उजव्या शक्तींचा उदय आणि स्त्रिया

 

गेल्या आठवड्यात हाथरस बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यापासून महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरुद्ध बातम्यांमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर सोशल मिडियावरूनही बलात्कारी मानसिकतेचा निषेध होतो आहे. पण त्यापूर्वी काही दिवसांपर्यंत मात्र याच माध्यमांतून रिया चक्रवर्ती, सोनिया गांधी इ. महिलांच्या संदर्भात अतिशय वाईट शब्दात निंदानालस्ती केली जात होती. अशा प्रकारचे ट्रोलिंग वारंवार अनेक महिलांच्या बाबतीत केले जाते – त्यामागची मानसिकता काय असते? चांगलीबाई किंवा वाईटबाई म्हणजे काय हे कसे ठरते? पुरुषसत्तेचा आणि उजव्या राजकीय विचारांचा परस्पर संबंध कसा असतो?

असे अनेक मुद्दे चैत्रा रेडकर यांच्या  ह्या लेखातून समजून घेता येतील. 


डॉ. चैत्रा रेडकर, गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांच्या अभ्यासक असून, ‘आयसर’ पुणे येथे मानव्य व सामाजिक शास्त्रांच्या सहयोगी प्राध्यापिका आहेत.


सबलीकरण झालेल्या स्त्रीची प्रतिमा दाखवायची असेल तर आजकाल नऊवारी साडी नेसून डोक्यावर फेटा बांधून मोटार सायकलवरून निघालेल्या तरुणींचा तांडा दाखवायची पद्धत रूढ झाली आहे. 'संस्कृतीचाही आदर राखते आणि कर्तृत्वही गाजवते, मोठ्यांची काळजी घेते आणि दुर्जनांना धडाही शिकवते' अशी एखादी टॅग लाईनही या इमेजच्या अवतीभवती सोडून दिली की मग अशा सबळ स्त्रीच्या निमित्ताने उभे करायचे राजकारण आकाराला येते. प्रतीकांच्या पातळीवर स्त्रीची सबलता सिद्ध करण्यासाठी नेमके काय काय केले जाते हे पाहिले तर हा पैस स्पष्ट होऊ लागतो. सबल स्त्री नऊवारी नेसते म्हणजे पारंपरिक वस्त्र-प्रावधान हा - सत्तेचा एक स्रोत म्हणून वापरला जातो. तिच्या दैनंदिन वस्त्रात पर्यायाने तिच्या सहज-स्वाभाविक रूपाचा सत्तेशी काहीच संबंध नसतो. किंबहुना सबळ होण्यासाठी तिला स्वाभाविकता सोडून द्यावी लागते. वर्तमानातील स्वाभाविकता सोडून जेव्हा भूतकाळातील स्वाभाविकता परिधान करते, तेव्हा तीही पुरेशी ठरत नाही, तर तिला सबळ होण्यासाठी पुरुषांच्या परिधानाचा आसरा घ्यावा लागतो. त्यांच्यासारखा फेटा बांधावा लागतो. 'फेमिनाईन' दिसण्यासाठी वॅक्सिन्ग-थ्रेडींग केलेलं असतं म्हणून मिशांवर उलटा हात फिरवत ताव मारता येत नाही, मग फेट्याचा शेमला मागे टाकण्यावरच समाधान मानावे लागते. सबळ होण्यासाठी इतर कोणतेही वाहन चालत नाही, वेग-दणकटपणा - राकटपणा- स्टॅमिना यांच्याशी जोडली गेलेल्या मोटारसायकलवरच तिला स्वार व्हावं लागतं. 
या प्रतिकात्मकतेत किमान चार गोष्टी गृहीत आहेत.
1. स्त्री-सुलभ आणि पुरुषी असे काही निश्चित गुणधर्म आहेत.
2. हे गुणधर्म अंगी आहेत याची सिद्धता त्यांच्या प्रतिकात्मक अभिव्यक्ती मधून होते. म्हणजे गुण अंगी असण्या-नसण्याला महत्व नाही तर त्या गुणांची ज्या प्रतिकांशी सांगड घातली आहे त्या प्रतीकांचे प्रदर्शन हीच त्या गुणांच्या असण्याची पावती आहे.
3. स्त्री-सुलभ मानलेले गुण हे स्त्रीला सबळ होण्यासाठी उपयुक्त नाहीत. सबळ होण्यासाठी तिने पुरुषी गुण आत्मसात करणे आवश्यक आहे.
