लव जिहाद- खुळाला कायदा म्हणण्याची चढाओढ


“लवजिहाद” नावाचं एक नवीन खूळ बीजेपी आणि त्यांच्या समर्थकांना मिळालेलं दिसतं आहे. मुळात ह्या विषयाची सुरवात काही वर्षांअगोदरच झाली आहे. पण त्या मुद्द्यावर येण्याआधी ‘लव जिहाद’चा मुद्दा आत्ता चर्चेत का आहे - ते पाहू या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ह्यांनी ह्या विरोधात नुसता वटहुकूम आणला नाही तर तो तिथल्या राज्यपाल आनंदीबेन पटेल ह्यांच्या संमतीसाठी पाठवून त्याचा कायदा बनवला सुद्धा!'बेकायदा धर्मांतरविरोधी कायदा २०२०' असे या कायद्याचे नाव आहे. सध्या ह्या कायद्याच्या बारीक सारीक कायदेशीर कंगो-यात जायची गरज नाही. तूर्तास आपण हे समजून घ्यायला हवं की हा कायदा कसा संविधान विरोधी आणि महिला विरोधी आहे. हा कायदा लग्न करणा-या जोडप्यांच्या मूलभूत हक्कांची नुसती पायमल्ली करत नाही तर त्यांच्यावर भावनीक अत्याचार सुद्धा करतो.
ह्या कायद्याला जरी ‘लवजिहाद विरोधी कायदा’ अशी संज्ञा दिली असली तरी मुळात हा कायदा धर्मांतराच्या विरोधी पूर्वग्रह असणाऱ्या राजकीय व्यवस्थेची प्रगट अभिव्यक्ती वाटते. हरियाणामध्ये काही दिवसांपुर्वी एका हिंदू मुलीची एका मुस्लिम मुलाने लग्नाला मना केलं म्हणून हत्या केली. ह्या घटनेला राजकीय पुरस्कृत ट्रोल्सनी एका व्यक्तीच्या चुकीच्या कृतीला त्याच्या धर्माशी जोडलं आणि लव जिहादच्या विरोधात कायदा व्हावा अशी मागणी मुख्यधारेतली माध्यमं आणि सामाजिक माध्यमं ह्यांच्या मार्फत होऊ लागली. मुळात कोणाच्याही धार्मिक आणि व्यक्तीगत स्वातंत्र्यावर गदा आणणं हेच संविधानविरोधी आहे. आर्टिकल 21 ची ती पायमल्ली आहे. एवढंच नव्हे राज्य सरकारांनी बनवलेला कुठलाही असा कायदा जो ह्या हक्कांची पायमल्ली करतो तो सर्वोच्च न्यायालय जे सांविधानिक न्यायालय आहे तिथे घटनाबाह्यच ठरवला जाईल.
ह्या लव जिहाद कायद्याच्या  तीन बाजु आहेत - एक आहे व्यक्तीगत, दुसरी राजकीय आणि तिसरी पहिल्या दोघांशी मेळ साधणारी आहे ती म्हणजे धार्मिक.
हिंदुत्ववादी प्रचाराचा नमुना 
सर्वप्रथम लोकांकडुन जोडीदार निवडण्याचा अधिकार हिरावुन घेणं म्हणजे वर नमुद केल्याप्रमाणे आर्टिकल 21 ची पायमल्ली आहे. दुसरी गोष्ट अशी की आता राजकीय मुख्यधारेत आलेले जे भारतातील मूलतत्ववादी आहेत त्यांचं असं म्हणणं असतं की मुस्लिम मुलांनी हिंदु मुलींवर जबरदस्ती करुन केलेलं लग्न आणि त्यानंतर झालेलं धर्मांतर हे रोखण्यासाठी हा कायदा गरजेचा आहे. मुळात जबरदस्ती कोणतीही वाईटच. जबरदस्तीचं लग्न आणि धर्मांतराच्या घटनांविरुद्ध लढायला सध्या अनेक कायदे उपलब्ध आहेत. शिंकण्याने करोना होत असेल तर प्रत्येकाने मास्क घालावे का शिंकण्यावर आणि नाक शिंकरण्यावरच बंदी आणावी? नेमका हाच तर्क इथे लागु होतो. आणि पुन्हा अनेक मुस्लिम मुली सुद्धा प्रेमापोटी, स्वेच्छेने हिंदु मुलांबरोबर लग्न करतातच. मग त्याला काय म्हणायचं?
