
शालेय शिक्षणात पाठ्यपुस्तकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाठ्यपुस्तकांचा साध्य ते साधन हा प्रवास गेल्या काही काळात बराच पूर्ण झाला आहे. पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातूनच अनेक जण आपले अपूर्ण शिक्षण पूर्ण करू शकतात. खरंतर गुरूनंतर पाठ्यपुस्तकेच विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांवर वाचनसंस्कार होण्यासाठी देखील पाठ्यपुस्तके महत्वाची भूमिका निभावतात. विद्यार्थी पुढच्या वर्गात गेले तरी मागील वर्षांची पुस्तकेही त्यांच्या मनात घर करून असतात. अमुक इयत्तेला मला अमुक पुस्तक होते, त्यावरचे मुखपृष्ठ, त्यातल्या कविता, धडे याचीही अगदी प्रेमळ आठवण पुढे कित्येक वर्षे काढली जाते. पाठ्यपुस्तकातून अनेक सांविधानिक मूल्ये शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाऊन भावी नागरिक घडवण्याचे काम ते करत असतात. कदाचित याच उद्देशाने काही वर्षांपूर्वी 'मूल्यशिक्षणा'स शाळेच्या वेळापत्रकात स्थान दिले गेले होते. पाठ्यपुस्तकातही ही मूल्ये असणे अपेक्षित असते. त्या मूल्यांपैकी 'स्त्री-पुरुष समता' या मूल्याचा अभ्यास करताना मुलांकडून अनेक मुद्दे चर्चिले जातात. अनेकदा मुलींना मिळणारी दुय्यम वागणूक त्यातून अधिक स्पष्ट होते. एकाच शाळेत जाणाऱ्या एका घरातल्या बहीण-भावाच्या बाबतीतही नकळतपणे दुजाभाव केला जातो. खेळाच्या सरावाला मुलाला पाठवले जाते; परंतु मुलीला मात्र मज्जाव असतो. मुलांच्या अभ्यासाबाबत जागरूक असलेले पालक मुलींच्या अभ्यासाबाबत मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून वागतात. तेव्हा मला एक शिक्षक म्हणून प्रश्न पडू लागला की शिक्षणामुळे परिस्थिती बदलते म्हणतात, पण सुशिक्षित घरांमध्येही अशीच परिस्थिती असेल तर दोष कोणाचा?

ज्या शिक्षणामुळे माणूस घडतो त्या शिक्षणाचा मुख्य आधार असलेल्या पाठ्यपुस्तकांमध्येच मुलामुलीतला भेदभाव दिसून येत असेल तर सर्वसामान्य घरातील वागणुकीमध्ये वावगे काही असे वाटणारच नाही. पाठ्यपुस्तकांत देखील जर असाच उल्लेख व मजकूर असेल तर नव्याने घडणाऱ्या पिढीत हा लिंगभेद जास्त तीव्र स्वरूप धारण करेल. शिक्षणात पाठ्यपुस्तके ही प्रमाण मानली जातात. पाठ्यपुस्तक मंडळाने विद्यार्थ्यांना सहज आकलन होण्याच्या दृष्टिकोनातून पहिली ते दहावीची पुस्तके रंगीत, चित्रमय व अधिक आकर्षक केली आहेत ही बाब खरंच अभिनंदनीय आहे. पुस्तकात शब्दांच्या बरोबरीने चित्रेही महत्त्वाची असतात. एक चित्र हजार शब्दांचे काम करते असे म्हणतात. पाठ्यपुस्तकातून आदर्श चित्रे समोर आल्यास त्याचा नक्कीच पुढील पिढीवर सकारात्मक परिणाम होईल असे वाटते. पण ही पाठ्यपुस्तके सहज चाळली तरी जवळपास 80 टक्के चित्रे ही मुलग्यांची दिसून येतात. अशा चित्रमय पुस्तकांतून विद्यार्थ्यांना काय आकलन होईल? त्यांच्या मनावर काय परिणाम होईल?
उदाहरणादाखल प्रथम भाषा मराठी असलेल्या इयत्ता सातवीच्या पुस्तकाचा आढावा घेऊया. ह्या पुस्तकामध्येही जास्तीत जास्त चित्रे मुलांचीच आहेत. 'स्वप्न विकणारा माणूस' या पाठांतर्गत चित्रात स्वप्न विकणाऱ्याच्या भोवती बहुतांश पुरुषच आहेत.(अपवाद एका स्त्रीचा अर्धवट दिसणार चेहरा ) याच पाठाच्या सुरुवातीला “तुम्ही काय कराल” ह्या भागात तिन्ही चित्रे पुरुषांचीच आहेत. त्या चित्राखाली लिहिले आहे - 'तुम्ही चांगले धावपटू आहात. शाळेच्या क्रीडासंमेलनात धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवायचे, हे तुमचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण होण्याकरता तुम्ही कोणते प्रयत्न कराल?'. हे वाचून एक मुलगी म्हणाली, "बाई, खेळाडू होण्याचं आमचं स्वप्न असू शकत नाही का? आमच्या शाळेचे त्यामुळे नाव होणार नाही का? आणि तसे असेल तर चित्रांमध्ये फक्त मुलेच का? आपल्या कोमलताईने(कोमल देवकर) तर शिवछत्रपती हा मोलाचा क्रीडा पुरस्कार मिळवून आपल्या शाळेचेही नाव उंचावले आहे. असे असताना या चित्रात तीनही मुलगेच कसे?" या प्रश्नाला काय उत्तर द्यायचे हे अजूनही माझ्या लक्षात आलेले नाही!