4. स्त्रीने पुरुषी गुण आत्मसात करताना 'स्त्री-सुलभ' गुण सोडून चालणार नाही. ती 'पुरुष' बनता कामा नये. तिचं अस्तित्व स्वतंत्र असता कामा नये. ती स्वतःच्या सुखासाठी जगता कामा नये, तिने दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख शोधलं पाहिजे. ती संसारी, सोज्वळ, पवित्र, मुलाबाळांना अंगाखांद्यावर खेळवणारी, घरा-कुटुंबापुढे नोकरी-करियरला दुय्यम मानणारी आणि जाताजाता नोकरी करूनही तिथे कर्तृत्व दाखवणारी, हरहुन्नरी, मल्टीटास्कर, सर्वगुण संपन्न, गृहकृत्यदक्ष, गोरी, देखणी, मध्यम बांध्याची, मध्यम उंचीची, आखूड शिंगी, बहुदुधी, कधीच प्रश्न न विचारणारी पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माहीत अशी सुपरवुमनही असलीच पाहिजे.
तिच्या उलट आपली 'स्त्री-सुलभ' शालीनता सोडून मुक्तीची आस बाळगणारी आणि त्यासाठी संघर्ष करणारी स्त्री ही कजाग, भांडकुदळ, निगेटिव्ह, स्वार्थी, दुट्टपी, कावेबाज, विध्वसंक, घर फोडणारी, काम वासनेने वखवखलेली असते. ती समाजहिताला घातक असते. त्यामुळे 'व्यापक' समाजहिताचा विचार करून अशा स्त्रीला वठणीवर आणण्यासाठी पुरुषाला आक्रमक व्हावे लागले तर त्यात चूक पुरुषांची नाही. अशा स्त्रीची निर्भत्सना करण्यासाठी कोणत्याही थरापर्यंत जाणे योग्यच आहे. जगभरात जसजशा उजव्या शक्ती प्रबळ होत चालल्या आहेत, तसतसे हा दृष्टीकोनही प्रबळ होत चालला आहे. सामाजिक माध्यमांवर ज्या प्रकारे स्त्रियांविषयी कॉमेंट्स होत राहातात त्यातून हे दृष्टीकोन किती बळावत आहेत हे ठळक दिसते.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील संशयीत रिया चक्रवर्तीवर चाललेली मिडिया ट्रायल आणि समाज माध्यमांवरील ट्रोलिंग हे अगदी आत्ताचे उदाहरण झाले. तिची निर्भत्सना करताना सभ्यतेची कोणतीही किमान मर्यादा पाळली गेली नाही. 'ती बंगाली आहे म्हणून तिला काळी जादू येते' हा धागा पुढे सगळ्या बंगाली मुली काळी जादू करतात', इथपर्यंत गेला. सोशल मीडियावर ज्या ज्या मुलींचे रियाबरोबर फोटो होते त्या सगळ्या तिच्यासारख्याच असणार म्हणत त्यांचे ट्रोलिंग झाले. ‘गुड गर्लफ्रेंड - बॅड गर्लफ्रेंड सिंड्रोम’ खेळवला गेला. त्याच्या कुटुंबाच्या भूमिकेची भलावण करणारी ती चांगली, कुटुंबाचे आणि त्याचे जमत नव्हते म्हणणारी वाईट, नैसर्गिक कुटुंब हे खात्रीलायक व्यक्तीच्या हिताचे संरक्षक आणि गर्ल फ्रेंड मात्र नक्कीच गोल्ड-डीगर! एका विशिष्ट व्यक्तीच्या संदर्भात या बाबी कोणत्याही स्वरूपाच्या असू शकतात. म्हणजे बॉय-फ्रेंडला लुबाडणाऱ्या मुली असतात की नाही तर असू शकतात, व्यक्तीला कुटुंबापासून तोडण्याचे प्रयत्न होतात की नाही तर होतात, कुटुंब व्यक्तीच्या हिताची काळजी वाहते की नाही तर वाहते. माणसे सर्व प्रकारची असतात मात्र जेव्हा एका व्यक्तीवरून (आणि इथे तर पुरेशी शहनिशाही ना करता) जेव्हा संपूर्ण समुदायाबद्दल समज बनवले जातात तेव्हा त्यात एक राजकारण असतं. या केसमध्ये नेमके काय होते हे तपासण्याची संधीही न देता काढलेले निष्कर्ष हे पुरुषसत्ताक मूल्यांची पाठराखण करणारे होते. या प्रकरणात ज्या ज्या स्त्रियांची नावे आली किंवा ज्या स्त्रियांनी या विषयी काही भूमिका घेतली त्यांच्यावर सामाजिक माध्यमांतून झालेली विखारी टीका पहिली तर त्यातून काही गोष्टी स्पष्ट दिसतात. 


