सणांचा आनंद घेण्याची सगळ्यांना सारखीच संधी मिळते का? सर्वजण श्रम आणि मजा सारख्या प्रमाणात करू शकतात का? की सण साजरे करायच्या पद्धतीतून देखील पितृसत्ता डोकावते? मर्दानगी, पुरुषत्व या संकल्पनांशी सणांचा काय संबंध आहे? आज डॉ. सीमा घंगाळे यांच्या ‘सणातली पुरुषप्रधानता’ ह्या लेखाच्या निमित्ताने थोडंसं आत्मपरीक्षण करूया.
सणातली पुरुषप्रधानता
लग्न झाल्यावर लगेचच नवीन शहरात नोकरी मिळाल्यामुळे वर्षाला माहेरी जायला मिळाले नाही. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीची ती विशेष वाट पाहत होती. तीन दिवस सासरी दिवाळी करून दोन दिवस आईकडे जावे असे तिला वाटले. 'पण तुला भाऊ नाही तर तू दिवाळीत माहेरी जाऊन काय करणार?' या प्रश्नाने तिला धक्काच बसला! म्हणजे जिला भाऊ आहे तीच दिवाळीला माहेरी जाऊ शकते का? सहा वर्षानंतर तिच्या बहिणीचे लग्न झाले तेव्हा बहिणीच्या सासूने तर कहरच केला;'दिवाळी सणाला भाऊ घ्यायला येतो तेव्हाच आम्ही सुनेला माहेरी पाठवतो. तुला भाऊ नाही तर तू कशी जाणार?' लहानपणापासून दिवाळी सण हा दिव्यांचा, आनंदाचा, नात्यांचा आणि आपल्या माणसांसोबत उत्साहाने साजरा करायचा उत्सव आहे -असं मानणाऱ्या मुलींच्या आयुष्यात लग्नानंतर त्या सणाच्या आनंदाला पुरूषप्रधानतेचा दणका बसला. ह्या घटना काही स्वातंत्र्यपूर्व काळातील नाहीत, तर अगदी अलीकडच्या दिवसातील अल्ट्रामॉडर्न म्हणवणाऱ्या समाजातल्याच आहेत.घरात पुरुष माणूस नसेल तर गुढीपाडवा, गणपती हे उत्सव कसे साजरे होणार? गुढी उभारायला पुरुषमाणूस पाहिजे, गणपती आणायला घरात पुरुष असतील तर ठीक, बायकांनी कशी त्याची स्थापना करावी! असे प्रश्न पडतातच. दहीहंडीचा थरार मुलांनी अनुभवायचा. त्यातूनही स्पर्धा करून थर वाढवायचे, जोखीम घ्यायची आणि मर्दानगी दाखवायची. म्हणजे दहीहंडी किंवा दहीकाला हे बाळकृष्णाच्या लीलांचे रिक्रिएशन नसून जणू काही एखादा पावर गेम आहे. आता त्यावर कळस म्हणजे मुलीही मुलांपेक्षा कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत असं म्हणत मुलींचेही दहीहंडीचे थर लावले जातात. म्हणजे परत कोणासारखे वागून दाखवायचे - तर मर्दासारखे!
रक्षाबंधन हा भावा-बहिणीच्या प्रेमाचा सुंदर सण. पण त्यातही भावाला बहिणीचे संरक्षण करण्यासाठी शिकवायचे आणि बहिणीला त्याच्या आधाराने जगायला. प्रत्येक स्त्रीला कसा प्रथम भावाचा आणि नंतर नवऱ्याचा आधार लागतो हे मनावर बिंबववायचे. वास्तवातलं चित्र पाहिलं तर कितीतरी बहिणी शिकून नोकरी करून आपल्या भावांना शिकवतात, पाठीशी उभे राहतात. आयुष्यात अडचणी आल्या की प्रसंगी मदतसुद्धा करतात तरीही त्यांनी सणाच्या निमित्ताने संरक्षणासाठी भावाला गळ घालायची. किती गम्मत!!
