मी फिटनेस प्रोफेशनल आहे. देशातलं लॉकडाऊन जरी २४ मार्च ला सुरु झालं तरी आमची जिम १५ मार्च पासूनच बंद होती. सुरुवातीला असं वाटलं कि १५-२० दिवसात सगळं पुन्हा पूर्वीसारखं होईल. पण ते तर वाढतच गेलं. एरवी दिवसभर busy असण्याची सवय असल्याने आता अचानक दिवसभर घरी रिकामटेकडा होतो. सुरुवातीला सगळंच उलटपुलट झालं. रात्रीअपरात्री जागरण, सकाळी लेट उठणं, लेट नाश्ता, लेट जेवण,दिवसभर मोबाइल असा सगळा टाईमपास चालू होता. सुरवातीला मज्जाच येत होती. सगळाच अनागोंदी कारभार. पण मग हळूहळू चिडचिड व्हायला लागली. कधी उघडणार लॉकडाऊन? असा प्रश्न सारखा मनात येऊ लागला. दहा पंधरा दिवसांनी माझ्या काही clients ना मी कॉन्टॅक्ट केला आणि online training सुरु केलं.
त्यामुळे काही प्रमाणात income चालू होती. पण हळूहळू माझे savings संपले आणि त्यांच्याही काही आर्थिक अडचणी असल्याने काही training बंद झाल्या. अश्या वेळी मग लॉकडाऊनचा जास्तच वैताग येऊ लागला. बाहेर जाणं तर बंदच होतं आणि शिवाय आता आर्थिक मर्यादा आल्याने आपला freedom कमी होतोय असं वाटत होतं. आपण चुकीचं क्षेत्र निवडलंय का? असाही विचार मनात येऊन गेला. पण मी माझ्या व्यवसायासाठी व्यायामाचे काही नवीन प्रकार शिकलो, व्यायाम आणि आहारावर बरं वाचन केलं, काही course केले, fitness वर माझं एक नवीन YouTube चॅनेल सुरु केलं( https://youtu.be/7JgXpxeWZgA )
लॉकडाऊनच्या आधी आई भोपाळला गेली होती आणि तिथेच अडकली होती. मुंबईत घरी मी आणि बाबा. या दिवसांत दोघांचं बोलणं खूप व्हायच. Relationships, प्रेम आणि त्यांच्या आयुष्यातल्या चुका असं सगळं ते share करत होते. पण माझ्या lifestyle मुळे, आळसामुळे त्यांना निराशा वाटायची. त्यामुळे आमचे खटके उडायचे. मग परत दोघं मिळून एखादी नवीन dish बनवायचो. मला वाटतं गेल्या दोन वर्षात माझ्या आयुष्यात जेवढं घडलं नसेल, त्यापेक्षा जास्त लॉकडाऊन मध्ये घडलं!
मी चपात्या करायला शिकलो. बघून वाटतं तितकं चपात्या करणं सोप्पं नाहीय. एकजीव आणि मऊ कणिक मळणं, गोल चपात्या लाटणं, नीट भाजणं आणि शेवटी सगळं झाल्यावर त्या मऊ राहिल्या पाहिजेत, हे सगळं माझ्यासाठी मोठ्ठं काम होतं. मग मी डोसे करायलाही शिकलो. बरीच वर्ष धूळखात पडलेला piano पुन्हा वाजवायला सुरुवात केली, काही गाणी बसवली.
ह्या रिकामपणाच्या काळात अजून एक interesting गोष्ट घडली. माझी एका मुलीबरोबर online ओळख झाली. Chatting सुरु झालं, वाढत गेलं. तिच्याबद्दल आकर्षण वाटायला लागलं. रोज बराच वेळ आमच्या गप्पा चालायच्या. कधी कधी तिचा phone यायचा. मी तिच्याशी बरंच share करू लागलो. बोलणं वाढत गेलं. माझं लक्ष दिवसभर mobile कडेच असायचं. आम्ही कधीच प्रत्यक्षात भेटलो नव्हतो, तरी मला भयानक obsession वाटत होतं. तेव्हाच बरंच लिखाणही सुरु केलं. कविता आणि प्रेमपत्राशिवायही बरंच काही लिहीत होतो. माझ्या घरी आम्ही विविध विषयांवर बरंच बोलतो, चर्चा करतो. देशात काय चाललंय? Political आणि social मुद्द्यांवर चर्चा, स्त्री-पुरुष समानता, हिंदू-मुस्लिम द्वंद्व, जातीआधारित विषमता इत्यादी अशी मोठ्ठी यादी आहे. आणि ती थोडी वेगळी होती. आपला अभ्यास, आपलं काम, career, लग्न अशी सरळमार्गी होती. मी घरी आईबाबांशी एवढं काही share करतो हेच तिच्यासाठी खूप नवीन होतं. काही वेळ असं चाललं आणि शेवटी हळूहळू सगळं संपलं. लवकरच 'प्रेमभंग' (माझ्या कल्पनेतला) झाला. आता विचार करतो तेव्हा वाटतं की चार महिन्यापूर्वी आपण असे होतो? आता आठवलं की हसू येतं ! पण 'प्रेमभंगाचा' काळ वाईटच होता. माझ्या दोघातिघा मैत्रिणीशी मी share केलं. त्यांनी सुद्धा त्यांचे अनुभव सांगितले, मला सावरायला मदत केली.