  • उजव्या शक्ती सामाजिक माध्यमांचा नियोजनबद्ध वापर करून विशिष्ठ व्यक्ती किंवा समाजाविषयीचं मत फार थोडक्या वेळात कलुषित करू शकतात. एखाद्या विशिष्ट संदर्भात आपल्याला पूरक दृष्टीकोन तयार करणे हे त्यांचे तात्कालिक उद्दिष्ट असले तरी ते साध्य करताना सर्व प्रकारच्या समतावादी मूल्याना आणि उदारमतवादी अवकाशाला पायदळी तुडवण्याचे काम हिरीरीने केले जाते. अशा एकारलेल्या विश्लेषणातून आणि अभिनिवेशातून वास्तवाचं बहुआयामी स्वरूप नाकारले जाते. कोणत्याही समाज घटकाला एकजिनसी सबगोलंकारी समूह म्हणून पेश करणे हे सांप्रदायिक राजकारणाला पोषक असते.
  • ‘तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे असाल तर तुम्ही आमचे शत्रू आहात’ हा दृष्टीकोन रुजणे ही उजव्या शक्ती यशस्वी होत असल्याची पावती असते. हा दृष्टीकोन रुजला की केवळ उजव्या शक्तीच नव्हे तर परिवर्तनवादी शक्तीही तीच भाषा बोलू लागतात. उदाहरणार्थ, ‘आम्ही स्वीकारत असलेला स्त्रीवादी दृष्टीकोन तुम्ही स्वीकारत नसाल तर तुम्ही स्त्रीवादीच नाही’; ‘जातीअंताची आमची भूमिका तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही ब्राह्मणी आहात.’ इत्यादी. हे दृष्टीकोन परिवर्तनवाद्यांमध्ये आधी नव्हते असे नाही. मात्र आता हे आग्रह अधिकच अणकुचीदार होत ज़ाताना दिसतात. अशा प्रकारच्या दृष्टीकोनाचा स्वीकार चर्चेचा अवकाश आक्रसत नेतो. एकच एक विचारधारा इतर विचारांपेक्षा स्वयंमेव श्रेष्ठ असल्याचा एकतर्फी निकाल देऊन टाकतो. विचारविनिमय, चर्चा, संवाद याविषयीची साशंकता ही अंतिमतः विचार-विरोधी असते. विचारहीन कृती परिवर्तनाची वाहक होऊ शकत नाही.
  • प्रस्थापित व्यवस्थेला पूरक अशी विषमतावादी मूल्ये रुजवताना वापरली जाणारी भाषा ही फसवी असते. ती शाब्दिक पातळीवर समता नाकारत नाही तर विषमता हीच खरी समता आहे हे बिंबवते. दुसऱ्या व्यक्तीची प्रतिष्ठा आणि समान अधिकार नाकारत तिच्यावर बिनबुडाचे आरोप करण्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटले जाते. फेक-न्यूजचे वृत्तपत्रीय स्वातंत्र्य म्हणून समर्थन केले जाते. सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने बेलगाम बोलणाऱ्या व्यक्तीला निर्भय-निडर म्हणून सादर केले जाते. यात भाषा व व्यवहार यात फारकत असली तरी माध्यमांतून सातत्याने झालेल्या माऱ्यातून लोक त्याकडे दुर्लक्ष करू लागतात. अशा रीतीने भाषा अधिकाधिक ‘पोलिटिकली करेक्ट’ असली तरी समता-स्वातंत्र्य-बंधुतेची मूल्ये मात्र खर्ची पडतात.  
