प्रेमसाधना

“प्रेम” शब्द किती लोभस आहे नाही? हा शब्द नुसता उच्चारला तरी काहींना लगेच गुदगुल्या होतात. मला तर वाटतं आपलं इतर कोणापेक्षाही ‘प्रेम’ या शब्दावरच खूप प्रेम असतं. त्याला आपण सगळ्यांनी मखरात बसवलं आहे. प्रेमाच्या अवतीभवती आपण कितीतरी बोलतो आणि फेब्रुवारी महिन्यात तर संपूर्ण वर्षाचं जे काही प्रेम आहे ते आपल्याला व्यक्त करायचं असतं. तसं करावंच लागणार असतं, शास्त्र असतं ते!
पण नक्की प्रेम कशाला म्हणायचं? याचं ठाम उत्तर कोण देवू शकेल? काहींनी मला सांगितलं की जे प्रेम करतात त्यांनाच कळतं.पण आजच्या काळात असं म्हणून कसं आपण गप्प राहणार? असं काहीबाही माझ्या मनात कितीतरी दिवसापासून येत होतं. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली – “प्रेमसाधना” ह्या पुस्तकात. एरिक फ्रॉम यांच्या ‘द आर्ट ऑफ लव्हिंग’ या पुस्तकाचे  शरद नावरे यांनी “प्रेमसाधना” ह्या नावाने रूपांतर केले आहे. संपूर्णपणे भारतीय सांस्कृतिक परिसर विचारात घेवून हा अनुवाद केलेला आहे. या पुस्तकात लेखकाने अनेक हिंदी गीतांच्या ओळींचाही समावेश केला आहे. त्यामुळे ते आपल्या मनापर्यंत सहज पोहचते. या पुस्तकात ‘प्रेम’ हा विषय गंभीरपणे हाताळला असला तरी तो कंटाळवाणा झालेला नाही. त्यामुळे त्यात सांगितलेल्या अनेक गोष्टींशी आपण सहजपणे जोडले जातो आणि विचार करू लागतो. 
हे पुस्तक वाचतांना प्रेमाबद्दल आपले जे समज असतात ते आपल्याला स्पष्टपणे कळतात. आपण सर्वजण ‘प्रेम’ खूप गृहित धरतो. त्याबद्दल लेखक आपले चांगले डोळे उघडतो. खरंतर प्रत्येकजण प्रेमासाठी आसुसलेला असतो, तळमळत असतो पण नक्की प्रेम कशाला म्हणावे या गोंधळामुळे माणूस चॉकलेट आणि भेटकार्ड देवून ते उथळ करून टाकतो. “प्रेम ही कितीतरी व्यापक गोष्ट आहे,ती सहज साधी वरवर वाटणारी क्रिया नाही. प्रेम ही एक कला आहे आणि ती तुम्हाला आत्मसात करावी लागते.” म्हणून स्वत्व व प्रेम करायची क्षमता प्रयत्नपूर्वक जोपासण्याची गरज हे पुस्तक सांगते.
प्रेमाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे हे आपल्याला सगळ्यांना मान्य असते; पण त्यात काही शिकण्यासारखे आहे हे मात्र सुचत नाही. असे का होत असेल - याची कारणमीमांसा या पुस्तकात वाचायला मिळते. मुख्य म्हणजे आपल्याला सगळ्यांना वाटत असते की प्रेम ही ‘करण्याची’ गोष्ट नसून ‘करवून’ घेण्याची गोष्ट आहे. प्रत्येकाला वाटते की आपल्यावर कोणीतरी प्रेम करावे. आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये इतरांवर प्रेम करण्याची क्षमता आहे किंवा नाही हे बऱ्याचदा आपण पडताळून देखील पाहत नाही. इतरांनी मात्र आपल्यावर भरपूर प्रेम करावे यासाठी आपण धडपडत असतो. अर्थात ती धडपड सुद्धा खूपवेळा दिखाऊ असते. काहीजण आपली सत्ता,संपत्ती दाखवतात. काहीजण सुंदर कपडे, सौंदर्यप्रसाधने वापरून ‘आकर्षक’ दिसण्याचा प्रयत्न करतात. इतरांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. लेखक या बाबतीत अनेक उदाहरणे देवून आपला मुद्दा नीट पटवून देतो. त्यामुळे अनेकजण जे प्रेमाच्या मार्गाने चालू इच्छितात त्यांना आपल्या प्रेमाबद्दलच्या कल्पना स्पष्ट व्हायला मदत होऊ शकते. तसेच प्रेमाबद्दलचे आकर्षण वा उदासीनता गांभीर्य वा उच्छृंखलता वगैरे गोष्टी समजण्यासाठी प्रेम आणि लग्न या दोन गोष्टींच्या सबंधाबद्दलदेखील लेखक विचार करायला भाग पाडतो.