जगात सगळीकडेच कोरोनाची भीती पसरली होती. पण मला कोरोनाची अजिबात भीती नव्हती. आपण सगळ्या भाज्या खातो, व्यवस्थित व्यायाम करतो, immunity चांगली आहे, शिवाय कोरोनाची सगळी नियमावली पाळतो मला कशाला कोरोना होतोय. झालाच तर बघू! सगळी काळजी घेणाऱ्यांना कोरोना होत असताना - मी मात्र बिंदास होतो. आपण मुंबईत राहतो. बाहेरच्या जगाशी अनभिज्ञ असतो. आपल्याकडे light कधी जात नाही, पाणी कपात फारशी होत नाही, सगळ्या गोष्टी वर्षाच्या बारा महिने उपलब्ध असतात त्यामुळे बाहेर काय चाललंय ह्याची सहसा फारशी कल्पना नसते. देशभरात काय चाललंय, प्रवासी मजूर कसे सगळे पायीच आपल्या गावी जायला निघाले आहेत हे सगळं आई मला फोनवरून सांगायची. मग मी पण news बघतील्या तेव्हा खऱ्या परिस्थितीचा अंदाज आला. भर उन्हात पायी चालणं , खिशात पैसे नाहीत, अंगावर नीट कपडे नाहीत, कोरोनाची भीती, पोटात भूक, पोरबाळं बघून वाईट वाटत होता. पण मी स्वत:हून त्यांच्यासाठी काहीच केलं नाही याची आता लाज पण वाटते. आपल्याघरी रोज येणारी घर कामवाली, इस्त्रीवाले, कचरेवाला ह्या सगळ्यांच्या परिस्थितीची जाणीव असून सुद्धा नसल्यासारखी होती.
तीनचार महिन्यांनी मग आई मुंबईला परतली. आई यायच्या अगोदर आम्ही दोघांनी ठरवलं होत कि तिच्यावर काही दिवस कुठलंच काम सोपवायचा नाही. पण तसं झालं नाही. मी पुन्हा घरकामाबद्दल बेफिकीर झालो आणि उलट तिच्यावरच जास्त काम पडलं. ह्या दिवसात आईचं आणि माझंही बरच बोलणं झालं. खूप शेअर केलं. कोरोनाकाळ, सरकारची भूमिका, देशातली एकंदर राजकीय आणि सामाजिक परिस्थिती ह्याबद्दल ती खूप निराश होती. माझ्या समोर दोनतीनदा ती इमोशनल पण झाली. पण आमचा bond अजून strong झाला.
पुन्हा असं संकट आणि संचारबंदी जर आली तर गोंधळून न जाता काही गोष्टी नक्कीच करता येतील. आपल्या जवळच्या माणसांबरोबर संवाद वाढवता येईल. त्यांना वेळ देता येईल. त्यांच्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करता येतील. आपली personal development करता येईल. ज्या field मध्ये आहोत त्यातल्या काही नवीन गोष्टी शिकता येतील. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात राहून गेलेल्या काही चांगल्या सवयी पुन्हा सुरु करता येतील. आपल्या आसपास जर कोणी वाईट आर्थिक परिस्थितीत असेल तर त्याला मदत करता येईल. आणि शेवटी हे सगळं सुरू असताना निराश न होता परत सगळं बदलेल अशी आशासुद्धा मनात ठेवली पाहिजे! शेवटी hope च सगळं आहे.
“Sometimes all you can do is hanging on, so hang in there, this too shall pass.”