उजव्या शक्ती त्यांना त्रासदायक वाटणाऱ्या स्त्रीला गप्प करण्यासाठी साधारणपणे खालील तंत्रे वापरतात 
अ ) स्त्रियांचे नग्न, अर्धनग्न फोटो प्रसारित करून तिला लाजिरवाणे वाटावे यासाठी प्रयत्न करणे. उदाहरणार्थ, सोनिया गांधी यांचा तारुण्यातला पोहोण्याच्या पोषाखातला फोटो व्हायरल केल्याचे दिसते. मध्यन्तरी मोदींचा वाढदिवस ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा झाल्यावर सोनियाजींचा वाढदिवस हा ‘राष्ट्रीय बारबाला दिवस’ म्हणून साजरा करावा असा ट्विटर ट्रेंड चालवला गेला होता. इथे मोदींचा प्रतीकात्मक निषेध हा त्यांच्या धोरणांच्या संदर्भात आहे तर सोनियाजींच्या विरोधातला ट्रेंड हा स्त्री म्हणून त्यांच्या चारित्र्याविषयीचा आणि लैंगिकतेविषयीचा आहे. अशा प्रकारामागच्या धारणा या अनेक प्रकारे पुरुषसत्ताक आहेत. विरोधक स्त्री नेत्याच्या लैंगिकतेची चर्चा ही तिच्यावरील टीकेचे साधन बनविणे हे तर पुरुषसत्ताक आहेच त्याचबरोबर स्वतः कष्ट करून उपजीविका चालविणाऱ्या बारबालांना हीन लेखणे हेही तेवढेच पुरुषसत्ताक आहे. एखाद्या ‘चांगल्या घराच्या’ स्त्रीला ‘बारबाला’ म्हटल्याने तिचा अपमान होईल ही दृष्टीच स्त्री-विरोधी आहे.
आ) स्त्रियांना बलात्कार आणि इतर प्रकारच्या शारिरीक हिंसाचाराची धमकी देणाऱ्यांना मोकाट ठेवणे. सामाजिक माध्यमांवर दीपिका पदुकोणला ‘पदमावत’प्रकरणी देण्यात आलेल्या धमक्या, रिया चक्रवर्तीवर भोजपूरी भाषेत आलेलं गाणं, अग्रीमा जोशुआ या कॉमेडियनला बलात्काराच्या धमक्या यातील शाब्दिक हिंसा ही विकृत मनोवृत्ती तर दाखवतेच त्याच बरोबर अशा प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई होण्यातील दिरंगाई, त्यांच्याविषयी व्यवस्थेने पाळलेले मौन यातून दहशत निर्माण केली जाते. ‘आमचं न ऐकणाऱ्या स्त्रियांना कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल ते त्यांचे त्यांनी पाहावे. आम्ही जबाबदार नाही.’ हा मेसेज स्त्रियांना भूमिका घेण्यापासून परावृत्त करणारा आहे.

इ) स्त्रीच्या विरोधात होणाऱ्या शाब्दिक व शारीरिक हिंसेचे समर्थन करणे. सोबत ट्विटरवरील काही कॉमेंट्सचा स्क्रिनशॉट दिला आहे. हाथरस बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटायला निघालेल्या प्रियांका गांधी यांच्या कुडत्याला एका पोलिसाने हात घातला. त्याचा निषेध करणाऱ्या पत्रकाराच्या ट्विटवर आलेली ही प्रतिक्रिया आहे. प्रतिक्रिया नोंदविणारी व्यक्ती लिहिते, ‘प्रियांका गांधींचे केस जर पुरुषांसारखे कापले असतील तर पोलिसाला ती बाई आहे की पुरुष हे कसे कळणार?’ ही प्रतिक्रिया अतिशय हिणकस तर आहेच पण त्यातली गृहीतकेही अतिशय पुरुषी आहेत. ‘बाई असून तुम्ही बाईसारखे दिसला-बोलला-वागला नाहीत तर तुमच्याविरोधात हिंसा होणे, तुमची छेडछाड होणे स्वाभाविक आहे’ या मेसेजमध्ये बाईसारखे म्हणजे काय हे ठरविण्याचा सर्वाधिकार पुरुषी मानसिकता स्वतःकडे घेते आणि आमच्या दृष्टीनं जे आदर्श आहे तशा तुम्ही नसाल तर तुम्हाला हिंसेला सामोरे जावे लागणार याची भीतीही घालतात. अशाप्रकारे बदनामी, चारित्र्यहनन, शारीरिक आणि लैंगिक हिंसेची भीती व त्याचा प्रत्यक्ष वापर यांच्या वापरातून उजव्या शक्ती स्त्रियांना काबूत ठेऊ पहातात. यांच्या जोडीला आपल्या विरोधातील स्त्री-पुरुष दोघांसाठी वापरली जाणारी काही समान तंत्रे आहेतच. कर्तृत्वाबद्दल शंका उपस्थित करणे, त्यांना अकार्यक्षम ठरवणे, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल शंका उपस्थित करणे यासारखी तंत्रेही विरोधी विचाराच्या स्त्री-पुरुषांना नामोहरम करण्यासाठी वापरली जात असतात.
