जेव्हा लॉकडाऊन जाहीर केलं गेलं तेव्हा माझी पहिली प्रतिक्रीया अत्यंत भाबडी होती. ‘उशीरा का होईना चांगला निर्णय घेतला!’ असं मी सोशल मिडियावर व्यक्त झालो. सवयीप्रमाणे सोशल मिडियावर पोस्ट टाकून मी स्वयंपाकाला लागलो. तेव्हा हा ‘21 दिवसांचा बंदिवास’ आपल्यासाठी ‘बिना मिठाचा बंदिवास’ ठरणार आहे याची जाणीव झाली ! जेमतेम एक दोन दिवस पुरेल एवढंच मिठ शिल्लक होतं. मग ते पुरवून पुरवून वापरण्याचा विचार केला. पहिला घास बंदिवासाची भीषण चुणूक दाखवून गेला! लोणच्याच्या साथीने जेवण कसे तरी उरकले. दुसऱ्या दिवशी पुन्हा थोड्या मिठातली करी केली. असं करता करता दोन दिवसांत संपणारं मिठ पाच दिवसांनी संपलं…हळूहळु बिनामिठाची चव येवू लागली. पण जेव्हा बातम्यात - उपाशी तपाशी पायपीट करणाऱ्या मजुरांचे हाल डोळ्यासमोर दिसू लागले तेव्हा मात्र तीही चव निघुन गेली. मला इथे बीनमिठाचं का होईना खायला काही तरी होतं, माझ्या बंधु-भगिनींचं अख्खं आयुष्यच अळणी होण्याच्या वाटेवर होतं… त्यांना एकवेळचं खायलाही मिळण्याची काही सोय नाही याची जाणीव घशाखाली घास उतरु देत नव्हती. सरकारची चीडही येत होती …! किमान संकटाच्या काळात तरी सरकार शहाण्यासारखं वागेल आणि नियोजनबद्ध पावलं उचलेल असं वाटलं होतं…पण देशाचा विकास रस्त्यावर ओसंडून वाहत होता…आणि माझ्यासारख्या अनेकांच्या डोळ्यांतून पाणी ….!
लॉकडाऊनचा कालावधी आणि कोरोनाबाधीतांची संख्या वाढत राहिली. माझी जीवनशैलीच अशी आहे की मी दिवसेंदिवस घराबाहेरही राहू शकतो आणि संपूर्ण काळ घरातही कोंडून राहू शकतो. मी एकटाच राहतो त्यात पंधरा पंधरा दिवस कारणाशिवाय बाहेर न पडण्याची मला सवय आहे. फरक एवढाच होता की आता गरज असतानाही बाहेर पडण्याची सोय नव्हती. लॉकडाऊनमुळे घरातच राहणे माझ्यासाठी फार कठीण नव्हते. शिवाय माझे काम सुरुच होते, पुस्तकांची साथ होतीच. पण आपल्या गावात जर काही घडलं तर आपण जाऊ शकणार नाही याची हळहळही वाटू लागली. माझा भाऊ आरोग्य खात्यात, त्याला झोकून काम करण्याची सवय, माझी आईही सत्तरी पार केलेली, तीही सामाजीक कामांत पुढे असते. बहिण घरापासून एकटीच दूर अडकलेली, दुसऱ्या भावाचा व्यवसायही बंद पडलेला, त्याच्या मुलांची शाळा बंद पडलेली - या सर्वाचीच मला चिंता वाटू लागली. माझ्याठायी एवढी असहायतेची भावना कधीच निर्माण झाली नव्हती. मग त्यातून मार्ग काढण्यासाठी सर्वांशी फोनवरुन बोलणे, व्हिडीओ कॉलींग करणे सुरु केलं. त्यानिमित्ताने अनेक मित्रांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला. सोशल मिडियावरुन रोज व्यक्त व्हायचं ठरवलं! याच दरम्यान माझ्या सहकारी कार्यकर्त्यांनी लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांपर्यंत गरजेच्या वस्तु पोहोचविण्याचे काम सुरु केले, मीही क्षमतेनुसार आर्थीक भार उचलण्यास सुरुवात केली. आम्ही सर्वांनी मिळून जवळ जवळ अडीच-तीन लाख लोकांना ‘कोरोनाच्या काळात घ्यावयाच्या काळजीचं प्रशिक्षण दिलं’, त्यामुळे अनेकांना लॉकडाऊन खायला उठलं असलं तरी मला मात्र खायलाही वेळ मिळत नव्हता.