शरद नावरे 
जीवनाप्रमाणे प्रेम ही देखील एक कला आहे.ती जर शिकायची असेल,तर ज्ञान आणि व्यवहार यांच्या बरोबर दुर्दम्य इच्छाशक्तीची गरज आहे. तसेच जितक्या घाईघाईने तुम्ही प्रेमात पडाल तितक्याच वेगाने ते ओसरून जाते. परस्परांमध्ये तणाव, कंटाळा आणि नैराश्याची भावना येते. आणि त्यातून विश्वासघाताचे आरोप होऊ लागतात. खरंतर असे प्रेम बऱ्याचदा आधीच्या एकलेपणामुळे निर्माण झालेले असते. यासंदर्भात लेखक युवावर्गाला समोर ठेवून अनेक व्यवहारिक गोष्टी सांगतो. या पुस्तकात वाचकाला लैंगिकता आणि प्रेम याचा काय परस्परसबंध असतो हेसुद्धा समजून घेता येईल. लैंगिकतेबद्दलचे अज्ञान हे अनावश्यक मानसिक ताणांना जन्म देते. या तणावाखाली युवा आपली निरोगी स्व-प्रतिमा सांभाळू शकत नाहीत आणि त्यांच्या व्यक्तीमत्वात तऱ्हेतऱ्हेचे गंड निर्माण होण्याचा धोका संभवतो. म्हणूनच प्रेम नीट समजून घेतले पाहिजे आणि मग ते केले पाहिजे.
पण आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर प्रेम म्हटल्यावर जे वय आणि जे प्रेम येते फक्त त्याबद्दलच हे पुस्तक बोलत नाही. तर ते आईवडिलांचे वात्सल्य, बंधुप्रेम, कामजीवनाशी जोडलेले प्रेम, आत्मप्रेम व ईश्वरावरचे भक्तीपर प्रेम या प्रेमाच्या विविध रूपांचे विवेचन करते. त्यामुळे प्रेम म्हणजे नक्की काय हे समजते.
काळजी घेणे,जबाबदारी स्वीकारणे,सन्मान करणे आणि समजून घेणे हे सर्व प्रेमाचे चार पैलू आहेत. अर्थात या गोष्टी दोन्ही बाजूने आवश्यक आहे. प्रेमाच्या नावाखाली आपल्या जोडीदाराशी कसेही वागणे,त्रास होईल अपमान होईल आणि त्या व्यक्तीला लाज वाटेल असे वागणे प्रेमात येत नाही. संपत्ती आणि तिच्या उत्तान प्रदर्शनाला त्यात वाव नाही. स्वतःच्या मानुष गुणांचा योग्य विकास ज्या व्यक्तीने घडवून आणलेला आहे, स्वतःबद्दल ज्याच्या अवास्तव कल्पना नाहीत, स्वतःच्या आंतरिक सामर्थ्यातूनच सहजगत्या निर्माण होणारी स्वाभाविक नम्रता बोलण्या-चालण्यातून दिसून येते. अशी व्यक्ती साठी प्रेमाची दारे खुली असतात. लेखकाने प्रेमाचे जे चार पैलू सांगितले आहेत त्यात अनेक भारतीय उदाहरणे दिली आहेत. भांडवली व्यवस्था प्रेम आणि अशा अनेक गोष्टींकडे कशी बघते हे सविस्तर सांगितले आहे. त्यामुळे प्रेम ही कितीही वैयक्तिक, खाजगी गोष्ट असली तरी आपण सर्वच कसे त्या व्यवस्थेचे नकळत बळी होत जातो हे लेखकाने सोदाहरण सांगितले आहे.
माणसामाणसातील सुंदर आणि आदर्श नात्याचे वर्णन करण्यासाठी आपण प्रेम शब्द वापरतो. पण शब्दाचे अर्थ व्यक्तीपरत्वे बदलतात.म्हणूनच एखाद्या समाजात वावरणाऱ्या सामान्य माणसांत ही प्रेम करण्याची क्षमता कशी निर्माण होते ? हे समजून घ्यायला हवे. कारण प्रेम ही बाब केवळ एका किंवा काही व्यक्तींपुरती मर्यादित नसून ते सर्व समाजाला व्यापू शकते. असा समाज अस्तित्वात येवू शकतो. अशी लेखकाची विवेकपूर्ण श्रद्धा आहे. प्रेमाच्या वाटेवर चालणाऱ्या आपण सर्वानीच हे पुस्तक मुळातून वाचायला हवे. आणि ज्यांना प्रेमात पडायची घाई आहे त्यांनी दुखापत होण्याआधीच ‘प्रेमसाधना’ करायला हवी. 


अश्विनी बर्वे

लेखिका आणि ब्लॉगर
http://kvdse.blogspot.com/


  

 

 

 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form