अलीकडेच 'गिली बेसॉन' या ट्रान्सवुमनच्या आयुष्यावर आधारित माहितीपट पाहिला.या माहितीपटाचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या स्वत:शी आणि समाजाशी होत असलेल्या संघर्षाचे दर्शन तर घडतेच आणि त्यासोबत 'गिली'ला कुटुंब आणि समाजातील विविध घटकांकडून वेळप्रसंगी मिळत गेलेली सौहार्दाची वागणूकही आपले लक्ष वेधून घेते. आपल्या लैंगिक ओळखीसहित विविध कलाप्रकारात स्वत:ला सिध्द करायची उर्मी , त्यासाठी घेतलेली मेहनत आणि समाजाकडून मिळत गेलेला सकारात्मक प्रतिसाद याआधारे 'गिली' एक आत्मविश्वासपूर्वक आयुष्य जगू शकते याचे या माहितीपटातून घडलेले दर्शन आपल्याला थोड्या प्रमाणात का होईना पण निश्चितच आश्वस्त करते. त्याचवेळी आपल्या आसपासच्या अनेक ट्रान्सजेन्डर व्यक्तींच्या आयुष्याची वाताहत डोळ्यासमोर येऊन अस्वस्थ वाटते. अशावेळी जगप्रसिध्द अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी आपल्या 'आयडेंटिटी अँड व्हायलंस' या पुस्तकात व्यक्त केलेल्या विचारांची आठवण होते. ‘व्यक्तीच्या एका विशिष्ट सामाजिक ओळखीला अनावश्यक महत्व दिल्याने किंवा व्यक्तीच्या विविध अस्मितांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने बर्याचवळेस त्या व्यक्तीचे आणि पर्यायाने समाजाचेही नुकसान होत असते’ – असे अमर्त्य सेन मांडतात. लैंगिक ओळखीच्या अनुषंगाने अल्पसंख्य असलेल्या, LGBTQI+ समाजगटातील बर्याच व्यक्तींबाबत अगदी हेच घडताना दिसते. अनेकदा 'सेक्सवर्कर' व 'भिक्षेकरी' म्हणून या समाजगटातील बर्याचजणांची उपेक्षा होताना आपण पाहतो. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवल्याने त्यांच्यावर सामाजिकदृष्ट्या अन्याय तर होतोच पण त्या व्यक्तिमधील क्षमतांच्या विकासालाही मर्यादा येतात. 'ट्रान्सजेन्डर' समुदायातील अनेकांची भरकटलेली, विस्कटलेली आयुष्य पाहिली कि महाराष्ट्र राज्याने यावर्षी स्थापन केलेली तृतीयपंथी हक्क संरक्षण महामंडळाची स्थापना किती आवश्यक होती याची जाणीव होते. परिस्थितीमध्ये आता हळूहळू बदल घडताहेत. पहिली ट्रान्सजेन्डर सरपंच , पहिली ट्रान्सजेन्डर शिक्षिका, पहिली ट्रान्सजेन्डर पोलिस - अशा आशयाच्या बातम्या वाचल्या की आशेचे किरण दिसायला लागतात. 'ट्रान्सजेंडर' ही एकजिनसी संकल्पना नाही. समाजाने स्त्री किंवा पुरुष असण्याच्या ज्या चौकटी आखून दिलेल्या असतात त्यापेक्षा निराळी लैंगिक ओळख जपणाऱ्या व्यक्तींना ‘ट्रान्सजेंडर’ म्हटले जाते. भारतीय समाजात 'किन्नर' , 'हिजडा' , 'जोगती' इ. अस्मिता बाळगून वावरणार्या ट्रान्सजेंडर व्यक्ती आहेत तसंच कोणत्याही समुहाचा भाग न बनता स्वतंत्रपणे आयुष्य व्यतित करणार्या व्यक्तीही आहेत. आज दोन ट्रान्सजेंडर व्यक्तींना कोरोनाकाळात आलेले अनुभव तुमच्यासमोर ठेवतो आहे. एक आहेत मोठ्या शहरात राहणार्या आणि हिजडा समुदायाशी संबंधित असणार्या पण त्या एकाच ओळखीपुरत्या मर्यादित न राहिलेल्या 'चांदणी गोरे' आणि सांगलीसारख्या तुलनेने छोट्या शहरातील एका उपनगरात 'जोगती' ही आपली ओळख अभिमानाने सांगणार्या 'मोना तुपलोंडे'
मोना तुपलोंडे