उजव्या विचारधारेचे समर्थन करणाऱ्या स्त्रिया आपल्या विचारधारेबाहेरील स्त्रियांच्या विरोधात होणारी हिंसा, बदनामी, चारित्र्य हनन याकडे कशा बघतात? 
उजव्या विचारधारेच्या स्त्रियांचे व्यक्तिगत आयुष्य आणि त्यांच्या राजकीय भूमिका यात एक प्रकारची विसंगती असते. या स्त्रिया स्वतः घराबाहेर पडायचे स्वातंत्र्य उपभोगत असतात, राजकारण किंवा समाजकारणात करिअर करता असताना कौटुंबिक आयुष्याला जी तिलांजली द्यावी लागते, ती त्यांनीही दिलेली असते, मात्र इतर स्त्रियांसाठी त्या अवकाशाचा आग्रह धरताना दिसत नाहीत. स्त्रीने प्राय: कुटुंबाला प्राधान्य द्यावे, समाजाने आखून दिलेल्या मर्यादा पाळाव्यात यासारख्या बाबींचे समर्थन करत असताना आपण मात्र स्वतःसाठी त्याहून वेगळे असे वास्तव उपभोगत आहोत याचे भान सोयीस्कर सोडून दिले जाते. स्वतःसाठी मुक्ती आणि इतरांसाठी परंपरेची शक्ती असा दुटप्पीपणा आढळून येतो. आपल्या विचारधारेचे समर्थन न करणाऱ्या स्त्रियांविषयी त्यांना भगिनीभाव नसतो. वेगळ्या मताच्या स्त्रियांच्या विरोधातील हिंसेविषयी, चारित्र्य हननाविषयी त्या मौन पाळणे अधिक पसंत करतात. अलीकडच्या काळात हाथरसप्रकरणाविषयी, सोनिया गांधी यांच्यावर होणाऱ्या जहरी आणि अश्लाघ्य भाषेतील टिकेविषयी सत्ताधारी मोदी सरकार मधील स्त्री मंत्र्यानी बाळगलेले मौन हे याचे अगदी ताजे उदाहरणे झाले. 
 उजव्या शक्तींचा आज जगभरात उदय झाला आहे. पोलंड मध्ये दोन-तीन महिन्यांपूर्वी सत्तेवर आल्याआल्या उजव्या पक्षांनी घरेलू हिंसेपासून स्त्रीला संरक्षण पुरवणारा कायदा रद्द करून टाकला. या कायद्याचा आमच्या कुटुंब व्यवस्थ्येवर विपरीत परिणाम होतो आहे असतात कांगावा त्यांनी केला. अशा उदाहरणांच्या जोडीला इतरही काही चिरंतन प्रश्न आहेत. गर्भपाताच्या स्त्रीच्या अधिकाराविषयी ख्रिश्चन जगातील उजव्या पक्षांनी कायमच स्त्रीचे स्वातंत्र्य नाकारले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तानातील काही भागात उजव्या शक्तीनी स्त्रीचा शिकण्याचा अधिकार नाकारला आहे. भारतात बलात्काराच्या प्रकरणांत स्त्रीच्या चारित्र्याविषयी शंका उपस्थित करणारे आणि पुरुषांच्या मर्दानगीचे भलावण करणारे काही कमी नाहीत!  या पार्श्वभूमीवर उजव्या शक्तींच्या हातात सत्ता गेली की स्त्रियांच्या अधिकारांत घट होते आणि त्यांना दुय्यमत्व मिळते हे अधिकाधिक स्पष्ट होत जाते. म्हणूनच उजव्या शक्तींच्या विरोधातील लढा केवळ लोकशाही - सर्वंकष राजवटी, धर्मान्धता-धर्मनिरपेक्षता अशा चौकटीत लढणे पुरेसे नाही तर उजव्या शक्तींच्या विरोधातली लढाई ही समतेसाठीचा लढाई करणे देखील आवश्यक आहे हे आवर्जून ध्यानात ठेवणे गरजेचे आहे!




Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form