ज्या घरात फक्त मुली आहेत तिथे नेहमी बहिणींना विचारले जाते - 'तुम्ही रक्षाबंधन कसे साजरे करता?' जणू काही - भाऊ नाही तर तुम्हाला त्या सणाचा काय उपयोग? जणू काही तो नात्यांचा उत्सव नसून नियमाप्रमाणे फॉलो करायचा एखादा प्रोटोकॉल आहे. लिंगधारीत समाजाने पिढ्यानपिढ्यांच्या मेंदूचे असे कंडिशनिंग केले आहे की नात्यांकडे लिंगनिरपेक्ष दृष्टीने पाहताच येत नाही.
स्त्रीपुरुषातल्या शारीरिक भेदांना अशा समाजनिर्मित लिंगभावाने झाकोळून टाकल्याने पुरुषांना फक्त वर्चस्वाचा फायदा होतो का? तर नाही!! दांभिक मर्दानगीच्या कल्पनांनी पुरुषही दबलेलाच आहे. 'पुरुषासारखा राहा, मर्द बन, पुरुषासारखा वागायला शिक' असे बोलून किशोरवयीन मुलांमध्ये सत्ता, स्पर्धा,अधिकार आणि त्यातून येणारी हिंसा हे समाजच रुजवतो. ओशो पुरुषाला सांगतात तुझ्यामध्ये वडिलांची कणखरता आणि आईची मृदूममता या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे पुरूषाने स्वतःमधल्या स्त्रीत्वाचा आणि स्त्रीने स्वतः मधल्या पुरुषपणाचा शोध घेतला पाहिजे. लिंग हा एक शारीरिक तपशील आहे. बाईचे आणि पुरुषाचे माणूसपण फक्त या एका तपशीलावर मांडून त्याच्या आयुष्याला ढोंगी साचेबद्ध पणा देणे, आता बदलायला हवे.
'स्त्री जन्माला येत नाही तर ती घडवली जाते', हे वाक्य जेंडर स्टडीज मध्ये नेहमी अधोरेखित केले जाते. भारतीय पितृसत्ताक समाजजीवनाचा विचार केला तर 'पुरुष जन्माला येत नाही तर घडवला जातो' हे वाक्यदेखील तितकेच खरे ठरते. पितृसत्ता स्त्रियांप्रमाणेच पुरुषालाही साच्यात बंद करून माणूस म्हणून त्याचा विकास होऊ देत नाही. पण बाईमाणसासारखा तो शोषित, दुबळा राहत नाही तर तो आश्चर्यकारकरीत्या 'वर्चस्ववादी' होतो आणि जन्माला येते मर्दानगी ! अधिकार, सत्ता, हिंसा, स्पर्धा या पॉवरपॅकने तयार झालेली वर्चस्ववादी संरचना म्हणजेच विखारी मर्दानगी. सणांच्या निमित्ताने अशी चुकीची मर्दानगीची कल्पना दृढ करायची की मर्दानगीचे सकारात्मक पैलू शोधायचे?
काही सण फक्त पुरुषांसाठी साजरे होतात आणि बायकांच्या वाट्याला येतो उपवास ! नवरा चांगला मिळण्यासाठी उपवास, पतीव्रता आहे म्हणून उपवास, सवाष्ण मरण यावे म्हणून उपवास! वटपौर्णिमा, करवा चौथ, हरतालिका, भावाच्या दीर्घायुष्यासाठी नागपंचमी. असे वेगवेगळ्या प्रकारचे उपास-तापास! त्यासोबत हळदीकुंकू करणे, त्यामध्ये घटस्फोटीत, परित्यक्ता, विधवांना जाणीवपूर्वक सहभाग नाकारणे यातून सणांमधली पुरुषप्रधानता अधिकच प्रकर्षाने जाणवते.एकीकडे सामाजिक दडपणामुळे स्त्रियांवर असे उपासतापास करण्याची सांस्कृतिक जबरदस्ती असते आणि त्याचसाठी त्यांच्यावर विनोदही केले जातात. अगदी दिवाळी सारखे निखळ आनंदासाठी केले जाणारे सण पाहिले तरी त्यात फराळ, घराची साफसफाई, सजावट यांच्यासाठी घरोघरी बायकाच राबत असतात. पुरुषांना मात्र कौतुकाने तेल-उटणे लावून रगडून आंघोळ घातली जाते.
