नोव्हेंबर महिन्यात ‘जागतिक पुरुष दिवस’असतो – त्या निमित्ताने या महिन्यात ‘पुरुषभान’ हे विषयसूत्र ठरवलं आहे.
‘जागतिक पुरुष दिवस’ हे शब्द वाचून आश्चर्य वाटलं का? अगदी साहजिक आहे. असा काही दिवस असतो, याची बऱ्याच पुरुषांना देखील माहिती नसते. ज्यांना माहिती असते असे लोक सुद्धा हा दिवस अनेकदा हसण्यावारी नेतात. हल्ली काहीवेळा ह्या निमित्ताने पुरुषांना शुभेच्छा दिल्या जातात. कधीकधी बातम्यांमध्ये या दिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमांची झलक दिसते. पण ‘जागतिक महिला दिवस’ जितक्या मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो – तशी या दिवसाची ओळख अजून तरी सर्वसामान्य लोकांना झालेली नाही. पुरुषांसाठी असा वेगळा दिवस असायची गरज आहे का? तो कशा प्रकारे साजरा करावा? याबद्दल आम्ही राजकारणी, अभिनेते, चित्रकार, दिग्दर्शक, लेखक, सरकारी अधिकारी अशा विविध व्यवसायातल्या आणि वयोगटातल्या पुरुषांना विचारले. त्यांची उत्तरं विचार करायला लावणारी आहेत.
याशिवाय प्रसारमाध्यमात दिसणाऱ्या पुरुषांच्या प्रतिमा, पुरुषत्वाविषयीच्या पुस्तकांची ओळख आणि मर्दानगी बद्दल कविता असा भरगच्च मजकूर या महिन्यात वाचायला मिळणार आहे. उद्यापासून पुरुषांनी लिहिलेल्या लॉकडाउन विषयीच्या अनुभवांनी ह्या मेजवानीची सुरुवात करूया!
मागच्या महिन्यात सोशलमिडियावर आवाहन करून पुरुषांनी लॉकडाऊनविषयीचे स्वत:चे अनुभव लिहून पाठवावेत असं आवाहन ‘पुन्हास्त्रीउवाच’ ने केलं होतं. स्त्रियांवर करोनोत्तर काळात जे परिणाम झाले त्याविषयीचे अनेक अभ्यास झाले. त्याविषयीचे लेख ‘पुन्हास्त्रीउवाच’ आणि इतरही अनेक ठिकाणी प्रकाशित झाले. पण पुरुषांवर करोना आणि लॉकडाऊनचे कायकाय परिणाम झाले त्यावर फारसे काही अभ्यास झाल्याचे ऐकिवात नाही. म्हणून याविषयी पुरुषांकडूनच समजून घ्यावे असे ‘पुन्हास्त्रीउवाच’ला वाटले. फिटनेस ट्रेनर, पर्यटन उद्योजक, रंगकर्मी, लेखक, पत्रकार अशा वेगवेगळ्या व्यवसायातल्या आणि वयोगटातल्या पुरुषांनी आपले हे अनुभव लिहिले आहेत. ते उद्यापासून तुमच्यासमोर येतील. आम्ही ‘पुन्हास्त्रीउवाच’ तर्फे स्त्रीवादी दृष्टिकोनातून त्यावर काही टिप्पणी किंवा विश्लेषण केलेले नाही. मे महिन्यापासून ‘पुन्हास्त्रीउवाच’मध्ये प्रकाशित झालेल्या स्त्रियांच्या अनुभवांशी हे पुरूषांचे अनुभव वाचकांना स्वत:लाच पडताळून पहाता येतील. तुमच्या प्रतिक्रिया समजून घेण्याची खूप उत्सुकता आहे!
Tags
पुरुषभान