भटकंतीची आणि खवय्येगिरीची मनापासून आवड असलेल्या तरुणाला सहासात महीने घरात अडकून पडावं लागलं तेव्हा कसं वाटलं? त्याने लॉकडाउनला कसं तोंड दिलं? त्याला लॉकडाउनने काय शिकवलं? - आज प्रशांत ननावरेच्या शब्दात जाणून घेऊया!
लॉकडाऊन जाहीर होण्याच्या आधी आम्ही काही मित्र मेळघाटात सायकलिंगसाठी गेलो होतो. ऑफिसमधून दहा दिवसांची सुट्टी मिळाल्याने ब-याच दिवसांनी कधीही, कुणीही सायकलिंग न केलेल्या भागात मनसोक्त आणि कसलंही दडपण न बाळगता सायकलिंग करायला मिळणार यासाठी उत्साहात होतो. आमचा आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की, देशातील कुठल्याही भागात सायकलस्वारांचं हसतमुखाने स्वागत केलं जातं, आपुलकीने खाऊ-पिऊ घातलं जातं. पण मार्चमध्ये मुंबईत कोरोनाच्या केसेस वाढत असल्याच्या बातम्या प्रसारित होत होत्या. कधी नव्हे ते आमच्याशी गावातली मंडळी थोडी अंतर ठेवूनच बोलत होती. अमरावती रेल्वे स्टेशनवरून चिखलद-याला पोहोचलो आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन दुस-या दिवशीच परत जायचं ठरलं. परत आलो आणि आठवडाभरातच लॉकडाऊन जाहीर झाला.जमेल तसं, केव्हाही आणि कुठेही भटकणे हा माझा स्वभावधर्म आहे, त्यामुळे खरंतर मी दोन महिने घरात बसून कसे काढले याचं माझं मलाच आश्चर्य वाटतं. पण घरात राहूनसुद्धा कंटाळा, चि़डचिड असं कधीच झाली नाही. घरून काम करत असलो तरी कंपनीने कधीच अधिक वेळ किंवा अवेळी काम करण्याची अपेक्षा आमच्याकडून केली नाही. उलट घरून काम करण्यासाठी काही सुविधा हव्या असल्यास त्यासाठीची तरतूद केली. साहाजिकच कामाचा ताण आला नाही आणि काम कंटाळवाणेसुद्धा झाले नाही. नेहमीपेक्षा मिळालेल्या थोड्या अधिकच्या मोकळ्या वेळेत पुस्तक वाचन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही चांगले चित्रपट आणि वेबसिरीज पाहणे पसंत केले. 'दुर्ग आणि किल्ले' हा प्रमाणपत्र कोर्स केला.
मी परदेशी कंपनीत काम करतो. आमचं भारतात कार्यालय नाही आणि माझं काम ऑनलाइनच असल्याने घरून काम करणं मला काही नवीन नव्हतं. खरंतर रोजच्या प्रवासातून सुटका होणार होती, म्हणून आनंदच झाला. दोन महिन्याच्या कडक लॉकडाऊनमध्ये कुठल्याच गोष्टीचा फारसा नकारात्मक परिणाम झाला नाही. ऑनलाइन काम सुरू होतं आणि कुटुंबासोबतच वेळ मजेत गेला. माझ्या आईचा मासेविक्रिचा व्यवसाय आहे, पण लॉकडाऊनच्या काळात ती पूर्णवेळ घरीच होती. कित्येक वर्षांनी आम्हाला तिच्या हातचे वेगवेगळे पदार्थ खायला मिळाले. यादरम्यान तिनेसुद्धा पदार्थांच्या बाबतीत अनेक प्रयोग केले. श्रीखंड, मावा बर्फी, विविध प्रकारचे केक, आंबावडी, ढोकळा अशा बाहेरून विकत आणल्या जाणा-या पदार्थांची चव आम्ही घरातच चाखली. संध्याकाळचा नाष्टा आणि कधीकधी रात्रीच्या जेवणाची जबाबदारी माझ्यावर असायची. मला स्वत:ला जेवण बनवायला मनापासून आवडतं. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये किचनमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवले, अशी काही भानगड नव्हती. पूर्वी सुद्धा मी नियमितपणे जेवण बनवत होतो. लॉकडाऊनचा एक अतिशय महत्त्वाचा फायदा म्हणजे मला न येणा-या चपात्या मी याकाळात बनवायला शिकलो. आता मला सर्व जेवण बनवता येतं. इतर वेळचा आणि लॉकडाऊनमधला फरक इतकाच की, मी बनवलेल्या पदार्थांचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची सवय मला आहे. परंतु लॉकडाऊनच्या काळात अनेकांना दोन वेळेचं पुरेसं अन्नही मिळत नव्हतं याची पूर्ण जाणीव असल्याने याकाळात खाद्यपदार्थांचा एकही फोटो कुठल्याही समाजमाध्यमावर शेअर केला नाही. माझे काही मित्र 'खाना चाहीए' या बॅनरअंतर्गत गरजूंना अन्नपुरवठा करत होते, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पनवेल शाखा आणि इतरही काही लहानमोठ्या संस्था आपल्यापरिने समाजातील विविध घटकांच्या मदतीला धावून गेल्या होत्या, त्यांना जमेल तितकी मदत केली. सायकलवरून गाव गाठणा-या लोकांची प्रचंड चर्चा या काळात झाली, त्यांना आमच्या काही मित्रांनी गाठले आणि त्यांचे अनुभव कॅमेराबंद केले. 'सायकल कट्टा' या आमच्या व्यासपीठामार्फत त्याची एक छोटीशी फिल्म बनवण्याचं काम केलं. या कटू आठवणी वेदनादायक आहेत. काळाने त्यांच्यासोबत केलेला अन्याय कदापी विसरता येणार नाही, म्हणून त्या कुठेतरी संग्रहीत होणं आवश्यक होतं.