विवाहपूर्व व विवाहोत्तर आणि नवरा मेल्यावर विधवा या तीनही अवस्थांमध्ये सणांच्या निमित्ताने नवऱ्याच्या अस्तित्वाभोवती स्त्रीचे आयुष्य फिरवत ठेवण्यात आले आहे. कौटुंबिक नातेसंबंधातील सर्वात विषमसंबंध हा पती-पत्नीचा आहे. पतीला देव आणि पत्नीला दासी असे चित्र उभे केले आहे. या देवाच्या पुरुषार्थामध्येच पत्नीचे अस्तित्व झाकोळून जाते आणि मग आयुष्यभर कुटुंबसंस्था स्त्रीला स्वतःची ओळख मिळू देत नाही. पुरुषप्रधानतेचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आणि त्यातून स्त्रियांना दुर्बल म्हणून दडपून ठेवण्यासाठी, सगळ्या प्रेमाच्या नात्यांना समाजनिर्मित भेदात तोलून पुरुषत्व आणि स्त्रीत्व अशा दोन टोकांवर नेऊन ठेवले जाते. स्त्रीपुरुषातल्या शारीरिक भेदांना अशा समाजनिर्मित लिंगभावाने झाकोळून टाकल्याने पुरुषांना फक्त वर्चस्वाचा फायदा होतो का? तर नाही!! दांभिक मर्दानगीच्या कल्पनांनी पुरुषही दबलेलाच आहे. 'पुरुषासारखा राहा, मर्द बन, पुरुषासारखा वागायला शिक' असे बोलून किशोरवयीन मुलांमध्ये सत्ता, स्पर्धा,अधिकार आणि त्यातून येणारी हिंसा हे समाजच रुजवतो. ओशो पुरुषाला सांगतात तुझ्यामध्ये वडिलांची कणखरता आणि आईची मृदूममता या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे पुरूषाने स्वतःमधल्या स्त्रीत्वाचा आणि स्त्रीने स्वतः मधल्या पुरुषपणाचा शोध घेतला पाहिजे. लिंग हा एक शारीरिक तपशील आहे. बाईचे आणि पुरुषाचे माणूसपण फक्त या एका तपशीलावर मांडून त्याच्या आयुष्याला ढोंगी साचेबद्ध पणा देणे, आता बदलायला हवे.
'स्त्री जन्माला येत नाही तर ती घडवली जाते', हे वाक्य जेंडर स्टडीज मध्ये नेहमी अधोरेखित केले जाते. भारतीय पितृसत्ताक समाजजीवनाचा विचार केला तर 'पुरुष जन्माला येत नाही तर घडवला जातो' हे वाक्यदेखील तितकेच खरे ठरते. पितृसत्ता स्त्रियांप्रमाणेच पुरुषालाही साच्यात बंद करून माणूस म्हणून त्याचा विकास होऊ देत नाही. पण बाईमाणसासारखा तो शोषित, दुबळा राहत नाही तर तो आश्चर्यकारकरीत्या 'वर्चस्ववादी' होतो आणि जन्माला येते मर्दानगी ! अधिकार, सत्ता, हिंसा, स्पर्धा या पॉवरपॅकने तयार झालेली वर्चस्ववादी संरचना म्हणजेच विखारी मर्दानगी. सणांच्या निमित्ताने अशी चुकीची मर्दानगीची कल्पना दृढ करायची की मर्दानगीचे सकारात्मक पैलू शोधायचे?
डॉ सीमा घंगाळे