मित्र-मैत्रिणींच्या शाळकरी मुलांशीही माझं बोलणं सुरुच होतं. त्यांची शाळा बंद पडली होती, बाहेर जाणंही बंद होतं - त्यांना वेगवेगळ्या उपक्रमात गुंतविण्याचा प्रयत्न सुरु केला, कुणी चित्र काढू लागलं, कुणी गाणी म्हणू लागलं तर गुणी आणखी काही कौशल्य शिकू लागलं. त्यांचं सोशल मिडियावरुन कौतुक करायचं. त्यांना प्रोत्साहन द्यायचं असेही उपक्रम या काळात सुरु केले. त्यांच्या पालकांशीही बोलणं व्हायचंच. त्यातून लॉकडाऊनची भीषणता आणखीच समोर येत गेली. ज्या कथा ऐकत होतो त्या भयानक होत्या. आर्थीक ताणात स्त्री-पुरुष दोघेही होते. त्यातही पती-पत्नीचे अनेक व्हिडीओ टिकटॉकवर पाहत होतो, अनेक पुरुष भांडी घासताना, स्वयंपाक करताना, साफ सफाई करताना गंमत म्हणून व्हिडीओ टाकत होते. महिलांसाठी तर हे सर्व आयुष्यभरासाठीच असतं ! ‘महिलांच्या विश्वात’ हा कोरोनाकाळ म्हणजे कर्दनकाळच ठरत होता. घर संभाळून काम करणाऱ्या व ज्यांचं लॉकडाऊनमध्येही ऑनलाईन काम सुरु होतं त्यांचं आणि एकत्र कुटूंबांत असलेल्या महिलांच्या अवस्थेचा विचार करुन अंगावर काटाच येतो.
मी स्वत: स्वयंपाक करतो, एका माणसाचा चहा बनवायचा म्हटला तरी कमीत कमी तीन भांडी दोनदा धुवावी लागतात. असं म्हणतात की दुसऱ्याचं दु:ख पाहिलं की आपलं दु:ख कमी वाटतं. माझ्या घरातील लोणचं संपलं होतं, कडधान्यही संपत आली होती आणि एक दिवस तो क्षण आला, ज्यावेळी माझा गॅस संपला….आता मी गॅसवर गेलो…आता कच्चं खावं लागणार! मी गॅसबुकींग तर केलं,पण गॅसवाल्याने ‘प्रत्यक्ष येवून घेवून जा’ म्हणून सांगितलं. माझ्याकडे ना गाडी ना घोडा, मी वाट पाहत राहिलो. मग एक दिवस पापडावर काढला, एक दिवस पोह्यांवर आणि दोन दिवस बीन साखरेचा चहा पिवून काढले….!चार दिवस वाट पाहिल्यानंतर गॅस आला ! एक मात्र चांगलं झालं की दुध उपलब्ध होवू लागलं…मी दुध न पिणारा पण तरीही दुध घेवू लागलो…दुधवालाच अंडीही विकायचा मग तेही सुरु झालं..आता हळुहळू पोटाची चिंता उरली नाही…पण मनाची चिंता मात्र आजही कायम आहे !
याकाळात हातून लॅपटॉप पडला, फुटला, दुष्काळात तेरावा महिनाच जणू ! मग Jugad Technology चा वापर करायचं ठरवलं. लॉपटॉप चालत होता, त्यामुळे इकडून तिकडून सेलटेप लावल्या आणि पट्टेदार लॅपटॉपवरुन काम सुरु केलं. केवळ चार्जींग पोर्ट दाबून दाबून ॲडजेस्ट करावी लागायची. कधी कधी पटकन ॲडजेस्ट व्हायची तर कधी कधी तास दोन तास लागायचे. बाहेर जाण्याची सोय नव्हती, लॅपटॉप कंपनीला फोन केला. तर त्यांनी लॉकडाऊन संपल्यानंतर त्वरीत टेक्निशिअन आपल्यापर्यंत पोहोचेल असं आश्वासन दिलं. जे लॅपटॉपचं तेच मोबाईलचं. खूप वेळ ॲडजेस्ट केल्यानंतर चार्जींग व्हायचं, ऑफिसला कळवून टाकलं की मी कधीही ‘आऊट’ होवू शकतो. पण ती वेळ आली नाही. केसांचे वाढणे ही सर्वांसाठीच नैसर्गिक समस्या होती. अनेकांनी चमनगोटा करुन टाकला, मी मात्र रोजच ऑनलाईन रहावं लागत असल्याने स्वत:च स्वत:चे केस कापले. दोन आरशांचे जुगाड करुन हे गोष्ट शक्य झाली.
