मकरंद जोशी

 

मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात आधी काही दिवसांसाठी म्हणून भारतात सुरू झालेला लॉकडाउन आता सहा महिने उलटून गेले तरी पूर्ण उठलेला नाही. यातले पहिले तीन महिने तर घरातच अडकून पडावे लागले आणि त्यामुळे माझ्या दैनंदिन कार्यक्रमात,मानसिकतेमध्ये,वर्तनामध्ये काही फरक झालाय का आणि झाला असल्यास तो कसा (म्हणजे सकारात्मक का नकारात्मक)हे जाणून घेण्यापूर्वी कोरोनापूर्व काळातील माझी जीवनशैली सांगणं गरजेचं आहे.मी जंगल सफारी आयोजित करतो त्यामुळे महिन्यातले किमान तीन चार (सिझन मध्ये बारा पंधरा) दिवस घराबाहेर असतो आणि त्याबरोबरच मी कमर्शिअल रायटिंग - कॉपी रायटिंग करतो त्यामुळे बहुतेक वेळा ‘वर्क फ्रॉम होम’ नाहीतर ‘घराबाहेर’ हे माझं रुटीन होतं. लॉकडाऊनमुळे दळण-वळण थांबले आणि सर्वात आधी आमचे पर्यटन क्षेत्र ठप्प झाले.शिवाय अन्य उद्योग-व्यवसायही मंदावले असल्याने लेखनाच्या संदर्भातले जे प्रोजेक्टस सुरू होते ते होल्ड वर गेले. साहजिकच मी बेकार झालो असंच म्हणावं लागेल.सुदैवाने सौभाग्यवती नोकरी करतात आणि तिचं काम ‘वर्क फ्रॉम होम’पध्दतीने सुरू राहिलं. त्यामुळे एक पगार येत राहिला आणि आर्थिक बाबतीत चिंता करण्यासारखी परिस्थिती उद्भवली नाही.
मात्र घरी कामासाठी म्हणजे पोळ्या करायला,धुणी-भांडी-सफाई करायला येणाऱ्या महिला येणे थांबले त्यामुळे ही सर्व कामे वाटून घेतली.घरात मी (वय ५०),पत्नी मिता (वय ४७), मुलगी सई(वय २०) आणि माझी आई वनिता (वय ७५) त्यामुळे कामाची विभागणी करताना आई आणि मुलीला मोकळीक दिली की तुम्हाला हवे ते आणि जमेल तेव्हढच तुम्ही करा.मुलीने घराची साफ सफाई करायचे ठरवले आणि चार महिने न चुकता केली. आईने कधी स्वयंपाक घरात जेवण करुन तर कधी भांडी घासून मदत केली.बायको सकाळी ९ ते संध्याकाळी ७ ऑफिसच्या कामात अडकलेली असल्याने - कमी तिथे आम्ही - म्हणून मी भांडी घासण्यापासून जेवण तयार करण्यापर्यंत सगळीच कामे केली.
मुळात मला अधून मधून एखादा पदार्थ करुन बघायची आवड आहे, थोडी सवय आहे त्यामुळे आमटी,भाजी,भात करणे कठीण गेले नाही.पोळ्यांच्या वाट्याला मात्र मी गेलो नाही. बायकोच त्या सकाळी उठून करुन टाकायची. मग पाच-सहा दिवसांनी एकदा बाहेर जाऊन मिळतील तशा भाज्या आणणे,वाणी सामान,घरातील इतर गोष्टी ( सॅनिटरी पॅड्सपासून ते डिटर्जंट पावडरपर्यंत ) खरेदी करणे यासाठी मी एकटाच घराबाहेर पडत होतो. मात्र या चार महिन्यांच्या काळात घरातल्या तीन महिलांपैकी एकिनीही घरात अडकून पडावं लागलंय याबद्दल त्रागा केला नाही किंवा कटकट केली नाही. तुलनेने माझीच चिडचिड जास्त व्हायची मात्र ती कोरोना काळातील परिस्थिती योग्य पध्दतीने न हाताळणाऱ्या शासन आणि प्रशासनावर असायची , मग याच फ्रस्ट्रेशनमधून फेसबुकवर मनातला राग,संताप व्यक्त करणाऱ्या पोस्ट लिहायच्या आणि मोकळं व्हायचं.
