आश्वासक चित्र

गेली पाच-सहा वर्षे मी इयत्ता दहावीला मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कवयित्री 'नीरजा 'यांची 'आश्वासक चित्र' ही कविता शिकवते. मुलाचं चेंडू खेळणे ,मुलीचं भातुकली खेळणं, बाहुलीला झोपवणं आणि त्याच सफाईनं चेंडू उंच उडवून झेलणं. मुलाला मात्र दोन्ही गोष्टी एकदम करताना करावी लागणारी कसरत ,पण मुलगाही प्रयत्न करतो- एकाच वेळी बाहुलीला सांभाळणं आणि स्वयंपाक करणं ही कौशल्य साधण्याचा !
शेवटी नीरजा म्हणतात -
"हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. 
माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं 
जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र.
भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही 
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं." 

मी या कवितेचे अभिवाचन करते आणि मग त्यावर काही सूचक प्रश्न विचारून चर्चा घडवून आणते. पहिला प्रश्न असतो- ' तुम्ही घरात कोण कोणती कामं करता? प्रश्न मुलगे आणि मुली दोघांसाठीही असतो. सुरुवातीची दोन-तीन वर्षे या प्रश्नाची उत्तरे ठराविक होती. मुली घरातली जवळपास सगळीच कामं करतात. पाणी भरणे, झाडलोट, भांडी घासणे, कपडे धुणे, स्वयंपाक करणे सगळीच कामे मुली करतात. मुलं सांगत - मी दुकानावरून काही आणून द्यायचं असेल तर आणून देतो. क्वचित कोणी मुलगा दळण आणतो आणि चहा करता येतो. गेल्या दोन-तीन वर्षात मात्र ही परिस्थिती बदललेली दिसते. वर्गातल्या वीस-बावीस मुलांपैकी जवळजवळ सतरा-अठरा मुलांना बेसिक स्वयंपाक येतो. मुलं पाणी भरतात, आई कामाला गेल्यावर शाळेत येण्याआधी घर झाडतात, धाकट्या भावंडांना जेवण वाढतात. हे बदललेलं आश्वासक चित्र काही प्रमाणात तरी सुखकर वाटतं. याचा अर्थ सगळं चित्र बदललेलं आहे का? तर अजिबात नाही.