सांगली शहरात ग्रामीण जीवनशैली अनुसरणार्या मोना यांच्या कुटुंबियनी त्यांना एक 'जोगती' ( यल्लमा या देवीसोबत लग्न लागलेला पुरूष जो एक स्त्री म्हणून जगतो) म्हणून स्वीकारले आहे.अर्थातच कुटुंबाने स्वीकारण्याचा हा प्रवास मोना यांच्यासाठी साधासोपा नव्हता. स्वत:मधील बाईपणाशी प्रामाणिक राहण्याची मोनाची जबरदस्त इच्छाशक्ती आणि एका सामाजिक - राजकीय कार्यकर्तीने केलेली मध्यस्थी यामुळे काही वर्षे घराबाहेर राहिलेल्या मोनाला तिच्या माणसांनी स्वीकारुनही अनेक वर्षे लोटली आहेत.जोगती म्हणून भिक्षा मागणे आणि धार्मिक कार्यक्रम करणे हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे.आई , वडिल , बहिण आणि भाचीसोबत त्या राहतात. कडक लाॅकडाउनच्या काळात बाहेर पडता येत नव्हते त्यामुळे रोजच्या खर्चासाठी पुर्वी केलेल्या बचतीवर अवलंबून रहावे लागले असे मोना सांगतात.लाॅकडाउन थोडे शिथिल झाल्यावर मंगती आणि जोगवा ( दोन्हीही भिक्षेचे प्रकार आहेत) मागण्यासाठी मोना बाहेर पडायच्या. धार्मिक प्रभावामुळे तसेच मोनाच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांना पुरेशी भिक्षा मिळायची.इतक्या वर्षांच्या ओळखीनंतरही भिक्षा मागायला गेल्यानंतर काहीजण मोना यांना अपमानास्पद वागणूक देतात.पण त्या अशा मंडळींकडे दुर्लेक्ष करतात. 'देवाचा माणूस' म्हणून बहुतेकांकडून मिळणारी आदराची वागणूक वेळप्रसंगी तिरस्कारयुक्त नजरेमुळे अनुभवास येणार्या त्रासाची तीव्रता कमी करते , असे मोना यांचे विचार आहेत. "एवढ्या कोरोनाला घालवा आणि पाहिजे तेवढे पैसं घेऊन जावा" किंवा "लई दिवस झालं जोगवा घ्यायला आला नाही ?" मोना यांना उल्लेखून काढले गेलेले असे उदगार त्यांना सन्मानजनक वाटतात.
लाॅकडाउनच्या काळात जेव्हा फारसे घराबाहेर पडता येत नव्हते तेव्हा घरकामात आईला मदत करणे , घरच्या जनावरांची देखभाल करणे अशी कामे त्या करत होत्या. याचकाळात त्यांच्याकडची एक म्हैस व्याली तर याबतची जनावरांची काळजी घेण्यामध्ये वेळ आनंदात गेल्याचे मोना सांगतात. त्या जनावरांना चरायला घेऊन जायच्या त्यावेळी त्यांना स्वत:शी संवाद साधता यायचा आणि मग "देवी का केलस तु हे सगळं? नष्ट करायचं असलं तर एका क्षणात सगळं जगच संपून जाऊ दे म्हणजे मग आप्तस्वकियांच्या विरहाचे दु:ख कोणालाच सोसावे लागणार नाही." – अशा अर्थाचं काही त्या यल्लमादेवीशी बोलून मन मोकळं करायच्या. आईयल्लमा या कोरोनाच्या संकटातून आपल्याला वाचवेल असे मोना यांची श्रध्दा त्यांना सांगत असली तरी कोरोनापासून बचावासाठी त्या बाहेर जाताना मास्क वापरणे, वेळोवेळी सॅनिटायझर वापरणे हे आवर्जुन करतात. चैनीच्या वस्तूंसाठी कर्ज काढू नये , अनावश्यक खर्च टाळावा हि आर्थिक सूत्रे पूर्वीप्रमाणे यापुढील काळातही काटेकोरपणे अमलात आणायची हे मोना यांनी ठरविले आहे. याप्रकारच्या नियोजनामुळे आर्थिक बाबतीत कमी त्रास होतो असे मोना यांना वाटते. यल्लमा देवीवरील नितांत श्रध्दा , स्वत:वरचा विश्वास तसेच कुटुंबियांकडून , गुरूंकडून, चेल्यां(शिष्यां) कडून मिळणारे प्रेम या अस्थिर काळात मानसिक संतुलनासाठी मदत करणारे ठरले असे मोना सांगतात. मोना यांना नृत्याची आवड आहे किंबहुना या नृत्याच्या ओढीमुळेच त्यांचा देवदासी मेळ्याशी परिचय झाला जिथे त्यांना 'जोगती' म्हणून ओळख मिळाली.
