मिथकांचा वास्तवाने उलगडा !


या महिन्यातल्या ‘पुरुषभान’ ह्या विषयसूत्रामध्ये आपण काही पुस्तकांची ओळख करून घेणार आहोत. आज प्राच्यविद्यापंडित शरद पाटील यांनी लिहिलेल्या ‘रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष’ ह्या पुस्तकाविषयी समजून घेऊया. भारतीय मनात राम आणि कृष्ण यांना खूप महत्त्वाचे स्थान असते. अनेकजण त्यांना आदर्श मानतात. त्याकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहायला हे पुस्तक मदत करते. हा पुस्तक परिचय किशोर मांदळे यानी करून दिला आहे. त्यांच्या मते ‘लिंगभावी समतेसाठी काम करणाऱ्या स्त्रीपुरुषांना स्वत:प्रती संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष करण्यासाठी एक नितळ दृष्टी देणारे हे पुस्तक अवश्य वाचायला हवे.’

मिथकांचा वास्तवाने उलगडा ! 

पुस्तक परिचय : रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष
लेखक : (प्राच्यविद्यापंडित) शरद पाटील
प्रकाशक : मावळाई प्रकाशन, शिरूर
पाने : १५० किंमत : १२०/-

रामायण व महाभारत या महाकाव्यांविषयी भारतीय मन उदासीनता व उत्सुकता या परस्पर विरोधी भावनांवर हिंदोळत असते. हे भारतीय मन पूर्णांशाने आधुनिक मन नाही. आणि परंपरेचा अर्थ तर प्राचीनत्व एवढाच करण्याकडे त्याचा कल आहे.
कुंतीला कर्ण सूर्यापासून झाला, जमीन नांगरताना नांगराच्या फाळाने पडलेल्या सरीतून सीता उपजली ... यासारखी मिथके उदासीनता निर्माण करतात तर या महाकाव्यातील नाट्यमय कथने व त्याभोवती गुंफलेले छळ, कपट, संहार, क्रौर्य व त्याचवेळी प्रेम, वात्सल्य, द्वेष, असुया, मत्सर व कारुण्य असा सारा बहुपेडी पट असल्याने उत्सुकताही निर्माण होते. पण काही झाले तरी या महाकाव्यांना 'इतिहास' मानायला मन तयार होत नाही.
इतिहासाचा शब्दश: अर्थ होतो : इति + हास = इतिहास. इति म्हणजे इथपर्यंतच्या आणि हास म्हणजे गोष्टी. पण तरिही, इतिहास म्हणजे घडून गेलेली व आता कुलूपबंद झालेली संहिता नव्हे. वर्तमानाच्या चावीने ती पुन्हा पुन्हा उघडली जाते व आजच्या वास्तवाने इतिहासाची नवीनच उकल होत असते. इतिहास जसा वर्तमानाचा अर्थ लावायला उपयोगी पडतो तसाच वर्तमान देखील इतिहासाचा नवा अन्वयार्थ लावत असतो.

