पद्माकर देशपांडे


गेला आठवडाभर आपण विविध व्यवसायात काम करणाऱ्या आणि वेगवेगळ्या वयोगटातल्या पुरूषांचे लॉकडाऊनच्या काळातले अनुभव  जाणून घेत आहोत. आता पर्यंतचे सगळे लेखक मुंबईत राहणारे होते. आज आपण नाशिक आणि जालना या दोन शहरांमधल्या पुरूषांचे अनुभव समजून घेऊया. पद्माकर देशपांडे हे नाशिकच्या 'तरुण भारत' चे संपादक आहेत आणि नीलेश बोदले हा जालन्यातला तरुण रंगकर्मी आहे. भौगोलिक फरकाखेरीज या दोघांच्या वयात, अनुभवात आणि विचारातही काही फरक  जाणवतोय का हे इतर अनुभवांशी जरूर पडताळून पहा. 
या दोन अनुभवांच्या सोबत लॉकडाउन विषयीच्या पुरुषांच्या अनुभवांची मालिका इथे थांबवत आहे. पण उद्यापासून 'पुरुषभान' ह्या विषयसूत्राच्या अंतर्गत आणखी काही लेख, कविता आणि पुस्तकपरिचय  - असं बरंच साहित्य वाचायला मिळणार आहे! 

आठवडाभरात प्रकाशित झालेले सर्व अनुभव शेजारच्या कॉलम मध्ये 'नोव्हेंबर 2020' ह्या लेबलवर क्लिक करून वाचता येतील. 

नीलेश बोदले 
लॉकडाउनच्या काही दिवस आधीच मी मुंबईहून माझ्या मूळ गावी जालन्याला आलो होतो. नाटकं, शूटिंग सगळंच बंद झाल्यामुळे माझं कामही थांबलं होतं. मला घरातून काम करणं शक्यच नव्हतं. मला घरात राहायला आवडतं. कारण मला घरात जेवढं comfortable वाटत तेवढं कुठेच वाटत नाही. त्यामुळे मला लॉकडाउनमध्ये घरात राहण्याचा फार त्रास झाला नाही किंवा चिडचिड झाली नाही. मी मुंबईत असतानाही दररोज बाहेर पडणं नसायचं. जेव्हा नाटकाचे दौरे किंवा ऑडिशन्स असतील तेव्हाच बाहेर पडायचो. पण काही दिवसानंतर ह्या सगळ्या गोष्टीची कमतरता जाणवायला लागली. पण नंतर इंटरनेटवर अनेक फिल्म्स सहज मिळत असल्यामुळे त्याचीही गरज वाटली नाही. वाचन केलं. चित्रपट, वेब सिरीज बघितल्या. अभिनयाच्या ऑनलाईन कार्यशाळेत सहभाग घेतला. याच काळात tv वर रामायण महाभारत सुरू झालेलं. मी ते याआधी कधीच बघितलं नव्हतं. त्यामुळे दररोज न चुकता आम्ही घरातले सर्वजण एकत्र बसून मालिका बघायचो. ह्या सगळ्यांसोबत घरातल्या कामांची जोड होतीच. त्या कामांची यादी केली तर त्यावरच एक लेख होईल.
आई आजारी असल्यामुळे मी तिची काळजी घेत होतो. मी जर मुंबईत असतो तर तिच्या आजारासोबतच तिला माझीही काळजी वाटली असती. मी घरी आल्यामुळे तिला मानसिक आधार मिळाला. घरकामातही मदत झाली. मुंबईत बॅचलर लाईफ जगत असल्यामुळे घरकामाच्या बाबतीत फारसा फरक पडला नाही. जी कामं मी तिकडे करत होतो तीच कामं घरी पण केली. पण काही काळानंतर ह्या कामाचा कंटाळाही आला. घरातील कामं संपता संपत नाहीत. मला सतत एकच प्रकारचं काम दररोज करायचा फार कंटाळा येतो. पण लॉकडाउनमध्ये मला एक गोष्ट जाणवली की माझी आई कित्येक वर्षांपासून तेच ते काम जराही न थकता, थोडाही उत्साह कमी न होता करत आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिची काम सुरू असतात. मला या गोष्टींच प्रचंड आश्चर्य आणि कौतुक वाटलं.
