले नसते तर तिने नक्कीच एखादी विहीर गाठली असती. तुम्ही मला माझ्या पोरीचे कल्याण करण्याची संधी दिली. मी फसवले नाही बाईसाहेब. तुम्ही तिला जरा वेळ द्या.”
हे ऐकून मांसाहेबांनाही वाटले की खरंच आपण उगाच घाई करत आहोत.
नंदिनी राणासिंगच्या दालनात जाऊ लागल्यापासून त्याची बायको सरस्वतीदेवी स्वतंत्र खोलीत झोपायची. वाड्यावर काम करणारा महादू तिच्या दिमतीला होता. तिला हवे नको ते बघणे, अगदी तिचे ड्रिंक्स बनवून देणे वगैरे कामे तो करायचा. त्या जवळीकीत महादूचे पिळदार शरीर सरस्वतीदेवीला आकर्षित करित राहिले. एकदा अशाच बेसावध क्षणी जे घडायचे ते घडले. ते कोणालाही कळणे शक्य नव्हतेच. त्यामुळे नंतरही ते सतत घडत गेले. अचानक पाळी चुकली तेव्हा मात्र सरस्वतीदेवीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने लगेच नंदिनीला खोलीत बोलावून घेतले.
“अगं नंदिनी तुझे चाललेय तरी काय? मांसाहेबांना गोड बातमी कधी देणार आहेस?”
“बाईसाहेब, मी तरी काय करू? मी रोज सांगितलेले काम करते. पण माझ्या हातात काहीच नाही ना!”
“मूर्ख मुली. माझ्याजवळ बोललीस. बाहेर कुठे बोललीस आणि राणासिंगांना कळले तर जीवच घेतील तुझा.”
“मग बाईसाहेब मी काय करू?”
“हे बघ. नीट लक्ष देऊन ऐक. मांसाहेबांचा धीर सुटत चाललाय. त्यांनी काही दुसरे पाऊल उचलायच्या आत आपल्याला काहीतरी करणे आवश्यक आहे. तुला दिवस राहिल्याचे नाटक करावे लागेल.” त्यांनी नंदिनीला सगळे समजावून सांगितले.
दुसऱ्या दिवशी सरस्वतीदेवी त्यांच्या माहेरी निघून गेल्या. जातांना राणासिंगांना तंबी द्यायला विसरल्या नाहीत की लवकर खुषखबर मिळाली नाही तर त्या घटस्फोट घेतील आणि मग राणासिंगांना व्यवहारात सगळी इस्टेट गमवावी लागेल. असली मानहानी पचविणे राणांसिंगांना शक्यच नव्हते. ते काळजीत पडले. पण त्यांची काळजी लवकरच मिटली. एक दिवस नंदिनीच्या कोरड्या ओकाऱ्या ऐकून मांसाहेबांनी सत्यनारायण घातला. तिचे थोडेफार पोट दिसायला लागल्यावर सरस्वतीदेविंनी तिला त्यांच्या माहेरी बोलावून घेतले. “तुमच्याजवळ पोटूशी बाईने राहणे म्हणजे तिच्या बाळाला मोठा धोकाच आहे" अशी भिती राणासिंगांना घातल्यावर त्यांनी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता.
यथावकाश तीन महिन्यांच्या बाळाला घेऊन सरस्वतीदेवी घरी परत आल्या. कुलदीपक आला म्हणून मांसाहेबांनी वाड्यावर मोठे गावजेवण घातले.
नंदिनी कुठे गेली याची कोणीच चौकशी केली नाही. महादू देखील वाड्यावरची नोकरी सोडून निघून गेला. आपण काही न करताच बला टळली म्हणून सरस्वतीदेवीना हायसे वाटले!
सरस्वतीदेविंनी दिलेल्या घसघशीत रकमेमधून नंदिनीने दूरगावी मोठी हवेली बांधली. जुन्या हवेलीत नोकर असणारा महादू आता महादेवशेट झाला होता आणि तारुण्यातल्या त्याच्या प्रेयसीसोबत म्हणजे नंदिनीसोबत त्यांचा स्वत:चा वारस आणण्यासाठी उत्सुक होता.
