प्रेम कविता

“पुल्लिंगाचं अवघड व्याकरण” सोसत प्रेमाविषयी लिहू पाहणाऱ्या स्त्रियांच्या भावना आज काही आगळ्या ढंगाच्या कवितांमधून समजून घेऊया. कवयित्री आहेत योगिनी राऊळ आणि शर्मिष्ठा भोसले.
योगिनी राऊळ अनेक वर्षांपासून स्त्रीवादी चळवळीत सक्रिय आहे आणि स्त्रीमुक्ती संघटनेच्या ‘प्रेरक ललकारी’ मासिकाच्या संपादन मंडळात आहे. 

शर्मिष्ठा भोसले पत्रकार आहे आणि तिच्या लेखासाठी ‘लाडली’पुरस्कार मिळालेला आहे.

     



मी लिहू पाहते प्रेम - शर्मिष्ठा भोसले 


अमुक तमुक धर्म भक्तांच्या

तमाम चिथावण्या नजरेआड करत

मी कागदावर लिहू पाहते प्रेम

लेखणी उचलत नाही तोवरच

वळलेल्या असतात माझ्याकडे

कित्येक संशयी नजरा

मी म्हणते, मला काही सांगायचंय

ते म्हणतात, तू मम म्हण नुसतं, ते पुरेसं आहे

तरी मी बोलते, मला स्वतंत्र मतं आहेत,

ते म्हणतात, अरे बापरे, मग तुझे हात कसे पिवळे होणार?

अजूनही मी बजावते, माझंही काही अस्तित्व आहे,

तेव्हा तर ते माझ्यावर उगारतात

त्याग, समर्पण, सहनशीलता आणि करुणेचे टोकदार दगड

अशावेळी

सगळेच धर्म बनून राहतात

सत्तेचे सराईत पक्षपाती

निःशब्द भरून आलेल्या आकाशात

कुठलाच प्रेषित अवतरत नाही माझ्यासाठी

नवी आकाशवाणी घेऊन

पुल्लिंगाचं अवघड व्याकरण सोसत

संस्कृतीच्या दलदलीतून अक्षरं शोधत

प्रतिष्ठेत बरबटलेली लिपी हाताळत

मी तरीही करत राहते प्रयत्न

प्रेम लिहिण्याचा


प्रेमाच्या निनावी कविता - योगिनी राऊळ

१.

सगळं शहर दहशतीखाली असतानाही

होतच असतात

सुरवंटाची फुलपाखरं,

मिरवतात आपल्या पंखांवरचे रंग

अन् शोधतात नवीजुनी फुलं

घटकाभर विसावण्यासाठी!

काल नक्की कोणाचं फुलपाखरू झालं रे...

तुझं की माझं?

२.

प्रत्येक भांडणानंतर

कमी होतंय

आपल्यातलं अंतर

आणि

येतोय आपण आणखी जवळ.

एकदाच भांडूया का रे जीवघेणं?

इतकं की -

आणखी जवळ येण्यासाठी

राहणारच नाही

जराही अंतर

आपल्यादरम्यान !

3.



विसरले नाहीये तुला

किंवा

झाले नाहीये हतबल

तुझ्यामागे

भिनवूनच घेतलंय तुला

माझ्यात

मुळापासून रुजवलंय

तुझं

राख झालेलं अस्तित्त्व

आतातर

मुलंही म्हणतात....

`बाबांचाच

भास होतो आईशी बोलताना !'

4.

रात्रभर खिडकीशी तिष्ठत राहिलेला

अनावर चंद्र

चादरीतच घुसला पहाटे.

ऊबदार वाटलं तरी

हाकलावं लागणारच उजाडल्यावर

म्हणून ओढू लागले त्याला

चादरीतून

तर

मुलीनेच टाकलेले हात

त्याच्या गळ्यात

बाबा समजून

अन् तोही मश्गुल

लेकीच्या अधुऱ्या स्वप्नांच्या कथा ऐकण्यात...

नाईलाजाने शेवटी मीच बदलली कूस....

तिचातरी उडू नये

चंद्रावरचा विश्वास

या कोवळ्या वयात !

 



 

 

 

 

 

 

 


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form