या काळात कुटुंबाला खूप जास्त वेळ देता आला. त्यांना नव्यानं समजून घेता आलं. संकटाच्या वेळी माझ्या सोबत माझं कुटुंब आहे या भावनेने फार बरं वाटलं. अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या कळाल्या. माझ्या स्वभावातले दोष कळाले. मी पहिल्यांदाच इतके दिवस सलग घरी होतो त्यामुळे गुडीपाडव्यापासून सगळेच सण साजरे करता आले. मुंबईत कुटुंबाशिवाय राहताना विसरलेल्या अनेक प्रथापरंपरा पुन्हा कळाल्या. अनेक कारणांमुळे माझी देवावरची श्रद्धा वाढली.
कोरोनामुळे माझ्या भावाचं लग्न दोन महिने पुढे ढकललं होतं; पण तरीही कोरोना काही कमी झाला नाही. लग्नाला किती लोकं न्यायचे, कोण कोण न्यायचे अशा अनेक विषयावर वाद झाले. पण ते तेव्हढ्यापुरतेच! शेवटी घरातले मोजके लोकं घेऊन लग्न उरकलं. पण लग्नाला बोलावलं नाही म्हणून अनेक नातेवाईक नाराज झाले. एकत्र राहताना वाद होऊ नयेत म्हणून खूप तडजोडी कराव्या लागतात. एकमेकांना समजून घ्यावं लागतं. प्रत्येकाच्या विचारांचा आदर करावा लागतो, स्वातंत्र्य द्यावं लागतं. प्रत्येकाचा खाजगीपणा जपावा लागतो. हे नव्याने उमजलं.
माझं क्षेत्रच मुळात अनिश्चित आहे. ह्या अनिश्चिततेची मला कल्पना आहेच. पण लॉकडाउनच्या काळात त्याची तीव्र जाणीव झाली. हे क्षेत्र सोडून कुठेतरी नोकरी करावी असंही वाटलं. मी घरी आल्यामुळे माझा बराच खर्च वाचला. पण भविष्यात पुन्हा अशी वेळ आली तर मला एकट्याला ह्या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे अशी स्वतःलाच समज दिली. मी कामाशिवाय इतका काळ घरी बसून नाही राहू शकत, याचीही जाणीव झाली. याच काळात मी उत्पन्नाचे इतर मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून गणेश चतुर्थीच्या दहा दिवसांत चॉकलेटचे मोदक करून विकले. भविष्यात आर्थिक संकट येऊ नये म्हणून काही रक्कम राखीव असायला हवी तसेच उत्पन्नाचे इतर पर्याय शोधायला हवेत, हे जाणवलं. पुन्हा अशी वेळ आली तर त्याच्याशी सामना करण्यासाठी मनाची तयारी करायला हवी. अनेक छंद जोपासायला हवेत. व्यायामाची सवय लावायला हवी. ध्यान आणि चिंतनाची सवय लावून घ्यायला हवी, जेणेकरून स्वतःचा स्वतःशी संवाद होईल. अशा परिस्थितीत आपण एकटे असू तरी निभावता येईल. नातेसंबंध, मित्रपरिवार जोडायला हवा; जेणेकरून आपण तणावात असताना त्यांच्याशी संवाद साधता येईल.
जोपर्यत माझ्या शहरात, माझ्या कॉलनीत कोरोनाचा पेशंट नव्हता तोपर्यंत कोरोनाची भयंकर भीती वाटायची. न्यूज चॅनेलवर कोरोना पेशंटस् चे वाढते आकडे पाहून भीती आणखी वाढायची. नंतर न्यूज बघणंच बंद केलं आणि पेपरसुद्धा बंद केला. कोरोनापासून बचावासाठी बाहेर जाताना मास्क लावणे, बाजारात सुरक्षित अंतर ठेवणे, बाहेरून आल्यावर कपडे धुणे, अंघोळ करणे, सगळ्या वस्तू सॅनिटाईझ करणे, होमिओपॅथी गोळ्या, गरम पाण्याची वाफ घेणे, गरम पाणी पिणे अशी काळजी घेतली. आताही घेतोय. पण कोरोनाची भीती कमी झालीये कारण आता कोरोनाचा पेशंट घरापर्यंत आलाय! 