इयत्ता सहावी नागरिकशास्त्रातील पाठात पुरुष पोलीस अधीक्षक सर्व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करत आहेत, असे चित्र आहे. खरंतर पुस्तकातील चित्रे पाहूनही अनेक मुले भविष्यातील ठोकताळे बांधत असतात. अशीच एक रेल्वेपोलीस म्हणून सेवेत असणारी विद्यार्थिनी एका कार्यक्रमानिमित्त शाळेत आली होती. तेव्हा ती पटकन म्हणाली की, “बाई, आताही पुस्तकात पोलिसाच्या वेषात पुरुषच असतील तर हे क्षेत्र खऱ्या अर्थाने मुलांचेच आहे - हा सगळ्यांचा गैरसमज पक्का होऊ शकतो.” ही खंत व्यक्त करत असताना स्वतःच्या यशाला असलेली दुःखाची किनार तिला लपवता आली नाही. ती म्हणाली की, “कबड्डी खेळाडू म्हणून पोलीस सेवेत प्रवेश सोपा झाला. पण माझ्या जीवनात साथीदाराचा प्रवेश मात्र सोपा नाही असे वाटते. एक खेळाडू मुलगी आणि वर ती पोलीस ही गोष्ट लग्नाळू मुलांना पचत नाही. त्यामुळे माझ्याशी लग्न करायला कोणी तयार होत नाही.” ते ऐकून खूपच वाईट वाटले.
याच पाठासोबत दिलेल्या व्याकरणाच्या अभ्यासात जी वाक्ये दिली आहेत त्यातली ही वाक्ये पहा –
रेश्मा पालीला घाबरते.
रवी पालीला मारतो.
या आणि अशा वाक्यांतून समाजातल्या साचेबंद लिंगभेदी प्रतिमाच दृढ होण्याची शक्यता वाढते.
सातवीच्या जुन्या मराठी पुस्तकात 'डोंगरी शेत' या कवितेतील स्त्री शेतातील सर्व कामे करताना दाखवली आहे. ही कामे करताना तिचा जीव दमला आहे. तिला ती सगळी कामे झेपत नाहीत. पण तरी ती करत रहाते. याचा अर्थ स्त्रियांनी जमणारी, न जमणारी सगळी कामे केली पाहिजेतच असा देखील होऊ शकतो. अशावेळी शिक्षक त्याचा कसा अर्थ लावून सांगतात, कशी चर्चा घडवून आणतात, यावर बरंच काही अवलंबून राहते. ही कविता शिकवत असताना शेतात राबणाऱ्या बाईसंदर्भात चर्चा रंगात आली होती आणि त्याच वेळी एका सिनेमाचा उल्लेख एका मुलाने केला. 'सैराट' नावाचा मराठी सिनेमा चित्रपट त्या काळात तरुणाईमध्ये धुमाकूळ घालत होता व चित्रपटातील नायिका धीट असल्यावरून तीही बहुचर्चित होती. ट्रॅक्टर घेऊन ती शेतात जाते, बुलेट चालवते तर मग शहरातील मुलीपण हे करू शकतात ना? हा मुलींचा भाबडा प्रश्न होता. त्या अनुषंगाने अधिक चर्चा होऊ लागली. आणि गावातली स्त्रीपण आर्चीसारखी दाखवली गेली तर किती छान असे सगळेच म्हणाले. शिवाय चित्रपटातील दोन तरुणांचे निर्णय कसे चुकीचे होते यावरही त्यांचे एकमत झाले. या सर्व चर्वितचर्वणानंतर कवितेतील बाई व वास्तवातील बाई वेगळी नाही असे सर्वांचे मत झाले.
पण वास्तवात जरी अनेकदा महिला घराबाहेर काम करताना आपण पहात असलो तरी पुस्तकात मात्र महिला घरातली कामे करतानाच दाखवली जातात आणि घराबाहेरच्या सार्वजनिक ठिकाणी पुरुष, मुलगे दाखवले जातात. उदा. सातवीच्याच पुस्तकात 53-54 पानांवर इतकी चित्रे आहेत. त्यात सार्वजनिक ठिकाणांच्या ह्या चित्रात एखादी तरी महिला दिसते का? पाठ्यपुस्तकांच्या चित्रांचे चित्रकार दोन-तीन अपवाद सोडल्यास तिथेही पुरुष चित्रकारांचीच संख्या जास्त असते. महिलांची चित्रे पाठपुस्तकांत कमी असण्याचे हे देखील कारण असेल का?