या पार्श्वभूमीवर रामायण-महाभारत हा इतिहास आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचे उत्तर शरद पाटील असे देतात की - ‘राम व कृष्ण हे काल्पनिक नाहीत. द्वारका समुद्रतळाशी सापडल्यामुळे कृष्ण ऐतिहासिक व्यक्ती ठरला आहे. रामायण बौद्ध व जैनांमध्येही असल्याने व कृष्णाच्या ऐतिहासिकतेमुळे रामही ऐतिहासिक पुरुष मानावा लागतो. रामाचे ऐतिहासिकत्व अमान्य केले तरी रामायण हे भारतीय इतिहासाचे एक साधन असल्याचे अमान्य करता येत नाही.’
रामायण व महाभारत ही मुळात लोककाव्ये होती. त्याचे व्यवस्थितीकरण अनुक्रमे वाल्मिकी व व्यास यांनी केले. लिखित इतिहास विरुद्ध मौखिक परंपरा हा पेच इथेही आहे. लिखित इतिहास जरी जास्त विश्वसनीय असला तरी मौखिक परंपरा ज्या स्मरण परंपरेने चालत येते, त्यावरून तो इतिहास अविश्वसनीय असू शकत नाही. वेद हे मौखिक परंपरेने चालत येऊनही त्यात कानामात्रेचाही फरक पडलेला नाही. तेच बौद्ध त्रिपिटकांचेही. तेही शेकडो वर्षे मौखिक परंपरेने चालत राहिले. वेद व त्रिपिटक धर्मग्रंथ आहेत. त्रिपिटक इतिहास मानले जातात तर वेद 'इतिहासाची साधने' मानली जातात. तर मग पुराणांनाही तोच दर्जा दिला पाहिजे. त्यातून इतिहास कसा मिळवायचा हा अन्वेषणपद्धतीचा (methodology) भाग आहे. असे शरद पाटील (शपा) यांचे मत आहे.
पुस्तकाच्या शीर्षकातील तिसरा शब्द आहे - वर्णसंघर्ष ! हा शब्द पूर्णार्थाने भारतीय आहे. " जगाचा इतिहास हा 'वर्गसंघर्षाचा' इतिहास आहे." हे मार्क्सचे इतिहासाच्या संबंधाने मूलभूत विधान आहे. पण ब्रिटीश आगमनापर्यंत भारतीय समाज हा वर्गसमाज नव्हता. जगभर वर्गसमाज अस्तित्वात असताना जंबुद्वीप भारत मात्र 'वर्ण-जाती' समाज होता. त्यामुळे भारतीय इतिहासाच्या संदर्भात 'वर्णसंघर्षा'चे हे अनन्यत्व वादातीत आहे. ते टाळून भारतीय इतिहास लिहिता येत नाही.
आधुनिक काळात, भारतीय इतिहासाला प्रथम वर्णजातिसंघर्षाचा दृष्टीकोन दिला तो महात्मा फुल्यांनी. त्यामुळे मार्क्सच्या वर्गसंघर्षी तत्त्वज्ञानाला फुले-आंबेडकरी तत्त्वज्ञानाची जोड द्यावी, अशी मागणी दलित विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्याकडून आली. त्यानंतर शपांनी प्रथम माफुआ (मार्क्स-फुले-आंबेडकर) व नंतर सौमा (सौत्रांतिक - मार्क्सवादी) ही तत्त्वज्ञानात्मक मांडणी केली. 'माफुआ'ला उदंड प्रतिसाद मिळत असतानाच, माफुआ विचारसरणी म्हणजे तत्त्वज्ञान होऊ शकत नाही असा निष्कर्ष काढून शपांनी माफुआपासून डिपार्चर घेतले व त्यांनी बौद्ध महायानी आचार्य दिग्नागच्या सौत्रांतिक विज्ञानवादाची मार्क्सवादाशी सांगड घातली. माफुआपासून डिपार्चर का घेतले व 'सौमा' का निर्मिले, यात आता आपण जाणार नाही आहोत, पण हे पुस्तक वाचताना शपांचा हा प्रवासही लक्षात घ्यावा लागतो म्हणून त्याचा ओझरता उल्लेख केला आहे.