लॉकडाऊनमुळे माझे महिन्याभरा पूर्वीच सुरु केलेले ‘मॉर्निंग वॉक’ बंद पडले. शारिरीक व मानसिक ताणही जाणवू लागला. मनाच्या मशागतीसाठी काम, वाचन, लेखन हे सुरुच होतं. शारिरीक मशागतीसाठी जमेल तसा व्यायाम सुरु केला. मॉर्निंग वॉकला बाहेर पडता येणार नाही त्यामुळे घरातल्या घरात, हॉल ते गॅलरी अशा फेऱ्या मारण्यास सुरुवात केली. एका दिशेने 15 पावलं होतात, त्यामुळे एका फेरीत 30 पावलं कव्हर होतील हे लक्षात घेवून मी हॉल ते गॅलरी अशा 100 फेऱ्या मारण्याचा म्हणजे 3000 हजार पावलं चालण्याचा क्रम सुरु केला. खिडकीच्या बाहेर रस्त्यावर कुत्रे फिरायचे आणि घरात मी ! अनेक दिवसानंतर मात्र पावलं पलायनवादी बनली आणि अखेर तो उपक्रम बंद झााला. याच काळात वेबसिरीजच्या मायाजालात अडकलो. पण वेबसिरीजमधला हिंसाचार, अश्लिलता, भाषा याचा लागलीच वीट आला आणि पुढे तेही बंद केलं. शेवटी पुस्तकं आणि कधी मधी जुनी आर्टफिल्म पहाणे एवढ्यावर येऊन थांबलो!
या लॉकडाऊनच्या काळात देशभर थाळ्या वाजविणे आणि दिवे मालवण्याचा उत्सव साजरा करण्यात आला. आपण उचललेल्या पावलाची परिणती शेवटी अनेकांच्या थाळ्या फुटण्यात आणि दिवे मालवण्यातच होणार आहे हे मोदीनी ताडलं असेल म्हणूनच लोकांना त्याचाही उत्सव करण्याची सवय लागावी यासाठी त्यांनी प्रयत्न केला असावा…! मी मात्र त्या दिवशी माझ्या आजुबाजूच्या परिसरातील गोंगाट ऐकून स्तब्ध झालो होतो. मरकजच्या प्रकरणावरुन लॉकडाऊनच्या काळातही मुस्लिमांना टार्गेट केलं गेलं. त्यावरुन माझ्या एका मित्राशी वाद झाला, माझा प्रश्न हाच होता की - ‘तू सरकारी अधिकारी आहेस, तुझाच जर दृष्टीकोन मुस्लिमांबद्दल असा असेल तर मग तू उद्या एखाद्या प्रकरणात निष्पक्ष कसा राहशील? शिवाय तुझ्या पगारात सर्वच समाजांचा वाटा आहेच’ त्याला तो प्रश्न एवढा झोंबला की तो आजही संपर्क टाळतो आहे! माझे काही परिचीत, स्नेही या काळात कोरोनाला बळी पडले, पण या काळात विषारी अपप्रचाराला बळी पडलेल्या माझ्या एका मित्रालाही मी मुकलो!
आता अनलॉक सुरु आहे. तरी कोरोना अजून संपलेला नाहीय. मला ऑफिसने फेब्रुवारीतच मुंबईला शिफ्ट केलं. अजून मुंबईची तोंडओळख होती पण पायओळख व्हायचीच होती आणि हे लॉकडाऊन लागलं होतं, मुंबईला आल्यानंतर त्वरीत गावाला कोकणात जाण्याचा विचार होता पण अडकलो, त्यामुळे मला गेल्या वर्षभरापासून गावी जाता आलं नाही, रेल्वे आता आता सुरु झाल्यात, गावी जायचं नियोजन आहे…पण पुन्हा तीच काळजी…दुसरी लाट आली आणि पुन्हा लॉकडाऊन लावलं गेलं आणि तिकडेच अडकून पडलो तर?
खरंतर मी त्यामानाने लॉकडाऊनमध्ये काहीच भोगलं नाहीये. पण जर हे लॉकडाऊन अधिक काळ राहिलं तर आपण वेडे होऊ असंच वाटू लागलं होतं. लॉकडाऊनचा मी धसका घेतलाय हे मात्र खरं… !