तर या नृत्यामध्ये स्वत:ला काही प्रमाणात रमविणे आणि आपल्या लहानग्या भाचीसोबत खेळणे हे या लॉकडाउनमधील मोना यांचे विरंगुळ्यासाठीचे पर्याय होते. कोरोनाचं संकट दूर होऊन लवकरच त्यांचे धार्मिक कार्यक्रम सुरळितपणे सुरु व्हावे म्हणून त्या यल्लमाकडे रोज प्रार्थना करतात. शासनाकडून योग्य ती मदत मिळण्यासाठी तृतीयपंथीयांची संघटनबांधणी मजबूत असावी असे त्यांना वाटते आणि म्हणूनच एका विशिष्ट टप्प्यावर हिजडा किंवा जोगती अश्या प्रकारची लैंगिक ओळख असणारे सर्व ‘तृतीयपंथी’ या शीर्षकाखाली एकच आहेत असे त्या आवर्जुन नमूद करतात. विशिष्ट प्रकारच्या उपासनापध्दती मोना यांना 'जोगती' म्हणून ओळख देत असल्या तरी साकल्याने विचार करता अश्या प्रकारच्या धर्मनिष्ठ ओळखींचे व्यवस्थेतील स्थान आणि त्यातून निर्माण होणारे सामाजिक प्रश्न समजून घेण्यासाठी मोना यांना विवेकाच्या वाटेवरचा खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.
चांदणी गोरे
पुण्यातील 'निर्भय आनंदी जीवन' या सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा चांदणी या स्वत:ची ओळख 'हिजडा' अशी सांगतात पण त्याहीपेक्षा त्यांना स्वत:ची 'माणूस' ही ओळख महत्वाची वाटते असे त्या विशेषत्वाने नमूद करतात. विविध कार्यक्रमांमध्ये आपली नृत्यकला सादर करणे हा त्यांच्या उपजिविकेचा भाग आहे. त्यांचा स्वत:चा एक डान्स ग्रुप आहे. पुण्यात त्या स्वतंत्रपणे राहतात. पुण्यातील एका उपनगरात चांदणी यांनी भाड्याने घर घेतले तेव्हा परिसरातील काही उपद्रवी लोकांनी चांदणी यांच्या दारात विष्टा , निरोधची पाकिटे इ. आणून टाकली. आज त्याच परिसरातील चाळीस ते पन्नास महिला बचत गटाच्या माध्यमातून चांदणीशी जोडल्या गेल्या आहेत.चांदणी त्यांच्या सामाजिक संस्थेद्वारे तृतीयपंथीयांसोबतच इतर वंचित शोषित घटकांसाठी काम करतात. पुण्यातील विविध शाळांमध्ये जाऊन लैंगिक शिक्षणाचा अंतर्भाव असलेल्या कार्यशाळाही त्या घेतात.लाॅकडाउनच्या काळात काम बंद पडल्यामुळे इतरांसारखेच चांदणी यांनाही ताण तणावाला सामोरे जावे लागले. अगदी रोजचे अन्न शिजवतानाही त्यांना भविष्याची अनिश्चितता अस्वस्थ करीत होती. सुरवातीचा काही काळ असा गेल्यानंतर मात्र त्यांच्यातील सामाजिक भान चांदणी यांना स्वस्थ बसू देत नव्हते.लाॅकडाउनमध्ये शहरातील दानशूर व्यावसायिकांसोबत काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने पुणेशहर आणि ग्रामीण परिसरातील तृतीयपंथीयांना आवश्यक ते किराणा सामान पोहचवण्याचे काम त्यांनी केले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने एच.आय.व्ही ग्रस्तांची ए.आर.टी.