No title


“आठ महिने होऊन गेले, करोनाने निर्माण केलेली दहशत अजून कायम आहे. मात्र त्याहीपेक्षा पुढे काय? या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यामुळे मनात दडलेली भीती अधिक जीवघेणी ठरत आहे.” - मध्यमवयीन, मध्यमवर्गीय सुखवस्तू पुरुषाच्या आयुष्यात देखील करोनाने कोणती उलथापालथ केली त्याबद्दल आज संतोष पाठारे व्यक्त होत आहेत.

सकाळी साडे सहाचा गजर झाला, नाही झाला, तरी डोळे उघडायचेच! त्यानंतर सगळ्या क्रिया अगदी यंत्रवत व्हायच्या! ब्रश, दाढी, अंघोळ, दोन मिनिटांत उरकलेली देवपूजा, घाईघाईत केलेला नाश्ता आणि आठच्या ठोक्याला कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडणं! १८ मार्च नंतर हे सगळ शेड्यूल ठप्प झालं. माझंच नव्हे तर सगळ्या जगाचे! पहिले काही दिवस मजेत गेले. अनेक वर्षांपासून हवाहवासा वाटत असलेला पण वाट्याला न येणारा निवांतपणा अचानक वाट्याला आला. मोबाईलवर सेट केलेला रोजचा गजर बंद झाला. झोपण्याची वेळ अकरापासून रात्री अडीच वाजेपर्यंत सरकली. सकाळी कितीला उठायचं याला मर्यादा राहिली नाही. करोना घरात येऊ नये म्हणून घराबाहेर पडणं बंद झालं. करोनाने टीव्हीला २४x७ ग्रासून टाकलं. मग नजर OTTPlatforms कडे वळली. चित्रपटगृहामध्ये जाऊ न शकल्याचं दुःख नेटफ्लिक्स , प्राईम यांनी अजिबात जाणवू दिलं नाही. अनेक पहायच्या राहून गेलेल्या चित्रपटांचा आणि वाचायच्या राहून गेलेल्या पुस्तकांचा कोटा करोना काळात भरून निघाला. या दरम्यान Whatsapp, एफबीवरून कोणाकोणाला करोनाचा संसर्ग झाला, कोणाचा करोनामुळे मृत्यू झाला याची माहिती मिळत होती. अनेक जवळच्या व्यक्तींचा झालेला मृत्यू आणि त्यांचे अंत्यदर्शन घेता न आल्याची खंत अजून काळीज पोखरते आहे.
करोनाबरोबर लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पोलीस यांच्यासाठी दिवे लावून झाले, टाळ्याथाळ्या वाजवून झाल्या. वेगवेगळ्या विषयावरील वेबिनारना हजेरी लावणे, मित्रमैत्रिणीच्या गटाबरोबर नियमितपणे योगसाधना करणे, कथा कवितांच्या वाचनाचे व्हिडीओ करून पोस्ट करणे अशी ऑनलाईन मुशाफिरी करून झाली. मित्र मैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी थेट संबंध तुटल्यामुळे व्हिडिओ कॉलच महत्व वाढलं आणि सोशल मिडिया च्या माध्यमातून अपरिचित लोकांशी संपर्क वाढला. आभासी जगातल्या मित्रांसमोर मनातील भावभावना व्यक्त होऊ लागल्या.या आभासी मैत्रीतील भल्या बुऱ्या अनुभवांना सामोर जावं लागलं. काहींनी मदतीसाठी हात मागितला, तर काहींनी हात देण्याचं औदार्य दाखवलं. घरात बायकोला मदत म्हणून पदार्थ बनविणे आणि त्याला पूरक म्हणून भांडी घासणे या आजवर टाळलेल्या घरगुती गोष्टी माझ्याही अंगवळणी पडत गेल्या. बायकोच्या छोट्या प्रमाणावर पदार्थ करून विकण्याच्या व्यवसायात मुलींच्या बरोबरीने मी सुद्धा यथाशक्ती मदत करू लागलो.
आठ महिने होऊन गेले, करोनाने निर्माण केलेली दहशत अजून कायम आहे मात्र त्याहीपेक्षा पुढे काय? या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यामुळे मनात दडलेली भीती अधिक जीवघेणी ठरत आहे. न्यू नॉर्मल जगण्याचा अंदाज अजूनही येत नाहीय, ही वस्तुस्थिती आहे! 
या काळाने काय शिकवलं, काय हिरावून घेतलं याचा हिशोब मांडायचा झाला तर प्रत्येकाच्या गणिताचं उत्तर वेगवेगळं येणार आहे. बँकेत थोडीफार का होईना रक्कम शिल्लक असणाऱ्या माझ्यासारख्याना या काळाने आत्मचिंतन करायला वेळ दिला. पैशाचं मोल कळलंच पण त्याच बरोबरीने नात्याचं मोल ठळकपणे लक्षात आलं. दिवसभर कामधंद्याच्या निमित्ताने बाहेर असणाऱ्या पुरुषाला घरात येणाऱ्या अडचणी लक्षात येऊ लागल्या आणि बाहेर राहणाऱ्या माणसाची होणारी घुसमट घरातल्या सदस्यांना समजून आली. कुटुंबात संवाद साधला गेला, मात्र हळूहळू आपली स्पेस आपल्याला मिळत नसल्याचंही उमगत गेलं. ‘इतके आलो जवळजवळ की जवळपणाचे झाले बंधन’ या मंगेश पाडगावकर यांच्या कवितेच्या ओळी अनुभवाला येऊ लागल्या. 
टूबीएचकेच्या घरामध्ये राहणाऱ्या चार माणसांचे आपापले एक जग असते. या जगात एकमेकांच्या अस्तित्वाने कुरघोडी होऊ लागली आणि त्यातून निर्माण झालेल्या तणावाने नात्यातील वीण विसविशीत होतेय का अशी शंका येऊ लागली. यातच आर्थिक घडी विस्कटू न देण्याची कसरत मानसिक तोल बिघडवू लागली. काही तरी वेगळं करायचं आहे असं मनाशी ठरवून शिक्षण क्षेत्राच्या नोकरीतून बाहेर पडून चित्रपटाच्या क्षेत्रात मुशाफिरी करू पाहणाऱ्या माझ्यासारख्या पुरुषापुढे करोनाने मोठे आव्हान उभे केले आहे! सर्व काही सुरळीत होऊन नव्याने पुन्हा जम बसविण्यासाठी किती काळ जाईल याचा अजूनही अंदाज येत नाहीय. यात केवळ अर्थकारणच नव्हे तर सगळी सर्जनशीलता सुद्धा पणाला लागली आहे. आपल्या मुलभूत गरजा कोणत्या? आपण आयुष्य जगतो म्हणजे नेमकं काय करतो ? या प्रश्नांचा विचार करायला करोनाने भाग पाडलं आहे. करोना काळाने उपस्थित केलेल्या या प्रश्नांची उत्तर शोधताना आजवर मलाच न जाणवलेला व्यक्तिमत्वाचा एखादा पैलू समोर येईल. त्यामुळे कदाचित आयुष्याला वेगळं वळण लागेल. करोनाने अनपेक्षितपणे समोर आणून ठेवलेला हा काळ लवकरच ओसरेल. कदाचित पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आयुष्य अगदी पूर्ववत होईल पण...या काळात अनुभवायला आलेले क्षण, नात्यात झालेले बदल, बदललेली मानसिकता कायम आपला पाठलाग करत राहणार आहे.

संतोष पाठारे


                                                                 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form