प्रिय इरफान,
हे लिहितानाही त्यादिवशीचा तू आठवतो आहेस. म्हणजे तुझी ती फ्रेमच मेंदूत इतकी फिट्ट बसलीये की पाच हजार वर्षानंतरही ती मेंदूतून पुसली जाणं निव्वळ अशक्य! आणि ही तुझ्या डोळ्यांची कमाल आहे. कसले गहिरे आणि अफाट सुंदर डोळे आहेत तुझे! आणि खरं तर इतकी वर्ष आपण मित्र आहोत, कितीदा तरी भेटलो पण कधीच का माझं लक्ष तुझ्या डोळ्यांकडे गेलं नाही, माहीत नाही. पण त्या डोळ्यांत पाहिलं नि हाय...दिल चूर चूर हो गया!
त्यादिवशी तर तुझे डोळे आणि तितकेच लडिवाळ, खट्याळ ओठ आणि मिश्कील हसू बघून उत्कटपणे तुला जवळ करावंसं वाटलं. घट्ट मिठी मारून किस करावं असंही वाटलं. काही दिवसांनी तुला मी हे मोकळेपणानं सांगितलंही. आणि तू हे ज्या पद्धतीनं स्वीकारलंस ते मला फारच आवडलं. म्हणजे मला तुला फार स्पष्टीकरणही द्यावं लागलं नाही आणि तू ग्रेसफुली माझ्या भावनेचा स्वीकारही केलास. मोकळेपणाचं कौतुकही केलंस. हे इतकं दुर्मिळ आणि म्हणूनच खासही आहे. आपल्या एखाद्या आवडत्या मित्राला हे सांगता येणं आणि त्यानंतरही त्यानं आपल्याशी आधीच्याच उबदार स्नेहानं वागणं हे किती कमाल आहे. त्यांनतर ना तुझ्या माझ्या मैत्रीत, बोलण्यात अंतर आलं ना तू शारीरिकदृष्ट्या अंतर राखून वागलास. सगळ्याच पुरुषांना नाही असं हे खुलेपणानं स्वीकारता येत. किंवा मग ते अशा व्यक्त होण्याचे वेगवेगळे अर्थ तरी काढतात. समोरची स्त्री डेस्परेट तरी आहे किंवा मग अवेलेवबल तरी आहे, असं समजलं जातं. म्हणून तुझ्या या हेल्दी स्वीकाराचं इतकं कौतुक करतीये. अर्थात त्यानंतरही आपण अनेकदा भेटलो, तेव्हा तुझ्याकडून नकोसा वाटेलसा स्पर्शही झाला नाही. निघताना, बाय करताना तू मारलेली मिठीही तितकीच निखळ होती.
अजून एक, तुझ्या त्या राखाडी रंगाच्या शर्टची वरची दोन तीन बटणं उघडी होती त्यादिवशी...आणि त्यातनं तुझ्या छातीवरचे केस दिसत होते! पोटात ढवळून निघालं ना तुला तसं पाहून...शरीरात हार्मोन्सचं उसळणं सुरू झालं. मेंदूला करंट बसत होते...अर्थात हवे-हवेसे वाटणारे.
हे असं सगळं वाटणं म्हणजे नेमकं काय आहे? याची संगती मला नाही लावता येत...आणि मला लावायचीही नाही. हे आकर्षण असलं तर आकर्षणही सही! शारीरिक आकर्षणाला मी अजिबात कमी लेखत नाही नि त्याची लाज तरी वाटायचं काय कारण? त्यामुळे हे सगळं मला छान एन्जॉय करावंसं वाटतं. या अवस्थेला चटकन कुठल्यातरी खोक्यात कोंबून त्याला कसलातरी समाजमान्य टैग लावत बसण्यापेक्षा त्यातली तरलता, हळुवारपणा नि धसमुसळेपणा, राकटपणाही अनुभवणं तर कितीतरी गंमतीचं आहे.
खरं म्हणजे आपल्या अत्यंत आवडत्या (आवडत्या म्हणजे प्रेम आहेच असं नव्हे) अशा पुरुषासोबत तास न तास एकांतात घालवणं, कमालीचं सुखकारक आहे. तास न तास तुझ्या डोळ्यात बघत बसावं, हातात हात घेऊन बोटांशी चाळा करावा...मग अलगद तुला पुढे ओढून किस करावं, तुझ्या छातीवरच्या केसांशी मनसोक्त खेळावं...असं सगळं वाटतं ते उगाच नाही...नुसती कल्पना करूनही किती बरं वाटतं यार! तुझ्या उघड्या पाठीवर बोटांनी कविता गिरवत बसावं! आहाहा!