ही औषधे त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचे कामही चांदणी यांनी केले. प्रामुख्याने 'सेक्सवर्क' मध्ये गुंतलेल्या आणि भिक्षेकरी असलेल्या तृतीयपंथीय समाजाचे कडक लाॅकडाउनच्या काळात खूप हाल झाले असे चांदणी सांगतात. तृतीयपंथीयांना मदत देताना पुण्यातील काही तथाकथित सुसंस्कृत मंडळींनी "तुम्हारे पास तो बहोत पैसे होंगे !!!" इथपासुन ते "ट्रान्सजेन्डर असल्याचा किंवा सर्जरी केल्याचा काही पुरावा दाखवू शकाल का ?" अशी उद्वेगजनक विचारणा केल्याचे त्या नमूद करतात. यासोबतच काही मंडळींनी सहानुभावाने, निरपेक्षपणे मदत केल्याचेही त्या सांगतात. लाॅकडाउनमध्ये वाणसामानाची मदत करताना काही तृतीयपंथीयांना चांदणी त्यांच्यापध्दतीने स्वावलंबन आणि स्वयंरोजगाराचे महत्व पटवून द्यायच्या. तृतीयपंथीयांनी स्वत:मधील कला कौशल्ये ओळखून त्यांना आकार द्यावा आणि सन्मानाने जगावे असे चांदणी यांना वाटते.लाॅकडाउनच्या काळात बाहेर पडताना चांदणी मास्क , सॅनिटायझर सारख्या गोष्टी बाळगून काळजी घ्यायच्या , तरी जवळ जवळ दररोज प्रेमापोटी आईने रडत रडतच बाहेर न जाण्याविषयी केलेली विनवणी त्यांना अस्वस्थ करायची. आईने व्यक्त केलेला हा स्नेहभाव चांदणी यांना त्यांच्या कुटुंबाशी जोडून ठेवतो. चांदणी यांना 'निर्भय आनंदी जीवन' ही त्यांची सामाजिक संस्था आपले विस्तारीत कुटुंबच आहे असे वाटते. कोरोनामुळे आलेले अडथळे दूर होऊन, संस्थेचे कामकाज पुन्हा पुर्ण क्षमतेने सुरु होण्याची चांदणी वाट पाहत आहेत. संस्थेमार्फत त्यांना अनेक प्रकल्प राबवायचे आहेत, त्यापैकी कम्युनिटी रेडिओ सुरु करणे हे त्यांचे स्वप्न आहे. याप्रकल्पाद्वारे आर.जे.बनण्याचे स्वप्न आणि सामाजिक उपक्रम या दोहोंची सुरेख सांगड घातली जाईल असे चांदणी यांना वाटते. लाॅकडाउनच्या निमित्ताने चांदणी गोरे यांच्याशी बोलल्यानंतर, त्यांचा स्वत:च्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण समजून घेतल्यानंतर मला पुन्हा एकदा प्रस्तुत लेखाच्या सुरवातीला उल्लेख केलेल्या 'गिली बेसाॅन'या ट्रान्सवुमनच्या आयुष्यावरील माहितीपटाची आठवण झाली.या माहितीपटाचा शेवट दिग्दर्शकाने अत्यंत कौशल्यपुर्णरीतीने केला आहे, या शेवटच्या दृश्यचौकटीत 'गिली' एका मनुष्यरुपी एअर बलुनला पकडून अत्यंत आनंदाने आणि आत्मविश्वासाने फोटोसाठी पोझ देत आहे असे दिसते. आपण ज्याक्षणी त्या मनुष्यरुपी एअर बलुनकडे नीट पाहतो त्यावेळी आपल्या लक्षात येते कि तो पुतळा स्वत:च्या तोंडात मारुन घेतो आहे. प्रस्तुत माहितीपटाच्या दिग्दर्शकाने माझ्यासमोर ठेवलेली हि दृश्यचौकट मला अंतर्मुख करुन गेली कारण त्या आत्मताडन करुन घेणार्या मनुष्यरुपी एअर बलुनच्या ठिकाणी मला आपल्या समाजाचे प्रतिबिंब दिसत होते.
ओंकार थोरात
कोल्हापूरच्या रेडियोसिटीमध्ये ओंकार आर.जे. आणि असो. प्रोग्रामिंग हेड आहे.