लॉकडाऊनच्या आधीच माझी बहिण दुबईला टूर घेऊन गेली होती, नियमाप्रमाणे तिला आठवडाभर सरकारी इस्पितळात क्वारंटाईन करण्यात आले होते. तिच्या 'कोरोना'चाचणीचा निकाल यायला तब्बल सहा दिवस गेले (जो निगेटीव्ह आला), हा एकच काळ थोडा धावपळीचा आणि थोडासा काळजी करण्यासारखा गेला, असं म्हणता येईल. माझा लहान भाऊ शेफ आहे आणि तो अमेरीकेत मयामीला एका जगातील अग्रगण्य कंपनीच्या क्रूझवर कार्यरत होता. भारतासोबतच संपूर्ण जगात लॉकडाऊन झाल्याने त्याचे भारतात परतण्याचे सर्व मार्ग बंद झाले. पण कंपनीने सर्व सुविधांसह त्याची काळजी काळजी घेतली आणि तब्बल एक महिन्याचा जगप्रवास बोटीने करून तो भारतात परतला. दररोज त्यांचे जहाज कुठल्या देशाच्या बाजूने जात आहे, कोणत्या समुद्रात आहे, याचा वृत्तांत तो आम्हाला देत होता आणि अशापद्धतीने घरबसल्या आमच्या कुटुंबाचे पर्यटन होत होते.
या काळात एकाच गोष्टीमुळे मन खट्टू होत होते, ते म्हणजे माझ्या पार्टनरला भेटता येत नव्हते. व्हिडिओ कॉलची सुविधा असली तर प्रत्यक्ष भेटण्याच्या आनंदाची तुलना कशासोबतच करता येणार नाही. दरम्यानच्या काळात आमच्या भेटीची ॲनिव्हर्सरीसुद्धा आली. त्यादिवशी भेटता आलं नाही, पण मग त्यानंतर पंधरा दिवसांनी थोडी हिम्मत करून बाईक काढली आणि तिला भेटायला गेलो. तब्बल अडीच महिन्यानंतरच्या भेटीच्या आनंदाचे वर्णन शब्दात व्यक्त न करता येण्यासारखे आहे.
खरंतर लॉकडाऊनमुळे आयुष्यात फारसा फरक पडला नाही. घरातील लोकांसोबत जास्तीत जास्त वेळ राहण्याची, संवाद साधण्याची, एकमेकांच्या मताचा, कामाचा आदर, एकमेकांना त्यांची स्पेस, वेळ देणे या सर्व गोष्टी आमच्याकडे आधीपासूनच पाळल्या जातात. या संपूर्ण काळात घरात एकही वाद किंवा रूसवे-फुगवे झाले नाही. एकत्र राहणं, नवनवीन पदार्थ बनवणं, खाणं, गप्पा, लिखाण यामुळे वेळ मजेत निघून गेला. 'कोरोना'मुळे केल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे जग अगदीच होत्याचं नव्हतं झालं असं नाही म्हणता येणार, पण या काळाने खूप नवीन गोष्टी शिकवल्या. चांगल्या-वाईट सर्वच गोष्टींचा स्वत:ला फारसा अनुभव आला नसला तरी वाचून, पाहून, ऐकून एका वेगळयाच जगाचं दर्नश या काळात घडलं. विशेष म्हणजे संपूर्ण जग यामुळे प्रभावित झालं, त्यामुळे या काळाने इतिहासावर आपलं नाव कोरून ठेवलं आहे. आपण त्या इतिहासाचे साक्षीदार आहोत, हेही नसे थोडके!