पण हे सगळं खरंच होईल का? कि हे सारं फक्त या पत्रात आणि मनातच राहील? अर्थात तुझी सहमती आणि आवड हा मुद्दा महत्वाचा आणि निर्णायक आहेच, तो नाकारायचा प्रश्नच नाही आणि तुझ्या निर्णयाचा अनादरही होणार नाही. पण या अशा प्रकारच्या आसक्तीला आपण (म्हणजे आपला समाज) रोमँटिक समजेल का? की मला चवचाल, उठवळ वगेरे ठरवून मोकळा होईल? हे असं कुणालाही वाटू शकतंच ना म्हणजे...फक्त त्याचा इजहार मी करतेय इतकंच! पण असो, समाजाला काय वाटतं, त्यापेक्षा तुला नि मला काय वाटतं, हे जास्त महत्वाचं! बुरसटलेल्या समाजाला आपण तितकीच किंमत दिली पाहिजे, जितकी सिगरेटचं थोटूक पायाखाली चिरडून टाकताना त्याला देतो.
तुला माहित्ये, मागे मी आपल्या एका मैत्रिणीला म्हणाले, की आपला हा मित्र म्हणजे तू मला आवडतोस. मग ती मला अधूनमधून चिडवू लागली. तर एकदा मी तिला कोपच्यात घेऊन म्हणलं..."अगं अशी सगळ्यांसमोर नको चिडवत जाऊस...कुणाला कळलं तर...आणि आमचं काही असं रिलेशनशिप-प्रेम वगैरे नाहीये. तो मला रोमॅण्टीकली आवडतो...इतकंच!" तर ती म्हणाली, "तुला चिडवल्यावर तुझ्या चेहऱ्यावर जे स्माईल येतं, तुझे गोबरे गाल गुलाबी वगेरे होतात, तेव्हा तू खूप सुंदर दिसतेस...सो एन्जॉय धिस! आणि कुणाला कळलं तर कळलं...त्यात काय एवढं! उलट अमुक एक व्यक्ती मला आवडते, अमुक एक मित्र रोमँटिकली आवडतो, हे सांगायला, व्यक्त करायला धाडस लागतं....आणि ती सुंदर गोष्ट आहे. यु आर ब्युटीफुल बिकॉझ यु हैव करेज टु एक्स्प्रेस धिस अँड चेरीशिंग दीज फिलिंग्ज" खरंच आहे तिचं...फक्त तिनं माझं थोडंसं लाडे लाडे कौतुक केल्यावर मला ते जास्तच पटलं. आणि मला फैज अहमद फैजच्या, माझ्या आवडत्या कवितेतला तुकडाही आठवला. फैज म्हणतो,
हम पर तुम्हारी चाह का इल्जाम ही तो है,
दुश्नाम तो नही ये इकराम ही तो है
करते है जिसपे ता'न कोई जुर्म तो नही
शौक-ए-फुजुल ओ उल्फत-ए-नाकाम ही तो है
तर हे सगळं असं आहे. हे सगळं असं मी लिहिल्यावर, तू ते वाचल्यावर काय होईल...अशी जराही धाकधूक मला वाटत नाही. उलट मीच बोलावणार आहे तुला डेटवर! येशील? आणि ही डेट म्हणजे अशी नुसतं कॉफी पिऊ, गप्पा मारू. लंच/डिनर/सिनेमा/ लॉंग ड्राइव्ह असलं काही काही नसणारे. एखाद्या शांत निवांत, आजूबाजूला खूप खूप झाडं, भणाण वारा, समुद्रकिनारा किंवा नदी असेल अशा एखाद्या ठिकाणी तुला डेटवर घेऊन जाईन. तिथं तू आणि मी तास न तास पडून राहू एकमेकांच्या कुशीत...नग्न! देहभान हरपून एकमेकांच्या डोळ्यांत बघत राहू किती तरी वेळ! आपल्या लाडक्या फैजच्या कविता म्हणू. तशाच अनावृत्त देहमनाने सूर्यास्तही पाहू. समुद्रासारख्याच अथांग असलेल्या तुझ्या डोळ्यांचा तळ गाठायचाय मला...नि त्यासाठी फक्त रुह की रुह से बात होणं... वगेरे एक शालीन अर्धसत्य आहे, असं मला वाटतं. शरीरं एकमेकांत उत्कटपणे गुंफल्यावरही सत्याचा शोध घेता येतोच की! मला त्या सुंदर सत्याची आस लागलीये, ज्यातून आनंद, सुख, समाधान मिळतं, नवनिर्माणाची ओढ लागते. त्यासाठीच मी तुला साद घालतीये...येशील?
तुझी मैत्रीण,
सुलेखा