संघ परिवाराने हायजॅक केलेली जयप्रकाश नारायणांची दुसऱ्या स्वातंत्र्याची चळवळ ऐन भरात असताना शपांची महाराष्ट्रभर रामायण महाभारतावर व्याख्याने सुरू झाली होती. ती व्याख्याने लेखबद्ध होऊन अनेक वृत्तपत्रे व नियतकालिकांतून प्रसिद्ध होत राहिली. प्रस्तुतचे पुस्तक म्हणजे अशा (१९७५ ते १९८३ पर्यंत) प्रसिद्ध झालेल्या निवडक लेखांचे एकत्रिकरण आहे. जातिअंतक प्रबोधनापुढे त्या काळात उभ्या राहिलेल्या आव्हानांचा प्राय: मुकाबला करीतच ही व्याख्याने व लेखन घडले असल्याने त्यातील विवेचनही धारदार बनले आहे.
'रिडल्स ऑफ राम अॅण्ड कृष्णा' या आंबेडकरांच्या मांडणीला झालेला विरोध, पांडुरंग शास्त्री आठवले यांनी 'स्वाध्याय' परिवारामार्फत बहुजनांतील नवशिक्षित मध्यमवर्गीयांचे चालविलेले ब्राह्मणीकरण आणि टीव्हीवर गाजत असलेल्या रामायण महाभारतावरील मालिका. या सर्वांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परामर्श घेतच ही व्याख्याने व लेखन घडल्याने 'वर्णसंघर्षा'ला शीर्षकात स्थान मिळाले आहे.
आधी सांगितल्याप्रमाणे रामायण महाभारत ही महाकाव्ये त्यातील नाट्यमयतेमुळे मनाला मोहिनी घालतात, हे नाकारता येणार नाही. खुद्द शपांना आपली या महाकाव्यांवरील व्याख्याने देखील सवाद्य गाऊन कीर्तनासारखी व्हावीत, असे वाटत होते ! कौमार्यात कर्णाला नाईलाजाने जन्म दिल्यावर कुंती ते अर्भक अश्वनदीत एका काष्ठ पेटाऱ्यातून सोडताना ती नदीमाता वगैरे देवी देवतांना (या पुत्राला सुरक्षित ठेवण्यासाठी) आळवते तो महाभारतातील सर्वात हृदयद्रावक अध्याय असल्याचे शपा नमूद करतात. (दुर्गा भागवत 'व्यासपर्व'मध्ये या शोक, कंप, कोमलता व ताटातूटीवर जे भाष्य करतात ते मूळातून वाचावे असेच आहे) हा अध्याय कोरसने सवाद्य गायला जावा व त्याचे निरूपण कीर्तनाच्या शैलीत व्हावे एवढेच सांगून ते थांबत नाहीत तर अशी रसाळ व्याख्याने 'हिंदुत्ववादी रामा'चा पराभव करतील, असा त्यांना विश्वास होता.
रामायण म्हणजे प्रभूराम विरुद्ध राक्षस रावण आणि महाभारत म्हणजे परमेश्वर कृष्णप्रणित पांडव विरुद्ध राक्षसावतार कौरव यांचा संघर्ष ...हे ब्राह्मणी प्रबोधन हजारो वर्षे चालू आहे. त्याविरोधात जाऊन शपा, रामायणाचे सूत्र मावळती स्त्रीसत्ता व उगवती पुरुषसत्ता (राम विरुद्ध सीता) असल्याचे व महाभारताचे आंतरिक सूत्र देखील पांडव विरुद्ध द्रौपदी असल्याचे सांगतात.
त्यांच्या मते - रामाची युद्धे स्त्रीसत्ताक गणराज्याशी होत हा योगायोग नाही. स्त्रीवध निषिद्ध असणे हा स्त्रीसत्ताक समाजाचा 'धर्मपूर्व धर्म' होता. ताटकेचा वध करायला युवक रामाला प्रोत्साहन देताना विश्वामित्र म्हणतो - " न हि ते स्त्रीवध-कृते घृणा कार्या नरोत्तम l चातुर्वर्ण्य-हितार्थं हि कर्तव्यं राज-सूनुना ll " पुरोषोत्तमा ! स्त्रीवध करावा लागतो आहे म्हणून मनात दया आणणे योग्य नाही. चातुर्वर्ण्याच्या हितासाठी झटणे हेच राजपुत्राचे कर्तव्य आहे.