मुलींची शिकण्याची वाट अजूनही म्हणावी तेवढी सोपी नाही .कौटुंबिक अडचणी, आर्थिक समस्या उभी राहिली तर पहिली गदा येते मुलींच्या शिक्षणावर. घरातलं कोणाचं आजारपण, पाहुणे येणार असतील तर, आईला कामात मदत करण्यासाठी, आई कुठे कामाला किंवा बाहेरगावी गेली तर धाकटे भावंड सांभाळणं अशा वेळी शाळा बुडवून मुलींनी घरी राहणे गृहीत धरलं जातं .मुलगी लहान असो की मोठी तिच्यावर त्या जबाबदारीचं ओझं तिच्या संमतीशिवाय येऊन पडतं. 
तिसरी -चौथी मधल्या मुलींना आईच्या अनुपस्थितीत जेवण बनवायला घरी राहावं लागतं हे आम्ही बघतो. चौथीत असलेल्या स्वप्नाला आणि तिच्यापेक्षा एखाद्या वर्षांनी लहान असलेल्या भावाला चौदा पंधरा वर्षांच्या 'काका’च्या भरवशावर सोडून आई उत्तर प्रदेशातल्या गावी गेली होती. एकदा तिच्या हातावर मोठी भाजल्याची खूण दिसली . काय झालं हे विचारल्यावर त्या चिमुरडीने सांगितले , " चाचा रोटी बनाता है, और मै सेकती हुं, मै रोटी सेक रही थी तब ये हुआ" हीच स्वप्ना दहावीत असताना आई तिचं लग्न करण्याच्या गोष्टी करायला लागली होती. नेहमी हसती खेळती स्वप्ना वर्गात शांत बसायला लागली तेव्हा ही गोष्ट आम्हाला कळली .स्वप्नाची आई खरं तर खूप अॅक्टिव्ह पालक. तिला मी आमच्या शाळेची ब्रँड अँबेसिडर म्हणते. कारण कोणतंही इतर प्रांतीय कुटुंब आलं की त्या मुलांना पालकांना ती स्वतः शाळेत घेऊन येते. ' बच्चों को अच्छा सिखाते है, इधरही डालना' वगैरे शिफारस करते. तिच्या डोक्यात स्वप्नाची शादी करायचं वेड आलं होतं आणि म्हणून सपना उदास झाली होती. अभ्यास, खेळ सगळ्यात हुशार असलेल्या स्वप्नाला पुढे शिकायचं होतं. मग तिच्या आईला एक दिवस शाळेत बोलावून घेतलं. अठरा वर्षांपूर्वी मुलीचे लग्न करणे हा गुन्हा आहे. स्वप्ना हुशार आहे, ती शिकली तर तुम्हाला तिचा अभिमान वाटेल ,आधार होईल हे समजावून सांगितलं. तिचं म्हणणं होतं, " हमारे यहा बिरादरीवाले बोलते है की लडकी 15 बरस की हो गई तो भी शादी करनी चाहिए, पढके क्या करेगी ?" हे बिरादरीवाले नंतर स्वप्नाच्या आयुष्यातलं भलंबुरं पाहायला येणार नाहीत, हे तिला पटवून दिलं. तुम्ही सांगताय ते बरोबर आहे असं तिने कबूल केलं; तरी भरवसा नव्हता खरं तर, पण स्वप्ना यावर्षी बारावी पास झाली आणि ती पुढे शिकणार म्हणते आहे!
शाळेच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे वीसेक वर्षांपूर्वी तर आमच्या शाळेत येणारी मुले मुली अगदी ग्रामीण भागातली होते. जवळपास सगळीच दहावीपर्यंत शिकणारी पहिली पिढी होती. तेव्हा हर्षलानी आमच्या शाळेत आठवीत प्रवेश घेतला. मूळच्याच स्मार्ट असलेल्या हर्षलाच्या अभ्यास, वक्तृत्व ,लेखन या गुणांना शाळेत छान पैलू पडले. तिने अलिबागमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि तेव्हा तिच्या मनात पत्रकारितेच्या शिक्षणाबद्दल आकर्षण निर्माण झालं . फारसं न शिकलेल्या, बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या हर्षलाच्या आई-वडिलांनी मुलीवर विश्वास आणि आमच्यावर भरवसा ठेवला. हर्षदाला पुण्याच्या रानडे इन्स्टिट्युट या नामवंत कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. कुरूळसारख्या छोट्याशा खेड्यातून पुण्यात जाऊन हर्षलाने जिद्दीने पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं. गेली चौदा-पंधरा वर्षे हर्षला राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या केंद्र सरकार अंगीकृत कंपनीत पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून उत्तम काम करते आहे.

अशाच आर्थिक, शैक्षणिक पार्श्वभूमीमधून पुढे जाऊन प्रेरणा आणि प्रणाली या भगिनी इंजिनियर होऊन चांगल्या कंपन्यांमध्ये काम करतायत. स्मिता ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात तर प्रतीक्षा नवी मुंबईत मोठ्या खाजगी रुग्णालयात सीनियर नर्स म्हणून काम करत आहेत. विद्या हैदराबादमध्ये कॉम्प्युटर इंजिनियर आहे.

या झाल्या काही यशोगाथा. पण सगळ्याच मुलींचे अनुभव असे आहेत का? तर दुर्दैवाने याचे उत्तर 'नाही' असे आहे.

शाळेत नवीन प्रवेश चालू होते . एक आई मुलांना घेऊन आली होती. आठवीतला मुलगा आणि पाचवीतली मुलगी. दोन्ही मुलं छान चुणचुणीत. मुलांनी दाखले, नोंदपुस्तिका मागवून घेण्यासाठी तिकडच्या शिक्षकांचा मोबाईल नंबर , शाळेचा पत्ता अगदी व्यवस्थित सांगितला. यवतमाळ जवळच्या एका आश्रमशाळेत दोन्ही मुलं शिकत होती. प्रवेश अर्ज भरताना मी मुलांच्या आईला विचारलं की एवढ्या लांब कशा आलात?

जुनाट , मळकी साडी नेसलेली , काळ्यासावळ्या रंगाची , गळ्यात साधी काळी पोत घातलेली ती बाई तेवढंच विचारल्यावर भडाभडा बोलायला लागली. "काय करणार बाई, सहा वर्षांपूर्वी नवरा गेला. या दोन पोरांना तिकडे शाळेत ठेवलं होतं. पन म्या इकडं काम करते. मला तिकडं जायला जमत न्हाई. तवा आनली इकडं. या वर्शी म्होठ्या पोरीचं लगीन लावून दिलं.’’

" केवढी आहे मोठी पोरगी ? " मी विचारलं.