वर्गात खरं तर मुलगा-मुलगी भेदभाव याबाबत अशी चर्चा बऱ्याच वेळा होते. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एकाच घरातील बहीण-भावाचा दिनक्रमही कसा वेगळा असतो आणि शिकवत असताना पाठ्यपुस्तकातही असाच उल्लेख येतो, तेव्हा मात्र मुलींना खात्रीच पटते की आपले आणि मुलांचे जीवन हे पूर्णतः वेगळे आहे.
मराठी धडे व कविता याशिवाय विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार करण्यासाठी 'विचारधन' विभागाचा पाठ्यपुस्तकात अंतर्भाव आहे. इयत्ता पाचवी ते आठवीच्या मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये सगळे 'विचारधन' हे महापुरुषांचे आहे ! अनेक स्त्रियानी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. तरीही महान विचार असणारी एकही स्त्री पाठ्यपुस्तक मंडळाला सापडली नाही याचे आश्चर्य वाटते. हीच गोष्ट पाठांच्या लेखकांबाबतही दिसते. सातवीच्या मराठीच्या पुस्तकाची अनुक्रमणिका पाहिली तर 21 पैकी 6 पाठ स्त्रियांनी लिहिले आहेत. ‘थोरांची ओळख - डॉ. खानखोजे’ हा पाठ वीणा गवाणकर यांच्या ‘डॉ. खानखोजे - नाही चिरा.. ’ ह्या पुस्तकातला उतारा असला तरी अनुक्रमणिकेत पाठाच्या लेखिकेचे नावच न लिहिल्यामुळे ‘थोरांची ओळख’ हा पाठ डॉ. खानखोजे यानी लिहिला आहे असा गैरसमज होऊ शकतो. इयत्ता आठवीच्या पुस्तकात १४ पैकी ४ लेखिका आहेत; इयत्ता नववी च्या पुस्तकात१८ पैकी ६ आणि दहावीच्या पुस्तकात १६ पैकी २ लेखिका आहेत. आठवी ते दहावीच्या प्रथम भाषा मराठीत 'काही पूरक पुस्तके व संदर्भ ग्रंथ’ यांच्या यादीतही स्त्री साहित्यिकांना जेमतेम स्थान आहे. पाठ्यपुस्तक मंडळ अभ्यासगट, तज्ज्ञ समिती यातील सदस्यांबाबतही स्थिती वेगळी नाही. जरी ‘स्त्री-पुरुष समता’ हे एक महत्त्वाचे मूल्य मानले जात असले तरीही आपल्यावरच्या विषमतेच्या संस्कारांना आपण मोठ्यामाणसांनीच अजून पूर्णत: पुसून काढलेले नाही. त्यामुळे अनेकदा आपल्यात रुजलेली विषमता आपल्या नकळत काम करते, तसेच पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीच्या बाबतीत होत असावे.
आता ही पहिलीतीलच कविता पहा - ‘आई मला दे ना’
मुलं आईकडे काय काय वस्तू मागतात, ते कवितेत सांगितले आहे. खरंतर ही कविता शिकवताना मुलगा किंवा मुलगी आपापल्या आवडीची कुठलीही कामं मोकळेपणाने करू शकतात, अशी शिकवण देता येणे सहज शक्य आहे. पण कवितेचे शब्द आणि सोबतची चित्रे दोन्हींचा ताळमेळ घातला तर काय दिसते आहे? ‘आई मला छोटीशी बंदूक दे ना, बंदूक घेईन शिपाई होईन’ असे मुलगा म्हणतो आणि मुलगी काय करेल? तर ती बाहुलीला सजवून तिच्या बरोबर खेळत राहील! बंदुकीशी खेळणारी मुलगी आणि बाहुलीशी खेळणारा मुलगा शालेय पुस्तकातल्या चित्रात दिसावा ही फारच जास्त अपेक्षा आहे का?
एकीकडे पालक आणि शिक्षक दोघांनीही ‘स्त्री-पुरुष समते’ चे मूल्य अंगिकारायला पाहिजे आहे. त्याच बरोबर पाठ्यपुस्तकातले शब्द आणि चित्रेसुद्धा समतेच्या जाणिवेला पूरक असली पाहिजेत. पाठ्यपुस्तकांनी एकूण मजकूर व आकर्षकता याबाबतीत कात टाकली आहे. आता लिंगभेदाच्या बाबतीतही अधिक जागरूकता बाळगली तर ती आदर्श ठरतील हे नक्की!
राजश्री साळगे
शिक्षिका, नंदादीप विद्यालय, गोरेगाव, मुंबई.
सम्यकसंदेश मासिकात पुस्तकपरिचय,
‘मैत्री पुस्तकाशी’ ह्या युट्यूबचॅनलच्या माध्यमातून
शालेय विद्यार्थ्यांसाठी पुस्तक परिचय व अभिवाचन