‘लव्ह जिहाद’ कायदा मुस्लिमविरोधी सुद्धा आहे! कारण ह्या कायद्याचा मसुद्याचे बारकावे बघीतले तर ही धर्मांतरबंदी कायद्याचीच एक विस्तारीत आवृत्ती भासते. मुळात जिहादचा खरा अर्थ लढाई असा होतो. ही लढाई दुर्गुणांशी असते आणि वाईटाशी असते. पण ह्या शब्दाला इतका आतंकवादाशी जोडला गेला आहे की ह्यातुन आंतरधर्मीय लग्नांना विरोध आणि मुस्लिम धर्मीयांविषयी दुर्भावना हे दोन्ही ही पसरवलं जातंय. प्रेमात कसला आलाय जिहाद? प्रेम हे खुप निरागस असतं. इथे जिहाद किंवा लढा समोरच्याचं हृदय जिंकण्याचाच असतो. बाकी काय असतो तो अभिनिवेष!
आता इस्लामच्या चष्म्यातून जर ह्या विषयाकडे पाहिलं तर असं लक्षात येईल की इस्लाम धर्मात लग्नाकडे खुप निष्पक्ष पद्धतीने पाहिलं आहे. लग्न हा दोन व्यक्तींमधला करार आहे. ह्यात तिस-याचा कुठेच उल्लेख नाही. शिवाय इस्लाम धर्माने पहिल्यांदा घटस्फोटाची मुभा स्त्री आणि पुरुष ह्या दोघांना ही दिली आहे. प्रेषित मुहम्मद ह्यांच्या आयुष्यात घडलेली घटना - एक तरुण विवाहीत मुलगी त्यांच्याकडे आली आणि ती म्हणाली की माझं लग्न माझ्या मर्जीशिवाय झालं आहे. तेव्हा लागलीच ते तिला म्हणाले की मी तुझा घटस्फोट घडवुन आणतो. इस्लाम बाहेरील मुलींशी जबरदस्ती लग्न करायला इस्लाम मध्येच धार्मिक मान्यता आहे - असं खोटं जे पसरवत आहेत, त्या सगळ्यांना हे उदाहरण चपराक आहे ! प्रेषितांनी स्वत: हजरत खदिजा नावाच्या आणि त्यांच्यापेक्षा साधारण पंधरा वर्ष मोठ्या असणा-या विधवा महिलेशी लग्न केलं होतं. शिवाय मुलीकडच्यांनी लग्नात एक पै देखील खर्च करु नये असा देखील इस्लाम मध्ये नियम आहे. शिवाय मुलाकडुन मेहेर स्वरुपात काही रक्कम मुलीकडे सुपुर्द केली जाते!
जी विचारसरणी आपल्या धारणे अथवा अवधारणेपोटी अख्खा कायदा बदलु पाहत आहे, तीच मुळात अत्यंत जुनाट आणि पुराणमतवादी आहे. मी कोणाशी लग्न करायचं हा माझा व्यक्तीगत प्रश्न आहे, त्यात बाहेरच्यांची सोडा घरच्यांशी सुद्धा लुडबुड होऊ नये. ही व्यक्तीगत बाजू जशी पुरुषांची आहे तशीच स्त्रीयांची सुद्धा आहे. आपली घटना पुरुष-स्त्री दोघांना समान अधिकार देतं. असं जर असेल तर मग ‘हिंदु’ स्त्रीयांना वाचवण्याचा अभिनिवेष आणून जर कोणता कायदा होत असेल तर पुरुषसत्ताक राजसत्ताच स्त्रीयांना वाचवु शकते अशा प्रकारचा हा दावा आहे. 
म्हणून ‘लवजिहाद कायदा’ हा कुठल्याही सामाजीक बदलाच्या इच्छेने प्रेरित झाला नसून फक्त आणि फक्त राजकीय फलीतं समोर ठेऊनच बनवला गेला आहे. समाजामध्ये विघटन करणा-या  - मंदीर निर्माण, CAA सारख्या विषयांमध्ये ह्या कायद्याची अजून एक भर पडली आहे. उजव्या विचारांच्या बाजारु गावगुंडाना अजून एक कायदेशीर हत्यार मिळाल्यात जमा आहे. अर्थकारण, रोजगार आणि अशा अनेक सामान्य लोकांच्या मुद्यावर आलेलं अपयश लपवण्यासाठी केलला हा फुकाचा राजकीय प्रपंच आहे. कोणताही धर्म सर्वसाधारणपणे आदर्शवादाची शिकवण देत असतो. पण लोक त्यांच्या मनाप्रमाणे वागत असतात. आणि म्हणुन राजकारण आणि धर्माची सरमिसळ ही घातक आहे. कायदा हा सर्व जनतेचा भल्याचा दृष्टीने लिहीला जायला पाहिजे. त्यात अमुक धर्म तमुकवर कसा वरचढ; अशी चढाओढ असूच शकत नाही. उद्याच्या भारतातले तरुणतरुणी खुलेपणाने श्वास घेत आपली स्वप्न साकार करु इच्छीतात. ह्यात कुबट धर्मांधतेला काही थारा असता कामा नाही!

केतन वैद्य 

वरिष्ठ पत्रकार आणि संस्थापक, केवीकॉम





Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form