" दहावी पास झाली बगा. यावर्षी अकरावीत गेली असती"

" अहो, पण एवढ्या लहान वयात कसं लग्न करून दिलंत ? अठरा वर्षाची होईपर्यंत मुलीचं लग्न करता येत नाही कायद्याने ." आता सांगून काही उपयोग नाही हे कळूनही मी सांगितलं.

" काय करायचं बाई , जग चांगलं न्हाई हो . म्या एकटी बाई .कामामागं फिरनार. वयात आलेली पोरगी कुटं ठेवायची सांगा ? करून दिलं लग्न. नणंदेच्या पोरालाच दिली. माज्या जीवाचा घोर गेला बाई ! "

यावर मी काहीही बोलू शकले नाही. शिक्षणाच्या प्रवाहातून मुली अशाही बाजूला होतात.

7,8 वर्षांपूर्वी चुणचुणीत सविता शाळेत आली. आईवडील नाहीत म्हणून बहिणीकडे राहात होती. सविता नववीत गेली आणि शाळेत येईना म्हणून चौकशी केली तर तिचं लग्न करून दिलंय असं कळलं. नंतर तिच्या वर्गातल्या मुली तिचा सासरी खूप छळ होतो असं सांगायला लागल्या. आमचा मात्र तिच्याशी काहीच संपर्क झाला नाही. पुस्तकं वाचायला आसुसलेली सविता, '१५ ऑगस्टला माझा वाढदिवस असतो, पण मला कोण नवा ड्रेस घेणार? असं म्हणणारी सविता, नवा ड्रेस घेऊन दिल्यावर चेहऱ्यावर निखळ हसू घेऊन दिवसभर शाळेत बागडणारी सविता, नजरानजर झाली की शब्दांशिवाय भावुक डोळ्यांनी बोलणारी सविता .... काय करत असेल आता? संसाराचं ओझं वाहत असेल? कामाच्या ओझ्याखाली पिचली असेल? नवऱ्याचा मार, छळ सहन करत निमुटपणे आसवं गाळत असेल? आणि या सगळ्याबद्दल तक्रार तरी कोणाकडे करेल तो अगतिक जीव? आम्ही काहीच करू शकलो नाही, या हतबलतेची, असहायतेची टोचणी मनाला सतत बोचत राहते. सविताच्या आठवणीने डोळे भरून येत राहतात.

शाळेच्या प्रवासातल्या सगळ्याच गोष्टी काही सुंदर, यशाच्या, उमलत्या फुलांच्या नाहीत. काही अशा आमच्या अपयशाच्या, मनाला कायम टोचणी लावणाऱ्याही आहेत. पण आमच्या या अपयशाने एका कळीचं फुलणं खुरटलं, एक कोवळं आयुष्य अकाली करपलं याची खंत कधीच पुसली जाणार नाहीये.

या सगळ्या मुलींचा प्रवास सोपा नव्हताच. प्रत्येकीचा स्वतःचा संघर्ष होता, आहे. पण मुलींच्या अंगातच झगडण्याची ताकद असते असं मला वाटतं. प्राथमिक, माध्यमिक शाळेत शिकवणाऱ्या कोणत्याही शिक्षकांना विचारलं तर बहुसंख्य शिक्षक सांगतील, इतक्या अडचणींवर मात करूनही शालेय शिक्षण आणि पूरक उपक्रम यात मुली अग्रेसर असतात.
काही मुली वर लिहिलंय त्या रूढार्थाने यशस्वी झाल्या. पण सगळ्याच जणी यशस्वी झाल्या नसतील किंबहुना एका यशस्वी कहाणीमागे एक अपयशाची कहाणी असेही प्रमाण असेल. पण तरीही मुली हरत नाहीत, त्या जिद्दीने आयुष्यभर कष्ट करतात ,जमेल आणि सुचेल त्या मार्गांनी संसार, जगणं सुंदर होईल यासाठी प्रयत्न करतात आणि आपल्या मुलांना मात्र चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आग्रही असतात. कधी तरी कुठे तरी भेटतात, तेव्हा शाळेतल्या दिवसांबद्दल भरभरून बोलतात आणि कडेवर हाताशी मूल असेल तर त्यांना कौतुकाने सांगतात," आमच्या मॅडम बरं का या! त्यांच्यामुळे आम्ही घडलो !" त्यावेळी मुलींच्या कौतुकाने मन आणि डोळे भरून येतात.

सुजाता पाटील, 

मुख्याध्यापिका, 
सु.ए.सो माध्यमिक विद्यालय, 
कुरूळ - अलिबाग.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form