पुढे शरद पाटील असेही म्हणतात की कौसल्येला राम दशरथापासून झाला नव्हता. तो 'नियोग' पद्धतीने ब्रह्मन् ऋष्यशृंगाने वीर्यरूपी बीज (कौसल्या या दशरथाच्या शेतात) टाकण्यातून झाला होता. हा स्त्रीसत्ताक धर्मपूर्व धर्माचा अवशेष होता. 'योनिशुचितेसाठी' सीतेचा त्याग करणारी नवी मूलव्यवस्था अद्याप यायची होती. ती आल्यावरच दुर्गम वनात नदीपार आपल्याला सोडायला आलेल्या दिराजवळ सीता, " लक्ष्मणा ! माझी काया विधात्याने खरोखर दु:ख भोगण्यासाठी घडविली आहे ! " असा आकांत मांडते जो सबंध स्त्रीजातीचा प्रातिनिधिक चित्कार होता ! सर्व स्त्रियांना गुलाम करण्यासाठी पुरुष एकत्र आले आणि नंतरच पुरुषांनी पुरुषांना गुलाम केले. 'शंबुका'च्या हत्येच्या अंकाचा पडदा वर जाण्यासाठी, सीतेला 'दे माय धरणी ठाय' करणारा स्त्रीसत्तानिर्मूलनाचा अंक पार पडणे अटळच होते.
आज प्रत्यही घडणाऱ्या निर्घृण बलात्काराच्या घटना व दलितांना मृत्यूदंड देण्यातल्या अपरिमित क्रौर्याचा अर्थ लावताना आपण 'मनुस्मृती'ला अधोरेखित करतो. तरीही या घटनांच्या नंतर समाजातील उच्चभ्रू व मध्यम जातवर्गीयांच्याच काय खुद्द दलित-मागास स्त्री-पुरुषांच्या येणाऱ्या निषेधाच्या व समर्थनाच्या अशा दोन्हीही प्रतिक्रियांकडे सूक्ष्मपणे पाहिले तर त्यामागे रामायण महाभारताने घडविलेले पितृसत्ताक ब्राह्मणी विषमतावादी मन प्रच्छन्नपणे दिसते. भारतीयांच्या मेंदूत जाणिवेतला ब्राह्मणवाद व नेणिवेत गाडला गेलेला अब्राह्मणी समतावाद या विरोधांची एकजूट होऊन प्रबोधनाची समस्या कशी जटिल बनते ते जाणण्याची अंतर्दृष्टी घडवायला हे पुस्तक मदत करते. नेणिवेचे सकारात्मक प्रबोधन कसे शक्य आहे, याचीही दिशा दर्शवते.
शपांनी, जेत्यांच्या लिखित साहित्यातील व पराभूतांच्या मौखिक परंपरेतील शब्दांचे मूळ अर्थ व बदलत जाणारे अर्थ घेऊन शब्द व्युत्पत्तीशास्त्राच्या आधारे ही नवी इतिहास मीमांसा घडविली आहे. मलपृष्ठावर या मीमांसेचे सुस्पष्ट असे प्रयोजन त्यांनी दिले आहे : “जातिअंतक भांडवलदारी लोकशाही क्रांतीची यशस्वीता समाजवाद उभारणीच्या पूर्वतयारीवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रबोधनाचा परीघ स्त्रीराज्यापर्यंत जातो. ब्राह्मणी प्रवाहाने स्त्रीराज्यापासूनचा अब्राह्मणी प्रवाह नष्टप्राय व बदनाम केल्यामुळे त्यातून या अब्राह्मणी प्रवाहाला मुक्त केल्याशिवाय प्रबोधनच काय पण समाजवादाची उभारणी देखील शक्य नाही.”
परिवर्तनाची आस असलेल्या व विविध समाज घटकांत चळवळीचे काम करणाऱ्या सर्वांनीच हे पुस्तक वाचले पाहिजे. पण त्यातही लिंगभावी समतेच्या चळवळीत काम करणाऱ्यांनी ते आवर्जून वाचले पाहिजे. कारण, समतेची सर्वोच्च कसोटी ही स्त्री-पुरुष तथा लिंगभावी समता हीच आहे. या समतेसाठी स्त्री आणि पुरुष दोघांनाही एक आतला असा स्वत:प्रती संघर्ष करावा लागणार आहे. तो संघर्ष करण्यासाठी एक नितळ दृष्टी देणारे हे पुस्तक अवश्य वाचायला हवे.


किशोर मांदळे

लेखक, कवी आणि सत्यशोधक कार्यकर्ता 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form