या काळात मी जसे यू ट्यूबवर पाहून नवे पदार्थ बनवण्याचा आनंद घेतला त्याचप्रमाणे अनेक दिवस बघायचे राहिलेले सिनेमे (ज्यात क्लिओपेट्रा,स्पार्टाकस सारख्या हॉलिवुड क्लासिक्स पासून पटाखा,लक्ष्मी-टिकली बॉम्ब सारख्या ऑफ बिट हिंदी सिनेमांपर्यंत सगळेच होते) सध्या चर्चेत असलेल्या वेब सिरीज बघितल्या. शिवाय,'वाचू सावकाश' म्हणून बाजूला ठेवलेली पुस्तके वाचायचा सपाटा लावला.मात्र जसजसे महिने उलटत गेले तशी भविष्यातील अनिश्चितता मनात दाटून आली आणि त्यातून कधी निराशा तर कधी वैफल्य साचले. आर्थिक बाबतीत तात्कालिक गरज भागत असली तरी भविष्यातील चिंता सतावत होतीच.
या काळात बायको घरातून काम करत होती, त्यांच्या कंपनीने अशा परिस्थितीचा कधी विचार केला नसल्याने ‘वर्क फ्रॉम होम’साठी आवश्यक ती यंत्रणा नव्हती त्यामुळे तिचा पहिला महिना तर फक्त वेगवेगळ्या लोकांशी बोलून, त्यांच्याकडून अपेक्षित काम करुन घेणे किंवा काम करण्यासाठी लागणारा डाटा जमा करणे यातच गेला. या आधीही ती कंपनीतील कामाच्या प्रेशरबद्दल आणि व्यवस्थापनातील उणिवांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल सांगायची पण या चार-पाच महिन्यात ती घरातून हे सगळं मॅनेज करत असल्याने प्रत्यक्ष पाहाता आले आणि तिला होणाऱ्या त्रासाची नीट कल्पना आली.वयोवृध्द आईला पूर्वीसारखे वाचन किंवा टिव्ही पाहाणे जमत नाही, कोरोनापूर्वी ती दिवसातून एकदा सकाळी एक मोठी चक्कर मारून यायची,तोच तिचा विरंगुळा होता,पण तो ही बंद झाला. मात्र तिने तिच्या सहनशिल स्वभावानुसार याबाबत जराही तक्रार केली नाही. मुलगी B.Sc.च्या शेवटच्या वर्षाला आहे. सरकारने अंतिम परिक्षांचा घातलेला घोळ आणि त्याचा तिच्यावर येणारा ताण आम्ही पाहात होतो आणि आमच्या परिने तो कमी करायचा प्रयत्न करीत होतो. कधी तिच्या आवडीचा पदार्थ करुन तर कधी तिच्याबरोबर तिच्या पसंतीचा सिनेमा बघून तिचे मनोबल कायम राखायचा प्रयत्न केला.
एक होतं - सगळी काळजी घेत होतो म्हणजे साबण/सॅनिटायझर लावून हात धुणे,मास्क वापरणे,न्यूज चॅनल न बघणे(हे आवश्यक ठरलं होतं !) तरिही अचानक इन्फेक्शन होईल की काय ही भीती सर्वांच्याच अंतर्मनात घट्ट रुजलेली होती. कधी कधी रात्री अचानक जाग यायची आणि आपल्याला कोरोना झाला तर .... याबद्दलचे चित्रविचित्र विचार मनात नाचायचे आणि झोप उडायची. गेल्या महिन्याभरात ही मनातली सुप्त भीती मात्र नक्की कमी झाली आहे.
या सगळ्या काळाने स्वतःकडे, स्वतःच्या आयुष्याकडे बघायला जरा निवांत वेळ मिळाला. त्यात पुन्हा एक गोष्ट जाणवली की ‘मध्यमवर्गिय’ म्हणून ज्या सवयींची अनेकजण खिल्ली उडवतात किंवा पारंपरीक पध्दतीच्या म्हणजे वस्तु-पदार्थ-पैसे पुरवून वापरण्याच्या सवयीची जरी अनेकदा टिंगल केली जात असली तरी याच पध्दतीच्या जीवनशैलीमुळेच कोरोनाकाळात उत्पन्न बंद (एकच पगार चालू) झाले तरीही जड गेले नाही. शिवाय घरातल्या सगळ्यांशी भावनिक बंध घट्ट असल्याने कायम एकत्र,एकमेकांसोबत राहताना कंटाळा आला नाही किंवा क्षुल्लक कारणांवरुन भांडण,वाद ही झाले नाहीत. एकूण काय - एकमेकांना समजून घेण्याची,प्रत्येकाला त्याचा त्याचा अवकाश द्यायची आणि एकमेकांच्या विचारांचा आदर करायची सवय असेल तर कोरोनाकाळातील सक्तीची घरबंदी देखील आरामात पार करता येते.


मकरंद जोशी

                                                          

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form