पद्माकर देशपांडे  
साधारणपणे नोकरीसाठी दररोज घराबाहेर पडावे लागे. रविवार किंवा सुट्टीचा अपवाद. शरीराला ती सवय होऊन गेली होती. मात्र कोविड-19 मुळे कायमचे किंवा अनिश्चित काळासाठी घरात राहण्याचा प्रसंग आला. मी स्वतः पत्रकार, पत्नी शिक्षिका, मुलगा आय टी मध्ये आणि दुसरा मुलगा शाळेत आठवीला असल्याने प्रत्येकाला घराबाहेर जावे लागेच. आता मात्र सक्तीने सगळे घरात बसले. जरी अनेक दिवस बाहेर जायला न मिळाल्याने चिडचिड झाली नाही, तरी काहीसे बांधल्यासारखे झाले. मात्र घरून काम सुरूच असल्याने सुटका झाल्यासारखे अजिबात वाटले नाही. मी घरातूनच वृत्तपत्राचे अग्रलेखाचे पान सांभाळत होतो. प्रमुख काम नेटवरील आणि संपर्काचे होते. मात्र घराबाहेर जाण्याची मला तरी गरज नव्हती. त्यामुळे काम विना व्यत्यय करता आले. प्रवासाचा वेळ व खर्च वाचला. त्यामुळे समाधान मिळाले. मात्र इतर काही आवडीचे उद्योग (वाचन इ.) मर्यादित प्रमाणात करता आले. कारण नंतर वाचनालय देखील बंद झाले. घरातील पुस्तके मर्यादित असल्याने सार्वजनिक वाचनालयातील पुस्तके वाचून छंद भागवित होतो. करिअरची अनिश्चितता होतीच. वृत्तपत्रातील अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. अनेकांचे पगार कमी झाले. कामाचे तास घटले. काही दिवस तर घरात वृत्तपत्र येत नसल्याने खप देखील कमी झाला. त्यामुळे अनिश्चितता जाणवत होती. माझी निवृत्तीकडे वाटचाल सुरू असल्याने आधीच तो अनुभव येत असल्याचे प्रत्ययास आले. आर्थिक गणित आणि भविष्याचं नियोजन फारसे बिघडले नाही. कारण पत्नी आणि मुलाचे उत्पन्न होते. कुटुंबाचे संरक्षण आणि सुविधांची तरतूद करण्यासाठी मी व पत्नी सौ. प्राजक्ता मेहनत घेत होतो. होटेलिंग खर्च कमी झाला. त्या ऐवजी घरात पदार्थ करू लागलो. मी खिचडी, वरण, एखादा स्पेशल पदार्थ, भाजी करू लागलो. चहा करणे मी पूर्वीपासून करीत होतोच. मुलांच्या सोबत खूप काळ राहून त्यांच्याशी जुळवून घेण्याचा ताण आला असे म्हणता येणार नाही. मात्र ऑनलाईन वर्ग आणि ऑनलाईन लॅपटॉप वर काम तसेच पत्नीचे ऑनलाइन शिकविणे या प्रकारामुळे एकाच वेळी तीन खोल्यात तिघांचे काम करणे हा प्रकार अवघड होता. एकमेकांपासून दुसर्‍याला त्रास होऊ नये म्हणून जपणे ही तारेवरची कसरत ठरत आहे! घरकामातल्या सहभागाबद्दल बायकोच्या वाढलेल्या अपेक्षांशी जुळवून घेत होतोच. माझी आई झेडपित सर्विस करीत होती, त्यामुळे घरातील कामांची सवय, अपेक्षा आणि अडचणी माहिती होत्या. त्यामुळे जास्तीत जास्त सहकार्य करत होतो. तसेच आर्थिकदृष्ट्या प्रत्येक जण स्वतंत्र असल्याने आणि कोणाचे कोणावर कोणतेही बंधन नसल्याने छान व्यवस्था लावता आली. स्त्रीचं घरातलं/ कुटुंबातलं स्थान खूप महत्वाचे आहे याची जाणीव अधिक वृद्धिंगत झाली. घरात सर्वात जास्त कष्ट स्त्री घेते हे जाणवले. तिला सहकार्य केले पाहिजे, समजून घेतले पाहिजे हे पदोपदी जाणवत होते. आधीच्या पेक्षा आता ते जास्त लक्षात आले हे मात्र नक्की! तिच्या शाळेच्या कामात देखील सहकार्य केले पाहिजे ही कर्तव्य भावना जागृत झाली - ही मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. या काळात कुटुंबात काहीसा ताणतणाव निर्माण झाला; मात्र वादविवाद /भांडणं फारशी झाली नाहीत.
लॉकडाउन पूर्वीचा मी आणि आत्ताचा मी यात निश्चित फरक जाणवतो. पूर्वी जी कामे सहज केली जात, ती अधिक कुशलतेने कर्तव्य म्हणून आणि घरातील एकूण सर्वांना सांभाळून करणे हाच तो फरक होय. पुढील काळात करोंना नसला तरी देखील अशीच स्थिती ठेवायला हवी हे मी यातून शिकलो. त्यामुळे कुटुंबाचे जीवन अधिक सुखकर होऊ शकते. मुलांवर अशी वेळ आली तर त्यांना आपल्या सारखे ताण येऊ नयेत म्हणून त्यांनी स्वयंपाक करणे, घरातील कामे करणे शिकावे आणि स्वतंत्र राहण्याची सवय करावी आपली आई, पत्नी किवा मुलगी यांच्यावर अवलंबून राहू नये, स्त्री आणि पुरुष दोघांनी किमान गृहकौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. आपल्याला चांगले जेवायला लागते, मग ते बनवता का येऊ नये? असा प्रश्न स्वतःला विचारावा.
कोरोनाशी प्रत्यक्ष सामना करण्याची वेळ आली नाही. अप्रत्यक्ष सामना करताना घराबाहेर न पडणे, अगदी आवश्यक कामासाठी घराबाहेर गेल्यास मास्कचा कटाक्षाने वापर, सॅनीटायझर, जंतूंनाशके वापरली. वेळप्रसंगी सकाळ संध्याकाळ स्नान केले. होमिओ गोळ्या नियमित घेतल्या. त्यामुळे कोरोनाचे इन्फेक्शन होण्याची भीती अजिबात वाटली नाही. आपल्यात नैसर्गिक प्रतिकार शक्ती असतेच. त्यामुळे नियम पाळल्यास काही त्रास होणार नाही अशी खात्री वाटते. खरे तर अनावश्यक प्रवास टाळणे केव्हाही हिताचे. अनावश्यक गर्दी, गोंधळ, उत्सव हे श्रम, पैसा, आरोग्य वेळ यांची हानी करणारे असतात - ते टाळायला हवे. मात्र हे लक्षात येण्यासाठी करोना साथ उद्भवावी लागली हे दुर्दैव! 







Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form